आभाळमाया : उदय दंडवते

‘‘आईने आयुष्यभर समाजसेवा केली. संस्था बांधल्या. सत्याग्रह केले. सेवा दल कलापथकात नृत्य, तमाशे आणि नाटक केले. तरीही नानांची सहचारिणी म्हणून आपली जबाबदारी पूर्णपणे बजावली. इच्छांना आणि आकांक्षांना लगाम घातला, पशांच्या कमतरतेचा परिणाम माझ्या शिक्षणावर कधीच होऊ दिला नाही. आईने कायमच मला पत्र लिहून माझ्या अंतर्मनातील शंकाकुशंकांना उत्तरे पाठवली. मनात वादळे अनेक आली. मनातली नाव हिंदकाळली जरूर. परंतु आईस्वरूप दीपस्तंभ दिशा शोधायला मदत करण्यासाठी खंबीरपणे उभा होता.’’ उदय दंडवते सांगताहेत त्यांची आई प्रमिला दंडवते यांच्याबरोबरच्या आजही चालू असलेल्या संवादाविषयी..

Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
married woman murder her son
सोलापूर : लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण उजेडात येऊ नये म्हणून विवाहितेने केला मुलाचा खून अन् स्वतः केले विषप्राशन
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

आमचे नाना (मधू दंडवते) म्हणायचे, भीती वाटली की, ‘‘अरे बापरे,’’ हे उद्गार आपल्या तोंडून निघतात, पण जेव्हा वेदना होते तेव्हा आपण कळवळून, ‘‘आई गं’’ म्हणतो. जेव्हा कधी नानांचे हे उद्गार मला आठवतात तेव्हा जाणीव होते की जन्मदाती आई  निसर्गाचे देणे असते. बालपणी संगोपन करण्यात तिचे जेवढे योगदान असते त्यापेक्षा कैक पटींनी अधिक आईचे देणे म्हणजे तिच्या  बिनशर्त मायेमुळे आयुष्यभर पुरणाऱ्या आणि कायम जागृत  रहाणाऱ्या कणव आणि करुणा या दोन मूलभूत मानवी क्षमता!

आईला जाऊन या वर्षी अठरा वष्रे होतील. या अठरा वर्षांत असा एकही दिवस गेला नाही की माझ्या तोंडातून ‘‘आई गं’’ हे शब्द निघाले नाहीत. कधी कधी जेव्हा जीवनाच्या वाटचालीत भरकटल्यासारखे, हरवल्यासारखे वाटते तेव्हा शाश्वत मूल्यांची आठवण देत आई नेहमीच अंतर्मनात उपस्थित असते. मला ईश्वराची कधीच गरज पडली नाही. कारण पूजापाठ आणि नवस न करता रोजच पावणारी आई मला ईश्वरापेक्षा जास्त मौल्यवान वाटते.

आईविषयी हा लेख लिहायला बसलो आणि मनात जणू काही एक चित्रफीतच सरकू लागली. लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात आयुष्य घालवलेल्या प्रमिला दंडवतेचे तिच्या एकुलत्या मुलाबरोबरचे नाते कसे असेल याबद्दल वाचकांना कुतूहल असेलच हे जाणून मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून हा लेख लिहायचे ठरवले. या लेखातून समाजकार्याला जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलांशी सहवेदना ठेवून मी माझे विचार व्यक्त करीत आहे. समाजकार्याला जीवन अर्पण केलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलांमध्ये दुर्लक्षित झाल्याची भावना निर्माण होणे साहजिक असते. ‘आणीबाणीतील पत्रे’ या आई आणि नानांच्या पत्रव्यवहाराच्या संकलनात एके ठिकाणी मी नानांना लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख आहे. ‘‘जर समाजसुधारणा करण्यासाठी जीवन द्यायचे असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलं-बाळं करून कौटुंबिक बंधने का करून घ्यावीत?’’ असा प्रश्न मी नानांना विचारला होता. त्याचा उल्लेख नानांनी आईला लिहिलेल्या पत्रात केला आणि त्यावर, ‘‘आई-वडील असताना देखील उदय पोरका झाला आहे,’’ अशी टिप्पणी केली होती. त्यावर आईने मला लांबलचक उत्तर लिहून पाठवले होते. ते उत्तर काय होते हे मला आठवत नाही. परंतु एक गोष्ट नक्कीच आठवणीत आहे. जो प्रश्न मी त्या दिवशी विचारला होता त्याचे उत्तर मला मिळाले. देशासाठी आपले जीवन समíपत करताना माझ्या आईने एक सवय कधीच मोडली नाही ती म्हणजे, तिने माझ्याशी संवाद कायम चालू ठेवला.

