आपल्यासमोर एखादा मोठा प्रश्न असला की पटकन आपण ‘यक्षप्रश्न’ असा त्याचा उल्लेख करतो. यक्षाने एक फार मार्मिक प्रश्न युधिष्ठिराला विचारला. ‘कि स्वित् बहुतरं तृणात्?’ म्हणजेच गवतापेक्षाही विपुल प्रमाणात जगात काय असेल?’ एक क्षणही न दवडता युधिष्ठिराने सुंदर उत्तर दिले. ‘चिंता’! गवत आपण कुठे पेरायला जात नाही. पावसात हिरवेगार डोंगर, माळरान डोळ्यांना, मनाला खूप आल्हाद देतात. चिंतादेखील प्रयत्नावाचून वाढते. कुठेही उगवते. मनाला आनंद मात्र अजिबात देत नाही. ‘सजीवाला जाळते ती चिंता आणि निर्जीवाला जाळते ती चिता’ असे सुभाषितच आहे. आज चिंताविरहित मनाने भुजंगासन करू या.
भुजंगासन
पोटावर शयनस्थितीत या. आता दोन्ही पावले पाठीमागे जोडून घ्या. पायाची नखे जमिनीला टेकलेली हवी. कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात छातीच्या सरळ रेषेत ठेवा. हाताचे अंगठे छातीच्या बाजूला. तळवा जमिनीला टेकलेला असेल.
 आता सावकाश कपाळ, हनुवटी, छाती या क्रमाने जमिनीवरून डोके वर उचला. नागाच्या फण्याप्रमाणे छातीपर्यंतचा भाग वर उचला. नाभीपासून पायापर्यंतचा भाग अगदी शिथिल ठेवा. दोन्ही हातांचे कोपरे जमतील तितके पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करा. छाती विस्तारली जाईल. दीर्घश्वसनाची आवर्तने करा. अंतिम स्थितीत श्वास रोखू नका. या आसनाच्या सरावाने पाठकणा, मानेचे स्नायू लवचीक होण्यास मदत होते.

खा आनंदाने! अस्सा नारळ सुरेख बाई..
वैदेही अमोघ नवाथे   आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
श्रावण सुरू झाला आणि बघता बघता नारळी पौर्णिमा उद्यावर आलीसुद्धा! वजन किंवा कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर नारळ जणू आरोग्याचा शत्रूच. पण आजी-आजोबांनो, प्रमाणात वापरला तर तो गुणीसुद्धा आहे. ओला नारळ / सुकं खोबरं / नारळपाणी सेवन करावं की नाही आणि किती प्रमाणात हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. १०० ग्रॅम खोबऱ्यामध्ये साधारण ३५० कॅलरीज मिळतात, पण त्याचबरोबर भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजंसुद्धा मिळतात. लोरिक आम्ल (lauric acid) हे फॅटी अ‍ॅसिड गुणकारी आहे, पण प्रमाणात घेतलं तरच.
 ज्या भाजीत नारळ घालायचा तर तेल एकदम कमी किंवा वाटणाच्या मसाल्यामध्ये इतर गरम मसाल्यांबरोबर भाजकं सुकं खोबरं कमी प्रमाणात घेतलं तरी तेवढाच स्वाद कायम ठेवतं. नारळपाणी लहान नारळाचं घ्यावं आणि बरोबर मलईसुद्धा. म्हणजे प्रथिन, लोरिक आम्ल आणि खनिज योग्य प्रमाणात मिळतात. खोबरेल तेल आम्ही त्यांना वापरायला सांगतो ज्यांना इतर तेल पचत नाही. कारण त्यात   MCT नावाचे फॅट्स असतात जे थेट वापरता येतात.
नारळी भात (तिखट)
साहित्य- २ टेस्पून तीळ, १ टीस्पून तूप, ३ टेस्पून काजू कणी, १/२ कप किसलेले नारळ, २ टीस्पून नारळ तेल किंवा इतर तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून उडीद डाळ, १ टीस्पून चणा डाळ, २  काश्मिरी लाल मिरची, ७ ते ८ कढीपत्त्याची पाने, १/२  टीस्पून हिंग, २ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, अडीच कप शिजवलेला भात, मीठ चवीनुसार
कृती – एक लहान पॅनमध्ये ३ ते ४ मिनिटे तीळ भाजून घ्यावे. थंड झाल्यावर खडबडीत पावडर करा. कढईत तूप गरम करा. मध्यम आचेवर काजू टाकून परता. काढा आणि बाजूला ठेवा. त्याच कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. मग जिरे, उडीद डाळ, चणा डाळ, लाल मिरच्या, कढीपत्ता पाने आणि हिंग घालून परता. मग तीळ पावडर, हिरव्या मिरच्या, शिजलेला भात, नारळ आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. काजू घालून सव्‍‌र्ह करावे.
यासह आणखी काही सोपे पदार्थ.
