News Flash

गद्धेपंचविशी : नाटक नावाचा तराफा

कॉलेजचा बराच काळ पसरलेलं पुणे पाहात वेताळ टेकडीवरील तेलकट देवळात घालवला आहे

अतुल पेठे atulpethe50@gmail.com

विचित्र एकटेपणा, न्यूनगंड आणि गोंधळलेपणानं मला ग्रासलं होतं. पण नंतर नाटक नावाचा तराफा माझ्या हाती आला आणि मी तो जिवाच्या आकांतानं पकडून ठेवला. दरम्यान, अनेक लेखक वाचले, नाटकं के ली, त्यातून माझं भावविश्व उलटपालटं झालं. वय २० ते ३०. या गद्धेपंचविशीच्या काळात गोंधळ, उलघाल, स्खलनशीलता, वेडेपणा, संताप, नैराश्य, दिशाहीनता आणि उत्कटता अशा साऱ्या भावभावनांचं मिश्रण मनात घुसळत होतं. माझ्यावर भसाभस अनुभव आदळत होता. वयाच्या विशीपर्यंत मी न्यूनगंडानं पछाडलो, चाळिशीपर्यंत अहंगंडानं तापलो आणि नंतर शहाणपणानं उरलो,  ते मात्र गद्धेपंचविशीत सापडलेल्या नाटकाच्या तराफ्यानंच.

करोनाच्या थैमानात स्वत:च्या ‘गद्धेपंचविशी’ला आठवावं का?, यावर विचार करता उत्तर सुचलं, ‘हाच तो काळ, स्वत:ला तपासण्याचा! निदान थोडं धाडस तरी करू या..’ कदाचित तुमचाही वेळ बरा जाईल. म्हणून हा छोटा प्रयत्न.

टळटळीत ऊन. उष्म वारे. घामाच्या धारा. धूळरस्त्यावर एक फाटका माणूस क्षीण मोसंब्यांचा रस विकतोय, तर दुसरा फिकट कलिंगडाच्या फोडी. मी मैदानातील झाडाच्या सावलीत आडवा होऊन हे पाहात आहे. मध्येच काही पुटपुटत आहे. काही क्षण जातात.. अचानक मधला काळ कातरला जातो.. शांतता.. आणि त्या शांततेला भेदून जाणारी घंटा वाजते. मला काही क्षण ग्लानी आलेली असते. मी दचकून उठतो. तप्त मैदानात कोणीच नसतं. सारं बळ एकवटून पळत सुटतो. दिशाच हरवते. भलत्याच इमारतीत शिरतो. तिथल्या माणसाची तेलुगू मला कळत नाही. तो फक्त बोट दाखवतो. मी परत जीव खाऊन पळत सुटतो. एकदाची इमारत सापडते. पंख फुटल्यागत तीन मजले चढतो. परीक्षेची वेळ बहुतेक संपली असावी. मी व्हरांडय़ातून पळतोय. पेपर देतायत की परत घेतायत? कळेना. बुडला पेपर असं वाटतं. मी वर्गात प्रवेश करतो, माझ्या बाकावर बसतो. समोर पेपर येऊन पडतो. मी घामानं निथळत आहे.

पण वाचलो! काही मिनिटं फुफ्फुसं जणू छातीतून बाहेर येऊन श्वास घेतायत असं वाटत राहिलं. मी जीव तोडून लिहू लागतो..

हे स्थळ असतं हनमकोंडा, वरंगल, आंध्र प्रदेश. माझं वय असतं चक्क २८ आणि मी असतो दोन वर्षांच्या मुलीचा बाप!

पण थेट २८ व्या वर्षी आंध्रात जाऊन मला बी.ए. करायची वेळ का यावी?

तर फ्लॅशबॅक-

माझ्या बाबतीत बालपण वाईट वगैरे गेलं नसलं तरी फार सुखदही नव्हतं. आई, वडील, कुटुंबीय चांगले असूनही काहीतरी विचित्र एकटेपणानं मला कायम घेरलेलं असायचं. शाळा, शिक्षक आणि मित्रही चांगले होते. पण मला मुळातच मराठी विषय सोडता शिक्षणात गोडीच निर्माण झाली नाही. माझ्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी सुरू असत. शाळा आणि अभ्यास म्हटलं की वर्गाच्या समोर पाळलेले ससे दिसत. त्यांचे लाल गुंजेसारखे डोळे  पुस्तकाच्या पानापानातून मला निरखत असत. आमच्या घराजवळच्या मैदानात ढाबळ होती. तिथे एक दिवस सर्व कबुतरांच्या माना पिरगळून टाकलेल्या होत्या. त्यांची रक्ताळ पिसं सतत दिसत. भीतीनं ग्रासलेला मी मग अशा वेळी देवळात जाऊन गरगर गरगर प्रदक्षिणा घालत असे. आमच्या वाडय़ातील ज्योतिषानं दिलेला पोवळ्याचा गणपती गळ्यात घालून असे. वरवर पाहाता मी नीट असे, अंतर्यामी मी वेगळाच होतो. पण कसा कोण जाणे, गटांगळ्या खाणारा मी तरू लागे.

