27 September 2020

News Flash

नात्यांची उकल : दोघांत ‘तिसरी’

दोन व्यक्तींमध्ये एखादी ‘तिसरी प्रेमाची’ व्यक्ती आली, की आपण त्याला सहजपणे नाव देऊन टाकतो, व्यभिचार

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

दोन व्यक्तींमध्ये एखादी ‘तिसरी प्रेमाची’ व्यक्ती आली, की आपण त्याला सहजपणे नाव देऊन टाकतो, व्यभिचार! खरंच सगळ्या नातेसंबंधांकडे या एकाच पद्धतीने बघण्याची गरज आहे का? त्याही पलीकडे जाऊन विचार करायला हवा की का येते ‘तिसरी’ व्यक्ती जोडप्यांमध्ये? कोणतं नातं असू शकतं दोघांमध्ये, प्रेम, मैत्री, भावनिक बंध की तडजोड? नात्यांमधल्या या विविध बंधांविषयी..

‘एक होती चिऊ आणि एक होता काऊ किंवा एक होता राजपुत्र आणि एक होती राजकन्या. किंवा आटपाट नगरात, कोणे एके काळी कोण्या एकाच्या स्वप्नात कोणी एक आलं, आणि मग..’ या सगळ्या गोष्टींचा शेवट, ‘मग ते सुखासमाधानाने, आनंदात राहू लागले.’ असा असतो.

हे या सुखांतात सांगितलं जातं तसं खरंच ‘चालू भविष्यकाळ’ म्हणून कायम टिकतं का, हा प्रश्न आजपर्यंत प्रत्येकालाच पडणारा. त्यातही, या कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये एखादी, ‘तिसरीच प्रेमाची’ व्यक्ती आली, की मात्र या चालू असलेल्या एकाच कथेतून अनेक कथांची सुरुवात व्हायला वेळ लागत नाही. ही ‘तिसरी’ व्यक्ती कोण, हे अधिक स्पष्ट करायची गरज नाही. ‘हे काय भलतंच’ किंवा ‘आमच्या आजूबाजूला नाही बुवा असं काही.’ किंवा ‘आमच्या कुटुंबात आम्ही सगळेच सुसंस्कृत, त्यामुळे असं काही घडण्याची सुतराम शक्यता नाही.’ किंवा ‘त्याला/ तिला काय, सवयच आहे तसली’ हे असे उद्गार या विषयासंबंधी अगदी सहज निघतील. निर्भर्त्सना, तिटकारा किंवा या विषयांबाबत उदासीनता, या सगळ्या चाकोऱ्या सोडून देऊन विचार केला, तर आपली बुद्धी कदाचित आपल्याला एक साधा चष्मा लावायला भाग पाडेल. म्हणजे जे जसं आहे, जसं घडतंय, त्या पद्धतीनेच पाहता येईल. त्याला आपल्या पदरच्या कोणत्याही नवीन टिप्पणीची गरज नसेल, नाही का?

आता काही घणाघाती प्रश्न विचारले जातील.

पण मग समाजव्यवस्थेचं काय? नैतिकता, नैतिक मूल्ये यांचं काय? आपल्या संस्कृतीचं काय? वगैरे वगैरे प्रश्न उद्भवू शकतात. पण मुळात आपल्याला काहीतरी खटकतंय म्हणून ते तसंच असावं, असं नक्कीच नाही. आजही आपल्याला आदर्श वाटणाऱ्या याच समाज व्यवस्थेतच राजरोसपणे या ‘प्रेमाच्या’ व्यक्ती किंवा ही नाती ठरवून सातत्याने बदलणारे लोक आहेतच की. आपण डोळ्यांवर कातडं ओढणं पसंत केलं म्हणून ते घडतच नाही असंही नाही. त्याला नावही देऊन ठेवलंय आपणच, ‘व्यभिचार’. पण कोणाच्या या अशा नात्यांना ‘प्रेम’ म्हणायचं, कोणाच्या नात्यांना ‘मैत्री’, कोणाच्या नात्यांना ‘तडजोड’, कोणाच्या नात्यांना केवळ ‘भावनिक बंध’ तर कोणाच्या नात्यांना ‘व्यभिचार’ हेसुद्धा आपणच आपापले सोयीस्कर नियम लावून ठरवून टाकतो.

