rttकेरळमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे, हिमाचल प्रदेशमधील शैक्षणिक स्तर सुधारणे, इतर खासदारांसोबत लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे यांसारख्या देशाच्या दृष्टीने प्रगतिशील धोरणे राबविण्यासाठी स्वनीतीची स्थापना करून ‘थिंक टँक’ची कल्पना विकसित करणाऱ्या हृत्विका भट्टाचार्य विषयी..

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत देशातील गरीब, कनिष्ठ आर्थिक स्तरातील जनतेला विम्याचे संरक्षण देणाऱ्या मोजक्या विकसनशील देशांपैकी एक भारत देश आहे, तर रस्ते या दळणवळणाच्या माध्यमातून प्रभावीपणे भौगोलिक भूभाग जोडणारा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे!
 या दोन्हीही गोष्टी देशाच्या, नागरिकांच्या दृष्टीने प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या. परंतु इतक्या मोठय़ा स्तरावर काही धोरणे राबवायची असतील तर तेवढय़ाच प्रभावी उपायांची आणि त्यांच्या नियोजनाची गरज भासते. आपल्या अनेक सरकारी/ राज्य सरकारी योजना, तरतुदी या अतिशय उत्तम आहेत, फक्त त्यांच्या अंमलबजावणीचे त्रांगडे होऊन बसले आहे. यावर ‘थिंक टँक’च्या माध्यमातून नवी दिल्लीतल्या एका तरुणीने खणखणीत उत्तर शोधले आहे.
अवघ्या २८ वर्षांच्या, नवी दिल्लीच्या हृत्विका  भट्टाचार्यने पॉलिसी मेकिंग अर्थात धोरणांचे नियोजन व अंमलबजावणी सारख्या क्लिष्ट विषयात भरीव काम करून ठेवले आहे. यासाठी तिने स्थापन केलेल्या ‘स्वनीती इनिशिएटिव्ह’ या एनजीओद्वारा ती देशातील नेते व संसदपटूंना प्रभावी कामकाजासाठी, चांगल्या योजना आखण्यासाठी मार्गदर्शन करते. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास करण्यासाठी कोणकोणत्या योजना आखाव्या लागतील, याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करते. आजकाल जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडे असे ‘थिंक टँक’ असतात. त्या त्या नेत्यांच्या मतदारसंघातील समस्या, त्यांचे पृथक्करण व समस्येचे निराकरण याबाबत माहिती देणे हे त्यांचे प्रमुख काम.
हृत्विकाला या कामाविषयी आकर्षण निर्माण झाले, ते लहानपणीच. वडील राजकारणात असल्याने राजकीय व्यक्ती, नेते यांची ऊठबस तिला नवी नव्हती. लहान वयातच, बारा वर्षांची असताना, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा तिने त्यांना बोलून दाखवली होती!
घरची सुबत्ता होती, त्यामुळे तिचे महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत पार पडले. अमेरिकी सिनेटर कँशरीन हॅरिस यांच्यासाठीही तिने विकासकामांच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडली आहे हे विशेष.
‘स्वनीती’च्या स्थापनेची कहाणीही रंजक आहे. हृत्विका व तिचे दोन सहकारी यांच्यात चर्चा सुरू होती, देशात १४ व्या लोकसभेचे वारे वेगाने वाहू लागले होते. तरुणांची राजकीय नेत्यांबरोबर काम करण्याची इच्छा त्यांच्या लक्षात आली. २१ व्या शतकातील नेत्यांनाही तरुणांच्या सक्रिय सहभागाची, त्यांच्या ज्ञानाची आवश्यकता होतीच. मग ही मागणी व पुरवठा यातील दरी भरून काढण्यासाठी २००९ साली ‘स्वनीती’ स्थापन झाली. पहिल्याच प्रयत्नात काही महत्त्वांच्या नेत्यांचे ‘थिंक टँक’ म्हणून त्यांना काम करायला मिळाले.
बुद्धिमत्तेचे देणे लाभलेल्या हृत्विकाची शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्दही तितकीच बहारदार आहे. हार्वर्ड केनेडी स्कूल या सुप्रसिद्ध विद्यापीठातून ‘पब्लिक पॉलिसी प्रोग्राम्स’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण तिने संपवले, तोच तिची जागतिक बँकेत ‘असोसिएट इन ग्रोथ अ‍ॅण्ड कॉम्पेटेटिव्ह एरिया’ पदासाठी निवड झाली. येथील अनुभवाने तिची या विषयाची चांगलीच पायाभरणी झाली. अर्थशास्त्र व धोरणनिर्मिती या विषयात ती पारंगत झाली.
‘स्वनीती’च्या स्थापनेपासून आत्तापर्यंत त्यांनी नव्वदहून अधिक खासदार व आमदारांबरोबर काम केले आहे. यात काही नामवंत मंडळीही आहे. यात तृणमूल काँग्रेसचे नेते व माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी, बिजू जनता दलाचे जय पांडा व भाजपचे यशवंत सिन्हा यांचा समावेश आहे. ‘थिंक टँक’ म्हणून काम करणाऱ्या हुशार तरुणांची फौजच ‘स्वनीती’मध्ये काम करते, हे हृत्विकाच्या यशाचे गमक आहे. तरुण, उत्साही व समर्पित व्यावसायिक तरुणांची निवड करून त्यांना त्या त्या खासदार-आमदारांच्या मतदारसंघातील विकासात्मक कामांची जबाबदारी त्यांना दिली जाते. ही मंडळी तेथील परिस्थितीचा अभ्यास करून त्यांना योग्य बदल सुचवतात.