नारळ-टोमॅटो सूप – लहान तुकडे केलेला नारळ, दांडय़ांसकट कढीपत्ता, हिरवी मिरची तुकडे आणि टोमॅटो एकत्र उकळून मिक्सरमध्ये फिरवा आणि जिरं-हिंगाची, तुपाची फोडणी तोंडाला एकदम चव आणते. आलं-मिरची वाटून केलेले नारळ कोकम सार तर एकदम प्रिय आणि पुदिना-कोथिंबीर-नारळ-मिरची-आलं वाटून उडीद आणि लाल मिरचीची फोडणी केलेली चटणी – लय भारी!
मधुमेह असून नारळी पौर्णिमा नक्कीच साजरी करता येईल. नारळ फक्त जरा प्रमाणातच!

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

संगणकाशी मत्री : ओळख गुगल ड्राइव्हची
संकलन-गीतांजली राणे
आजी-आजोबा, आज आपण संगणकातल्या एका वेगळ्या पर्यायाची ओळख करून घेणार आहोत. हा पर्याय आहे गुगल ड्राइव्हचा. काय आहे नक्की गुगल ड्राइव्ह? सोप्या शब्दात सांगायचे तर आपल्या संगणकातल्या फाइल्स कधीही, कुठेही, सहज उपलब्ध करून देणारा पर्याय म्हणजे गुगल ड्राइव्ह! किंवा गुगलतर्फे दिली जाणारी ही फाइल साठवण्याची व हवी तेव्हा ती वापरण्याची सुविधा आहे. आपल्या फाइल्स गुगल ड्राइव्हमध्ये ‘सेव्ह’ वापरण्यासाठी अट फक्त एकच, तुम्ही ज्या उपकरणावर (संगणक, लॅपटॉप, टॅब, मोबाइल) गुगल ड्राइव्ह वापरणार असाल त्यावर इंटरनेटची सुविधा असायला हवी. जून २०१४ मध्ये, गुगल ड्राइव्ह वापरणाऱ्यांची संख्या १ कोटी ९० लाखांच्या आसपास गेली होती.
  गुगल ड्राइव्ह वापरण्यासाठी जीमेलचे ईमेल अकाऊंट असणे गरजेचे आहे. गुगल ड्राइव्हची सुविधा ५ जीबी स्टोरेज स्पेस (माहिती साठविण्याची मर्यादा) असून ती मोफत उपलब्ध आहे. त्यापेक्षा जास्त स्टोरेज स्पेस हवी असेल तर २.४९ डॉलर इतक्या किमतीला २५ जीबी स्टोरेज स्पेस दर महिन्याला विकत घेता येते. गुगल ड्राइव्ह वापरण्यासाठी  drive.google.com/start या संकेतस्थळावर जा. गेल्यानंतर आपल्यासमोर जीमेलचे लॉगिन पेज सुरू होईल. या पेजवर आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. आता आपल्यासमोर ‘क्रिएट’चा पर्याय दिसेल. या पर्यायाचा शेजारी असलेल्या बाणाच्या चिन्हावर ‘क्लिक’ करा. आता आपल्यासमोर फाइल्स, फोल्डर असे पर्याय दिसतील. यापकी आपल्याला ज्या प्रकारातील माहिती साठवून ठेवायची असेल तो पर्याय निवडा. अपलोड झालेली माहिती आपसूकच सेव्ह होईल. ही माहिती आपण कोणासोबतही शेअर करू शकता, तसेच कोणालाही मेल करू शकता. इतकेच नाही तर कधीही, कुठेही आपण सेव्ह केलेल्या फाइल्समध्ये बदल करू शकतो. आहे की नाही फाइल्स साठविण्याचा स्वस्त आणि मस्त पर्याय !     

आनंदाची निवृत्ती : कामात बदल हीच विश्रांती
मधुकर खोचीकर – chaturang@expressindia.com
तसं पाहिलं तर माझी दोनदा सेवानिवृत्ती झाली! पहिल्यांदा वयाच्या ३५व्या वर्षी भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालो तेव्हाची आणि दुसरी, वयाच्या ५८ व्या वर्षी बँक ऑफ महाराष्ट्रातून सेवानिवृत्त झालो तेव्हाची!
दुसऱ्या निवृत्तीच्या वेळी दोन्ही मुले आपापल्या मार्गाला लागली होती. स्वत:चे घर झाले होते. आर्थिक स्थितीही बऱ्यापैकी आणि स्वावलंबी राहाणीची झाल्यानं रिकामा वेळच होता. नियमित व्यायाम, आहार-विहार आणि पत्नीची सार्थ साथ होती. सुरुवातीला तिच्या घरगुती व्यवसायात, पोष्टाच्या बचत योजनेत मदत करत होतो, परंतु स्वत:चा एखादा मनाशी जपलेला छंद पुन्हा नव्याने जोपासायचा असं ठरवलं. पुरेसा वेळ तर होताच. लहानपणीचे गरिबीचे चटके, सैन्यातील खडतर जीवनातही आलेले अनुभव, बँकेतील नोकरीत ग्राहकांशी सुख-दु:खांची देवाण-घेवाण, नातेवाईक, मित्रांच्या जीवनातील घटनांचा साक्षीदार झाल्यानं ते कुठंतरी कागदावर उतरलं पाहिजे ही तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती आणि मग लिहीत गेलो. कथा आकाराला येऊ लागल्या. प्रतिष्ठित मासिके, दैनिकांच्या रविवार पुरवणीत त्या छापून येऊ लागल्या. वेळ छान आणि समाधानी जाऊ लागला. अनेक दिवाळी अंकांतही कथा प्रसिद्ध होत गेल्या. पहिला ‘मधुघट’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्याची दुसरी आवृत्ती निघाली, त्यानंतर ‘गांधार’ हा दुसरा कथासंग्रह व नुकताच ‘त्रिदल’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. आज वयाच्या ८० व्या वर्षीही लेखन चालू आहे. कथांची शंभरी केव्हाच पार पडली आहे.
