धार्मिक नेत्यानं आवाहन केलं म्हणून, देशाची गरज व्यक्त केली गेली म्हणून भाराभर मुलं जन्माला घालणं.. पण हीच मुलं देशाची आर्थिक परिस्थिती पार कोलमडून टाकताहेत हे लक्षात आल्यावर कुटुंब नियोजन सक्तीचं करणं, त्यासाठी देशभरात कायदे करणं, नसबंदी, गर्भपात यांना उत्तेजन आणि गर्भनिरोधकांचा पाऊस पाडणं.. पण तेही इतकं टोकाचं की देशातल्या मुलांचा जन्मदर अगदी शून्यावर यायची वेळ येणं..   हीच परिस्थिती कायम राहिली तर देशात फक्त म्हातारेच उरणार हे लक्षात आल्यावर पुन्हा एकदा देशाच्या भवितव्यासाठी भाराभर मुलं जन्माला घालण्याचं आवाहन करणं.. त्यासाठी गर्भपात, नसबंदी यांच्यावर र्निबध आणणं, गर्भनिरोधकांची निर्मितीच थांबवणं, येनकेनप्रकारेण मुलांची संख्या वाढलीच पाहिजे यासाठी थेट कायद्याचीच मदत घेणं..
.. धिस हॅपन्स ओन्ली इन इराण.
गेल्या ४०-५० वर्षांतील इराणची ही स्थिती. युद्धामुळे, इतर जगाशी चाललेल्या स्पर्धेमुळे देशाची कमी-जास्त होत चाललेली आर्थिक स्थिती काबूत आणण्यासाठी इराण सरकारने थेट आवामलाच, त्यातही स्त्रीलाच वेठीस धरलं आहे. आपल्या जनतेच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक अशा कोणत्याच गोष्टीचा विचार न करता कुटुंब कमी करण्याची किंवा वाढवण्याची ही सक्ती म्हणजे ‘आले सरकारच्या मना तेथे कोणाचे चालेना,’ अशी गत झाली आहे.
 हे खऱ्या अर्थाने सुरू झालं ते इस्लामिक वा इराण क्रांतीदरम्यानच्या काळात. १९७९ मध्ये धार्मिक सर्वोच्च नेते बनलेल्या आयातुल्ला खोमेनी यांनी लोकसंख्या वाढ हे देशापुढचं महत्त्वाचं ध्येय बनवलं. त्यातच इराण-इराक युद्ध छेडलं गेलं आणि लोकसंख्येची गरज अधिकच तीव्र भासवली गेली. एकेका जोडप्याला सहा सहा मुलं व्हायला लागली. संयुक्त राष्ट्राच्या आकडय़ानुसार २० वर्षांत इराकची लोकसंख्या थोडीथोडकी नाही दुप्पट वाढली होती. आणि त्याचा भार सरकारी तिजोरीवर पडू लागला.
युद्ध संपलं आणि त्याच दरम्यान खोमेनी यांचं निधन झालं आणि त्यानंतर अध्यक्ष झालेले अली खोमेनी आणि त्यानंतरचे अध्यक्ष अकबर रफसंजानी सरकारनं लोकसंख्येचं गांभीर्य लक्षात घेऊन लोकसंख्या कमी करण्याचा एकदम झपाटाच लावला. तो इपाटा इतका जोराचा होता की सहावरून तीन मुलांवर आलेली गाडी एकदम एकावर आली. भरपगारी मॅटर्निटी रजा, तिसऱ्या मुलानंतर खास अनुदान आदी सोयी मागे घेण्यात आल्या. कुटुंब मर्यादित ठेवण्याचं प्रशिक्षण आणि खेडय़ापाडय़ात मोफत नसबंदीची शिबिरं सुरू झाली. इतकंच कशाला २००१ पासून इराणच्या फॅक्टरीत दरवर्षी ७ कोटी कंडोम्स तयार होऊ लागले, ते मोफतही मिळू लागले. त्यामुळे १९८६ मध्ये ३.२ टक्के असलेला जन्मदर कधी नव्हे आणि कुठेही नाही इतका खाली घसरून १.२ टक्के इतका झाला. २००७ मध्ये तर  इराणचा एकूण प्रसव दर ०.०७ टक्के इतका खाली आला. १००० माणसांमागे फक्त १७ मुलांचा जन्म होऊ  लागला, तर मृत्यूचं प्रमाण मात्र १००० मध्ये  ६ फक्त. त्यात परदेशगमन वाढल्याने देशाची लोकसंख्या ६ कोटी ५० लाख इतकी खाली आली. कुटुंबनियोजन असंच चालू राहिलं तर नवीन मुलांची संख्या अगदीच नगण्य होऊन जाईल हे लक्षात आलं आणि तत्कालीन अध्यक्ष अहमदीनेजाद यांच्या सरकारने ही लोकसंख्या १२ कोटीपर्यंत वाढवण्याचा चंगच बांधला. आणि आताच्या हसन रुहानी सरकारने तसा इशाराच दिला आणि हाच इशारा आता कायद्यात बदलू पाहतो आहे. एप्रिलमध्ये एक विधेयक तेहरानच्या पालर्मेटमध्ये संमतीसाठी ठेवण्यात येणार आहे.
यात सगळी जनता भरडली जाणार आहेच, पण त्याची थेट झळ स्त्रीलाच पोहोचणार आहे. कारण तिलाच ही मुलं जन्माला घालायची आणि वाढवायची आहेत. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानव अधिकार संघटनेनं तर इराण स्त्रीला मुलं जन्माला घालायचं मशीन करतो आहे, असा जाहीर आरोपच केला आहे. शिवाय नको असलेले गर्भारपण तिच्या वाटय़ाला येणार आहे. बेकायदा आणि असुरक्षित गर्भपातांना ऊत येणार आहे. लवकर होणारी लग्नं आणि घटस्फोटाला आडकाठी यामुळे तिच्यावरचा कौटुंबिक हिंसाचार अटळ आहे. त्याहीपलीकडे आता कुठे शिकायला, नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रिया पुन्हा एकदा घराच्या चौकटीत बंदिस्त होणार आहेत.
मात्र.. इथेच गोची आहे. मधल्या काळात चौकोनी, सुखी कुटुबांचा आनंद उपभोगलेल्या, पाश्चिमात्य जीवनशैलीची चटक लागलेल्यांना ही कल्पना प्रत्यक्षात आणणं सहजशक्य होईल? बेरोजगारांचा सरकारी आकडा १२ टक्के झाला आहे. त्यातच इराणची चलनवाढ ३६ टक्के झालीय. अशा महागाईच्या काळात जास्त मुलं म्हणजे दु:खाला आमंत्रण याची खात्री तिथल्या ८२ टक्के सुशिक्षित आणि त्यातही ६० टक्के उच्चशिक्षित स्त्रियांना नक्कीच आहे. त्यामुळे लोकं जिंकतील की सरकार, काय घडेल नेमकं इराणमध्ये?      

बुरखाधारी तो
अखेर त्याला रस्त्यावर उतरावंच लागलं, तिच्यासाठी! अफगाणी स्त्रियांच्या अधिकारासाठी अफगाणी पुरुषांनी उचललेलं ते छोटंसं पाऊल. स्त्री पारतंत्र्याचं दृश्य चिन्ह म्हणजे तिचं पडदानशीन असणं, असं मानलं जातं. या बुरखाधारी स्त्रीच्या कोंडीची जाणीव सगळ्यांना व्हावी यासाठी ‘अफगाण पीस वॉलिंटियर्स’ या संघटनेच्या पुरुषांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक छोटी रॅली काढली होती. राजधानी काबूलमध्ये, भर दिवसा, सर्वासमक्ष आणि तीही चक्क बुरखे घालून!
 आजही अफगाणिस्तानातील स्त्रियांची अवस्था फारशी चांगली नाहीच. पण तालिबानी राजवटीत (१९९६ ते २००१) तर ती अगदीच रसातळाला पोहोचली होती. स्त्रियांसाठी शिक्षणाचे, नोकरी व्यवसायाचे दरवाजे बंद करून त्यांना घरी बसवण्यात आलं होतं. कोणत्या तरी पुरुषाच्या सोबतीशिवाय तिचं बाहेर पडणं बंद झालं होतं. अनेक स्त्री डॉक्टर असूनही त्यांना काम करणं बंद केल्यानं आणि कोणत्याही पुरुष डॉक्टरांकडे जाण्यास स्त्रियांना बंदी असल्यानं अनेक स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. हे सगळं फक्त उघडय़ा डोळ्यांनी बघणं एवढंच अफगाणिस्तानवासीयांच्या नशिबी आलं. पण २००१ ला तालिबानी राजवट संपुष्टात आली. करझाई यांचा उदय झाला होताच. २००४ मध्ये ते अध्यक्ष झाले आणि चित्र बदलायला लागलं. अनेकींनी शाळेत, कॉलेजला, नोकरीला जाणं पुन्हा सुरू केलं. आता ती थोडा श्वास घेतेय, पण तरीही ग्रामीण भागात बालविवाहाचं प्रस्थ प्रचंड आहे.  एकदा लग्न झालं की मुलींचं शिक्षण बंद होतंय. ४० टक्के मुलींनी फक्त प्राथमिक शिक्षण घेतलंय. आजारी मुलींना रुग्णालयात दाखल करणं आजही प्रचलित नाही. शिवाय लवकर लग्न, गर्भारपण यामुळे अनेकींचे आरोग्याचे गंभीर प्रश्न आहेत. स्त्रीच्या मृत्यूचं प्रमाण चढं आहे.
