‘‘तुमचं, मागच्या पिढीचं जगणं सीमित असेल सर, पण समोर येणाऱ्या प्रत्येक माणसावर संशय घेण्याजोगं नक्की नव्हतं. माणसांना माणसांचा भरवसा असला, की देवाची आठवण फारशी होत नाही असं काही तरी असेल का? आमची तिथेच बोंब आहे ना.. म्हणून असेल कदाचित.. देवधर्माचं व्यसन जडलेलं दिसतंय.’’
मुलं स्वत:हून ‘भेटायला येतो’ म्हणाली म्हणून सर फार खूष होते. सकाळपासून स्वत: चांगले आवरूनसावरून तयार होऊन बसले होते. मुलांसाठी ‘हे आण’, ते  ‘करून ठेव’ अशा सूचना कामाच्या बाईला देत होते. नाही तरी अलीकडे त्यांच्याकडे फारसं कोणी येतच नसे. घरात ऐंशीच्या घरातले ते आणि त्यांची आजारी बायको. बोलून बोलून बोलणार किती आणि काय? त्यांचे दोन विद्यार्थी आज येणार होते. एक नुकताच सी.ए. झालेला आणि दुसरा इथून बी.ई. झाल्यावर अमेरिकेला गेला तो एम.एस., नोकरी, लग्न ही सगळी स्टेशनं घेऊन आता पहिल्यांदाच भारतात येणारा. दोघंही वयाची तिशी पार केलेले, मिळवते, संसारी वगैरे, पण सरांच्या लेखी मुलंच ती! फार वाट बघायला न लावता दोघं आले, अदबीनं नमस्कार करून समोर बसले, तेवढय़ात एकाने हात पुढे करत म्हटलं, ‘‘सर घ्या.’’
‘‘सी.ए.चे पेढे वाटतं? वा! छान झालं अगदी.’’
‘‘जरा उशीरच झालाय पेढे द्यायला, पण काय झालं रिझल्टनंतर तीन-चार दिवसांनी चतुर्थी होती. तेव्हा ठरवलं, चतुर्थीला सिद्धिविनायकाला सव्वा किलो पेढे चढवू आणि मगच वाटू. तिथे सिद्धिविनायकाच्या रांगेत हा भेटला अचानक.’’ त्या एकाने दुसऱ्याला संभाषणात ओढत म्हटलं. सरांनी हा दुसरा परदेशात असतो एवढंच ऐकलेलं होतं. हे सिद्धिविनायकाच्या रांगेचं प्रकरण त्यांना गोंधळात टाकून गेलं, पण दुसऱ्यानं लगेच उलगडा केला, ‘‘बायकोची फार इच्छा होती सर. दर चतुर्थीला आमच्यातर्फे सिद्धिविनायकाची काही तरी सेवा व्हावी. यू.एस.मध्ये करतो आम्ही थोडंफार, पण सिद्धिविनायकाची गोष्ट वेगळी. म्हणून मुद्दाम चतुर्थीला देवळात जायचं ठरवलं. पुढच्या वर्षभरासाठी दान-देणगी-समाराधना यांच्या काही योजना असल्या तर समजून घ्याव्यात म्हणून, तर तिथे याची स्वारी दत्त म्हणून उभी.’’
‘‘कमाल आहे? तुमच्या गणपतीच्या देवळामध्ये हे आगंतुक दत्तमहाराज काय करत होते? की त्यांनीही सर्वदेव समभाव स्वीकारलाय? माणसांसारखा?’’ सर जरासे चेष्टेने म्हणाले. दुसरा आपल्याच तंद्रीत होता.
‘‘आमची दोघांची गाठ पडावी ही देवाचीच इच्छा असणार बहुतेक. एरवी मी चार दिवस अगोदरच फ्लाय केलं असतं. रिटर्न तिकीटही तयार होतं, पण नेमकी अमावास्या होती हो त्या दिवशी. वाटलं, तिकडे यू.एस.मध्ये तर आपण धड काही पाळू शकत नाही. निदान इथून तरी भऽऽरऽऽ अमावास्येला जायला नको.. बायको प्रेग्नंट आहे सर. फॉर द फर्स्ट टाइम.’’
‘‘अरे वा! योग्य वयात योग्य त्या गोष्टी होताहेत हे किती चांगलं आहे ना? माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला.’’ गप्पा रंगल्या. मध्येच न राहवून सर म्हणाले,
‘‘तुम्ही असं करा.. या खेपेला जमवाच तुमच्या वेळच्या सगळ्यांना.. ’’
‘‘नक्की, फक्त हे तीन-चार दिवस जाऊ द्यात.’’