मला त्या काळात गडकिल्लय़ांचं वेड होतं. सज्जनगडावर जाऊन मला आजन्म ब्रह्मचारी राहायचं होतं. कसल्या तरी अनाहूत वाटणाऱ्या आकर्षणापासून मी अशी सुटका करून घेई. त्यातल्या त्यात मला फटाके आणि साबण विकायला हायसं वाटे. पण तेही तितपतच. दहावी-बारावी पास झालो हे महान आश्चर्य. पुढे आदळत आपटत कॉलेजला गेलो. तिथल्या ‘अकौंटन्सी’ आणि ‘स्टॅटेस्टिक्स’मधल्या आकडेमोडीनं हैराण झालो होतो. कॉलेजचा बराच काळ पसरलेलं पुणे पाहात वेताळ टेकडीवरील तेलकट देवळात घालवला आहे. अशातच वडिलांनी तर मी चक्क ‘सी.ए.’ची प्रवेश परीक्षा द्यावी असं सुचवलं. इतकंच नाही, तर अभ्यास आणि अनुभव यावा म्हणून एका सी.ए.च्या ऑफिसमध्ये मला धाडलं. मी त्या ऑफिसात गेल्यावर माझ्या हातापायातली ताकद गेली. फायली आणि आकडय़ांचे कागद पाहून गर्भगळित झालो. करंगळी दाखवून आलोच, असं सांगून जे बाहेर पडलो तो पोबाराच केला. पानशेतच्या दिशेनं सायकल दामटत राहिलो. थकून विस्तीर्ण झाडाखाली झोपून राहिलो. त्या झाडाच्या ढोलीतच राहावं, असं वाटू लागलं. मी एस.वाय. बी.कॉम.च्या परीक्षेला बसलोच नाही. त्यामुळे टी.वाय. वगैरेचा प्रश्नच नव्हता. आईवडिलांना काहीही खोटं सांगून आणि प्रसंगी त्यांच्या नकळत परस्पर पैसे चोरत दिवाभीतासारखा जगत होतो. वय होतं १८.

याच काळात मला लैंगिक प्रश्न भेडसावू लागले. स्वत:च्या आवेगी लैंगिकतेला मला सामोरंच जाता येत नव्हतं. स्त्री आकर्षण अफाट होतं. घरातील कोणाला काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता. लैंगिकतेबाबत मित्रांतून काहीबाही कळत राहायचं. काही विचित्र अनुभव घेतले. अशा गोष्टींचा पराकोटीचा ‘गिल्ट’ यायचा. मग मी प्रायश्चित्त घ्यायचो. एकदा जळती धूपकांडी मनगटावर रागानं चुरली! माझं जगाशीच काय, पण माझं माझ्याशीच जुळत नव्हतं. मी अशा सर्व दिशांनी घेरलेल्या प्रश्नांपासून पळत होतो. याच काळात बुडत्याला काडीचा आधार मिळाला. नाटक नावाचा तराफा माझ्या हाती लागला. तो मी जिवाच्या आकांतानं पकडून ठेवला. ‘शिशुरंजन’ या बालनाटय़ संस्थेत दाखल झालो. पुढे कॉलेजात पुरुषोत्तम करंडकमध्ये ‘चेस’ ही एकांकिका केली. त्यात मला लेखन आणि अभिनयाचं पारितोषिक मिळालं. मी परत तरंगू लागलो. गाभ्यातलं अपयश झाकायला अधेमधे मिळणारी अशी पारितोषिकं बरी असतात हे उमगलं. वय होतं १९.

