manस्त्रीने आपली भूमिका फक्त गृहस्वामिनी किंवा ‘आदर्श आई’पुरतीच मर्यादित न ठेवता विशाल बनविली, त्यात विधायकता आणली, सामाजिक कार्यात रस घेतला तर भावनिक चलबिचल कमी होऊ शकेल. रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीने स्वत:च स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करायला हवा.
गेल्या लेखात आपण पाहिले की, रजोनिवृत्तीच्या काळात शरीरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. या सगळ्या समस्या स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्स कमी प्रमाणात झाल्याने होतात. जशी हाडे ठिसूळ होतात तसेच स्त्रीची नखेही ठिसूळ होतात. अचानक धक्क्याने किंवा बोटे कुठे तरी अडकली तर नखांमध्ये मृदूपणा आल्याने ती पटकन तुटतात. नखाच्या आकारामध्ये फरक पडतो. नखांवर रेघा आल्यासारख्या दिसतात. केसही या काळात खूप गळायला लागतात. तसेच केसांची मुळे अशक्त झाल्याने केस खूप तुटायला लागतात. शुष्क होतात. विस्कळीत दिसायला लागतात. काही स्त्रियांना तर टक्कलही पडायला लागते. ज्याला आपण स्त्रीचे मुकुटी सौंदर्य किंवा क्राऊनिंग ग्लोरी समजतो तेच कमी झाल्याने अनेक स्त्रिया मानसिकदृष्टय़ा खूप अस्वस्थ होतात. त्वचासुद्धा कोरडी पडते व सुरकुतायला लागते. चेहऱ्यावरचे तेज हळूहळू निघून जाते. सौंदर्य हातातून निसटून चालले आहे हे जाणवायला लागते आणि स्त्रीचे चिडचिडणे वाढते. त्यांना स्वत:लाच स्वत:बद्दल कमीपणा वाटतो व त्याचा राग त्या व्यक्त मात्र दुसऱ्यावर करतात.
याच काळात सर्वात जास्त मनस्ताप स्त्रियांना होतो, तो त्यांची लंगिक इच्छा कमी झाल्याने. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. आपल्या संस्कृतीत स्त्रीला मुले मोठी व्हायला लागली की लंगिक संबंध करणे अयोग्य वाटते व त्यातच आता तिची इच्छाही कमी व्हायला लागते. तिला हे नसíगकदृष्टय़ा कुणाकडे व्यक्त करता येत नाही. मग ती नवऱ्याशीच फटकून वागायला लागते, कमी बोलायला लागते. या काळात नवऱ्या-बायकोचे वाद या मूलभूत कारणांमुळे कधी कधी विकोपालाच पोचतात. याशिवाय योनीमार्गातला ओलावा कमी होऊन तोही कोरडा पडायला लागतो. लवचीकता कमी होते. परिणामी तिला संभोग करणेसुद्धा क्लेशदायक होते. म्हणजे हा काळ स्त्रीसाठी खरे तर सहन होत नाही आणि कुणाला सांगताही येत नाही असा आहे. अशा समस्या स्त्रिया त्यांच्या डॉक्टरलाही सांगत नाहीत. त्यांना लाज वाटते, कमीपणा वाटतो. पण त्यामुळे तिच्या आयुष्यात खूप खळबळ माजते. या साऱ्या अनुभवाचा मानसिक दुष्परिणाम खूप खोलवर आहे. किंबहुना स्त्रीसाठी हा खूप अस्वस्थ, निराश करणारा काळ आहे. तिची उदासीनता वाढते. तिच्या व्यक्तिमत्त्वात आक्रमकता व हट्टीपणासुद्धा येतो. तिच्या या असल्या कारणाशिवायच्या हट्टीपणामुळे मत्रिणीही तिला टाळतात. बऱ्याच वेळा या साऱ्या मानसिक तणावाचे व्यक्त स्वरूप म्हणजे अनेक प्रकारच्या शारीरिक वेदना स्त्रियांच्या संवादातून दिसून येतात. या वेळी तिच्याकडे तक्रारींची खाण आहे की काय असे घरच्यांना आणि मित्रमंडळींना वाटते. तिचे हे सततचे तक्रारीचे सूर घरचे वातावरण मात्र बेसूर बनवितात. स्वत:चा मनस्ताप टाळण्यासाठी मग सगळे तिच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. यामुळे तिला हे सारे लोक आपल्याला महत्त्व देत नाहीत, विचारत नाहीत, दुर्लक्ष करतात असे वाटते. परिणामस्वरूप ते एक मानापमानाचे दुष्टचक्रच बनते.