अवतीभोवती घडणाऱ्या घटना, नियमितपणे वर्तमानपत्र वाचनामुळे ‘वाचकांच्या पत्रव्यवहारा’त पत्रे लिहीत गेलो. आजपर्यंत अशी सातशे ते आठशे पत्रे प्रसिद्ध झाली आहेत, तसेच दैनिकांच्या निरनिराळय़ा सदरात तीन-चार वर्षे लेख, मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणीवरून कथाकथन केले आहे. ‘चेंज ऑफ वर्क इज रेस्ट’ हे तत्त्व पाळलं तर जीवनातला खरा आनंद मिळतो याचा पुरेपूर अनुभव मला चिरतरुण करून सोडतो. आनंदाची निवृत्ती आणखी काय असते?  
निवृत्तिवेतनाबरोबर निवृत्ती वर्तनाचाही विचार
प्रकाश दामले -damlep72@gmail.com
‘किर्लोस्कर कोपलॅण्ड’ कंपनीतून ३५ वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर मी ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’ या पदावरून २००५ साली निवृत्त झालो. तोपर्यंत मी निवृत्तिवेतनाबरोबर निवृत्ती वर्तनावरही विचार-चिंतन-मनन केले होते. मनाप्रमाणे आवडीची कामे करायला निवृत्तीनंतर स्वातंत्र्य मिळणार होते, मात्र हे स्वातंत्र्य आनंदात व्यतीत करण्यासाठी, मानसिक, शारीरिक, आíथक तरतूद करायचा मी प्रयत्न केला. तसेच दरवर्षी काय-काय करायचे या गोष्टींची यादीही प्रत्येक वर्षी १ जानेवारीला करत आहे व त्यातील ८० टक्के गोष्टी पूर्ण करण्यात यशस्वी होत  आहे.
निवृत्तीनंतर सर्वप्रथम मी राहतो त्या प्रकाशनगरमध्ये फुलझाडे लावण्यास प्राधान्य दिले. उद्देश हाच होता की किमान ५० जणांना दररोज ५-६ प्रकारची फुले, दुर्वा व तुळस पाहिजे तेवढी मिळेल. त्यासाठी जवळजवळ ७० झाडे लावली आहेत. अंदाजे ३१ प्रकारची फुले मोसमानुसार फुलतात तिथे आता! सोसायटीतील व कराडमधील नागरिक ती देवाला अर्पण करतात. ते करण्यासाठी व झाडांची निगा राखण्यासाठी दररोज अडीच तास कसे निघून जातात ते कळत नाही. सकाळचे काम असल्याने मोकळ्या हवेत वेळ व्यतीत होतो व त्यामुळे तब्येतही उत्तम राहिली आहे. झाडांना पाणी घालणे, औषधे फवारणे, नवीन झाडे लावणे, छाटणी करणे, यांसह सोसायटीतील गवत काढणे, बाहेर पडलेले प्लास्टिक, कागद व इतर कचरा गोळा करून तो ओला व सुका असे करून नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने योग्य त्या ठिकाणी पाठविणे अशी कामे स्वयंस्फूर्तीने करतो.  
नागरिकांना बाहेर/ रस्त्यावर कचरा टाकू नका, टाकला असल्यास उचलून योग्य त्या ठिकाणी ठेवण्यास सांगतो. परिसर स्वच्छ राहतो. तसेच आता डास निर्मूलनावर काम करतो आहे. प्रकाशनगर डासमुक्त करण्यासाठी काम करायचा प्रयत्न चालू आहे. माझे शेजारी, अच्युत कुलकर्णी व कांतीभाई मेहता हेही मला मदत करत असतात. या वृक्षारोपणाच्या छंदाने मला समाधान तर दिलेच मात्र सामाजिक कर्तव्य बजावण्याची संधीही मिळाली.
नोकरीत असताना वीस देशांत जायची संधी मिळाली तसेच जगातील अनेक नामवंत सल्लागारांची भाषणे ऐकण्याचेही भाग्य लाभले. माझ्या व्यावसायिक कौशल्यांचा उपयोग कराड परिसरातील विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापीठ मॅनेजमेंट संस्था, आय.एस्.बी.एम्. तसे किर्लोस्कर इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स मॅनेजमेंट या संस्थातून वेगवेगळे विषय शिकवत आहे. याबरोबरच ‘छान प्रस्थाश्रम’ हे पुस्तकही लिहिले आहे. कंटाळा येण्यासाठी वेळच कुठे आहे?