‘‘का? नवा जॉब सुरू होतोय, का स्वत:ची फर्म काढतोयस सी.ए.ची?’’
‘‘नाही हो. नवस फेडायला जायचंय. दोन वेळेला सी.ए. फायनल परीक्षेत विकेट गेली ना आमची? बायकोनं धसका घेतला होता. वणीच्या देवीला परस्पर नवस बोलला होता. ’’
‘‘बायको.. ’’
‘‘म्हणजे होणारी बायको हो. माझ्या बहिणीची मैत्रीणच आहे ती. खूप र्वष चाललंय आमचं.. आधी लगीन सी.ए.चं असं ठरवलं, म्हणून अडकलो.’’
‘‘चऽऽला! म्हणजे आता वणीची देवी पावली, की नंतर ही प्रेमदेवता वगैरे पावणार म्हणायची तुम्हाला.. लग्नाला बोलवा बरं का आठवणीनं आणि नेण्या-आणण्याची सोयपण कर रे बाबा. ’’
‘‘घ्यायला कोणीही येईल हो सर. निम्म्या पोरांकडे तरी स्वत:च्या मोटारी आहेत आता. त्याचा प्रश्नच नाही, पण दिवस ठरवतानाच दमछाक होते. कोणीकोणी मार्गशीर्षांतले गुरुवार करतं हल्ली. एरवी पुष्कळांचे शनिवारचे उपास असतात. संध्याकाळी उपास सोडताना ड्रिंक, नॉनव्हेज चालत नाही मग त्यांना. नॉनव्हेज, ड्रिंक घ्यायचं नसेल तर पार्टीची काय मजा?’’
‘‘नॉनव्हेजपर्यंतच ऐकू आलं मला. पुढला शब्द काय म्हणालास?’’
‘‘ड्रिंक सर. अ- पे- य- पा- न. तुम्हाला ज्याचा तिटकारा होता ते. क्लासच्या सेंडॉफच्या दिवशी तुम्ही आमच्याकडून जाहीर शपथ घेतली होतीत. आयुष्यात व्यसन करणार नाही म्हणून. तुम्ही बरोबर होतात सर. ड्रिंक वाईटच, पण माझ्या फर्मसाठी पुढचे प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट शोधायला पार्टी देतोय मी. ती कोरडी कशी देऊ?  आता ती लाइफ स्टाइल आहे सर.. व्यसन नाही.’’
‘‘शक्य आहे, पण आता एकूण दुसरंच व्यसन जडलेलं दिसतंय मला. तेही कदाचित तुमच्या सगळ्या पिढीलाच.. देवाधर्माचं !’’ सर एकटक बघत म्हणाले. त्यांच्या त्या नजरेनं, शब्दानं दोघंही ‘मुलं’ जराशी गोंधळल्यासारखी झाली. एवढा वेळ हिरिरीने बोलत होती ती एकदम गप्प झाली. त्यांचा ताण ओळखून मग सरांनीच वातावरण हलकं केलं.
‘‘ए बाबांनो, मी वयानं अगदीच ‘हा’ झालोय असं तर वाटत नाही ना तुम्हाला?..  फारसा बाहेर जात-येत नसलो तरी वाचत असतो, ऐकत असतो. त्यावरून अनेकदा वाटतं, सध्या देवमंडळींची चलती आहे.’’
‘‘काही तरीच काय सर?’’
‘‘सहज बघा ना.. केवढाल्ली ती देवळं.. केवढाल्ले ते त्यांचे उत्सव.. हे सगळं योजणारे, पैसा पुरवणारे तरुणच असतात ना? तुमच्या पिढीच्या आसपासचे? आमच्या म्हाताऱ्यांकडे कुठून येणार एवढा पैसा किंवा सत्ता? शिवाय आमच्या पिढीला एवढं देवदेव नसावंच बहुधा. देव म्हातारपणासाठी राखून ठेवायचो आम्ही. जवानी जायची आयुष्याशी दोन हात करण्यात.’’
‘‘मग आम्ही सगळे काय गाद्यागिद्र्यावर लोळत दिवस घालवतोय?’’
‘‘तसं नाही म्हणत मी, पण तुम्ही तुमच्या सगळ्या एवढय़ा व्यग्रतेमध्ये, व्यवस्थतेमध्ये देवाला फारच वेळ देताना दिसताय मला. कुतूहल वाटतं. एरवी एवढी संपन्न पिढी तुमची..’’