मात्र सगळ्या नातेसंबंधांकडे खरोखर या एकाच पद्धतीने बघण्याची गरज आहे का? शिवाय आपण हे केवळ शारीरिक मापदंडांवर सरसकट ठरवून मोकळे होतो, त्यामागे काय मानसिकता असावी? मुळात दोघात ‘तिसरी व्यक्ती’ खरोखर येण्याइतकी जागा असते का? आणि असेलच तर त्या दोघांच्या नात्याचा नेमका अर्थ काय? समाजमान्य आहे म्हणून, कित्येक वर्ष एकत्र सहवास आहे म्हणून, की केवळ सवयीचा भाग म्हणून, की एकनिष्ठ राहणे हे अत्यावश्यक मानले गेले आहे म्हणून?

यातील मनुष्याला प्राण्यांसारखे पाहिले तर त्यातही इतर प्राण्यांमध्ये दिसतात त्याप्रमाणे अनेकवेळा अनेक व्यक्तींबाबत वाटणाऱ्या शारीरिक आकर्षणाचे गुणधर्म अगदी सहज दिसतील. उदा. आपण सहजच जाताजाता ‘अमुक एक व्यक्ती मला दिसायला आवडते किंवा तिच्यातील ही गोष्ट भावते,’ असे सांगतो. यात रुपेरी पडद्यावरचे कलाकार अग्रक्रमाने किंवा आज माझ्या स्वप्नात अमुक एक ‘मदन’ वा अमुक एक ‘मेनका’ आली होती, हेसुद्धा मोठय़ा आनंदाने सांगतो. तिथे आपल्याला आपण कुठेही जोडीदाराशी किंवा एकनिष्ठ असण्याच्या संकल्पनेशी प्रतारणा करतोय, असं अजिबातच वाटत नाही. कारण ते अंगवळणी पडलेलं आहे. त्यामुळे हे आपल्याला खटकतसुद्धा नाही.

याचाच दुसरा अर्थ, आपल्याला वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पातळ्यांवर आवडणे साहजिकच आहे. परंतु त्या स्वाभाविक वाटणाऱ्या आकर्षणाला आपण वाट कशी करून देतो, हेसुद्धा महत्त्वाचं. म्हणजे मोकळेपणाने ते सहज बोलून किंवा त्याविषयी व्यक्त होऊन, की ते मनात साठवून, दाबून ठेवून.. आणि त्याही पुढे जाऊन या केवळ काही क्षण वाटणाऱ्या आकर्षणातून त्याला कोणत्या तरी एखाद्या नात्याच्या नावात बांधून घेतो, की त्यातून एखादे बिननावाचे पण अर्थपूर्ण नाते आकार घेऊ शकेल असे बघतो?

पण या अशा सर्वच नातेसंबंधांना एकाच तराजूत तोलून, एकाच पद्धतीने जोखून, कसे चालेल?

त्याआधी ही अशी नाती तयार होण्याची कारणं नेमकी काय हे समजून घेतले पाहिजे.

जोडीदारासोबतचे नाते स्वेच्छेने निवडलेले, की लादले गेलेले हा पहिला मुद्दा. म्हणजे इथे प्रेम-विवाह की ठरवून केला गेलेला विवाह असं नाही. कोणत्याही प्रकारे नात्याची सुरुवात झाल्यानंतर सतत ‘ते लादले गेलेले आहे’ असेही वाटू शकते. यामधून आपल्याला हव्या असणाऱ्या नात्याचा अव्याहत शोध सुरू होतो. बऱ्याचदा यात केवळ शारीरिक गरजेचा भाग किंवा त्यातील असमाधानाचा भाग असेल, तर अनेकदा विवेक, विचार, हे सगळे मागे पडून त्याच एका गोष्टीसाठी अशी नाती तयार केली जातात.