वय २० ते ३०. गद्धेपंचविशीचा काळ. या काळात गोंधळ, उलघाल, स्खलनशीलता, वेडेपणा, संताप, नैराश्य, दिशाहीनता आणि उत्कटता अशा साऱ्या भावभावनांचं मिश्रण मनात घुसळत  होतं. भाषेची ओढ असल्यानं मी वाचनालयातून पुस्तकं आणू लागलो. चि. त्र्यं. खानोलकर, जी. ए. कु लकर्णी, गो. नी. दांडेकर अशा अनेक लेखकांच्या मी आधी प्रभावाखाली होतो. पण या काळात ‘थिएटर अकादमी’ ही काळाचा व्यापक पट समोर असणारी महत्त्वाची नाटय़संस्था माझ्या आयुष्यात आली. हिच्यामुळे मी नखशिखांत बदलू लागलो. ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ या नाटकांनी माझं आधीचं जग बदललं. मी विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, गो.पु.देशपांडे असे लेखक वाचून पाहू लागलो. याच काळात श्याम मनोहर या लेखकाची ओळख झाली. श्याम मनोहरांमुळे माझं विचारविश्वच बदललं. भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, रघू दंडवते, अशोक शहाणे, नामदेव ढसाळ, राजा ढाले, दया पवार, नारायण सुर्वे, मनोहर ओक, कमल देसाई, मनोहर शहाणे, सतीश तांबे, चंद्रकांत पाटील आणि भाऊ पाध्ये हे लेखक मी वाचू लागलो. मला हा प्रांत जवळचा वाटू लागला. ‘कोसला’, ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’, ‘महानिर्वाण’, ‘अतिरेकी’तील पराभूत ‘न-नायक’ मीच आहे असं वाटू लागलं. त्यात मला समांतर सिनेमांनी पछाडलं. ‘अर्धसत्य’, ‘आक्रोश’, ‘गर्म हवा’, ‘उंबरठा’, ‘सिंहासन’ अशा चित्रपटांनी माझं भावविश्व व्यापलं. स्मिता पाटील, दीप्ती नवल आणि सुप्रिया पाठक यांच्याबरोबर तर मनातून मी संसारच थाटला होता. ‘घरोंदा’मधलं ‘एक अकेला इस शहर में’ म्हणत मी मुंबईत रेल्वे पुलावर गाणं म्हणत उभा राहिलो आहे. ‘सीने मे जलन’ वगैरे गाणी तर मनाच्या नाजूक कसनुशा अवस्थेला चूड लावत होती. आधीच्या गूढ आणि सात्त्विक गोष्टींतून माझी मुक्तता होऊन मी प्रखर वास्तवाचे चटके समजावून घेऊ लागलो. आजूबाजूच्या साऱ्या दु:खाला ‘नियती’ नाही, तर काही ‘कारण’ असतं हे कळू लागलं. भांडवलदारी, कम्युनिस्ट, फॅसिस्ट, सोशालिस्ट आणि धार्मिक-जातीय मांडणी मला थोडी थोडी उमगू लागली. मी गळ्यातील पोवळ्याची माळ एका ओढय़ात फेकून दिली.

‘थिएटर अकादमी’मुळे मी चित्रपट पाहू लागलो, फ्रें च-जर्मन नाटकं पाहू लागलो, घमासान चर्चा ऐकू लागलो आणि अपमानाचा उच्चांक गाठणाऱ्या उर्मट, तुच्छ टिंगलटवाळ्याही पचवू लागलो. ‘घाशीराम’, ‘पडघम’  आणि अडलंनडलं तेव्हा ‘तीन पैशाचा तमाशा’मध्ये काम करू लागल्यानं भारतभर जाऊ लागलो. दरम्यान, थिएटर अकादमीनं आयोजित केलेल्या ‘फोर्ड फाउंडेशन’ लेखन कार्यशाळेत माझी निवड झाली. तिथे नाटकाच्या तराफ्याचा किंचित अंदाज आला. त्या वेळेस मी लिहिलेली ‘क्षितिज’ आणि ‘अवशेष’ ही नाटकं माझ्या त्या वेळेपर्यंत अनुभवलेल्या नैराश्याची, लैंगिक हताशपणाची आणि पराकोटीच्या रागाची होती. ती नाटकं करून मी माझ्या त्या नकोशा अनुभवांना तिलांजलीच दिली म्हणावं लागेल. हा सारा अनुभव मी तनमनानं समर्पित होऊन घेतला. आजवरच्या घुसमटलेल्या जीवाला तो उतारा होता. याच काळात हंगेरी, युगोस्लाव्हिया, रशिया, पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीत प्रयोगांना गेलो. उमगत काहीच नव्हतं. फक्त भसाभस अनुभव आदळत होता. पश्चिम जर्मनीत मी ‘ग्रिप्स थिएटर’मधली नाटकं पाहून जसा स्तिमित झालो, तसाच जिवंत बाईनं एकेक कपडे उतरवत केलेला अतिशय उत्तान ‘शो’ पाहून हादरलो. ‘सेक्स शॉप्स’मध्ये चोरटय़ा अवस्थेत जाऊन येणं ही तर दबलेल्या उत्सुकतेची सीमा आणि धैर्याची कसोटी होती. ही लैंगिकता काय भानगड आहे हे मी तेंडुलकरांमुळे समजू लागलो. त्यांच्यामुळे मी र.धों.कर्वे वाचले आणि सिमोन द बोउआरसुद्धा!