आठवी इयत्तेत पाचगणीला ‘संजीवन बोर्डिंग ’मध्ये गेल्यापासून ते आणीबाणीच्या काळापर्यंत दर आठवडय़ाला आईने मला पत्र लिहून माझ्या अंतर्मनातील शंकाकुशंकांना कायम उत्तर पाठवले. मनात वादळे अनेक आली. मनातली नाव हिंदकाळली जरूर. परंतु आईस्वरूप दीपस्तंभ दिशा शोधायला मदत करण्यासाठी खंबीरपणे उभा होता. आणखीन एक महत्त्वाची बाब आठवते. ज्या ध्येयवादाने झपाटून नाना आणि आईंनी समाजकार्यात झोकून दिले, त्यामुळे कुटुंब म्हणजे काय या कल्पनेच्या पारंपरिक कल्पनेला ते मूर्त स्वरूप देऊ शकले नसले तरी त्यांच्या ध्येयवादाबद्दल मी आदर बाळगून होतो. लहान असताना आई आणि नानांबरोबर सर्व आंदोलनात, सेवादलाच्या कलापथकाच्या कार्यक्रमात, पक्षांच्या बौद्धिकांना, कार्यशाळांना जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मुलांबरोबर भावा-बहिणींप्रमाणे नाती जुळली. झोपडपट्टीतल्या घाणीत आणि सुखवस्तू मित्रांच्या घरात खेळण्याची संधीही मिळाली. या सर्वाचा परिणाम म्हणजे संपत्ती गोळा करून मिळणाऱ्या आनंदाच्या पलीकडच्या आनंदाबद्दल कुतूहल निर्माण झाले.

त्यांनी त्यांच्या मूल्यांशी कधी प्रतारणा केली नाही हे महत्त्वाचे आहे. समाजकार्यात गर्क कार्यकत्रे जेव्हा व्यक्तिगत फायद्यासाठी ध्येयांशी आणि मूल्यांशी प्रतारणा करतात तेव्हा लोकांपेक्षा त्यांच्या कुटुंबातच त्याचे तरंग उठतात. अशा कुटुंबातून भरकटलेली अनेक मुले मी पहिली आहेत. माझ्या आई-नानांना ध्येयवादास चिकाटीने धरून ठेवण्यात बऱ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागले, साथींना मुकावे लागले, साथी दुरावले, सत्ता गेली. परंतु त्यांच्या अव्यवहारी आदर्शवादाचा मला नेहमीच अभिमान वाटला. त्याचे मूळ कारण म्हणजे माझा आईबरोबर कायम सुरू असलेला संवाद!

