उन्हाची तलखी सोसता सोसता, मी पावसाची वाट पाहात असते आणि मनाच्याही नकळत, इच्छेविरुद्ध अप्रिय आठवणी मनाला दु:खचिंब करतात. प्रत्येक सणाची आठवण गेलेल्या ‘तिची’, ‘त्यांची’ यांच्याशी धागा जुळवत राहते. वटपौर्णिमेदिवशी आईने गरजवंत स्त्रियांना स्वहस्ते केलेल्या स्वेटर्सचे दान, बहिणीने केलेल्या वर्षांऋतूच्या कविता, पावसात जसे भूमीतून कोंब निर्माण होतात तसे स्मृतींचे हे कोंब..

उन्हाची तलखी शिगेला पोहोचता, पोहोचताच, वळवाच्या सरी पडायला लागल्या. पहिला वळीव,   दुसरा वळीव आणि मग वर्षांऋतूच्या पाऊसधारा सुरू झाल्याच.. खिडकीतून दिसणाऱ्या हिरवाईकडे झुकणारी झाडे, रस्त्यावरून पाऊस तुडवत जाणारी शाळेच्या गणवेशामधली चिमुकली, डोळ्यांना रिझवू लागली आणि अनेकानेक वर्षे मध्ये गेली, तरी माझा छोटा मुलगा मनात येऊन उभा राहिला, रडणारा..
  त्याचा नवा गणवेश, दप्तर आणून झालं होतं. नवीन शाळा सुरू होऊन आठवडाभरच झाला होता. शाळा आता आवडू लागली होती आणि अचानकच एका रविवारी रात्री वडिलांचा फोन आला. ‘‘तुम्ही (मी आणि माझी धाकटी बहीण) पुण्याहून ताबडतोब निघा. माँ खूप आजारी आहे, मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केली आहे.’’ धक्का देणारी बातमी.. मागच्याच आठवडय़ात दादा (वडील) पुण्याला आले होते, तेव्हा आईने माझ्या एम.ए.च्या डिस्टिंक्शनचे कौतुक म्हणून पाठवलेली छान साडी, सांगलीचा भडंग आणि घर आणि मुलं सांभाळून अभ्यास केला म्हणून चार कौतुकशब्द लिहून पाठवलेली चिठ्ठी.. साडीची घडीही अद्याप तशीच. भडंगाचा पुडा अर्धा शिल्लक. इतक्या अत्यल्प काळात असा काय प्रलय झाला?
सोमवारी सगळी रिक्षात बसून रेल्वे स्टेशनवर जाताना, माझ्या मांडीवर बसलेला छोटा रडत होता. त्याला शाळेत जाणारी मुलं दिसत होती. ‘सांगलीला नाही जायचं. स्कूलला जायचंय.’ प्रवास सुरू झाला. हाच ऋतू, हेच रंग, पावसाच्या सरी, हिरवे डोंगर आणि वळून वळून पुढे जाणारी रेल्वेची गाडी. सहप्रवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आम्हा दोघींच्या मनात कुठेही उतरत नव्हता. फक्त चिंता. आईची आणि आम्ही पुण्यात मागे ठेवून आलेल्या दोघींच्या मुलांची..
 त्यानंतरचा अवघा वर्षांऋ तू हॉस्पिटलच्या फेऱ्या, औषधांचे वास, फक्त निराशेचेच खेळ, कुटुंबाची विस्कटलेली घडी, सणवार आणि चातुर्मास मुकाट आले गेले. घरी गोडधोड शिजले नाही, की उत्साहाचे वारे नाही. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यातला आईचा मृत्यू. किती वर्षे मध्ये गेली तरी पावसांच्या पहिल्या धारा, दु:खदायक आठवणी पुन्हा नव्याने मनात उभ्या राहतात. काळ हे औषध आहे, हे भाष्य खोटे ठरवीत, श्रावणधारातून छत्र्या घेऊन भिजत भिजत घातलेले हॉस्पिटलचे हेलपाटे, खचत जाणारी उत्साही आई, आणि श्रावणाअखेरचे तिचे दहावे-तेरावे.
पाऊस पडतच असतो. दु:खाची तीव्रता अगदी बोथट झालेली.. इतका काळ मध्ये गेलेला असतो, पण परत एकदा तेच ऋतुचक्र तशाच परिस्थितीत आम्हाला आणून सोडते. काळाची वीसेक वर्षे, उन्हाळा, थंडी, पावसाळा या ऋतुचक्रातून फिरून आली होती आणि नेमके तेच आईच्या वेळेचे ‘रोगपर्व’ परत घरी अवतरले, आता बहिणीच्या संदर्भात. काळ बदलला, औषधे सुधारली, घरचीच मुले डॉक्टर्स झालेली, पण हिरव्या ऋतूने परत चकवा दिला. परत मृत्यू.. अकालीच झालेला.. रिमझिमत्या पावसातली दहावं-तेरावं.
आमच्या लेखी वर्षांऋतूचा रंग दु:खाचा.. कारण वडीलही आषाढी एकादशीच्या पावसात अचानक गेले. तसे अकालीच म्हणावे असे आणि मनीध्यानी नसताना.. उन्हाची तलखी सोसता सोसता, मी पावसाची वाट पाहात असते आणि मनाच्याही नकळत, इच्छेविरुद्ध त्या अप्रिय आठवणी मनाला दु:खचिंब करतात. प्रत्येक सणाची आठवण गेलेल्या ‘तिची’, ‘त्यांची’ यांच्याशी धागा जुडवत राहते. वटपौर्णिमेदिवशी आईने गरजवंत स्त्रियांना स्वहस्ते केलेल्या स्वेटर्सचे दान, बहिणीने केलेल्या वर्षांऋतूच्या कविता, पावसात जसे भूमीतून कोंब निर्माण होतात तसे स्मृतींचे हे कोंब..
खरंच, ऋतूंना निसर्गाने आणि नंतर मानवाने एक रंगरूप बहाल केले आहे. एक व्यक्तिमत्त्व प्रदान केले आहे, पण हे खरं आहे? माझ्या मते ऋतूंचं नातं मनाशी अधिक घट्ट आहे. सुखद आठवणीने ग्रीष्म ऋतूतही उत्साह येऊ शकतो मनावर, तर भर पावसात दु:खद आठवणींनी तलखी होते. या संदर्भाला एक आयाम आहे. शालेय वयात कोल्हापूरच्या डॉ. सुमती क्षेत्रमाडे या प्रख्यात लेखिकेची कादंबरी वाचली होती. ‘श्रावणधारा’ नावाची एक तरुण, नवविवाहित मुलगी. हुशार, सालस सर्वाना प्रिय अशी. साधी सरळ निरोगी असणारी ती तरुण मुलगी, पावसाळ्यात मात्र दम्याची शिकार होते. अत्यंत आजारी असते. ओळीने काही वर्षे असंच आणि हेच. डॉक्टरीणबाई औषधोपचार करतात; परंतु मनाचे शरीरनाते त्यांना डॉक्टर आणि सुजाण मानसशास्त्रीय अभ्यासक या नात्याने माहीत आणि मान्य असते. त्या त्या दमेकरिणीच्या पूर्वायुष्याचा पट तिच्याकडून आस्ते-आस्ते जाणून घेतात आणि तिची आई श्रावण पावसात आजारी पडलेली असते आणि मृत्यू पावते तीही श्रावणातच. तेव्हाच्या त्या बालजीवाने आईचे हाल आणि मृत्यू पाहिलेला असतो आणि तरुणपणी मनात गाडलेले मरणभय कोसळत्या श्रावणसरीत दम्याचे रूप घेऊन अवतरते. पुढे डॉक्टरबाई हे भय कमी कमी करण्यात यश मिळवतात आणि ती शरीर आणि मनाने फुलते, खुलते आणि श्रावणसरीत छत्रीही न घेता, मनमुराद फिरायला, भिजायला, उत्साही मनाने बाहेर पडते. अशी ही हृदयस्पर्शी साहित्यकृती आजही मनात ताजी आहे.
ऋतू, गंध, निसर्ग, देश-प्रदेश, फुलांमुळे या साऱ्या संकल्पना थेट मनाशी भिडलेल्या असतात. ऋतूंना रंग असतो तो मनाचा. मन आनंदी असेल तरच इंद्रधनुष्याचे रंग दिसतात. एरवी नाहीच. इतरांप्रमाणे वर्षांऋतू हा मलाही हवाहवासा वाटणाराच ऋतू आहे. पाचूच्या हिरव्या माहेरी मन रमावेसे वाटतेच; परंतु एक योग म्हणा किंवा नियती म्हणा, माझ्या माहेर-सासरच्या सगळ्याच मृत्यूंना पाऊससरीच साक्ष होत्या. त्यामुळे मातीचा ओला सुगंध आला, की विस्मरणाचे पांघरूण पडलेल्या स्मृती, वर्षांचे, दशकांचे टप्पे ओलांडत मनाच्या पृष्ठभागावर येतात. अस्वस्थपणा जाणवतो.
 मग आता जाणत्या वयाने मलाही एक समज दिली आहे. ‘गेलेल्या’ जवळच्यांच्या सुंदर आठवणी मी मनात आणते. आईंचे सणावारी सजलेले सुंदर रूप, हॉर्मोनियमवर फिरणारी बोटे, बहिणीची सुरेल सतार, रजनीने (मैत्रीण) केलेली पावसाळ्यातली खेकडा भजी, सासूबाईंचे चातुर्मासातले उपास अशा सुखद आठवणी आवर्जून नव्याने मनात घोळवते. आवर्जून मुद्दाम ‘नकोशा’ आपोआप मागे सरतात.
एक-दोन पावसाळी आठवडे सरतात आणि या ‘सुखदस्मृती’ थेरपीने मनाला पाऊससरी ओल्याचिंब करू लागतात. सुमतीबाईंच्या ‘श्रावणधारा’ कादंबरीने शरीरमनाचे अन्योन्य नाते दाखवले आहे.
ते नुसतेच वाचण्यापुरते नाही, तर आचरायचेही आहे. या प्रौढ समजुतीने, मी नव्याने पावसाळ्याचा ऋतुगंध अनुभवते.. मनोभावे.. ओव्या आणि आनंदी सुगंधासह..   

Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा