इस्रायल, पॅलेस्टिन, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सर्बिया अशा विविध संघर्षभूमींवर जात तिथलं दाहक वास्तव छायाचित्रांद्वारे टिपणारी आनया नेड्रिंगहॉस, सीरियातल्या किळसवाण्या हिंसाचाराचं वार्ताकन करणारी मेरी कोव्हिन आणि चेचेन्यातल्या युद्धाविरोधात सातत्याने लिहिणारी अ‍ॅना स्टेपानोव्हना पोलिट्कोवस्काया, तिघी युद्ध पत्रकार. युद्धातली भयंकरता वारंवार जगासमोर यावी म्हणून प्रयत्नशील. आणि म्हणूनच तिघींवर मरणाची तोफ कायम डागलेली. मरणाशी लपंडाव खेळत या तिघींनी त्या त्या देशातलं दाहक वास्तव जगासमोर आणण्याचा कायमच प्रयत्न केला आणि अखेर त्यांना संपवलं गेलं. ठार केलं गेलं. मरणाचं भय त्यांना सत्य लोकांसमोर आणण्यापासून रोखू शकलं नव्हतं त्या तिघींच्या या धाडसाविषयी, नुकत्याच अफगाणिस्तानात मारल्या गेलेल्या आनयाच्या निमित्ताने..
युद्ध.
लांबून वगैरे ते खूपच रम्य वाटतं.
त्यातलं शौर्य, धैर्य, हौतात्म्य यांवर तर छान छान थरारक काव्यंसुद्धा लिहिली जातात. लोक ती वाचतात. मग अनेकांच्या छात्या गर्वाने फुगून जातात. कोणाच्या दंडाच्या बेटकुळ्या फुरफुरू लागतात. कोणाच्या डोळ्यांत रक्त उतरतं. असं खूप खूप काही होतं..
पण खरंच युद्ध असं असतं? व्हिडीओ गेमसारखं? मनोरंजक?
नसतं!
मृत्यू, वेदना, विध्वंस यांना अगदी मेकअपनं सजवलं, तरी त्याला कोणी सुंदर म्हणू शकणार नाही. ते भयंकरच असतं. क्रूर असतं. पण त्या सगळ्या वेदनांत, विध्वंसात, क्रौर्यात आणि मरणांतही एक काळाकुट्ट विनोद लपलेला असतो.
आनया नेड्रिंगहॉस हिचं एक छायाचित्र आहे, अफगाण युद्धातलं. कंदहारमध्ये सप्टेंबर २०१० मध्ये टिपलेलं. गावातला एक छोटासा कच्चा रस्ता. समोरून अमेरिकी सैन्याचं गस्ती पथक येतंय. एक सैनिक छायाचित्रात स्पष्ट दिसतोय. त्याहून स्पष्ट दिसतेय ते त्याच्या हातातल्या अत्याधुनिक शस्त्राच्या ट्रिगरवरचं त्याचं बोट. कुठल्याही क्षणी दाबलं जाईल असं. पण समोरून येणाऱ्या गाढवाला आणि त्या गाढवावर बसलेल्या छोटय़ा मुलाला त्याचं काय? तो आपल्याच नादात चाललेला आहे. इतक्यात त्याला जाणवलं असावं, की मागे कोणीतरी आपला फोटो काढतंय. त्यासरशी तो मागे वळून पाहतो. त्याला कॅमेरा दिसतो आणि अशा वेळी सहसा लहान मुलं करतात तेच तो करतो. जीभ बाहेर काढून कॅमेऱ्याला वेडावून दाखवतो. आजूबाजूला रोजच एवढा संहार चाललाय, त्याचंही आता काही वाटेनासं झालं आहे.
आजूबाजूला रोजच मृत्यू असा थैमान घालतो आहे, की जगण्यालाही त्याची सवय झाली आहे.
काळाकुट्ट विनोद, ब्लॅक कॉमेडी म्हणतात, ती हीच.