‘‘कुतूहल कसलं आलंय सर? यू शुड बी हॅपी. आम्ही लोक आमच्या एवढय़ा सगळ्या वैभवातही कशापुढे तरी लीन होतोय..  कशापुढे तरी नमतोय.. ’’
‘‘असेल बुवा. आम्हाला कळणार नाही. तेव्हाचं कोणतं ते प्रसिद्ध गाणं होतं..
‘दो आरजूमें कट गये.. दो इंतजारमें’ अशी आयुष्यं गेली आमची. हाताशी ना पैसा, ना संधी, ना घरच्यांचा पाठिंबा, उलट जबाबदाऱ्याच जास्त. रोज उठून आज कोणत्या बाबतीत मन मारायचं हेच ठरवावं लागे. तरी आम्ही एवढे देवाच्या भजनी नाही लागलो कधी. फार अपेक्षा नसतील म्हणा किंवा स्वत:वर विश्वास असेल म्हणा. तुमचं उलटं. देव का आठवतो? कारण अपेक्षा गाडाभर.. स्वत:वर विश्वास कणभर.. सॉरी.. मी जरा जास्तच बोलतोय का? ’’ सर सावरून घ्यायला लागले. थोडा वेळ तिघंही नुसतेच खात बसले. मग जराशाने पहिलाच बोलायला लागला,
‘‘हे सगळं तुमचं परसेप्शन आहे सर. तुमच्या पिढीनं म्हणा, पण स्वत:वर भरभक्कम विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आहे का आज? एकेकटय़ा माणसाला काही स्थान आहे? किंमत आहे? कुठे काही भरवसा आहे? तुम्हाला सांगतो सर.. विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीत पहिली सेमिस्टर करत होतो.. ख्रिसमसच्या पार्टीनंतर कोणा तरी अमेरिकन विद्यार्थ्यांने दुरून मोठी काचेची बाटली फेकून मारली मला. नेम चुकला म्हणून सर. नाही तर त्या तिथे मी जन्माचा आंधळा होऊन किंवा मरूनही पडलो असतो. काय करणार होतो मी एकटा? देवाचा धावा करण्याशिवाय?’’
दुसरा आठवणीनेही शहारला. मग त्याने आणि पहिल्याने अशा दुर्घटनांचा पाढाच वाचला. आमच्या बॅचमधला एकजण पदवी परीक्षेत कॉम्प्युटरच्या चुकीमुळे नापास दाखवला गेला. स्कॉलर मुलगा एरवीचा, त्या धक्क्य़ाने वेडा झाला,. पुढे त्याला फर्स्ट क्लास मिळाल्याचंही जाहीर झालं. काय उपयोग? आणखी एकाची महत्त्वाची परीक्षा आणि महत्त्वाचा इंटरव्ह्य़ूचा कॉल एकाच दिवशी आला. गुणवत्ता असूनही त्याला दोहोंपैकी एकावर पाणी सोडावं लागलं. कोणाचा दोष?’’
‘‘महामार्गावर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याच्या गाडीखाली एकाचा शाळकरी मुलगा चिरडला गेला. कोणाकडे न्याय मागायचा? मृत्यूपुढे न्याय-अन्याय काय उपयोगाचा? कोणी तरी जिवापाड खर्च करून बहिणीचं लग्न करून दिलं. तिचा नवरा समलिंगी नात्यात रमणारा होता. त्यानं, त्याच्या घरच्यांनी फसवलं. बहीण आयुष्यातून उठली. कोणाला काय मिळालं?’’
मुलं पोटतिडिकीने सांगत राहिली. सर ऐकत राहिले. बोलले नाहीत. बोलता येत नव्हतं म्हणून नव्हे, पण ऐकण्यात जास्त रस होता म्हणून. ऐकण्याची संधी फारशी मिळत नव्हती म्हणूनही. निघण्याच्या दृष्टीने हालचाली करताना पहिला म्हणाला, ‘‘तुमच्या पिढीचं जगणं सीमित असेल सर, पण समोर येणाऱ्या प्रत्येक माणसावर संशय घेण्याजोगं नक्की नव्हतं. माणसांना माणसांचा भरवसा असला की देवाची आठवण फारशी होत नाही असं काही तरी असेल का? आमची म्हणजे तिथेच बोंब आहे ना.. म्हणून कदाचित.. कोण जाणे?’’
‘‘देव जाणे म्हणालास तरी चालेल.’’ सरांनी त्याला थोपटत म्हटलं,‘‘आपली काही त्याच्याशी दुश्मनी नाहीये. पुढच्या पिढय़ांचा त्याच्याशी दोस्ताना अंमळ जास्तच वाढतोय हे खटकतंय एवढंच.’’