आई आणि नाना दोघेही स्वातंत्र्यलढय़ात गांधीजींच्या आंदोलनातून सामील झाले. आई सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होती पण संघातील मनुवादी विचारसरणीमुळे भ्रमनिरास होऊन आणि खास करून साने गुरुजींच्या विचारांनी भारावून जाऊन तिने राष्ट्र सेवा दलामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून, ‘सामाजिक समता आंदोलन’ आणि ‘स्त्री-मुक्ती’ या दोन चळवळींशी तिने शेवटच्या श्वासापर्यंत वचनबद्धता ठेवली. अनेक वेळा स्वत:च्या पक्षातील नेत्यांच्या बोटचेपेपणाबद्दल तिने आवाज उठवला. आज मी माझ्या स्वत:च्या जडणघडणीबद्दल विचार करतो तेव्हा हे लक्षात येते की, आई आणि नानांच्या ध्येयवादाने माझी मूल्ये घडली. मी नानांकडून दुर्दम्य आशावाद शिकलो. परंतु आईकडून त्यापलीकडचे शिकलो, जेव्हा मूल्य जपणे आणि व्यवहारिक विचार करणे यात संघर्ष निर्माण होतो, तेव्हा चिकाटीने, जोमाने आणि आक्रमकपणे मुल्यांचे रक्षण करणे आवश्यक असते.

समाजकारण आणि राजकारण याच्या इतक्या जवळ असूनही दोघांनी मला बजावून सांगितले होते की, ‘‘आमच्या राजकीय प्रभावाचा फायदा करून घेऊन तुझ्या करिअरची मांडणी करायची नाही.’’ आईने तर सांगितले, ‘‘तू डॉक्टर किंवा इंजिनीयर व्हावा, राजकारणात जावे अशी आमची मुळीच अपेक्षा नाही. स्वत:चा नैसर्गिक कल काय हे समजून घे आणि अगदी चप्पल शिवण्याचा व्यवसाय केलास तरी कर पण जगातला सर्वात कुशल कारागीर हो.’’ त्यांच्या या शिकवणीमुळेच मी स्वत:च्या जीवनाची वाटचाल स्वसामर्थ्यांवर करू शकलो.

आईकडून आणखी दोन गोष्टी शिकलो. लहानपणी मी नाजूक प्रकृतीचा आणि भित्रा होतो. मला अंधाराची भीती वाटायची. सोसायटीतील जिन्यातल्या घुशींची भीती वाटायची, प्रेतयात्रेची भीती वाटायची. आईने मला सांगितले, ‘‘ज्याची भीती वाटते त्याचा सामना कर आणि तुला लक्षात येईल की, भीती ही मनाची कृती आहे.’’ हळूहळू माझी भीती गेली. मी तिचे ब्रीदवाक्य आयुष्यभर जपले, वापरले. गेली अनेक वष्रे मला भीती जाणवत देखील नाही. आणखीन एक गोष्ट आईने मला लहानपणीच शिकवली होती, ‘‘तुझ्याकडे एक छोटेसे बिस्कीट असले तरी ते कुणाशी तरी वाटून खा. आनंद वाटण्याने द्विगुणित होतो.’’ या उपदेशाचा देखील मला खूप फायदा झाला आहे.

मी दुसरीत असताना आई ‘युनेस्को’ची शिष्यवृत्ती घेऊन एक वर्षांसाठी इंग्लंडला शिकण्यासाठी गेली. त्यावेळी तिने मला तिच्या माहेरी (माझ्या आजोळी) ठेवले. नाना पक्ष कामात व्यग्र असायचे. त्यावेळी आईची खूप आठवण यायची. नाना आवर्जून भेटायला यायचे. कधी चित्रपट बघायला घेऊन जायचे. ब्रीच कँडी किंवा मारिन ड्राईव्हला फिरायला घेऊन जायचे. तरी देखील आईची खूप आठवण यायची. रडू यायचे. त्याच सुमारास माझे आजोबा वारले आणि आई शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतली. सगळेच जण दु:खात होते, पण मी मात्र आई परतल्याच्या आनंदात होतो.

