13 December 2019

News Flash

सुखाशी भांडतो आम्ही?

‘‘आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली. पण आमच्यात म्हणावं तसं काहीच नाही.

|| डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

आपण पुढारलो म्हणजे नेमकं काय झालं? तर आपली सर्वसाधारण जीवनशैली, जीवनमान उंचावले. नुसतेच सुशिक्षित असण्याऐवजी आता आपण उच्चशिक्षित आहोत. आपली घरे, आपला वावर सगळे कसे चकाचक झाले. सगळी सुखे हाताशी आली, मात्र आता साध्या भाषेत सांगायचं तर ‘सुख दुखायला लागलं.’ नाहीतर सगळं स्थिरस्थावर असताना नवरा-बायकोंमध्ये वादाचे, न पटण्याचे विषय तरी काय असतील, नाही का?  परंतु अशा प्रत्येक जोडप्याच्या सद्य परिस्थितीत डोकावून पाहिलं तर काही त्याच त्याच बाबी कारणीभूत आहेत हे दिसते.. कोणत्या आहेत या बाबी हे सांगणारा हा लेखाचा पूर्वार्ध.

‘‘आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली. पण आमच्यात म्हणावं तसं काहीच नाही. आता मूल हवं यासाठी घरचे सगळे मागे लागलेत. आम्हालाही तसंच वाटतं. तर त्यासाठी तरी आम्ही नवरा-बायकोच्या नात्याने राहिलं पाहिजे ना.’’

‘‘दीडेक वर्षांपूर्वी लग्न झालं, पण आता लक्षात येतंय की ही चूकच केली मी. मला यातून लवकरात लवकर बाहेर पडायचंय.’’

‘‘माहीत नाही या दोघांची समस्या काय आहे. पण यांच्यात सतत भांडणं, कुरबुरी चालू असतात. चार दिवससुद्धा एकत्र, प्रेमाने राहू शकत नाहीत. आता तर थोडे दिवस ‘ब्रेक’ घेऊन पाहू म्हणतात.’’

‘‘लग्न करताना सगळी काळजी घेतली. अगदी एकमेकांची अनुरूपतासुद्धा तपासून बघितली होती. पण तरीही आता यांचं अजिबातच पटत नाही. सूनबाई माहेरी गेल्या त्याला चार महिने झाले. पण हा आणायलाही जात नाही. किंवा परत ये, सुद्धा म्हणत नाही.’’

वरच्या सगळ्या उदाहरणांचे केंद्रिबदू, म्हणजे लग्न झालेली जोडपी. तीसुद्धा अतिशय सुशिक्षित, सुविद्य, सुस्थितीत असणारी.

एकंदरीतच सध्याची परिस्थिती पाहिली, तर लग्नसंस्था आणि असलेली लग्नं टिकून राहणं या सर्वावरच एक मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. बहुतांश लग्नं अतिशय समजून-उमजून, व्यवस्थित शिक्षण झालं, एखादी नोकरी-व्यवसाय यात थोडीशी स्थिरता आली की केली जातात. पूर्वीसारखी ‘वयात आलं की, उजवून टाका,’ असं नक्कीच नाही. तरीही ‘लग्न’ या एकंदरीत प्रकाराबाबतच साशंकता निर्माण व्हावी, अशी खरी परिस्थिती आहे. पटापट मोडणारे संसार किंवा वाढणारे घटस्फोटाचे प्रमाण, याला क्वचित प्रसंगी लागणारं हिंसक वळण, यातून घडणारे गुन्हे, या प्रथमदर्शनी दिसणाऱ्या समस्या आहेतच. परंतु या सगळ्याच अनुषंगाने समोर येणारी बदलती मानसिकता, त्यावर होणारे आघात, मानसिक आजार, तक्रारी यात होणारी लक्षणीय वाढ, वाढत्या आत्महत्या, आणि समाज म्हणून निकोप, निरोगी न राहता, या सगळ्याच्या परिपाकातून तयार होत असलेला एक आत्मकेंद्री, रोगट, मनोवृत्तीचा समाज.. हे खरे आपल्यापुढचे आव्हान!

नात्यांमध्ये तेही वैवाहिक नात्यांमध्ये इतक्या समस्या का तयार व्हायला लागल्या? या सगळ्या जोडप्यांमध्ये, त्यांच्या समस्यांमध्ये एकसारखे सूत्र दिसते, ते म्हणजे, एकमेकांत तयार न झालेले नाते. असतो तो केवळ त्या नात्याचा आभास आणि त्याला असणारं एखादं गोंडस नाव, जसं की ‘लग्न झालेले जोडपे.’ या नावाचा विशेष एकच की केवळ त्यामुळे, समाजमान्य अशा पद्धतीने एकत्र राहणं सोपं होतं, इतकंच. पुढे ते एकत्र राहणं मनाजोगतं घडलं की त्यातून फुलतो तो संसार. पण याआधीच काही काळातच रोजच्या सामान्य व्यवहारातून, बरेच खटके उडतात, एकमेकांशी पटत नाही हे लक्षात येतं आणि या सगळ्यालाच खीळ बसतो.