वैवाहिक आयुष्य, परिवार, समाजातील स्थान, यात स्थिरस्थावर झालेल्या कित्येक व्यक्तींना, ‘आता आयुष्यात काहीतरी नवीन हवे.’ असे वाटू लागते, त्या वेळेस कित्येकदा काही उथळ नाती तयार होतात. ती जितकी अचानक तयार होतात, तशीच पुसलीही जातात.

काही व्यक्तींच्याबाबत नावीन्याचा सोस हा एखाद्या व्यसनाप्रमाणे असू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींचा उद्देश बऱ्याचदा केवळ अशी अनेकानेक नाती तयार करणे आणि त्यातून केवळ शारीरिक सहवासाचा आनंद असा असू शकतो.

बऱ्याचदा एखाद्या अशा नात्यातून बाहेर पडल्यानंतर गरज म्हणून इतर बंध तयार होतात आणि मग त्याचे चक्रच सुरू होते.

कित्येकदा या अशा जोडीदाराशिवायच्या अनेक नात्यांचा संबंध काही मानसिक विकृतींशीही असतो.

मित्र-मत्रिणी, सहयोगी यांच्या दबावाखाली येऊनही अशी नाती तयार झालेली दिसतात. किंवा काही प्रसंगी तडजोड म्हणूनही. ही तडजोड काय आणि त्यासाठी आपण आपले व्यक्ती म्हणून असणारे स्वातंत्र्य अशाने गमावून बसू, याचा विचार, ती घडण्यापूर्वी झाला पाहिजे.

आता यातल्या दुसऱ्या, बऱ्याचदा दुर्लक्षित झालेल्या बाजूकडे पाहू.

जोडीदार निवडणे, त्याच्यासोबत जगण्याची सुरुवात करणे, ही तर केवळ सुरुवात असते. इथून बऱ्याच पुढच्या टप्प्यांवर ‘आपल्याला कदाचित वेगळे काहीतरी हवे होते,’ असा साक्षात्कार होण्याची शक्यता असते. असे वाटले, तर यात काहीतरी मोठे चुकते आहे, असे नाही. ती एक स्वाभाविक भावना असते. अशा वेळेस अनेकदा नंतर भेटणारी एखादी व्यक्ती आवडू लागते किंवा हवीशी वाटू लागते. इथे शारीरिक गरजांपेक्षा मानसिक गरज, भावना समजून घेण्याची पातळी, याला प्राधान्य दिले जाते. इथेही काही नाजूक नाती तयार होतात.

जर दोघांत तिसरी कोणी प्रेमाची व्यक्ती येण्यासाठी आपसूक जागा तयार होत असेल तर मुळात तिथे नक्कीच पोकळी आहे, हे समजून घेणे गरजेचे. त्यावर उपाय झाले तर उत्तमच, अन्यथा तिथे नवीन दुसऱ्या नात्याची सुरुवात होतेच.

जोडीदार जर जास्तच संशयी असेल किंवा जोडीदार नात्यातल्या दुसऱ्या व्यक्तीला आपल्या मालकी हक्काची वस्तू असे समजत असेल तर तिथे साध्या स्नेहबंधांकडेही वक्रदृष्टीने पाहिले जाण्याची शक्यता असते.

कित्येक नाती ही कोणत्याही नावाशिवायची, अत्यंत घट्ट, तितकीच निरोगी असतात. तिथे व्यक्तीचे लिंग, वर्ण या सगळ्याच्या पुढे वाट काढत अशी नाती तग धरून असतात. अनेकदा ही नाती चाकोरीबद्ध भावना, विचार असलेल्या लोकांना उमजत नाहीत. त्यामुळे अशा नात्यांवर सहज ठपका ठेवण्याची वृत्ती दिसते किंवा ‘आपल्यापाशी असा बंध का नाही,’ या विमनस्कतेतूनही या नात्यांना समजून घेतले जात नाही.