मी सातवीत असताना आईच्या लक्षात आले की, घरातल्या राजकीय धामधुमीचा माझ्यावर विपरीत परिणाम होत आहे. घरात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मी उपदेश करायला, सल्ला द्यायला सुरुवात केली होती. अभ्यासाऐवजी राजकीय गप्पांमध्ये माझा रस वाढत चालला होता. आईच्या नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात मित्रांची वानरसेना तयार करून वाडय़ातून घोषणा देत मोच्रे काढण्यात मजा येत होती. तिने तिचे राजकीय काम काही काळ बाजूला ठेवून बोर्डिंग  शाळेचा शोध सुरू केला, त्यावेळी दोन मुख्य गोष्टी तिने विचारात घेतल्या. शिक्षण मराठी माध्यमातच झाले पाहिजे आणि शाळा आधुनिक विचारांची असली पाहिजे. पाचगणीच्या ‘संजीवन विद्यालया’त तिचा हा शोध थांबला. मला तिथे प्रवेश मिळाला. आईने मला समजावून सांगितले की, माझी विविध अंगाने वाढ व्हावी या हेतूने तिने ही शाळा शोधून काढली आहे. पहिल्या सत्रानंतर मला घराची ओढ लागली, सुट्टीनंतर पाचगणीला परत जायचे नव्हते. आईने माझ्याबरोबर एक करार केला, ‘‘एक वर्ष पूर्ण कर. मग आवडले नाही तर परत घरी ये.’’ मी तो मान्य केला. पहिल्या वर्षांत अभ्यासात सुधारणा झाली, नाटक, खेळ, गाणी, नृत्य, बागकाम, रंगकाम आदी अनेक छंदांत मी रुळून गेलो. आईही राजकारणात मग्न झाली होती. अर्थात कितीही व्यग्र असली तरी प्रत्येक पालक दिनाला आई शाळेत हजर असायची. तिची दर आठवडय़ाला येणारी पत्रे मला दिलासा देत होती की आई माझ्या कायम पाठीशी आहे. शाळेतली

अनेक मुले दु:खी असायची. त्यांना वाटायचे त्यांच्या पालकांनी त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेय. काही मुले पळूनही जायची. वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना आईने कधीच माझ्या मनात येऊ दिली नाही.

एक गोष्ट मात्र आईने मला कधीच कळू दिली नाही ती म्हणजे घरात कायम असणाऱ्या पशांच्या तंगीची. नाना कॉलेजचे प्राध्यापक होते आणि आई शाळेतील शिक्षिका. घरी कार्यकर्त्यांचा सतत राबता असायचा. शिवाय पक्षाच्या कामासाठी स्वत:चे पसे काढावे लागायचे. महिनाअखेर काहीच पसे उरायचे नाहीत. अनेकदा चहासाठी दूध किंवा साखर घेण्यासाठीही पसे नसायचे. शेजारी विमलमावशी परांजपे राहायची. तिच्याकडून वाटीभर दूध किंवा साखर यायची. नाना लोकसभेत निवडून आले. तेव्हा त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाचा राजीनामा दिला. त्यांना महाविद्यालयाने प्रॉव्हिडंट फंडाचे पसे दिले. घरी येताना नाना ठाकूरद्वारच्या पक्ष कार्यालयात थांबले आणि फंडाची अर्धी रक्कम पक्षाला देण्याचे मान्य करून घरी आले. आईला नक्कीच धक्का बसला असणार. पण तरीही तिने नानांना दिलेल्या या वचनापासून त्यांना परावृत्त करण्याचा जराही प्रयत्न केला नाही.