आपण पुढारलो म्हणजे नेमकं काय झालं? तर आपली सर्वसाधारण जीवनशैली, जीवनमान उंचावले. नुसतेच सुशिक्षित असण्याऐवजी आता आपण उच्चशिक्षित आहोत. यात समाजातले बरेचसे स्तर येतात. या सगळ्यासोबत आपली घरे, आपला वावर सगळे कसे चकाचक झाले. सगळी सुखे हाताशी आली, मात्र आता साध्या भाषेत सांगायचं तर ‘सुख दुखायला लागलं.’ नाहीतर सगळं स्थिरस्थावर असताना वादाचे, न पटण्याचे विषय तरी काय असतील, नाही का? हो हा विचार अगदीच पटण्यासारखा. परंतु अशा प्रत्येक जोडप्याच्या सद्य परिस्थितीत डोकावून पहिलं तर काही त्याच त्याच बाबी करणीभूत आहेत हे दिसते.

  • घरच्या इतर मंडळींची नको इतकी ढवळाढवळ. यात दोन्हीकडचे आईवडील, सख्खे भाऊ-बहीण इथपासून ते अगदी लांबचे नातेवाईक यापकी कोणाचीही. त्यांची मते, दृष्टिकोन याला दिलेले अवास्तव महत्त्व. उदा. ‘‘तुम्ही सारखे कशाला बाहेर जाऊन खाता,’’ ‘‘वेळी-अवेळी असं फिरायला जाऊ नका,’’  ‘‘सतत दोघांनीच काय राहायचं?’’‘‘तुम्हाला जबाबदारीने काही गोष्टी केल्याच पाहिजेत.’’
  • स्वतंत्र-विभक्त असल्याचा आभास, परंतु खरेतर बऱ्याच बाबतीत नकळत गुंतली जाणारी जोडपी. उदा. ‘‘तुमच्या कामाच्या वेळा काहीही असोत. सुट्टी घेऊन अमुक एका सणाला हजर झालंच पाहिजे.’’ ‘‘महिन्यातून दोनदा तरी घरी चक्कर टाकणं कसं जमत नाही तुम्हाला?’’ ‘‘तिथे काय तुमचा राजा-राणीचा संसार!’’ किंवा फोन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने यांच्या आयुष्यात रोज काय चाललेलं असावं याचा सतत आढावा घेण्याची वृत्ती असणारी घरची मंडळी. त्यातून दिले जाणारे नकोसे सल्ले. एखाद्या वागणुकीवर ओढलेले ताशेरे. किंवा नको असताना केली जाणारी टिप्पणी.
  • कुटुंबनिहाय बदलणाऱ्या जगण्याच्या, सण- समारंभ साजरे करण्याच्या, किंवा धार्मिक विधीतल्या पद्धती आणि त्याचे अकारण माजवलेले स्तोम. हे थोरामोठय़ांकडूनच होते असे नाही तर, कित्येकदा कोणत्याही वयातील स्त्री-पुरुष हे बोलताना आढळतात. उदा. ‘‘तिला हे कसं समजत नाही? आमच्याकडे कोणीही रात्री खिचडी खात नाही. ती मात्र आठवडय़ातून चारदा खिचडी करते.’’ किंवा ‘‘माझ्या घरी या विशिष्ट सणाला सासूने साडी घ्यायची असते. यांनी मात्र मला घेतलीच नाही.’’
  • आपल्या सर्वाच्या आजूबाजूला असणारी मित्र-मंडळी, आपण जपलेले नातेसंबंध आणि त्यांची मत-मतांतरे याचा आपल्यावरती होणारा परिणाम.
  • आई-वडील आणि जोडीदाराशिवायचे आपले कुटुंबीय, यांचे महत्त्व जोडीदारासमोर टिकवण्याचा चाललेला अतोनात खटाटोप. उदा. ‘‘मी तिला स्पष्टच सांगितलं, तुला आईसोबत जमवून घेता येत नसेल, तर मी काही तुझ्यासाठी वेगळं राहणार नाही किंवा तिला सतत समजावूनही सांगणार नाही. तू तुझा निर्णय घे.’’ किंवा ‘‘माझे आई -बाबा जर काही कार्यक्रम ठरवत असतील आणि त्याला तुला यायला जमणार नसेल, तुझी सतत काही न काही कारणं असतील तर आपलं एकत्र राहणं अशक्यच.’’
  • नात्याची सुरुवात झाल्यापासूनच एकमेकांत असणाऱ्या विश्वासाच्या जागी पेरला जाणारा अविश्वास, नसलेली पारदर्शकता किंवा आपलेच महत्त्व टिकून राहावे यासाठीची चढाओढ.
  • नाते गुंफताना सुरुवातीला ते कसेही करून गुंफले जावे यासाठी केवळ स्वत:मधले गुण समोर मांडून, असलेल्या इतर सवयी, किंवा स्वभावातले काही कंगोरे दडवण्याची वृत्ती. आणि कालांतराने ते समोर आले की उडणारा गोंधळ. उदा. ‘‘आमची मुलगी तापट आहे हे मान्यच. पण आता तिशी उलटून गेली तरीही लग्न होत नव्हतं, तेव्हा लग्न ठरवताना तिला मी सांगितलं की त्यांना तुझ्या तापट स्वभावाचा अंदाज येऊ देऊ नकोस. लग्न झालं की सगळेच सांभाळून घेतात. सगळं होईल सुरळीत.’’ किंवा ‘‘हा पस्तिशीचा असला तरीही, याला सगळं हातात द्यावं लागतं. त्याला तशी सवयच आहे लहानपणापासून. त्याच्या या सवयीला ती सरावेल असं वाटलं होतं. पण आता तेच त्यांच्या वादाचं मोठ्ठं कारण बनलंय.’’
  • वैयक्तिक आर्थिक परिस्थिती, कामाच्या ठिकाणी असणारे हुद्दे याबाबत असणारी चढाओढ. त्यातून निर्माण होणारी असूया आणि यात गळचेपी करण्याचा प्रयत्न.

ही आणि अशी कितीतरी महत्त्वाची कारणे. परंतु यात कुटुंब म्हणून आधार मिळण्याऐवजी अनेकदा असलेली परिस्थिती कशी चिघळेल अशा पद्धतीची कुटुंबातील मंडळींची वागणूक असते. इथे ‘आपला तो बाब्या’ करण्याच्या नादात, आपणच थाटून दिलेला संसार मोडीत काढत आहोत हेसुद्धा लक्षात येत नाही.

या जोडप्यांशी बोलताना, त्यांचं ऐकून घेताना, त्यांना एकमेकांबाबत काय तक्रारी आहेत, असे विचारले की इथे सर्वात प्रकर्षांने जाणवते म्हणजे त्यांचे कुटुंबाशी जमत नाही. तक्रारीची सुरुवात तिथून असते. ते एकत्र राहणारे असो किंवा मलोन्मल लांब राहणारे कुटुंब असो. पण जोडीदारापेक्षा इतर लोकांनीच वागण्याचे मोजमापन करून एक निर्णय दिलेला असतो. तो तसाच्या तसा या जोडप्यांच्या डोक्यात कोरण्यापर्यंतदेखील या लोकांना यश येते. तिथून पुढे तीच एक पट्टी किंवा परिमाण वापरून, पुढचे सगळे बघितले जाते.

अशा वेळेस आपली शैक्षणिक पात्रता काय, ताíककदृष्टय़ा आपल्याला हे पटते का? किंवा जिच्यासोबत आपण सतत राहतो, त्या व्यक्तीच्या सगळ्या गुणदोषांची पारख सतत करत बसण्याने नाते घट्ट होईल, की ते संपून जाईल, असे प्रश्न पडतच नाहीत. या लग्नांकडे, नात्यांकडे मग ‘वाटेतील अडथळा’ असेच पाहिले जाते.

कुटुंब म्हणून असणाऱ्या वडील व्यक्तींनी इथे फारच काळजीपूर्वक, जबाबदारीने वागणे अपेक्षित असते. दोन्ही बाजूंच्या कुटुंबात एका नवीन व्यक्तीची भर पडलेली असते. तिला वयानुसार अपेक्षित असणाऱ्या पोक्तपणातून, सामंजस्यातून, सामावून घेणे हे खरे काम. त्यासाठी त्या नवीन व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आदर असणे गरजेचे. तिची मते, आवडीनिवडी, सवयी, हे सारेच थोडेसे तटस्थपणे पाहिले, तर त्या व्यक्तीचा स्वभावही आवडू लागतो. इथे मात्र केवळ स्वत:चे अस्तित्व आणि महत्त्व याला धरून बसणाऱ्या कुटुंबातील वडील व्यक्ती, कळत-नकळत खलनायकी भूमिका व्यवस्थित पार पाडतात.

(या लेखाचा उर्वरित भाग २४ ऑगस्टच्या अंकात)

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on August 10, 2019 12:04 am

Web Title: the human lifestyle mpg 94
Just Now!
X