या काळात माझ्या आयुष्यात अजब घटना घडली. शिक्षण अर्धवट सोडलेला २२ वर्षांचा मी, माझ्याहून दोन वर्षांनी मोठय़ा असलेल्या रोहिणी टाकसाळेच्या प्रेमात पडलो. ती माझ्यापेक्षा अकॅडमिक पातळीवर हुशार होती. शिवाय सरकारी नोकरीत होती. हे टाकसाळे कुटुंब मला थक्क करणारं होतं. रोहिणीचा भाऊ मुकुंद आणि वहिनी संध्या टाकसाळे नवविचारांनी भारलेले  होते. मी रोहिणीसह दोन वर्ष कुठेकुठे भटकत असे. पण याबद्दल चकार शब्द या कुटुंबातील कोणी काढला नाही. रोहिणीचे वडील धोतर-टोपी घालणारे नीरा बारामतीचे अतिशय साधे शेतकरी होते. ते आजारी होते. त्यांच्याकरता मी दवाखान्यात जाऊन बसत असे. एकदा मी न राहावून त्यांना विचारलं, की तुम्हाला रोहिणीसोबत माझ्यासारखा असा रिकामटेकडा भणंग माणूस हिंडत असल्याची चिंता वाटत नाही का? (कारण माझ्या आईवडिलांनी माझ्या बहिणींकरता कष्ट घेऊन स्थळं कशी निवडली हे मी अनुभवलं होतं ना!) तर हा प्रश्न ऐकून रोहिणीचे वडील क्षणभर स्तब्ध झाले. मिटलेले डोळे उघडले. त्यांचा मनगटावर सुई टोचलेला हात माझ्या हाती देत म्हणाले, की ‘मी शेतकरी आहे.. पाऊस येणार याची खात्री असणारा.. त्यामुळे मी निर्धास्त आहे.’ हे ऐकून मी पार उलटपालटा झालो.  स्फुंदून स्फुंदून रडू लागलो. आयुष्यात माझ्यावर इतका विश्वास कोणीतरी प्रथमच दाखवला होता. मी काहीतरी करायचं असा निश्चय केला.

रोहिणीचे वडील आजारी असल्यानं त्यांच्या डोळ्यादेखत लग्न करून घ्यावं, असा विचार आम्ही केला. माझ्या आईवडिलांना रोहिणीबाबत अतिशय विश्वास आणि प्रेम. त्यांनी रोहिणीला माझ्या कलंदर असण्याबाबत ‘अलर्ट’ केलं. तिला याची जाणीव आहे ना ही खात्री करून घेतली. आम्ही लगोलग नोंदणी पद्धतीनं विवाह केला. तिच्या वडिलांच्या पाया पडायला दवाखान्यात गेलो. झालं. माझं चक्क साडेतेवीस वर्षांचा असताना थेट लग्नच झालं.

लग्नाआधी एकदा रोहिणीच्या ओळखीचे एक जण रस्त्यात भेटले. थोडं बोलणं झाल्यावर मी काय करतो?, असा प्रश्न त्यांनी विचारला. मी काही बोलणार इतक्यात रोहिणीनं मी इंजिनीअर आहे असं सांगितलं. माझ्यावर बेशुद्ध पडायची वेळ आली. ते लोक वाटेला लागताच मी रोहिणीला विचारलं, की तिनं मी नाटकवाला आहे असं का सांगितलं नाही?, तर  ती म्हणाली,

‘‘प्रायोगिक नाटक म्हणजे काय?, ‘शीतयुद्ध सदानंद’, ‘सापत्नेकराचे मूल’, ‘प्रलय’ अशी नाटकं  करून घर चालतं का? किंवा ‘बालगंधर्व’मध्ये ही नाटकं चालतात का?, वगैरे प्रश्नांना कशाला उत्तरं द्या, म्हणून त्यांना मी इंजिनीअर आहे, असं सांगितलं.’’ लोकांच्या मूर्ख प्रश्नांपासून मला वाचवणं हा तिचा सद्हेतू होता. पण माझ्या जिव्हारी मात्र जखम झाली होती.

