19 August 2019

News Flash

आशीर्वाद अक्षरांचा

नोकरी लागली खरी पण मी ४ ते ५ महिन्यांतच राजीनामा दिला. तू खूप घाईत नोकरी सोडलीस. आता पैसे कसे मिळवणार? तुझा पूर्वीसारखा ‘मान’ आता

| October 18, 2014 01:01 am

नोकरी लागली खरी पण मी  ४ ते ५ महिन्यांतच राजीनामा दिला. तू खूप घाईत नोकरी सोडलीस. आता पैसे कसे मिळवणार? तुझा पूर्वीसारखा ‘मान’ आता राहणार नाही, अशा एक ना अनेक प्रतिक्रियांमुळे माझ्याही मनात निराशेचे ढग दाटून आले. पण त्याच वेळी आठवला तो ‘प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी किनार असते.’ हा सुविचार. आणि मार्ग सापडला.. विचार केला, माझं हस्ताक्षर इतरांपेक्षा वेगळं, सुंदर आहे. आपणही ‘सुंदर हस्ताक्षर लिहिण्याचे वर्ग’ सुरू केले तर..? वळणदार अक्षरामुळे आयुष्याला सुंदर वळण मिळाले..
मी नुकतीच (२००२) बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो होतो.. तेव्हाचा हा प्रसंग.. जो माझ्या आयुष्यात एक सुंदर वळण घेऊन आला. मी कायमच त्याचा ऋणी राहीन..
माझ्या एका मित्राने सांगितले की, आपल्या सोलापूरमध्ये एक सेवानिवृत्त इंजिनीअर आहेत मधुसूदन रायते, जे अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचे अक्षर ‘सुंदर’ करण्याचे वर्ग घेतात. सर्व विद्यार्थी त्यांना ‘रायते काका’ म्हणत. त्या मित्रासोबत मी रायतेकाकांच्या घरी गेलो. रायतेकाकांनी त्यांच्याकडे सुंदर हस्ताक्षराचे धडे घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ‘सुंदर अक्षराचे संग्रह’ तसेच मान्यवरांनी त्यांना पाठवलेल्या पत्रांचा संग्रह आम्हाला दाखवला. ‘‘काका, आम्हालाही ‘सुंदर हस्ताक्षर कसे काढायचे’ हे शिकायचे आहे,’’ असे सांगितल्यावर काका म्हणाले, ‘‘उद्यापासून या.’’ दुसऱ्या दिवसापासून आम्ही ४-५ मित्र त्यांच्याकडे जाऊ लागलो. मराठी, प्रिंट इंग्लिश आणि कर्सिव्ह (रन्िंाग लिपी) असे तीन विविध प्रकार काका शिकवायचे. रायतेकाकांना सुंदर-वळणदार-मोत्यासारख्या अक्षरांचा वसा, त्यांचे वडील श्रीनिवास रायते (रायते गुरुजी-साने गुरुजींच्या काळातील आदर्श शिक्षक) यांच्याकडून मिळाला.
आम्हा मित्रांपैकी काहींनी मराठी तर काही मित्रांनी इंग्लिश आणि कर्सिव्ह अक्षरं शिकण्यास प्रारंभ केला. कुणाला लवकर तर कुणाला काही दिवसांनी ‘अक्षर वळण’ जमायला सुरुवात झाली. पाहता-पाहता काकांच्या सहज-सोप्या मार्गदर्शनामुळे सर्व मित्रांच्या अक्षरांमध्ये ‘सुंदरता’ येत होती. माझं अक्षर लहानपणापासून थोडसं चांगलं असल्यामुळे मला मराठी, इंग्रजी व कर्सिव्ह अक्षरंही चटकन जमली. रायते काकांचा बोलका, उत्साही स्वभाव-प्रत्येक अक्षराचं वळण अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्याची तळमळ.. ‘अक्षर’ या शब्दाचा अर्थ-सुंदर अक्षरांचे महत्त्व. क्लास पूर्ण केल्यानंतर सराव कसा करायचा.. नियमित दैनंदिनी, पत्र कसं लिहावं- उत्तरपत्रिका लिहिताना कोणती पद्धत वापरायची इ. अनेक गोष्टी काकांनी आम्हाला शिकवल्या. क्लास करताना काकांनी आम्हाला आमचा उत्साह द्विगुणित करणारी बातमी सांगितली ती म्हणजे रायते काकूंनी त्यांचं अक्षर वयाच्या ५०व्या वर्षी, अवघ्या पंधरा दिवसांत सुंदर केलं होतं. थोडय़ाच दिवसांत हा क्लास पूर्ण झाला आणि आम्हा सर्वाचं अक्षर ‘वळणदार’ झालं. पुढे काही वर्षांनी आम्हा सर्वाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. कुणी सोलापुरातून पुढील शिक्षणासाठी पुणे गाठलं- कुणी वडिलोपार्जित व्यवसाय स्वीकारला तर कुणी नवीन व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात होता.
