आपलं जगणं भावनाहीन व्हायला लागलं आहे. माझ्या भावना कशाही असल्या तरी त्या माझ्या आहेत, त्याची लाज वाटता कामा नये. मात्र नकारात्मक भावनांचे रूपांतर सकारात्मक शेवटात करता आले पाहिजे. यासाठी प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. जे पाहतो, जे दिसतं ते एकाग्रतेने मन:श्चक्षूंनी हृदयावर कोरले गेले पाहिजे. जे खातो-पितो त्याने रसना तृप्त झाल्या पाहिजेत. जे ऐकू त्यानं आपलं अस्तित्व अधिक संपन्न होईल, असंच झालं पाहिजे. यासाठी आहे त्या क्षणात, स्वत:ला थांबवता आलं पाहिजे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहेच. नव्या ऊर्जेने जगण्यासाठी भावनांची शक्ती जाणून घ्या. छान जगा. मस्त मजेत जगा. या शुभेच्छा.
खू प दिवसांत तुम्ही एखादं गाणं भान हरपून ऐकलंत? एखादं पुस्तक वाचता वाचता घडय़ाळाचा विसर पडलाय? एखादा पदार्थ सावकाश चवीचवीने आस्वाद घेत खाल्ला आहात अलीकडे? किंवा तळहातात मोगरा घेऊन डोळे मिटून त्यांचा सुगंध दीर्घ श्वासातून शरीराच्या रोमारोमांत भरलाय? ..हे आणि अशा अनेक प्रकारचे प्रश्न मी माझ्या अवतीभवतीच्या अनेकांना नेहमी विचारत असते. आणि बहुतेकदा त्याची उत्तरे नकारार्थीच मिळतात. अनेकांनी स्वत:साठी म्हणून कित्येक दिवसांत काहीच केलेले नसते. स्वत:पाशी थांबून आपल्या भावनांचा, आपल्याला नेमकं काय हवंय यांचा सजगपणे, जाणीवपूर्वक विचारच केलेला नसतो. विशेष म्हणजे असे केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीही नंतर आपली भूमिका स्वत:च खोडून काढतात.
    मी जाणीवपूर्वक लोकांना ‘पॉवर ऑफ फीलिंग’चा अनुभव घ्यायला लावते. त्यांना आपल्या भावनांचा विचार करायला लावते. भावना या अधिकाधिक सजगपणे जगण्यासाठी, समृद्ध आयुष्यासाठी उपयोगी पडतात. आयुष्याकडे बघण्याचा एक नवाच दृष्टिकोन देण्याचा तो प्रयत्न असतो. खरं तर संपूर्ण जग म्हणजे भावनांचा समुद्र आहे. प्रत्येकाच्या काही भावना असतात, काही जणांच्या भावना अव्यक्त, दुर्लक्षित, काहीशा दबलेल्या असतात तर काहीजणांना आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणं, त्यांना शब्दरूपात मांडणं शक्य होतं. काहींना आपल्या भावनांप्रमाणे जगणं जमतं, तर काही जण सतत दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करतं, आपलं मन मारून जगत असतात.
भावनांचा प्रभावी आविष्कार फार महत्त्वाचा असतो. ती भावना रागाची, प्रेमाची, लोभाची, मत्सराची किंवा अगदी द्वेषाची असो. आपण स्पष्टपणे त्या व्यक्त न केल्याने आतल्या आता कुढणं सुरू होतं. नकारार्थी भावना जाहीरपणे मांडण्यास वा कबूल करण्यास आपण एक पाऊल मागे येतो. अनेकदा आपल्या खऱ्या भावना मुळातून समजून घेण्यातच आपण कमी पडतो. भावनाप्रधान होण्याऐवजी व्यावहारिक निर्णय घेण्याकडे कल सुरू झाला की मेंदूच सर्वशक्तिशाली आहे, या निष्कर्षांप्रत येतो. आपण जेव्हा भुकेलेले असतो, तेव्हा आपण अन्नपदार्थ शोधतो, तहानलेले असतो तेव्हा पाण्याचा शोध घेतो, थंडी वाजते तेव्हा उबदार कपडे शोधतो, गरम झालं की पंखा लावतो, पण जेव्हा स्वत:ला काय हवंय, याचं उत्तर शोधण्याची वेळ येते, तेव्हा आपण शक्यतांच्या गत्रेत हरवतो. मित्र-मैत्रिणींनो, याचा शोध मेंदूनं नाही हृदयानं, मनाच्या प्रामाणिक प्रयत्नांनी घ्यायला हवा.
      मानवाकडे असणारी पंचेंद्रिये भावनांच्या उगमासाठी मुख्यत्वे कारणीभूत असतात. डोळे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी कान, वास घेण्यासाठी नाक, चव घेण्यासाठी जीभ आणि स्पर्शज्ञान या माध्यमांतून अक्षरश: लाखो बाबींची नोंद मेंदूकडे होत असते. पण नोंद होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे दृश्य पडसाद उमटतात का? दुर्दैवाने नाही. आपण आपल्या पंचेंद्रियांची ताकदच विसरलो आहोत. डोळ्यांमध्ये प्राण असतात, असं म्हणतात. पण आपल्याला डोळ्यांनी एखादी गोष्ट जाणून घेण्याचाच विसर पडला आहे. जेव्हा एखादा आपल्या आवडत्या रंगाचा ड्रेस पाहतो, आपले डोळे आपोआप मोठे होतात. आपल्याकडे असा ड्रेस हवाच अशा भावना निर्माण होतात. क्षणात आपण तो घालूनही पाहतो. पण दुसऱ्याच क्षणी वास्तवाचे भान जागे होते व आपल्या भावना दुय्यम  ठरतात, हे आपल्यासाठी नाही, असा संदेश मेंदूतून उमटतो. एखादं मूल जन्माला येतं, तेव्हा त्याचे डोळे टपोरे, सताड उघडे असतात. पण जशी र्वष सरतात, त्याचे डोळे अर्धवर्तुळाकृती होतात. खुल्या डोळ्यांनी जग पाहण्याची कुवतच कमी होते. कानांनी आपण आजूबाजूच्या वातावरणाशी जोडलेले असतो, पण आपण आता ऐकणंच सोडलं आहे. नाकांनी आपण श्वास घेतो, शरीरासाठी त्याज्य असलेला कार्बनडाय ऑक्साइड बाहेर सोडतो. एक प्रकारे नकारात्मक शक्ती बाहेर सोडण्याचे ते प्रतीक आहे. पण आपण रसरसून जगणं, श्वासावाटे आयुष्याची धडधड ऐकणंच सोडलंय. एका नि:शब्द लयीनं श्वासोच्छ्वासाची क्रिया सुरू असते. त्याकडे किती गांभीर्याने पाहतो आपण? आपण जणू काही चिंता, काळज्या आणि तणाव शोधत असतो,    भावनांची ताकद श्वासामधून. म्हणूनच बहुधा अस्थमा, दमा यांसारखे आजार त्यांच्या शरीरात घर करतात.
निवड करण्यात आपण इतके ‘कडिशन्ड’ झालो आहोत की आपल्याला फक्त सुगंध घेणंच माहीत आहे. गलिच्छ ठिकाणची दरुगधी आपण तिरस्कृत मानतो, आपल्याला ती सहनच होत नाही. पण हे शक्य आहे? दरवेळी आपल्या वाटय़ाला चांगल्याच गोष्टी येतील, ही अपेक्षाच का? वाईट गोष्टी कुणालाच नको असतात. पण त्याची घृणा करण्याऐवजी ती सहज मनाने कशी टाळता येईल हे पाहणं महत्त्वाचं. अमुक एक वाईट- अमुक एक चांगलं या सार्वत्रिक निकषांवरच आपल्या भावना तोलल्या जाणं, हा भावनांवर केलेला अन्याय आहे. या चक्रव्यूहात अडकून भावना दडपून टाकण्याची सवय होते. जी अत्यंत घातक आहे.
खाण्यासाठी जगणे की जगण्यासाठी खाणे हा सनातन वाद असेल कदाचित पण आपण पुरेशा जाणिवेने, चवीने जेवणं गरजेचं आहे. असे न केल्यानेच पचनाशी संबंधित व्याधी जडतात. थोडक्यात आपण नीट बघत नाही, ऐकत नाही, खात नाही; तंत्रज्ञानाच्या भाषेत इनपुट योग्य नाही तर आउटपुट कसे दर्जेदार असणार?
पंचेंद्रियांची शक्ती आपण का विसरलोय, आपल्या भावनांची ताकद आपण का विसरलोय? कारण आपला मेंदू मेंदूनिर्मित विविध चिंतांच्या भोवऱ्यात अडकला आहे. भावनांच्या नसíगक प्रकटीकरणावर या चिंतांचे सावट आहे. माझा पगार वाढेल का, माझे लग्न ठरेल का, माझ्या कुटुंबाचे काय होईल, हा असाच का वागला, तिने असं नको वागायला हवं होतं..अशा एक ना अनेक चिंता मनात ठाण मांडून बसल्या आहेत. त्यामुळे तुमचा मनाशी संवाद खुंटलाय. आणि या अस्वस्थतेचे कारण आपण शोधतो, बाह्य़जगात. हाच विरोधाभास आहे.. इथूनच सर्व समस्यांना सुरुवात होते. आपण आपल्या ह्रदयाचं म्हणणं ऐकण्यात असमर्थ ठरतो. आपलं हृदय नानविध चिंतांनी ग्रासलेलं असतं. यामुळे आपल्या भावना आतल्याआतच दडपल्या जातात. यथावकाश आपल्यातच हरवून जातात..विरून जातात.
   जेव्हा आपल्या भावनांचा आवाज दडपला जातो, त्याचा थेट परिणाम, शरीरावर, मनावर इतकंच नाही तर आपल्या सबंध आयुष्यावर परावíतत होत असतो. ५०-८० वर्षांपूर्वी आयुष्य शांत होतं. मात्र काळाबरोबर आपला मेंदू अधिक चपळ, सक्रिय झाला. यामुळे चहुबाजूला स्पर्धा वाढली, त्यातून तुलना, बरोबरी, द्वेष, शत्रुत्व यांचा शिरकाव झाला. असुरक्षितता वाढली मग चिंतांनी प्रवेश केला तो कायमचाच. यापाठोपाठ मधुमेह, हायपर टेन्शन, हिस्टेरिया, तोतरेपणा, डोळ्यांवर चष्मा अशा आरोग्याशी निगडित गोष्टींची यादी आली. काळजी, चिंता यांनी आयुष्य दयनीय झाले, गुंतागुंतीचे झाले. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजार अशा कुठल्याही ठिकाणी उभ्या असणाऱ्या लोकांचे चेहरे पहा, कायम चिंतातुर दिसतात, कुठेतरी हरवल्यासारखे वाटतात. खरं तर आपल्या चिंता, काळजी यांच्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी आपण अपयशी झाल्याने हे चित्र दिसते.