किंवा आनयाचंच साराएव्होमधील एक छायाचित्र आहे, मोठं विलक्षण. तिथं यादवी युद्ध सुरू आहे. कुठल्याशा इमारतीमध्ये लपून एक स्नॅपर लोकांना वेचून वेचून गोळ्या घालत आहे. तो दिसत नाही छायाचित्रात. आपल्याला दिसतात ती त्या गोळ्यांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी एका सिमेंटी भिंतीआड लपलेली माणसं. त्यातली एक प्रौढ महिला. आणि तिचा हात धरून उभा असलेला तिचा सहा-सात वर्षांचा मुलगा. भिंतीआडून ती हळूच डोकावून पाहतेय. तिच्या चेहऱ्यावर मृत्यूचे  भय आहे. आणि तो गोजिरवाणा मुलगा.. त्याला काहीच नाही त्याचं. मस्त मजेत आहे तो. त्याला वाटतेय, आपण जणू लपाछपीचा खेळच खेळतोय.  
ब्लॅक कॉमेडी अजून काय वेगळी असते?
ती दिसली की युद्धाची भयंकरता अधिक दाहक बनून समोर येते.
आनयाला, तिच्या कॅमेऱ्याला ती भयंकरता दिसत होती. ‘असोसिएटेड प्रेस’ची आघाडीची वृत्तछायाचित्रकार ती. मूळची जर्मन. अठ्ठेचाळिशीतली. पुलित्झर वगैरे पुरस्कार मिळालेली. ती म्हणायची, युद्धग्रस्त भागात गेल्यानंतर ज्या दिवशी मला वाटू लागेल, की हे सगळं नॉर्मल चाललंय, त्या दिवशी मी युद्धाचं छायाचित्रांकन करणं बंद करीन.
युद्धातली ही असामान्य भयंकरता वारंवार जगासमोर यावी म्हणून ती वारंवार इस्रायल, पॅलेस्टिन, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सर्बिया अशा विविध संघर्षभूमींवर जात होती. मरणाची पर्वा न करता युद्ध आघाडय़ांवर फिरत होती. आपल्या छायाचित्रांनी युद्धातील, हिंसक संघर्षांतील क्रौर्य, जगासमोर आणण्याचं आणि युद्धाला चेहरा देण्याचं काम करीत होती.
गेल्या आठवडय़ात तिचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानातल्या खोस्त भागात एका पोलिसाने तिला ठार मारलं. त्याने तिच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करीत तिचा जीव घेतला.
का? ते माहीत नाही.
एक बाई म्हणून मारलं असेल का तिला? तीच शक्यता अधिक आहे.
पण त्या कारणांचा शोध घेण्यातही काही अर्थ नाही. युद्धात मरणाला कारणीभूत युद्ध हेच असतं!
 अशीच एक लंडनच्या संडे टाइम्सची युद्ध पत्रकार, मेरी कोव्हिन. दोन वर्षांपूर्वी सीरियात तिचा मृत्यू झाला. तिला मारलं सीरियाच्या लष्करानं. तिथल्या यादवी युद्धाचं वार्ताकन करण्यासाठी ती गुपचूप एका मोटारसायकलवरून सीरियात घुसली होती. सीरियन सरकारच्या परवानगीशिवाय. त्याची शिक्षा तिला देण्यात आली. होम्स शहरातल्या ज्या इमारतीतून ती तिथल्या किळसवाण्या हिंसाचाराचं वार्ताकन करीत होती, त्या इमारतीवर सीरियन सैन्याने तोफा डागल्या. त्यात तिचा मृत्यू झाला.
पण त्याआधी तिने होम्समध्ये लष्कराने घातलेला हैदोस जगासमोर आणला होता. तिथं नागरी वस्त्यांवर, इमारतींवर लष्कराच्या तोफा आग ओकीत होत्या. सामान्य नागरिकांना बंदुकीच्या गोळ्यांनी वेचून वेचून मारण्यात येत होतं. हे सगळं मेरी कोव्हिनने आपल्या बातम्यांतून मांडलं होतं.
