27 November 2020

News Flash

टॉयलेट ट्रेनिंग

शू-शीवर बाळाचं नियंत्रण म्हणजे नेमकं काय? तर ते एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. त्यासाठी किमान तीन गोष्टींचा विकास होणं गरजेचं आहे.

| September 7, 2013 01:01 am

शू-शीवर बाळाचं नियंत्रण म्हणजे नेमकं काय? तर ते एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. त्यासाठी किमान तीन गोष्टींचा विकास होणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मूत्राशय किंवा मोठं आतडं भरलं आहे, ही संवेदना होणं. दुसरं ही संवेदना आणि प्रत्यक्ष शी-शू होण्याची क्रिया यांचा परस्परसंबंध बाळाच्या लक्षात येणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला जाणवणारी संवेदना आणि ही गरज शब्दात व्यक्त करून आईबाबांचं लक्ष वेधून घेण्याचं कौशल्य विकसित होणं.
‘वाटेल तेव्हा, वाटेल तिथे शी-शू करणारा तो शिशू’ अशी एक मजेदार व्याख्या आहे. या दोन क्रियांवर ताबा मिळवायला बाळांना बराच काळ लागतो, पण आपल्या बाळाला हे कौशल्य कधी आत्मसात करता येईल अशी घाई आईबाबांना झालेली असते. ओल्या दुपटी-लंगोटांचे ढीग किंवा शहराच्या कचऱ्यात भर घालणारे डायपर्स हे दोन्ही त्यांना नकोसं वाटतं. आपलं बाळ शहाण्यासारखं या गोष्टी जिथल्या तिथे उरकून स्वच्छ, कोरडं कधी राहायला लागेल याची ते उत्कंठेनं वाट पाहात असतात.
त्यातच घरातल्या ज्येष्ठ स्त्रियांचे अनुभव अनाहूतपणे कानावर पडत असतात. ‘‘आम्ही बाई, आमच्या मुलांना अगदी तिसऱ्या महिन्यापासून ‘शू’ची सवय लावली होती. झोपेतून उठलं की लगेच बेसिनवर धरायचं नि श्.. श्.. करायचं की झाली धार सुरू! आणि मग दर दोन तासांनी असंच धरून सवय लावायची. सहाव्या महिन्यापासून खाली रबर टाकून बाळाला आपल्या पायांवर बसवायचं, की शीसुद्धा करायला शिकतं बाळ.’’
कोवळ्या आईबाबांनो, ऐकायला या गोष्टी कितीही रमणीय वाटल्या तरी एक लक्षात घ्या. सवय लावणं (कंडिशनिंग) वेगळं आणि ऐच्छिक नियंत्रण वेगळं. तीन महिन्यांच्या बाळाला उघडं करून बेसिनवर धरलं, थोडंसं पाणी खालच्या अंगावर शिंपडलं. गार बेसिनचा स्पर्श उघडय़ा अंगाला झाला किंवा वाहत्या पाण्याचा आवाज ऐकू आला, तर पुष्कळदा वागतंही बाळ आईच्या इच्छेप्रमाणे, पण यामध्ये एक प्रतिक्षिप्त क्रिया घडत असते. खाली काय होतंय याचा बाळाला पत्ता नसतो. यामुळे होतं एवढंच की काही डायपर्स किंवा लंगोटांची बचत होते, पण तरीही वारंवार ‘अपघात’ घडतच राहतात आणि बाळ अधूनमधून ