लहानपणी उंबऱ्याला अडखळून पडल्यावर ‘मला उंबरा दिसला नाही म्हणून मी पडले,’ या समजुतीऐवजी तिला उंबऱ्यालाच ‘हात्’ म्हणून मारायला शिकवलं जातं. त्यामुळे तिच्या पडण्याची जबाबदारी तिची नाही, तर उंबऱ्याची होऊन जाते. मोठं होता होता, अनेक उंबरे ओलांडता ओलांडता म्हणूनच प्रत्येक ठेचकाळत्या क्षणी ती घाबरते आणि तिच्या ठेचकाळण्याचं खापर उंबऱ्याऐवजी समोरच्या माणसावर फोडायला लागते..
मी दहावीचा अभ्यास तासन्तास करायची. मला आवडायचं, पण जसजशी परीक्षा जवळ यायला लागली तसतशी एक वेगळीच गोष्ट घडायला लागली. माझा सगळा अभ्यास चोख तयार होता खरंतर. मी दिवसभर वेळ लावून आधीच्या वर्षांचे बोर्डाचे पेपर्स सोडवत होते. इतपत जय्यत तयारी होती, पण तरी एक गोष्ट घडत होती. बाबा संध्याकाळी ऑफिसमधून घरी यायच्या वेळी ती गोष्ट घडायची. मी आतल्या खोलीत अभ्यास करत असायची. बाबा त्यांच्याकडच्या किल्लीनं लॅच उघडून आत यायचे. आई त्या वेळी नाटकात कामं करायची. त्यामुळे ती घरी नसायची बऱ्याचदा. लहान भाऊ खाली खेळायला गेलेला असायचा. बाबा दार उघडून आत येण्याचा आवाज बाहेरच्या खोलीत येताच आतल्या खोलीत अभ्यास करणाऱ्या मला रडायला यायचं. मी स्फुंदत बाहेरच्या खोलीत यायचे. बाबा बूट काढत असताना मी रडत रडत त्यांना सांगायची, ‘‘मला खूप टेन्शन आलं आहे, मी नापास होईन असं वाटतं आहे.’’ बाबा मंद हसत म्हणायचे, ‘‘तू? तू कितीही प्रयत्न केलेस तरी नापास होऊच शकत नाहीस! तुला शक्यच होणार नाही ते!’’ मग मला आतून छान वाटायला लागायचं. रडणं बंद होऊन मी नि:शंक मनाने पुन्हा अभ्यासाला लागायचे. परीक्षा जवळ यायला लागली तसंतसं हळूहळू हे रोजच व्हायला लागलं. बाहेरच्या खोलीत बाबांच्या लॅचचा आवाज आला, की तत्क्षणी आतल्या खोलीत माझं रडणं सुरू व्हायचं. म्हणजे बाबा चावी दाराला लावत नसून जणू माझ्या आतल्या एका रडणाऱ्या खेळण्याचीच चावी फिरवत असावेत, असं वाटण्याइतकं त्यांची चावी आणि माझं रडणं याचं ‘टायमिंग’ जुळायला लागलं. खरं तर अभ्यास इतका तयार होता की, थोडंसुद्धा दडपण यायचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळे बऱ्याचदा बाबांच्या लॅचच्या आवाजानंतर माझे डोळे गळायला लागायचे तेव्हा माझ्या आतल्या एका मनाला खूप आश्चर्य वाटत असायचं. ते मन भाग तटस्थपणे माझ्या रडण्याकडे बघत मला विचारत असायचं, ‘अगं, आपलं सगळं तयार आहे, तरी का रडते आहेस तू?’
