07 July 2020

News Flash

चित्रकर्ती : टिकुली कला

‘टिकुली’ ही बिहारची पारंपरिक कला. बिहारची राजधानी पटना येथे सुमारे २,५०० वर्षांपूर्वी या कलेचा जन्म झाला.

आरतीदेवी यांचं टिकुली चित्र ‘वरात’

प्रतिभा वाघ

plwagh55@gmail.com

काच, सोनं, चांदी वापरून तयार केलेली कपाळावर लावण्याची मौल्यवान टिकली हा एके काळी स्त्रियांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानला जाई. टिकली बनवण्याच्या या पारंपरिक कलेनं पुढे माध्यम बदललं आणि ती लाकडावर वेगळ्या रूपात चितारली जाऊ लागली. बिहारच्या या ‘टिकुली कले’तील कलाकृती आता केवळ जगभरच पोहोचल्या नाहीत, तर अनेक स्थानिक स्त्रियांना त्यांनी हक्काचा रोजगार दिला आहे. एकीकडे अर्थाजन करून आपली स्वप्नं पूर्ण करतानाच या स्त्रिया आनंदानं ही कला जपत आहेत.

भारतात १९८२ मध्ये एशियाड क्रीडा स्पर्धा झाल्या. त्या वेळी भारतात आलेल्या खेळाडूंना ‘टिकुली आर्ट’ची कलाकृती भेट द्यावी असं त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सूचित केलं आणि त्याप्रमाणे ‘टिकुली आर्ट’ची चार चित्रं एका लाकडी पेटीत घालून परदेशी व्यक्तींना भेट म्हणून दिली गेली. एक वेगळीच भारतीय आठवण या लोकांना दिली गेल्यानं साहजिकच अनेकांकडून त्याचं कौतुक झालं.

‘टिकुली’ ही बिहारची पारंपरिक कला. बिहारची राजधानी पटना येथे सुमारे २,५०० वर्षांपूर्वी या कलेचा जन्म झाला. ही मगध आणि गुप्त साम्राज्याची देणगी समजली जाते. राजघराण्यातल्या स्त्रिया आपल्या कपाळावर विविध प्रकारच्या टिकल्या, बिंदियां  लावत असत. भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून स्त्रिया कपाळावर चंदन, कुंकू, सिंदूर हे गंध, टिकली किंवा बिंदीच्या स्वरूपात लावत आल्या आहेत. सौंदर्य आणि सौभाग्याचं प्रतीक असलेल्या टिकल्यांमध्ये हळूहळू कालानुरूप फरक पडत गेला. अगदी  विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ही टिकली- अर्थात ‘टिकुली’ सोनं, चांदी आणि काचेच्या तुकडय़ांवर तयार केली जाई. विशेष समारंभात स्त्रियांनी कपाळावर लावलेल्या ‘टिकुली’वरून समाजातल्या त्यांच्या ‘प्रतिष्ठेचा’ अंदाज लावला जात असे. म्हणजे राणीच्या कपाळावरची ‘टिकुली’ सर्वात मौल्यवान असे, तर सरदार पत्नींची ‘टिकुली’ त्यापेक्षा कमी मौल्यवान असे.

 

आता जी ‘टिकुली आर्ट’ म्हणून कला प्रचलित आहे, तिचं स्वरूप मात्र पूर्णपणे वेगळं आहे. पण तिचा जन्म हा मूळच्या ‘टिकुली’च्या निर्मितीचंच पुढचं पाऊल आहे. त्यामुळे वर्तमानकालीन कलेलाही ‘टिकुली आर्ट’ हेच नाव पडलं आहे. मूळची ‘टिकुली कला’निर्मिती जवळजवळ ५,००० कारागीर करत. ही खूप गुंतागुंतीची पद्धत होती. काच तापवून, फुंकून तिचा फुगा बनवला जाई, त्यामुळे एक पातळ पापुद्रा तयार होई. हा पापुद्रा टिकलीच्या आकारात कापण्याचं काम मुस्लीम कारागीर करत. त्यानंतर त्यावर सोन्याचा पातळ पत्रा टिकवण्याचं काम हिंदू कारागीर करत. हिंदू स्त्रिया त्यावर कलाकारी करत आणि पुरुष ‘टिकुली’च्या मागील भागात गोंद लावण्याचं काम करत. हिंदू-मुस्लीम कलाकारांच्या सहकार्यानं या टिकल्यांचा व्यापार खूप जोरात सुरू होता. पण ‘सुवर्ण नियंत्रण कायदा’ आल्यामुळे सोन्याची किंमत वाढली आणि या व्यापारात मंदी आली. त्याच वेळी रोजगारासाठी बरेचसे कारागीर औद्योगिक व्यवसायाकडे वळले आणि ‘टिकुली आर्ट’ची निर्मिती जवळजवळ थांबलीच. त्यानंतर साधारणपणे