 पण तरीही हे चित्र बदलणारच नाही असं नाही. ‘अफगाण पीस वॉलिंटियर्स’च्या  तरुणांनी बुरखा घालून काबूलमध्ये काढलेली ती छोटी रॅली, आपल्या देशातल्या स्त्रियांसाठी धोका पत्करून त्यांनी घेतलेली ही भूमिका नक्कीच व्यापक रूप धारण करेल, त्या व्यापक रूपातच अफगाणी स्त्रीचा मोकळा श्वास दडलेला आहे!   

आंघोळीला बुट्टी?
तुम्ही कितीही बिझी असाल. जगणं नुसती धावती रेस झालीय म्हणत असाल तरीही आंघोळीला बुट्टी मारू शकता? तेही तीन तीन दिवस?सध्या इंग्लंडमधल्या स्त्रियांच्या जगण्याचा हाच फंडा आहे. तीनपैकी एक स्त्री तर तीन दिवसांनी एकदा आंघोळ करते तर ८ मधली १ रोज दात ब्रश करते. १० पैकी ६ जणी तर रात्री घरी आल्यावर मेकअप उतरवण्याचेही कष्ट घेत नाहीत. कधी एकदा बिछान्याला अंग टेकतेय, असं होतंय म्हणे त्याचं.
‘फ्लींट प्लस फ्लींट’ या ब्युटी केअर कंपनीच्या २००० स्त्रियांच्या सर्वेक्षणातून हे उघड झालंय म्हणे. तरी बरंय ९२ टक्के बायांना स्वच्छतेचं महत्त्व माहीत आहे. स्कीन केअर, मॉइश्चरायझर नियमित नाही लावलं तर चेहऱ्याचं तारुण्य टिकवणं कठीण जाणार आहे, हेही कळतंय पण वळत नाहीए. अनेक जणी म्हणे पूर्ण वेळ नोकरी करतात. त्यात मुलांच्या संगोपनाचं टेन्शन, शिवाय सोशल लाइफ असतंच ना. वेळ नाहीच, शिवाय कामाने इतकं थकायला होतंय की काही करण्याची एनर्जीच राहत नाही म्हणे घरी आल्यावर.
अर्थात आपल्यासारखा मोसम आणि वातावरण तिथे नसल्याने आंघोळीचा बाऊ फारसा केला जात नसावा. पण तरीही ‘फ्लींट प्लस फ्लींट’चे मालक मॅक्झीम फ्लींट यांनी मात्र या सर्वेक्षण म्हणजे सामाजिक अनारोग्याचं लक्षण म्हटलं आहे. तुम्ही स्वच्छ नसलात की आजूबाजूच्या लोकांचंही आरोग्यही धोक्यात येतच की. शिवाय रोज आंघोळ केल्यानं तुमची उत्पादनक्षमता, सृजनशीलता वाढतेच. पण लक्षात कोण घेतंय?
  तुम्ही कितीही बिझी असाल हो. पण रोज सकाळी किंवा रात्री दहा मिनिटं शॉवरखाली उभं राहता येत नाही? ये बात कुछ हजम नही हो रही.. लंडन गर्लस् कुछ तो गडबड है!   
आरती कदम
arati.kadam@expressindia.com

संदर्भ-
* इराण- विकिपीडिया, राऊटर, अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशलय न्यूज
*अफगाणिस्तान- ट्रस्ट इन एज्युकेशन फाउंडेशन, फेमिनीस्ट मेजॉरिटी फाऊंडेशन माहिती
* आंघोळीला बुट्टी?-स्कीन केअर रेंज फ्लींट प्लस फ्लीट. टेलीग्राफ न्यूज