हृत्विका चेंजमेकर का आहे, याचं उत्तर म्हणजे तिच्या व तिच्या टीमने अभ्यासलेल्या, सुचवलेल्या उपाययोजना लाखो लोकांच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान देतात. तिच्या टीममध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसोबत काम केलेला, आयआयएमचा विद्यार्थी हरिहरन श्रीराम आहे, तर वरुण संतोष नावाचा मुलगा सध्या सिक्किमच्या मुख्यमंत्री कार्यालयासाठी काम करतो. पर्यावरण व मानवी संसाधने हा त्याच्या आवडीचा विषय आहे. तर खासदार सुलतान अहमद यांच्याबरोबर काम करणारा अंशुमन दिधवानिया याने त्याला मिळालेल्या संधीचे अक्षरश: सोने केले आहे. तळागाळातील जनतेत आर्थिक सक्षमता आणणाऱ्या बचतगटामार्फत २० लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य त्याने गाठले, अवघ्या दोन वर्षांत. अशी अनेक उदाहरणे आहेत.
‘स्वनीती’ने केरळमधील स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, हिमाचल प्रदेशमधील शैक्षणिक स्तर सुधारण्याकामी धोरणात्मक बदल घडवणारे धाडसी निर्णय घेतले. खासदार कमल नाथ यांच्या मतदारसंघात पर्यावरणरक्षणाशी संबंधित योजना आखल्या. ओदिशाचे खासदार श्रीकांत जेना, जमशेदपूरचे झामुमोचे खासदार अजय कुमार यांच्याबरोबर तळागाळातील लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या. ही यादी खूप वाढवता येईल. पण कोणत्याही योजना आखताना, एखाद्या प्रकल्पाचा प्रस्ताव सुचवताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्या त्या विषयाशी संबंधित संशोधन करावे लागते. याचसाठी ‘स्वनीती’ने दोन महत्त्वाचे माहितीचे स्रोत विकसित केले आहेत. एक म्हणजे ताम्रपत्र. यात केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा डेटा एकत्रित केलेला आहे. या योजनांमधील तरतूद, त्यांच्या अंमलबजावणीची आकडेवारी व आलेले यश. तर दुसरा स्रोत ‘जिग्यासा लॅब.’ २०१३ च्या अखेरीस स्थापन झालेले हे केंद्र म्हणजे खात्रीलायक व अचूक माहितीचा स्रोतच जणू. हृत्विका सांगते, अनेकदा धोरणे आखताना उपलब्ध डेटा हा पुरेसा नसतो वा सर्वागीण नसतो अशा वेळी ताजी आकडेवारी, संबंधित घडामोडी-घटना यांचे संदर्भ नियोजनात मोलाची भर घालू शकतात. म्हणूनच हे केंद्र सुरू करण्याचे मनात धरले. तिचा हा दावा किती खरा आहे ते तपासण्यासाठी वेबसाइट लिंकवर जिग्यासा लॅबवर क्लिक केले. तर त्या त्या राज्यातील शेतीची प्रगती, उत्पादकता वाढीचा निर्देशांक व सत्ताधारी पक्षाचे योगदान या गोष्टींचा एकत्रित तुलनात्मक तक्ताच तिथे आहे. जो आणखी कुठेही सापडणार नाही. राजकीय पक्षांच्या सत्तांतरसह, काळ बदलतो तसा शेतीच्या प्रगतीचा आलेखही कसा खाली-वर होतो, याचे दर्शनच येथे होते. यावरूनच हे किती मोठे योगदान आहे याचा अंदाज यावा.
हृत्विका व तिच्या गटाचा ठाम विश्वास आहे- की  सकारात्मक बदलाची कास धरणारे राजकीय नेते व ध्येयवादी, समर्पित वृत्तीने काम करणारी तरुणाई यांची सोबत असेल तर अनेक समस्यांची उकल शक्य आहे.
  हृत्विका म्हणते, भविष्यात अधिकाधिक खासदार व आमदार यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा मानस आहे. मात्र नुसताच हा आकडा वाढवून उपयोग नाही. तर व्यवस्थेत माहिती देवाण-घेवाणीत ती दरी आहे ती मिटवणे हे आमचे खरे लक्ष्य आहे.’ उदा- केंद्रांच्या राज्यांसाठी जवळपास १५० कल्याणकारी योजना असतील, पण ‘स्वनीती’च्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या खासदारांशी चर्चा केली, त्यांना फक्त २०-३० योजनांची माहिती होती. जर योजनांची माहितीच नसेल तर हे नेते त्या मतदारसंघात राबवणार कशा?
एक तरुणी धोरणात्मक विकासासारख्या क्लिष्ट विषयात लक्ष घालते व देशाचा विकास साधायचा असेल तर व्यवस्था बळकट करण्यासाठी, राजकीय नेतृत्वाला सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध काम करते, हा तिचा प्रयत्नच अनेकांसाठी दिशादर्शक आहे. हृतिकासारख्या व्यक्तींनी वेगवेगळ्या व ठोस कल्पना घेऊन येणे आणि त्या राबवण्यासाठी कष्ट करणे हे त्यांच्यासाठीच नव्हे तर देशाच्या प्रगतीसाठीही महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.   
भारती भावसार -bharati.bhawasar@expressindia.com

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त