४ इंच बाय ६ इंचाच्या काचेच्या तुकडय़ांवर ‘इनॅमल’ रंगाच्या साहाय्यानं काही चित्रं रंगवण्यास सुरुवात झाली. पण व्यवसायाच्या दृष्टीनं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं, हाताळणं कठीण होतं. बिहारमधले ज्येष्ठ चित्रकार पद्मश्री उपेंद्र महारथी हे १९६० मध्ये जपानला गेले असता त्यांनी लाकडावर इनॅमल रंगांच्या साहाय्यानं रंगवलेल्या जपानी कलाकृती पाहिल्या. आपण ‘टिकुली’ कलेसाठी काचेऐवजी हेच माध्यम वापरावं अशी कल्पना त्यांना सुचली आणि भारतात परतल्यावर त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली.

सुरुवातीला त्यांनी लाकडावर काम करण्यास प्रारंभ केला, पण लाकूड जड असल्यामुळे ‘हार्डबोर्ड’चा पर्याय शोधण्यात आला. आता हे काम ‘एमडीएफ’वर (‘मीडियम डेन्सिटी फायबरबोर्ड’- अर्थात पातळ लाकूड) केलं जातं, कारण ते टिकाऊ आणि वजनाला हलकं असतं. आपल्याला हव्या असलेल्या गोल, चौकोन, आयत अशा आकारांत हे ‘एमडीएफ’ कापून घेतलं जातं. सॅण्डपेपरनं त्याच्या कडा घासून गुळगुळीत केल्या जातात. लाल आणि काळ्या इनॅमल रंगाच्या मिश्रणानं गडद तपकिरी रंग तयार केला जातो. एका बाजूवरील रंग सुकण्यास सहा ते आठ तास लागतात. त्यानंतर दुसरी बाजू रंगवली जाते. अशा प्रकारे तीन ते चार इनॅमलचे पटल दिले जातात आणि प्रत्येक पटल वाळल्यावर त्याला सॅण्डपेपरनं घासून गुळगुळीत केलं जातं. नंतर हवं ते चित्र काढून ते या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाच्या कार्बन पेपरनं छापलं जातं. इनॅमल रंगांनी ते रंगवलं जातं. त्यासाठी तीन नंबर, डबल झिरो आणि ट्रिपल झिरो या नंबरचे ब्रश वापरतात. अतिशय नाजूक रेषांसाठी ट्रिपल झिरो ब्रश वापरतात. ‘मधुबनी’  चित्रकला ही बिहारचीच पारंपरिक कला असल्यामुळे तिच्यामधल्या मनुष्याकृती आणि इतर आकार हे ‘टिकुली आर्ट’साठीही वापरतात. फरक इतकाच आहे की ‘मधुबनी’चं चित्रण कागद, कापड आणि भिंतीवर केलं जातं, तर ‘टिकुली आर्ट’ लाकडी पृष्ठभागावर करतात. शिवाय अतिशय बारीक काम यात होतं, ते जलरोधक (‘वॉटरप्रूफ’) देखील असतं. इनॅमल रंग वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे जलरोधक असणं हा या रंगाचा गुणधर्म आहे. त्यामुळे हे काम टिकाऊ तर होतंच, पण टेबलावर ठेवायचे कोस्टर, ट्रे अशा पाण्याशी संपर्क येऊ शकणाऱ्या वस्तूंवरच्या चित्रकृतींसाठी हे रंग वापरणं फायदेशीर आहे, असं अशोककुमार विश्वास सांगतात. लयाला जाणाऱ्या ‘टिकुली आर्ट’चं रूपांतर आज दिसणाऱ्या ‘टिकुली आर्ट’मध्ये करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. आज जवळजवळ ६०० कारागीर हे काम करत आहेत. साडेतीन लाखांहून अधिक ‘टिकुली आर्ट’ कलाकृती जगभरात पोहोचल्या आहेत. अशोककुमार हे स्वत: चित्रकार, कारागीर, शिक्षक या भूमिकेतून १९७४ पासून यात व्यग्र आहेत.