२५ जून १९७५ माझा वाढदिवस. त्याच दिवशी नानांना बंगळुरूला अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर अटक झाली. त्याच दिवशी आई मला ‘एनआयडी’ला सोडायला अहमदाबादला आली. अहमदाबादला नानांचे समाजवादी मित्र डॉ. अशोक मेहता यांच्याकडे महिनाभर राहायची सोय केली होती. त्याशिवाय, डॉ. जि. जि. पारीख यांचे कुटुंबीय, खासदार पुरुषोत्तम मावळंकर, त्यांचे बंधू केशव मावळंकर, कवी उमाशंकर जोशी आणि नानांचे सिद्धार्थ महाविद्यालयातील मित्र डॉ. प्रताप या सर्वाशी ओळख करून देऊन मला खंबीर राहण्यास सांगून ती मुंबईला परतली आणि महिन्याभरात तिलाही अटक झाली. त्यावेळी गुजरातमध्ये बाबुभाई पटेल यांचे सरकार होते. त्यामुळे आणीबाणीविरोधी कारवायांचा गुजरातमध्ये जास्त सुकाळ होता. मृणाल गोरे, जॉर्ज फर्नाडिस, बापू काळदाते, पन्नालाल सुराणा मला नियमित भेटून जात आणि आई आणि नानांसाठी पत्रही घेऊन जात असत.

मी अहमदाबादच्या ‘एनआयडी’मधून पदवी मिळवली आणि आईने आम्हा सर्व मित्रांना एक आठवण करून दिली. तुम्ही व्यावसायिक भरभराटीच्या मागे लागण्यापूर्वी एक सामाजिक जबाबदारी पूर्ण करा. त्यावेळी ती हुंडा प्रतिबंध कायद्यासाठी देशभर आंदोलन योजत होती. तिने आम्हा सर्व मित्रांना जबाबदारी दिली की हुंडाप्रतिबंध आंदोलनासाठी एक फिरते प्रदर्शन तयार करा, जेणेकरून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जनमानसात संताप निर्माण होईल. तीन महिने संशोधन करून आम्ही मित्रांनी एक फिरते प्रदर्शन तयार केले. ते

प्रदर्शन देशभर फिरवले गेले. ‘महिला दक्षता समिती’ने जागोजागी सह्य़ा गोळा करून एक कोटी सह्य़ा लोकसभेच्या तत्कालीन सभापतींकडे पाठवल्या. त्यानंतर आईने खासगी सदस्य बिल लोकसभेत मांडले.

ते सरकारने मान्य केले. आईने बिल मागे घेतल्यावर सत्तारूढ पक्षाने सरकारद्वारा ते बिल मांडून त्याचे कायद्यात रूपांतर झाले.

आई-नानांनी आयुष्यभरात फारशी संपत्ती गोळा केली नाही तरी ध्येयधुंद जीवन जगून एवढी मित्र-मंडळी गोळा केली आहे की जगात कुठेही गेलो तर मधू आणि प्रमिला दंडवते यांचा मुलगा म्हणून लोक आजही मला सौजन्याने वागवतात. आईच्या संस्कारांचा माझ्या मनावर काय परिणाम झाला याबद्दल मी हल्ली बराच विचार करतो. राजकारणात न पडता स्वत:च्या क्षेत्रात कर्तृत्व दाखवावे हा आईचा उपदेश मी पूर्णत: पाळला याबद्दल मला आनंद आहे.

वयाच्या ३५ व्या वर्षी आईने मुंबई एसएनडीटी मध्ये मनोविज्ञानशास्त्रात एम. ए. केलं. मीसुद्धा वयाच्या ३५ व्या वर्षी अमेरिकेत ‘ओहिओ स्टेट युनिव्हर्सटिी’मध्ये मनोविज्ञान, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि संप्रेषणशास्त्र या विषयांचा अभ्यास करून त्याचा संदर्भ डिझाइन रिसर्चशी लावला. आई मुंबईच्या जे. जे. महाविद्यालयातून ‘कला’ शिकली होती. सर्जनशीलता जीवनातल्या प्रत्येक अंगामध्ये असायला हवी, असे तिचे ठाम मत होते. त्यामुळे मी डिझाइन क्षेत्र निवडले याबद्दल तिला खूप अभिमान होता. औद्योगिक किंवा आर्थिकक प्रगती ही सामाजिक सुधारणेबरोबरच झाली पाहिजे, हे समीकरण आईमुळेच माझ्या मनात खोलवर रुजले होते. म्हणूनच सामाजिक लोकशाहीच न्यायाधिष्ट समाजरचना निर्माण करू शकेल, हे सूत्र मी मान्य केले. लोकशाहीतील धर्माची लुडबुड संपूर्णरीत्या संपवली पाहिजे, हे माझे मत सर्व धर्माना लागू होते.