मी मात्र सोलापूरमध्येच एका दैनिकात अर्धवेळ नोकरी करत होतो. दिवसातील काही तास दैनिकातील काम व राहिलेल्या वेळेत अक्षरांचा सराव. अक्षरांचा सराव करून आता माझंही अक्षर ‘सुंदर’ झालं होतं. त्याच वेळी माझ्या पणजोबांच्या काळातील व त्यांच्या नित्य वाचनातील १९०१मधील श्री संत तुकाराम महाराजांची साडेचार हजाराहून अधिक अभंग असलेली गाथा, मी ‘हस्तलिखित’ करण्याचा संकल्प केला.
नोकरी लागली पण सुरुवातीला आनंददायी, लई भारी वाटणाऱ्या कामात नंतर तोच तोपणा आल्याने आणि ‘वरिष्ठ’ म्हणणाऱ्या व्यक्तीच्या माझ्या कामातील ‘असमाधानतेमुळे’ मी ४ ते ५ महिन्यांत राजीनामा दिला. ‘खूप घाईत नोकरी सोडलीस तू’, ‘आता पैसे कसे मिळवणार?’, ‘तुझा पूर्वीसारखा ‘मान’ आता राहणार नाही.’ अशा एक ना अनेक प्रतिक्रियांमुळे माझ्याही मनात निराशेचे ढग दाटून आले. मला वाचनाची आवड असल्याने फार वर्षांपूर्वी मी वाचलेला ए५ी१८ इ’ूं‘ उ’४ िँं२ ं र्र’५ी१ छ्रल्ली (प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी किनार असते) हा सुविचार आठवला.. आणि माझ्यातील सकारात्मक गोष्टींचा विचार करण्यास सुरुवात केली. मला त्या वेळी प्रकर्षांने जाणवलं, की माझं हस्ताक्षर इतरांपेक्षा वेगळं. सुंदर आहे. आपणही ‘सुंदर हस्ताक्षर लिहिण्याचे वर्ग’ सुरू केले तर..?
दरम्यान, रायतेकाकांसोबत विविध शिबिरांत त्यांचा ‘सहायक विद्यार्थी’ म्हणून गेल्याने मलाही विद्यार्थ्यांना अक्षरवळण शिकवणं जमत होतं. मीही तुमच्यापमाणे ‘अक्षरवर्ग’ सुरू करण्याचा विचार करतोय, असं मी एके दिवशी त्यांना भेटून सांगितलं. काकांनी मला मनापासून आशीर्वाद दिला आणि ‘अभिजीत अक्षर वर्ग’ सुरू झाला.
काही वर्षांपूर्वी रायतेकाकांचे बहुतांश नातेवाईक पुण्यात राहत असल्याने काकांनी पुण्यात नवं घर घेतलं. सोलापूरला अलविदा केल्यानंतर रायतेकाकांची अक्षरपरंपरा सुरू ठेवण्याची जबाबदारी आपसूकच माझ्याकडे आली. गेल्या सहा-सात वर्षांपासून मी पूर्णवेळ यशस्वीपणे सुंदर अक्षर वर्ग चालवतोय. अनेक शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पालक-शिक्षक-व्यापारी-डॉक्टर्स माझ्याकडे ‘सुंदर हस्ताक्षर’ कसं काढावं हे शिकून जातात. दरम्यान २०११ मध्ये श्री संत तुकारामांची गाथा ‘हस्तलिखित’ झाली.
सुंदर अक्षरांनी मला भरपूर मान-सन्मान दिले. सुंदर अक्षरांमुळे मला कवी प्रा. प्रवीण दवणे सरांच्या घरी आठवडाभर राहून त्यांच्या मुलांना अक्षर शिकविण्याची संधी मिळाली. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा/ शिबिरं घेण्यासाठी सोलापूर शहर-जिल्हय़ासह पुणे-ठाणे-अमरावती-अहमदनगर-परतवाडा अशा महाराष्ट्रातील विविध शहर-जिल्ह्य़ांमध्ये जाण्याची संधी लाभली.
कविवर्य मंगेश पाडगांवकर, कॅलीग्राफीतज्ज्ञ अच्युत पालव, प्रा. प्रवीण दवणे, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, डिस्कव्हरी चॅनेलवरील ‘मेन व्हर्सेस वाईल्ड’चे बीअर ग्रील्स, विठ्ठल कामत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही पत्रं माझ्या संग्रही आहेत. या सगळ्याचं श्रेय मी रायतेकाकांना देतो.
इंटरनेट-वॉटस् अ‍ॅप-फेसबुकच्या जमान्यात हाताने, तेही स्वत:च्या हाताने लिहिलेलं सुंदर अक्षर बघायला मिळणं, खरंच मनाला किती समाधान देतं. मी त्यात खूप खूप समाधानी आहे.
(ता.क.- ज्या वाचकांना/युवकांना सुंदर अक्षर कसं काढावं याच्या ‘मोफत बेसिक टिप्स’ हव्या असतील त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.)
९०११०१४३९९

First Published on October 18, 2014 1:01 am

Web Title: the turning point that changed my life forever