बिहारमधल्या अनेक गावांमधल्या गृहिणींना ‘टिकुली आर्ट’चं प्रशिक्षण देऊन घरी बसून अर्थाजन करण्याचा मार्ग अशोककुमार यांनी दाखवला आहे. आज बिहारमध्ये तीसहून अधिक प्रशिक्षण केंद्रं असून त्यात अशोककुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टिकुली आर्ट’मध्ये ट्रे, भिंतीवरील चित्रं, पेन स्टॅण्ड, मोबाइल स्टॅण्ड अशा अनेक सुंदर आणि उपयुक्त कलाकृती बनत आहेत. जगभरातून या वस्तूंना मागणी आहे. परदेशात बिहार शासनाच्या सहयोगानं त्याचं प्रदर्शन, प्रशिक्षण आयोजित केलं जातं.  बिहारमधील गावागावांत घरबसल्या गृहिणी कलानिर्मिती करत आहेत. बिहार- पटनामधल्या नासरी गंज गावातील संध्यादेवी सिंह आणि आरतीकुमारी सिंह या जावा जावा आहेत. संध्यादेवी पूर्वी फक्त घर-संसार यातच पूर्ण दिवस व्यतीत करत. पण ‘टिकुली आर्ट’चं प्रशिक्षण घेतल्यावर त्या भल्या पहाटे उठून घरातली सर्व कामं आटोपून सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत कलानिर्मितीचा आनंद घेतात. त्यातून महिन्याला सहा-सात हजार रुपये मिळवतात. आपली धाकटी जाऊ आरतीकुमारीला त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि दोघीही आनंदानं हे काम करू लागल्या. पालखी, विवाह समारंभ हे आरतीकुमारीचे चित्रांमधले आवडते विषय आहेत. तिला दोन मुली आहेत. तिची १२ वर्षांची मुलगीही त्या काम करताना उत्सुकतेनं निरीक्षण करते. त्यामुळे आपल्या घरात अजून एक चित्रकर्ती तयार होणार असा विश्वास आरतीकुमारीला वाटतो. गडद तपकिरी आणि काळ्या पार्श्वभूमीवरील चित्रांमध्ये त्या सोनेरी रंग वापरतात त्यामुळे ही चित्रं फारच खुलून दिसतात.

२४ वर्षांची पदवीधर असलेली गुडियाकुमारी मेहता आता ‘बी. एड.’ शाखेत प्रवेश घेण्याच्या तयारीत आहे. तिनं दहावीची परीक्षा दिली आणि तेव्हापासूनच ‘टिकुली आर्ट’चं प्रशिक्षण घेऊन चित्र काढू लागली. होळी, विवाह समारंभ, गावातील देखावा, राधा-कृष्ण अशा विविध विषयांवर ती ‘टिकुली’ चित्रशैलीत सुंदर काम करते. आपलं दहावीनंतरचं संपूर्ण शिक्षण तिनं ‘टिकुली आर्ट’मधून मिळणाऱ्या कमाईतूनच केलं आणि यापुढील शिक्षणही तसंच पूर्ण करणार असं ती सांगते. आताच्या पिढीतल्या मुलींकडून ही कला जिवंत ठेवण्याचं काम नक्कीच होईल, असा तिला विश्वास वाटतो. डायरी, फोल्डर, काचेच्या वस्तू यांवरही ही चित्रं काढण्याचं काम अशोककुमार विश्वास हे शासनाच्या मदतीनं करत आहेत. ते म्हणतात, की लोककलेतून अर्थाजन होण्याची शक्यता निर्माण करणं हा लोककला जिवंत ठेवण्यासाठीचा प्रयोग आपण केला आणि त्यात यश मिळत आहे.

आज गुडियाकुमारीसारखी मुलगी अर्थार्जन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी करून आनंदी आहे, प्रगती करते आहे आणि त्याच वेळी लोककलाही टिकवत आहे. जगातल्या अनेक देशांत, कलामेळाव्यांत ‘टिकुली आर्ट’ला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक राज्यातले ज्येष्ठ आणि तरुण चित्रकार अशा प्रकारे पारंपरिक कला जिवंत ठेवू शकतात. त्याकरता त्या-त्या राज्यातील शासनाकडून योग्य प्रतिसाद, प्रोत्साहन मिळणं मात्र गरजेचं आहे.

विशेष आभार-

चित्रकार संजयकुमार (पटना)

चित्रकार अशोक विश्वास (पटना)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 12:32 am

Web Title: tikuli art chaturang chitrakarti article abn 97
Next Stories
1 सायक्रोस्कोप : कृतज्ञतेची रोजनिशी
2 ‘रानभूल..  चकवा.. झोटिंग..’मधील विधानांना वैज्ञानिक पुरावे नाहीत
3 टाळं लागलेलं जिणं
Just Now!
X