आई आणि नाना राजकीय साथीदार होते. नानांच्या लौकीकावर आईचे कर्तृत्व अवलंबून नव्हते. तरी अनेकदा नानांना पक्षात आणि सरकारात पदे मिळाली आणि आईने कधीच त्याबद्दल तक्रार केली नाही. ‘राष्ट्रीय महिला आयोग’ व्हावा म्हणून आईने देशभर चळवळ केली आणि शेवटी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी महिला आयोग स्थापन करण्याचे ठरवले. या ना त्या कारणाने आयोगाची स्थापना पुढे ढकलली जात होती. हे नक्की होते की आई ‘राष्ट्रीय महिला आयोगा’ची पहिली अध्यक्ष होणार होती. दरम्यान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार गडगडले. त्या रात्री ते ‘महिला आयोग’ निर्माण करण्याची घोषणा करणार होते. त्यांचा आईला दूरध्वनीही आला. परंतु आई आणि नानांनी एकत्र बोलून ठरवले की लेम डक सरकारने कॅबिनेट लेव्हलची नियुक्ती करणे चुकीचे आहे. आईने नेमणूक नाकारली. नानांनी त्या आशयाचे पत्र पंतप्रधानांना पाठवले. मला राग आला. पुरुषप्रधान सरकारने ‘महिला आयोग’ बनवतानासुद्धा ज्या बाईने त्यासाठी जंग जंग पछाडले तिच्यावर अन्याय केला, असे मला वाटले. पण आईने आयुष्यभर जपलेल्या मूल्यांशी तडजोड केली नाही याचा आनंद झाला.

आईबद्दल बोलताना या प्रवासात मला मिळालेल्या, भेटलेल्या अनेक मावशींबद्दल बोलल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या आंदोलनात आई-बाबांबरोबर साथ देणाऱ्या मावश्या मला बरेच काही शिकवून गेल्या. मृणाल मावशी (गोरे), अहिल्या मावशी (रांगणेकर), जयवंतीबेन (मेहता), सुधा मावशी (वर्दे), दुर्गाताई (भागवत), अनुताई (लिमये), कुमुद मावशी (करकरे), आवा मावशी (देशपांडे), रतन मावशी (डिसोझा), शुभांगी मावशी (जोशी), मंगला मावशी (परीख), स्वाती मावशी (कालेलकर) अशा अनेक जणी म्हणजे महाराष्ट्रातल्या स्त्री-मुक्ती चळवळीची भक्कम आघाडी. लहानपणापासून त्यांच्या चळवळी आणि बौद्धिके जवळून पाहण्याची आणि ऐकण्याची मला संधी मिळाली. त्यातूनच माझ्या मनाची स्त्रीवादी घडण घडत गेली. आईच्या कामाचा हा एक मोठा फायदा मला झाला. एक जाणीव कायम मनात राहिली की, पुरुषांनी स्त्रियांशी वागताना कायम सावध राहिले पाहिजे. समाजात स्त्री आणि पुरुष समान भागीदार म्हणून वावरले पाहिजेत.