 रजोनिवृत्तीचा काळ हा स्त्रीच्या जीवनातला निश्चितपणे येणारा, पण तात्पुरता काळ आहे. या काळात आपण वृद्धत्वाकडे झुकलो आहोत ही खंत तिच्या मनात येत असते. त्या अनुषंगाने तिच्या व इतरांच्या मनात अनेक गरसमज असतात.
* ‘रजोनिवृत्ती येणे म्हणजे म्हातारपण येणे’ हा  गरसमज आहे. रजोनिवृत्ती हा काळ म्हणजे म्हातारपण तर नक्कीच नाही. व्यवस्थित हाताळल्यास या काळातही स्त्रीची विधायकता व बौद्धिक क्षमता व सामाजिक उपयुक्तताही शाबूत राहते. किंबहुना आजपर्यंतच्या अनुभवाच्या बळावर ती आतापर्यंत जे केले नाही असे नवनवीन प्रयोग  करू शकते व त्यात यशस्वीही होऊ शकते.
* रजोनिवृत्तीमुळे होणाऱ्या संप्रेरकांतील बदलांमुळे अनेक शारीरिक परिणाम होतातच. पण त्याव्यतिरिक्त मानसिक व भावनिक बदलही तिच्यात जास्त प्रमाणात होतात. खरे तर या बदलांमुळेच तिला जास्त त्रास होतो. चिंता, उदासीनता यांसारखे मानसिक आजारही होतात.
* रजोनिवृत्तीनंतर स्त्रीची लंगिक इच्छा नष्ट होते. हार्मोनल बदलांमुळे स्त्रीची लंगिक इच्छा नष्ट होत नाही. तिची लंगिक इच्छा तात्पुरत्या स्वरूपात कमी होऊ शकते. रजोनिवृत्तीच्या काळात व त्यानंतरही ६० ते ७० टक्के स्त्रिया लंगिकदृष्टय़ा समाधानी आढळतात.
*  रजोनिवृत्तीच्या काळात लठ्ठपणा येतोच, असे म्हणता येणार नाही. आहाराचे व्यवस्थित नियंत्रण व नियोजन केले, व्यायाम नियमित घेतला तर शरीर सुडौल व सुरेख राहू शकते. खरे तर हा लठ्ठपणा नियंत्रित ठेवून अनेक स्त्रिया या वयातही आकर्षक दिसतात हे आपण पाहतोच.
* कृत्रिम हार्मोन्सचे उपचार किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी रजोनिवृत्तीनंतर घेणे गरजेचे आहे. हा एक गंभीर व महत्त्वाचा गरसमज आहे. ही उपचारपद्धती वैद्यकीय सल्ल्यानुसार घेणे कधी कधी आवश्यक आहे. पण ती गरजेची आहे, असेही नाही. कारण बऱ्याच स्त्रियांमधील हे बदल दोन-तीन वर्षांत निघून जातात. उत्तम समतोल आहार, आनंदी मन, योग्य व्यायाम व इतरांचा आधार यामुळे स्त्रियांमधील रजोनिवृत्तीची त्रासदायक लक्षणे कालांतराने निघून जातात. रजोनिवृत्तीच्या सर्वसामान्य वा गंभीर त्रासातून जाताना स्त्रियांना कळत नाही की आपण काय करायला हवे. मुळात ही लक्षणे त्यांनी ओळखणे व स्वीकारणे आवश्यक आहे. आपल्यासारखी ही लक्षणे जवळजवळ सर्व स्त्रियांना जाणवतात हे जाणून घेतल्यास आपण एकटेच सोसणारे नाही हे लक्षात येते. पाळी गेल्यानंतर जो त्रास स्त्रियांना होतो तो त्रास बऱ्याच अंशी त्यांच्या पाळीबद्दलच्या विचारांमुळे वा मतांमुळे कमी-जास्त होऊ शकतो. ज्या स्त्रिया रजोनिवृत्तीचा काळ हा आयुष्याचा नसíगक भाग आहे आणि तो काही काळापुरता मर्यादित आहे, अशी सकारात्मक भूमिका घेतात त्यांना त्या काळात सुसह्य़ वाटते. काही स्त्रियांना तर हा काळ अगदी आपण स्वतंत्र झालो आहोत असे वाटते. आता डोक्यावर महिन्यामहिन्याने येणारा पाळीचा त्रास कायमचा गेला याचा त्यांना खूप आनंद असतो. बऱ्याच स्त्रियांना या काळात उदासीनतेचा आजार येऊ शकतो. आणि त्यांची वैचारिक क्षमताच कमी होते. त्या खूप भावुक होतात व साध्या साध्या कारणाने रडू लागतात.