त्याआधी २००१ मध्ये तिने अशाच प्रकारे श्रीलंकेतील तमिळींवरील अत्याचारांना आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचा फोडली होती. त्याचं फळ श्रीलंकेच्या लष्कराने तिला दिलं. लष्कराने केलेल्या हल्ल्यात तिला एक डोळा गमवावा लागला. नंतर शस्त्रक्रिया करून त्या जागी ती कृत्रिम डोळा बसवू शकली असती. पण त्याऐवजी तिने त्यावर काळा पॅच लावणं पसंत केलं. तो पॅच ती एखाद्या पदकासारखा मिरवत असे. ते तिच्या धाडसी पत्रकारितेचं प्रमाणपत्र होतं.   
मेरी मूळची अमेरिकेतली. पत्रकारितेत येण्यापूर्वी तिने काही काळ न्यूयॉर्कमध्ये कामगार चळवळीत काम केलं होतं. नंतर ‘युनायटेड प्रेस इंटरनॅशनल’ या वृत्तसंस्थेत ती दाखल झाली. तेथून १९८५ मध्ये ती ‘संडे टाइम्स’मध्ये गेली. तेव्हापासून ती अशा युद्धांचं, संघर्षांचं वार्ताकन करीत होती. लीबिया, चेचेन्या, कोसोवो, सीएरा लिओन, झिम्बाब्वे, पूर्व तिमोर, श्रीलंका, सीरिया.. जिथं जिथं संघर्ष तिथं तिथं ती गेली. धाडस तिच्या रक्तातच होतं. पण युद्धवार्ताकनामागे केवळ धाडसीपणा हीच प्रेरणा होती?
लंडनच्या सेंट ब्राइड्स चर्चमध्ये २०१० मध्ये शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक कार्यक्रम झाला. तिथं तिचं भाषण झालं. त्यात ती म्हणाली होती, ‘सत्तेला सत्य सांगणं हे आमचं मिशन आहे.’
 पण सत्तेला सत्य सांगणं हे फारच अवघड काम असतं. जिवावर बेतणारं! तसं ते नसतं, तर अॅना स्टेपानोव्हना पोलिट्कोवस्काया हिचीही हत्या झाली नसती.
 अॅना ही रशियातली पत्रकार, लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्ती. वय वर्षे ४८. ‘नोव्हाया गॅझेटा’ या रशियन वृत्तपत्रात ती काम करायची. चेचेन्यातल्या युद्धाविरोधात सातत्याने लिहायची. चेचेन बंडखोर, तिथले अखमद कादिरोव्ह यांचं रशियाधार्जिणं सरकार आणि रशियातलं पुतिन सरकार या सगळ्यांनी मिळून चेचेन्यातील सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचा नरक केला होता. अवघ्या चेचेन्याची एक छळछावणी झाली होती. त्या विरोधात ती सतत लिहीत होती. तिच्या एका पुस्तकाचं नाव आहे – ‘ए स्मॉल कॉर्नर ऑफ हेल, डिस्पॅचेस फ्रॉम चेचेन्या.’
व्लादिमीर पुतिन म्हणजे नव-हुकूमशहाच. त्यांच्यावर तर तिने झोडच उठवली होती. ‘पुतिन्स रशिया’ या पुस्तकातून तिने त्यांच्या कारभाराची लक्तरं काढली होती. सत्ताधाऱ्यांना अशी टीका सहन होत नसते. डिसेंबर २००५ मध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयीच्या एका परिषदेत बोलताना ती म्हणाली होती, ‘आपल्याला काय वाटतं हे मोठय़ाने बोलल्याची किंमत कधी कधी लोकांना आपले प्राण देऊन चुकवावी लागते.’ हे बरोबरच होतं. हुकूमशहांना मोठा आवाज सहन होत नसतो. आणि अॅना केवळ मोठय़ानेच बोलत नव्हती. तर ती सत्य सांगत होती. तेही साधंसुधं नव्हे. तर आपल्याच देशाविरोधातलं.
