मला शिकायचं होतं, पण वडिलांची अजिबात संमती नव्हती, पैशांचाच प्रश्न मोठा होता. तेव्हा एकदा आईने आणि नंतर भावाने माझा प्रश्न सोडवला आणि आज मी लेबर ऑफिसर म्हणून नावाजला गेलो. त्यांनी ती तयारी दाखवली नसती. ते टर्निग पॉइंट माझ्या आयुष्यात आले नसते तर?
मे १९५७ चा तो काळ. मी व्हर्नाक्युलर फायनल, म्हणजे त्या काळची सातवीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर आठवीसाठी शेजारच्या कालकुंद्री गावात हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याच्या विचारात होतो, पण अचानक बाबांचे फर्मान निघाले, की मी पुढे शाळा वगरे काही शिकायची नाही. माझ्या दोन मोठय़ा भावांनी थोडीफार शाळा शिकल्यानंतर बाबांच्या स्वभावाला कंटाळून मुंबई गाठली. ते परत गावी यायचं नावही काढत नाहीत. दोघेही मिलमध्ये नोकरीला लागले होते. शेती करण्यासाठी परत त्यांनी गावी यावे म्हणून बाबांनी खूप तगादा लावला होता, पण ते काही बधले नाहीत. मग बाबांनी निर्णय घेतला की, मलाच यापुढे शाळेत पाठवायचं नाही. मला शेतीबरोबर जोडधंदा म्हणून एक टेलिरग मशीन घेऊन द्यायचं ठरलं. मला तर शेती किंवा टेलिरगमध्ये रस नव्हता. मला पुढे शिकायचं होतं. पण बाबांपुढे कुणाचं काहीच चालत नसे.
मला त्यांनी टेलिरगचे धडे घेण्यासाठी आमच्या शेजारच्या कोवाड गावचे त्या काळचे प्रसिद्ध टेलर व बाबांचे एक मित्र शंकरराव मुळीक यांच्याकडे पाठविलं. मुळीक काकांची दोन मुलं माझ्याबरोबरच मराठी शाळेत सातवीपर्यंत शिकत होती. सातवी पास झाल्यानंतर कालकुंद्री हायस्कूलमध्ये त्यांनी आठवीसाठी प्रवेश घेतला. मी मुळीक काकांना माझी कैफियत ऐकवली आणि बाबांची समजूत घालण्याची विनवणी केली. त्यांनी माझ्या बाबांची कशीबशी समजूत काढली. बाबांना सांगितले, ‘अरे मी टेलर असून माझी पोरं पुढे शिकत आहेत, तू तर गावचा पाटील असून पोराला टेलिरग शिकवतो, हे काही बरोबर नाही. अरे गावातले लोक, आपली पोरं शिकत नाहीत म्हणून खंतावतात आणि तुझा पोरगा शिकतो म्हणतो, तर त्याला अडवतोस? हे काही बरोबर नाही.’ बाबांनी शंकररावांचा सल्ला ऐकला खरा, पण म्हणाले, ‘मी त्याच्या शिक्षणासाठी पसे वगरे काही देणार नाही, त्याचं त्यानं काय ते करावं.’ त्या वेळी माझी आई पुढे आली, नुकतेच आईला तिच्या आईच्या निधनानंतर, तिच्या इस्टेटीतील काही पसे मिळाले होते. ते सारे पसे तिने माझ्या शिक्षणासाठी खर्च करण्याची तयारी दर्शविली व माझ्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला..
पुढे चांगल्या गुणांनी मॅट्रिक झालो. पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये जावयाचे म्हणजे कोल्हापूरला १००-१५० मलावर जाणं भाग होतं. आईच्या पशातून माझं हायस्कूल शिक्षण पार पडलं होतं. पण कोल्हापूरला जायचं तर तेथे राहण्या-जेवणाचा खर्च कोण करणार, बाबांनी तर पहिल्यापासूनच नन्नाचा पाढा वाचला होता. त्यामुळे अकरावीनंतर कुठं तरी शाळा मास्तर होणं भाग होतं. पण माझा काही तिकडे जाण्याचा विचार होईना. मला खूप खूप शिकायचं होतं. मोठा साहेब व्हायची स्वप्न पडत होती.