आपण एक साधी बाब विसरतो, ती म्हणजे आपल्याला एकाच व्यक्तीसोबत सारे काही अनुभव घेण्यातही मजा येऊ शकते किंवा प्रत्येक अनुभव घेण्यासाठी अनेक व्यक्ती असेही समीकरण असू शकते. उदा. एखाद्या स्नेह्य़ासोबत कॉफीचा आस्वाद घेताना त्याच्यासोबत होणाऱ्या गप्पा हा केवळ त्याच्याचसोबतचा अनुभव असू शकतो किंवा आपल्याला चित्रपट एकटय़ालाच पाहायला आवडत असेल किंवा कोणी विशिष्ट व्यक्ती हीच आपली यासाठी निवड असू शकेल. तसेच अगदी सहलीला, प्रवासाला जाताना किंवा इतर कशाही बाबत.

सर्व अनुभव एकाच व्यक्तीसह घ्यावेसे वाटू लागले आणि त्यातून आयुष्यात अधिक आनंद निर्माण झाला तर ती व्यक्ती हाच आपला खरा जोडीदार नाही का..? पण असे आदर्श चित्र असणे अवघड. म्हणूनच आपण कुटुंब आणि तशासारख्या इतर गोतावळ्यात आपला आनंद शोधत राहतो.

या सगळ्या नाजूक नात्यांकडे आपण कशा प्रकारे पाहतो हे प्रत्येकाची जडण-घडण, व्यक्ती म्हणून मिळालेले वैचारिक, व्यक्त होण्याचे आणि गरजेचे स्वातंत्र्य, त्याच्यावर असणाऱ्या कोणत्याही विशिष्ट विचारांचा पगडा किंवा निर्माण झालेल्या धारणा, दृढ झालेल्या संकल्पना या अनुषंगाने ठरते. सोबतच, एकंदरीत ‘समाज’ या संकल्पनेविषयी एखाद्याचे काय आणि कसे विचार आहेत, तिथे कुठेही काही मूलभूत बाबी समजून घेताना गल्लत होतेय का, ती वयानुसार अधिकच गडद होत जातेय का, हेही तितकेच महत्त्वाचे. इथे मुद्दामच ‘शिक्षण’ हा संदर्भ टाळलेला आहे. कारण शिक्षित असणे, सुशिक्षित असणे, म्हणजे लिहिता वाचता येणे, शिक्षणाचा उपयोग करून, अर्थार्जन वगैरे बाबींतून आपल्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूला सुयोग्य परिस्थिती निर्माण करता येणे आणि सुजाण असणे यात फारच फरक आहे. त्यामुळे, एखादी व्यक्ती अमुक इतकी उच्चविद्याविभूषित आहे, म्हणून त्या व्यक्तीच्या मतांमधून तशाच प्रकारच्या सुजाणतेचं दर्शन व्हायला हवं, ही कितीही रास्त अपेक्षा असली तरीही, प्रत्यक्षात तसं असेलच असं नाही.

यातूनच या जोडीदाराशिवायच्या, अनेकांच्या असणाऱ्या, अनेक नात्यांकडे बघण्याची दृष्टी तयार होते. मात्र किमानपक्षी प्रत्येक नातं हे केवळ वासनेभोवती घुटमळणारं नसतं, हे जरी आपण वेळोवेळी लक्षात ठेवलं, तरी पुरेसं आहे. शेवटी काय, सुदृढ असणारं, तयार होणारं कोणतंही नातं आणि त्याला असलेले विविध कंगोरे, हे त्या नात्यात

गुंफल्या गेलेल्या व्यक्तीच जाणून घेऊ

शकतात.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:19 am

Web Title: third love person dr urjita kulkarni abn 97
Next Stories
1 आभाळमाया : आचार्याणां शतं पिता!
2 कुटुंबातील एकटेपण
3 अवघे पाऊणशे वयमान : मी निसर्गसंवादी!
Just Now!
X