एका बाईचा रजोनिवृत्तीचा कालावधी सुरू झाला होता. त्याच सुमारास त्यांचा मुलगा परदेशात अभ्यासाला गेला. आपल्या मुलाने परदेशात जावे ही त्यांचीच केव्हापासूनची इच्छा होती. पण प्रत्यक्षात ती वेळ आल्यावर खूप बिथरल्या. त्यांची झोप व भूक गेली. आपला मुलगा आपल्यापासून दूर जाताच कामा नये, आपण त्याच्याशिवाय जगूच शकणार नाही म्हणत त्या घायकुतीला आल्या. अस्वस्थ झाल्या. नंतर त्या मानसोपचाराने ठीक झाल्या. पण आतापर्यंत आयुष्यात त्या त्यांच्या आईच्याच भूमिकेत जगत होत्या. मातृत्वाचे जगच तेवढे त्यांना माहीत होते. त्यात पाळी जाण्याचे दिवस, त्यामुळे त्या सरभर झाल्या. या काळात त्यांना अचानक असुरक्षित वाटू लागले. त्यांचे लक्ष लागेना. सारासार विचार करता येईना. इतरांनी दिलेला सल्ला रुचेना. म्हणूनच स्त्रीने आपली नेहमीची भूमिका जी फक्त गृहस्वामिनी किंवा ‘आदर्श आई’ एवढय़ापुरतीच मर्यादित न ठेवता थोडीशी विशाल बनविली, त्यात विधायकता आणली, विरंगुळा साधला, बरोबरच्या मत्रिणींबरोबर सुसंवाद साधला, स्वत:ला आवडणारे नवीन छंद जोपासले, सामाजिक कार्यात रस घेतला तर आपल्या एकाच भूमिकेतल्या अस्तित्वावर अवलंबून राहण्याने होणारी भावनिक चलबिचल वा घालमेल कमी होऊ शकेल. आपली बदलती भूमिका लक्षात घेणे स्त्रीला खूप आवश्यक आहे. या काळामध्ये तिच्या आयुष्यात इतर अनेक बदल होत असतात. मुले स्वतंत्र होतात. इतर नातेवाईकही आपापल्या जगात जगत असतात. म्हणून स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा स्त्रीने जपणे आवश्यक आहे. स्त्रीला भावनिक आधाराची, समजावून घेण्याची खूप गरज आहे. म्हणूनच आपल्या अवतीभोवती अनेक मत्रिणींची उपस्थिती व यासाठी मत्रिणींचा एक छानसा ग्रुप करायला हवा. मनात येणाऱ्या गोष्टी बोलता येईल अशी एक मत्रीण जवळ असावी. चांगल्या कार्यात सहभाग आवश्यक आहे. यामुळे मन सकारात्मकदृष्टय़ा गुंतले जाते. नावीन्याची आवड निर्माण होते. समाजसेवेसारखी निरलस सेवा हातातून घडल्यास स्वत:वरचा विश्वास वाढतो. नवीन माणसांशी नाते जुळते.
या काळात तणाव कमी ठेवणेही आवश्यक आहे. मनात येणारे त्रासदायक विचार शक्यतो दूर ठेवावे. आपला मूड आनंदी ठेवावा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. वजन कंट्रोल करून हाडांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. याच काळात मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार बळावतात. म्हणून नियमित व्यायाम, योगासने करावीत. गरज पडल्यास मानसिक आजाराचे उपचार व्यवस्थित घ्यावे. असलेल्या समस्या कशा सोडवता येतील, याकडे लक्ष द्यावे. आवड असेल तर ध्यानधारणा, अध्यात्मात रमावे. यामुळे आपल्या मनाची काही ना काही थातूरमातूर गोष्टीत व माणसात उगाचच गुंतण्याची प्रक्रिया कमी व्हावयास मदत होते. एकंदरीत या काळात स्त्रीने शक्यतो स्वत:च स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करावा. आयुष्यात नावीन्य आणावे व नात्यात गोडवा आणावा.    
डॉ. शुभांगी पारकर -pshubhangi@gmail.com

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…