माझ्या कार्यशाळेत येणारे अनेकजण सर्वकाही ठीक असताना ‘गमते उदास’ या भावनेने त्रस्त असतात. प्रतिष्ठित व्यावसायिकाची पत्नी असणारी नेहा अशीच एकदा भेटायला आली. प्रेमळ नवरा, बक्कळ पसा, दोन लहान मुले, दरवर्षी परदेशवारी, भरपूर खरेदी अशी सारी सुखे पायाशी लोळण घालत होती. ती उत्तम सुगरण होती. त्यामुळे मित्रपरिवाराकडून नेहमीच तिच्या पाककलेचे, तिच्या श्रीमंतीचे कौतुक होत असे. वरवर पाहता सगळं उत्तम. मात्र नेहाला तिच्या दिसण्याविषयी थोडी नकारात्मक भावना होती. तिची मान आणि चेहरा जरा उजवीकडे कललेला होता. जेव्हा जेव्हा ती मोठय़ा पाटर्य़ा, सार्वजनिक सण-समारंभ यांना हजेरी लावायची, तिच्या दिसण्याविषयी सावध असायची. अनेक डॉक्टर्स करून झाले, गेली तीन वष्रे ती यावर उपाय शोधत होती. काहीच फरक पडत नसल्याने तिचा आत्मविश्वास ढासळला, आयुष्यातली शांतता भंग पावली. तिने हळूहळू लोकांना भेटणे बंद केले. ती निराशेच्या गत्रेत ओढली गेली. तिची समस्या ही की स्वत:ला आहोत तसे स्वीकारण्यास ती तयार नव्हती. तिचा स्वत:शी संवाद संपला होता. तिला पुन्हा स्वत:कडे नेण्यासाठी, तिच्या भावनांची ताकद समजवावी लागली. ध्यानधारणा, स्वसंवाद, स्वत:चा आदर यांनी तिला या सावध राहण्यापासून निर्धास्त होण्यापर्यंत मदत केली. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर नेहा आनंदी दिसू लागली. आता तिची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलली.  कृष्णाने गीतेत सांगितलेला संदेश कधीही विसरता कामा नये ‘या पृथ्वीतलावरचे सर्व जीवात्मे जन्मापासून मुक्त आहेत. आतला आवाज ऐका व त्याप्रमाणे जगा. कुठल्याही दुसऱ्या जीवाला त्रास देऊ नका वा त्याला दडपण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक जीव एक उद्देश घेऊन जन्माला आला आहे.’ म्हणूनच आपल्या भावनांचा प्रामाणिक स्वीकार करता येणं, ही कला आहे. स्वत:वर प्रेम करणे परमानंदाची गुरुकिल्ली आहे. माझ्या भावना कशाही असल्या तरी त्या माझ्या आहेत, त्याची लाज वाटता कामा नये. मात्र नकारात्मक भावनांचे रूपांतर सकारात्मक शेवटात करता आले पाहिजे. यासाठी प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. जे पाहतो, ते दिसतं ते एकाग्रतेने मन:चक्षूंनी हृदयावर कोरले गेले पाहिजे. जे खातो-पितो त्याने रसना तृप्त झाल्या पाहिजेत. जे ऐकू त्यानं आपलं अस्तित्व अधिक संपन्न होईल, असंच झालं पाहिजे. यासाठी आहे त्या क्षणात, स्वत:ला थांबवता आलं पाहिजे. आयुष्यात संकटं, अडचणी येणारच, पण त्याचा बाऊ न करता चित्रपटात ज्याप्रमाणे एखादी फ्रेम फ्रीज होते, तसं आयुष्य घटकाभर थांबून, झालेली चूक सुधारून पुढे नेता आलं पाहिजे.
 निसर्गाच्या सान्निध्यात कलासक्त मन अधिक खुलते. मात्र आपण असू तिथे आनंद शोधता आला पाहिजे. गाडीत असू तर गाडीच्या वेगाबरोबर शीळ घातली पाहिजे, चालत असू तर पावलांचा आवाज ऐकता आला पाहिजे. काही वाचत असू तर त्याचा अर्थ आतून लागला पाहिजे आणि काहीच करत नसू तर आपला एकांतही अनुभवता आला पाहिजे. शांततेचा आवाज ऐकता आला पाहिजे. आजूबाजूच्या इंद्रधनुषी वातावरणात स्वत:चे रंग भरता आले पाहिजेत. हेच खरं जगणं, हाच आनंद!        
                                                            

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?