साधारणत: सगळीकडेच देश आणि देशातलं सरकार यांच्यात गल्लत केली जाते. लोक सरकारलाच देश समजतात. तेव्हा या समजुतीनुसार अॅना करीत होती तो देशद्रोहच म्हणायचा. त्याची शिक्षा तिला मिळाली. ७ ऑक्टोबर २००६ रोजी मॉस्कोतल्या तिच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये तिचा मृतदेह सापडला. तिच्या छातीत दोन, खांद्यावर एक आणि डोक्यात एक गोळी घालण्यात आली होती.
कोणी केली तिची हत्या? ते उघड होतं. पण ते न्यायालयात सिद्ध होऊ  शकलं नाही. न्यायालयाचे हात क्रेमलिनपर्यंत पोचू शकले नाहीत.
 आपली हत्या होणार हे अॅनाला माहीत होतं. आधी तसे दोन प्रयत्न झालेही होते. पहिला प्रयत्न २००१ मधला. चेचेन्यातल्या एका खेडय़ात झालेल्या अत्याचारांची बातमी काढण्यासाठी ती गेली होती. तेथून परतताना तिला रशियन सैनिकांनी पकडलं. तीन दिवस त्यांनी तिचा छळ केला. मारहाण केली. तिचं मनोधैर्य मोडून काढण्यासाठी तिला तोफेच्या तोंडी देण्याचं नाटकही करण्यात आलं. त्यात ती मरायचीच, पण वाचली. पुढे सप्टेंबर २००४ मध्ये तिला चहातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. असे होऊनही ती लढत होती. मनात भीती होती. तरीही लढत होती.
     हीच कथा मेरी कोव्हिनची. एलटीटीईच्या विभागातून सरकार नियंत्रित भागात येत असताना श्रीलंकेच्या लष्कराने तिच्यावर तोफा डागल्या. आपण पत्रकार आहोत हे ती ओरडून सांगत होती, तरीही हल्ला झाला. चेचेन्यात वार्ताकन करीत असताना तर याहून भयंकर संकट आले होते. रशियाच्या लढाऊ  विमानांनी चेचेन बंडखोरांबरोबरच तिच्यावरही हल्ले केले होते. ती त्यातून कशीबशी वाचली.
 आनया नेड्रिंगहॉसची कहाणीही अशीच. अफगाणिस्तानात कंदहारमध्ये अमेरिकी गस्ती पथकासोबत जात असताना अचानक कोणीतरी भिंतीपलीकडून त्यांच्यावर हातबॉम्ब टाकला. त्या स्फोटात ती जखमी झाली. बॉम्बचे तुकडे तिच्या पायात घुसले. सर्बियात तर सरळ सरळ तिच्या खुनाचा प्रयत्न झाला. तिथं एका पोलिसानेच तिच्या अंगावर गाडी घातली. त्या खाली ती चिरडून मरायचीच, पण पाय अनेक ठिकाणी मोडण्यावर निभावले.
 आणि असं सगळं असूनही त्यांची पत्रकारितेची जिद्द कमी झाली नव्हती. डोळा जायबंदी झालेला. अंगावर जखमा. पण त्यातून जरा बरं वाटताच मेरी कोव्हिनने तीन हजार शब्दांचं वार्तापत्र लिहून पाठविलं. आनया पुन्हा पुन्हा जीव धोक्यात घालून युद्धाला चेहरा देण्याचं काम करीत राहिली, तर अॅना सरकारी दडपशाहीविरोधात सातत्याने आवाज उठवत राहिली.
 हे पाहिलं, की मग प्रश्नच पडतो. काय असतील यांच्या लढय़ाच्या प्रेरणा? कुठून येत असेल त्यांना हे बळ?
उत्तर साधं आहे -अंत:करणातून.
तिथं सत्यनिष्ठा असली की हे होतं, आपोआप!