शिक्षण अर्धवट आणि नोकरी नाही या भावनेनं मला लाज वाटू लागली. या अस्वस्थतेपोटी मी विविध नोकऱ्या शोधू लागलो. ज्यूस, पावभाजी सेंटर सुरू करावं असंही ठरलं. माझ्या मेव्हण्यांच्या मिठाईच्या दुकानात अर्धा तास बसून आलो. मुंबईत व्यावसायिक नाटकात काम करणार होतो, पण ते नाटक तालमीतच बंद पडलं आणि मी उद्ध्वस्त. अशा बारीकसारीक गोष्टी माझ्या मनाला जबर रक्तबंबाळ करत. मी परत बुडायला लागलो आणि तराफ्याची वेगळी बाजू हाती आली..

बारावी पास असल्यानं ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ला धीर एकवटून प्रवेश घेतला. उत्तम गुणांनी पास झालो. लग्नानंतर दोन वर्षांनी आमच्या घरी बाळ आलं. श्याम मनोहरांच्या ‘कळ’ या प्रसिद्ध कादंबरीतील नायिकेचं नाव मुलीला ठेवलं.. पर्ण! या काळात मला थिएटर अकादमीचंही नकोसेपण येऊ लागलं. आणि अचानक संधी समोर आली. मी नाशिकच्या मुक्त विद्यापीठात ‘एफ. एम. रेडिओ टेक्स्ट’ ध्वनिमुद्रण प्रकल्पात काम करायला गेलो. तिथे पैसे मिळू लागल्यानं मला धीर आला. तिथेच नव्यानं सुरू झालेल्या ‘दृकश्राव्य केंद्रा’त नोकरीला लागलो. पण तिथे विशिष्ट पदाकरता डिग्री आवश्यक, म्हणून मी काकातीया विद्यापीठात ‘वन सिटिंग बी.ए.’ करता येतं हे कळून थेट आंध्र प्रदेशातील सुरुवातीला उल्लेख केलेलं वरंगल आणि हनमकोंडा गाठलं.. बी.ए. पास झालो. नंतर पुणे विद्यापीठातून एम.ए. केलं. पीएच.डी. करता करता सोडून दिली. नाशिकच्या नोकरीनं मी पूर्णत: बदललो. तिथून स्वतंत्रपणे मला हवं तसं नाटक करू लागलो. ‘प्रयोग परिवार’ ही आमची नाटय़संस्था. तिथे मी रुळलो, खुललो आणि चुका करत, सुधारत उभा राहायला शिकलो. या माझ्या गद्धेपंचविशीतील शेवटचा टप्पा म्हणजे १९९० साल. नव्या डिजिटल जगाची नांदी सुरू झाली. राजीव गांधींची हत्या झाली. रथयात्रा सुरू झाली. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली गेली. (त्याच दिवशी आम्ही ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा कोलकाता येथे प्रयोग करत होतो. तो प्रयोगही शेवटचा ठरला.) माझ्याकरता हे आघात होते. व्यक्ती आणि समाज यांच्यात तुकडे पडू लागले. धर्म आणि तंत्रज्ञान जगण्यात घुसू लागले. अनाकलनीय घुसमट सुरू झाली. या काळात मी ‘वेटिंग फॉर गोदो’ केलं.

१९९४ मध्ये मी ३० वर्षांचा झालो. माझ्या ‘गद्धेपंचविशी’चा काळ संपला. अधिक जबाबदार नागरिक आणि नाटकवाला होण्याचं आव्हान समोर उभं राहिलं. माझ्या नाटकाच्या निवडीतून हे भवतालातील बदल दिसू लागले. आज ५७ व्या वर्षी जाणवतं, की वयाच्या विशीपर्यंत मी न्यूनगंडानं पछाडलो, चाळिशीपर्यंत अहंगंडानं तापलो आणि नंतर शहाणपणानं उरलो!

मात्र या शहाणिवेच्या खोल शांत समुद्रात न्यायला मला ‘त्या’ वयात सापडलेला ‘नाटक नावाचा तराफा’ कारणीभूत आहे हे मात्र नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:01 am

Web Title: theater personality atul pethe talk about his career in drama field zws 70
Next Stories
1 विस्तारल्या कुटुंब कक्षा
2 आहे अटळ, तरीही..
3 स्मृती आख्यान : विस्मरणाचे रोजचे अनुभव
Just Now!
X