आयुष्याची शेवटची वर्षे आई मधुमेह आणि हृदयविकारांनी त्रस्त होती. तरी तिच्या सामाजिक कामात तिने व्यत्यय येऊ दिला नाही. नानांबरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायचा, असे तिने ठरवले होते. मृत्यूची चाहूल तिला लागली होती. २००१ च्या ऑक्टोबरमध्ये आई, नाना, माझी पत्नी रोहिणी, मुलगी इशा आणि मी आग्रायाला ताज महाल पाहायला गेलो. आम्हा सर्वाची तीच शेवटची भेट. आईला चालताना धाप लागत होती. आम्ही दिल्लीला परत आलो. आई आणि नाना विमानतळावर आम्हाला सोडायला आले. विमानात शिरायची वेळ झाली. आईने माझा मुका घेतला आणि म्हणाली, ‘‘आता परत आपली भेट होणार नाही.’’ डिसेंबरमध्ये आईची अँजिओप्लास्टी झाली. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन दिवसांतच नाना ‘मद्रास’ला निघाले होते. तिने त्यांच्याबरोबर जायचा हट्ट केला. तिथून ते दोघे मुंबईला परत आले. ३१ डिसेंबरला आईने सर्व कुटुंबीयांना नव्या वर्षांची शुभेच्छापत्रे पाठवली. त्या दिवशी दादरच्या साने गुरुजी विद्यालयाच्या समारंभाला हजेरी लावली आणि संध्याकाळच्या विमानाने ते दोघे दिल्लीला आले. रात्री साडेअकरा वाजता तिला हृदयविकाराचा झटका आला. हॉस्पिटलला जाता जाता नानांच्या कुशीत डोके ठेवून तिने अखेरचा श्वास सोडला.

३१ डिसेंबर २००१ ला मध्यरात्री आई गेली. मी त्यावेळी अमेरिकेत होतो. वेळेवर पॅरोल न मिळाल्यामुळे तिच्या अंत्यसंस्काराला मला उपस्थित राहता आले नाही. याची खंत अयुष्यभर राहील. आईने आयुष्यभर समाजसेवा केली. संस्था बांधल्या. सत्याग्रह केले. सेवा दल कलापथकात नृत्य, तमाशे आणि नाटक केले. तरीही नानांची सहचारिणी म्हणून आपली जबाबदारी पूर्णपणे बजावली. इच्छांना आणि आकांक्षांना लगाम घातला, पशांच्या कमतरतेचा परिणाम माझ्या शिक्षणावर कधीच होऊ दिला नाही. जातानासुद्धा ती किडुक मिडुक पसे साठवून, घरात नोकर मंडळींना बांधून ठेवून नानांची उरल्या आयुष्यभराची सोय करून गेली. डिसेंबरमध्ये नानांच्या मांडीत गाठ आली होती. त्या गाठीची तपासणी करण्यासाठी देखील तिने डॉक्टरांची बावडेकरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. डॉक्टर कामतांशी बोलून ठेवले होते.

आईचा मृतदेह शारदाश्रम सोसायटीच्या हॉलमध्ये दर्शनासाठी ठेवला होता. आयुष्यभर ज्या गरीब वस्तीतल्या लोकांची तिने सेवा केली त्यांनी अंत्यदर्शनासाठी भली मोठी गर्दी केली होती. अंत्यदर्शनाची गर्दी पाहून तिचे समाजकारण हे तळागाळातल्या लोकांचे होते हे लक्षात येत होते. अखेपर्यंत ती हाडाची कार्यकर्ती होती. गांधीजींची अनुयायी म्हणून तिने आयुष्यभर रचनात्मक कार्य आणि संघर्ष यात संतुलन ठेवले. तिच्या निग्रही स्वभावाचे एक उदाहरण म्हणजे – तिचे आदर्श साने गुरुजी ११ जून १९५० रोजी गेले. त्या दिवसापासून दर रविवारी संध्याकाळी गुरुजींच्या आठवणीसाठी तिने आयुष्यभर उपवास पळला.

आईचे शरीर नजरेआड गेले असले तरी तिचे अस्तित्व मला आजही रोज जाणवते. अनेकदा मनातल्या मनात तिच्याशी संवाद चालू असतो. ६१ वर्षांपूर्वी तिची माझी नाळ कापली गेली परंतु संवाद अर्निबध सुरूच आहे. आईची उपस्थिती मला जन्मभर दिशा देत राहील.

-uday@sonicrim.com  chaturang@expressindia.com