असं साधारण पाच-सहा दिवस सलग झाल्यावर मग एक वेगळीच गोष्ट घडली. नेहमीप्रमाणे लॅचचा आवाज येताच माझा गळा भरला आणि मी बाहेरच्या खोलीच्या दिशेने निघाले. तोच मला टी.व्ही. लावल्याचा आवाज आला. त्या वेळी कुठलीशी मॅच चालू होती. मी बाहेर पोहोचले, तर बाबा बूट काढता काढता मॅच बघू लागले होते. त्यांनी माझ्या येण्याची पुसटशी दखल घेतली आणि लगेच ते मॅच बघू लागले. त्या मॅचच्या गदारोळातही मी ‘टेन्शन आलं आहेचा खेळ’ खेळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. बाबा तुटक वागत नव्हते, पण नेहमीसारखं त्यांनी मला गोंजारलंही नाही. त्यांनी टीव्हीवरची नजर न हलवता शांतपणे मला सांगितलं, ‘‘मला वाटतं तुझा अभ्यास झाला आहे, तुला घाबरायची काहीच गरज नाही आहे.’’ मला एकदम अनपेक्षित माझा डिमांड घसरल्यासारखा वाटला. रागच आला. यांना काहीच वाटत नाही असं वाटलं. मी रडं थांबवलं आणि अभ्यासाला गेले. त्यानंतर काही काळ धुसफुसतच अभ्यास केला. जेवतानाही जरा धुसफुसले, बाबांना दाखवायला. ते मला गोंजारतही नव्हते, तुटकही वागत नव्हते. अगदी शांत, सहज वागत होते, काहीच न घडल्यासारखे. दुसऱ्या दिवशीही पुन्हा तसंच. बाबांनी टी.व्ही.वरची नजर हटवलीच नाही. बाबा माझ्याकडे पाहातच नाहीत म्हटल्यावर माझा त्या खेळातला रसच संपला. हळूहळू बाबा यायच्या वेळी मला रडू येईनासं झालं, पण मनातल्या मनात त्यांचा राग मात्र येत राहिला. त्या वेळी ते काय शिकवू पाहात आहेत हे कळायचं वयच नव्हतं. आता आहे. तरीही अजून माझ्यात त्या दोन्ही मुली आहेत- एक, स्वत:चं स्वत: सगळं करू शकणारी, अगदी गाडी खरेदीपासून ते सव्‍‌र्हिस टॅक्सचे नियम समजावून घेण्यापर्यंत सगळं आणि दुसरी छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्येही नवऱ्यावर अवलंबायला आवडणारी. अर्थात कधीकधी असं वाटणं साहजिकच. संसारात आपल्याबरोबर चालणाऱ्या माणसाला मध्येच ‘ए, माझा खांदा दुखला, आता तू उचल!’ असं म्हणावंसं वाटतंच की. पण ते वेगळं आणि वजन उचलायचा कंटाळाच असणं वेगळं. परवा एका मैत्रिणीचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिची सैरभैर अवस्था बघवेना. तिला तिचं काहीच माहीत नव्हतं. ती कमवत असलेल्या पैशाच्या गुंतवणुकी, तिची बँक अकाऊंटस, सगळं नवऱ्यालाच माहीत. त्यामुळे त्याच्याशिवाय ती अक्षरश: पांगळी असल्यासारखी झाली; किंबहुना आधी याच कारणांसाठी नवऱ्याशी पटत नसतानासुद्धा तो वारंवार घटस्फोटाची मागणी करत असूनही ती तो त्याला देतच नव्हती. लाचारासारखी त्याला सोडतच नव्हती. ‘‘मी त्याच्याशिवाय रस्ताही क्रॉस करू शकणार नाही गं!’’ म्हणत किती तरी दिवस त्याच्याशिवाय रडत राहिली. आता हळूहळू तिचं रडणं थांबलं आहे, पण दिवसाचा सगळा वेळ त्याच्यावर धुसफुसण्यातच जातो आहे.