सगळी सोंगं करता येतात, पण पशाचं सोंग घेता येत नाही. मी खूपच निराश झालो. पण काय कोण जाणे, माझं नशीब जोरावर होतं असं वाटतं. मी कॉलेजला पुढील शिक्षणासाठी जाऊ शकत नाही, ही बातमी माझा मुंबईत असलेला भाऊ शंकर पाटील याला समजली. त्याचं मला पत्र आलं की, माझा कॉलेजचा पुढील शिक्षणाचा खर्च करायला तो तयार आहे. काय हा चमत्कार! मी कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये कॉमर्ससाठी प्रवेश घेतला, पुढे बी.कॉम. झालो. त्यानंतर नशीब कमावण्यासाठी शंकरदादाचा हात धरून मुंबईत आलो. इकडे तिकडे छोटी-मोठी नोकरी करता करता एलएल.बी. झालो, त्यानंतर मुंबई विद्यापीठाचं पोस्ट ग्रॅज्युएशन ‘डिप्लोमा इन लेबर वेल्फेअर’मध्ये केलं. काही काळ ‘इंडियन हुम पाइप’ कंपनीत लेबर ऑफिसर म्हणून कामाला लागलो. पुढे एम.पी.एस.सी.ची परीक्षा अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होऊन, महाराष्ट्र शासन सेवेत असिस्टंट लेबर कमिशनर, क्लास वन ऑफिसर म्हणून रुजू झालो. पुढे डेप्युटी लेबर कमिशनर, अ‍ॅडिशनल लेबर कमिशनर म्हणून पदोन्नती मिळाली. जवळजवळ ३० वर्षांच्या सेवेतून जानेवारी २००२ मध्ये निवृत्त झालो. शासकीय सेवेत असताना अनेक मान-सन्मान मिळाले. ‘आंत्रप्रन्युअर इंटरनॅशनल’ या संस्थेतर्फे ‘उद्योग मित्र’ म्हणून पुरस्कार मिळाला. शासकीय सेवानिवृत्तीनंतर आज रिलायन्ससारख्या जागतिक कंपनीत त्यांचा एक कामगारविषयक सल्लागार म्हणून गेली १२ वष्रे काम करीत आहे. माझ्या शिकण्याच्या इच्छेला जीवदान मिळालं ते माझी आई व शंकरने दिलेल्या भक्कम आधारामुळे. एकदा आईने आणि नंतर शंकरने आश्वासन दिल्याने दोन टìनग पॉइंट माझ्या आयुष्यात आले. आणि मी आज अधिकारीपदापर्यंत पोहोचू शकलो. नाहीतर मी आज एक टेलर म्हणूनच गावात काम करीत राहिलो असतो.   

एक असाही अनुभव
गेल्याच महिन्यात मी माझ्या गावी माझा दुसरा लहान भाऊ विष्णू पाटील व आमच्या इतर कुटुंबीयांच्या मदतीने आमच्या छोटय़ाशा दुंडगे गावी एक मोफत ग्रंथालय सुरू केले आहे. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून माझ्या तालुक्यातील ग्रामीण भागातील दोन कॉलेजला, एक कोवाड येथील व दुसरे चंदगड येथील कॉलेजला, प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके देणगीदाखल दिली. त्यानिमित्ताने चंदगड कॉलेजमधील एका कार्यक्रमात माझा मुलगा अमोल पाटील जो, बी.ई.एम.बी.ए. होऊन रिलायन्स कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो, तो आपले मनोगत व्यक्त करताना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाला, ‘मित्रहो, माझे बाबा कशा परिस्थितीत शिकले, मोठे झाले हे सारे काही इतर वक्त्यांनी सांगितले आहे. माझे बाबा शिकले नसते तर गावात एक टेलर म्हणून राहिले असते. मग सांगा, आज हा या ठिकाणी तुमच्यासमोर जो अमोल पाटील उभा आहे, तो आज काय असता? मी बाबांनी शिवलेल्या कपडय़ांना बटण लावणारा पोरगा म्हणून राहिलो असतो की नाही? बघा आपल्या आयुष्यात कधी आणि कुठे टìनग पॉइंट मिळतील हे सांगता येत नाहीत. आयुष्यातल्या या चमत्कारावर विश्वास ठेवा. आणि मेहनत करा.’ हे त्याचे मनोगत ऐकून कार्यक्रमाला हजर असलेली कॉलेजची सारी मुले-मुली भारावून गेली.