माझ्यातली ती बाबांसमोर रोज रडणारी आणि नंतर त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणून रडणं थांबवून मनातल्या मनात त्यांच्यावर धुसफुसणारी मुलगीच वयानं थोडय़ा वाढलेल्या रूपात मला माझ्या मैत्रिणीत दिसते. नुसती तिच्यातच नाही, तर मी पाहिलेल्या जवळजवळ प्रत्येकीत ती कमीअधिक प्रमाणात मौजूद आहे. काही जणींनी तिला मोठं करण्यासाठी कष्ट घेतलेत, पण कित्येक जणी वयानं मोठय़ा झाल्या तरी त्यांच्यातली ‘ती’ मात्र लहानच राहून गेलेली आहे. तिला बाबांनी कायम कडेवर घेऊन गोंजारत चालायला हवं आहे. दुसऱ्यावर संपूर्ण विसंबणं एवढाच प्रेमाचा अर्थ असतो असं तिला वाटतं. तिला समोरच्यावर रेलायला आवडतं. त्यात कधीकधी आपलं समोरच्यावर वजन पडतं आहे हे जाणवतंच नाही तिला किंवा जाणवलं तरी ‘तेवढं तर करायलाच हवं माझ्यासाठी!’ असा अट्टहास दिसतो मला तिच्यात. तो तिच्यात कुठून आला असेल याचा विचार करताना जाणवतं, लहानपणी उंबऱ्याला अडखळून पडल्यावर ‘मला उंबरा दिसला नाही म्हणून मी पडले,’ या समजुतीऐवजी तिला उंबऱ्यालाच ‘हात्’ म्हणून मारायला शिकवलं जातं. त्यामुळे तिच्या पडण्याची जबाबदारी तिची नाही, तर उंबऱ्याची होऊन जाते. लहानपणी तेवढंच समजतं तिला म्हणून तेवढंच समजावलं जातं हे एक वेळ ठीकच, पण नंतरही मोठं होता होता, अनेक उंबरे ओलांडता ओलांडता ‘आता मी मोठी झाले, आता ठेचकाळले तर जबाबदारी माझी, उंबऱ्याची नाही’ हे कधी ना कधी तिनं स्वत:ला शिकवायला हवं असतं, पण हे असं आपलं सगळं आपणच उचलायची तिला सवयच नसते. म्हणून प्रत्येक ठेचकाळत्या क्षणी ती घाबरते आणि तिच्या ठेचकाळण्याचं खापर उंबऱ्याऐवजी समोरच्या माणसावर फोडायला लागते. लहानपणी ‘हात्’ म्हणून मारलेला उंबरा निर्जीव असतो बिचारा. त्यानं तेव्हा तिच्या ठेचकाळण्याची जबाबदारी मुकाट उचललेली असते, पण जिवंत माणूस हे किती दिवस करेल? तिच्या ठेचकाळण्याचं खापर त्यानं किती काळ त्याच्या डोक्यावर फोडून घ्यावं आणि कशासाठी? किंवा हे फक्त इतकंचही नसणार. मी बाबांसमोर रडले, की बाबा माझ्याकडे विशेष लक्ष द्यायचे, माझ्याशी विशेष प्रेमाने बोलायचे आणि ते त्या लहान मला आवडत असणार. मी माझी मीच नीट राहिले. बाबांवर विसंबले नाही किंवा त्यांना दाखवलं नाही की, ‘मला तुमची गरज आहे’, तर ते त्यांच्या कामांमध्ये बुडलेलेच राहतील. माझ्याकडे पाहणारच नाहीत अशी भीती त्या माझ्यातल्या लहानीला वाटत असणार. त्यांचं आपल्यावर लक्ष राहावं म्हणून ती ‘लहानी’ कारण नसताना त्यांच्यासमोर रडत होती का, पण आता मोठं झाल्यावर तिला समजावं लागेल, रडून रडून वेधलेलं लक्ष हे प्रेम नसतं. समोरचा कर्तव्यापोटी चार दिवस तिचे डोळे पुसेल, पण पाचव्या दिवशी कंटाळेलच ना. मग एक तर कर्तव्यापोटी तो बिनप्रेमाचा नाइलाजाने तिच्याबरोबर राहील, नाही तर मग माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने घेतला तसा घटस्फोट घेऊन मोकळा होईल. तिच्या या ‘माझ्याकडेच फक्त लक्ष दे’ म्हणण्यानं किंवा समोरच्यावर अवाजवी रेलण्यानं तिला फार मोठी किंमत चुकवावी लागू शकते.नुसती नात्यांमध्येच नाही, तर इतर ठिकाणीसुद्धा. परवा असंच झालं आणि माझ्यातला त्या ‘लहानु’ला मोठं करण्याची निकड पुन्हा एकदा नव्यानं जाणवली. माझ्या आयुष्यात एक फार छान व्यायाम शिकवणारे सर आले आहेत. त्यांचं नाव परुळेकरसर. ते इतका शास्त्रीय आणि अप्रतिम व्यायाम शिकवतात की, त्याविषयी कधी तरी स्वतंत्रपणे लिहावं लागेल. ते परवा एकदा जिममध्ये मला एक व्यायाम शिकवताना म्हणाले, ‘‘आता दोन्ही हातांत दहा दहा किलोची वजनं घ्या आणि आपला नेहमीचा खांद्याचा व्यायाम करा.’’ मी वजनाच्या स्टँडच्या दिशेने गेले. सरांच्या जिममध्ये सगळं शिकवलं जातं. अगदी स्टँडवरून वजनं कशी काळजीपूर्वक घ्यायची, कशी ठेवायची हेसुद्धा. मलाही ते शिकवलं गेलं होतं. मी वजनं उचलली आणि व्यायाम सुरू करणार तोच सर म्हणाले, ‘‘मॅडम, कुठली वजनं उचललीत तुम्ही? एका हातात पाच किलोचं वजन आहे आणि एका हातात दहाचं आहे!’’ मी दचकलेच. जी गोष्ट मला वजन उचलताक्षणी सहज जाणवायला हवी होती ती सरांनी सांगेपर्यंत का जाणवली नव्हती? सरांचं प्रत्येकाच्या व्यायामाकडे जातीनं लक्ष असतं म्हणून त्यांनी मला वेळीच थांबवलं, नाही तर मला काही गंभीर दुखापतही होऊ शकली असती कदाचित. वजन उचलताना माझे  डोळे उघडे होते, पण लक्ष कुठे होतं. जर लक्ष नव्हतं तर ते का नव्हतं, असे अनेक प्रश्न समोर आले. पुन्हा एकदा लहानपणची बाबांवर अवाजवी विसंबून राहणारी ‘लहानी’ आठवली. इथे ती सरांवर अवाजवी विसंबू पाहात होती. सरांनी एकदा व्यायाम पूर्ण शिकवल्यावर तो व्यवस्थित करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझीच ना. त्या दिवशी घरी जाताना सर म्हणाले, ‘‘मॅडम, तुम्हाला ती म्हण माहीत आहे ना, ‘डोंट गिव्ह एनीबडी रेडिमेड फिश, टीच हिम हाऊ टू कॅच इट’. मला सगळ्यांना ते शिकवायचं आहे. मी आसपास नसतानाही तुम्ही शिकलेला व्यायाम योग्य आणि बरोबरच करायला हवा. एक्सरसाइज विथ ओपन आइज अँड ओपन माइंड!’’ मी म्हटलं, ‘‘येस सर!’’ माझे अभिनयाचे गुरू सत्यदेव दुबे म्हणायचे ते वाक्य आठवलं. ‘‘बेटा, डोंट ट्रीट मी लाइक अ गॉड, ट्रीट मी लाइक अ ह्य़ूमन बिइंग.’’  एकदा समोरच्याला ‘देव’ केलं, की आपली जबाबदारी संपते, मग आपली सगळी मदार त्यांच्यावर, पण हे बेजबाबदार आणि सोयीस्कर वागणं नाही का? दुसऱ्या दिवशी दुसरा कुठलासा व्यायाम करत असताना माझं मीच मला सांगितलं, ‘या व्यायामात सरांनी सांगितलं होतं, पाय एवढा आपटायचा नाही, पायाचा एवढा आवाज येता कामा नये.’ माझा मीच लक्षपूर्वक पायांचा आवाज कमी केला. तोवर आधी दाणदाण आपटत असलेले पाय बघून सर ‘आवाज कमी’ सांगायला माझ्या दिशेनं निघालेच होते. ते काही बोलायच्या आधीच तो आवाज मी स्वत:च कमी केला होता. मी सरांकडे पाहिलं. सरांनी ‘थम्स अप’ची खूण केली आणि हसले.आता या जगात नसणारे माझे बाबाही कुठूनसे हसले असणार. लहानपणी ते काय शिकवायचा प्रयत्न करत आहेत हे न कळून मनातल्या मनात त्यांच्यावर रुसणारी त्यांची मुलगी आता हळूहळू शिकते आहे हे पाहून.. एकदम आठवलं, बाबांनापण या सरांसारखीच ‘थम्स अप’ची खूण करायची सवय होती. सरांच्या ‘थम्स अप’ला मी माझ्या ‘थम्स अप’नी प्रतिसाद दिला आणि तोच हात आभाळाकडे नेऊन आकाशातही ‘थम्स अप’ फेकला. त्या दिवशी माझ्यातली ‘ती’ मुलगी कडेवरून खाली उतरून दोन पायांवर उभी राहिलेली मला आतल्या आत जाणवली.
घरी आले, तर बाथरूममधला बल्ब गेला होता. नवऱ्याची वाट न बघता मीच तो खाली जाऊन विकत आणला आणि बाथरूममध्ये लावला. त्यानंतर बटण दाबल्यावर फक्कन बाथरूमभर पसरलेला पिवळाधमक प्रकाश मला माझ्या आतही पसरल्यासारखा वाटत राहिला..
amr.subhash@gmail.com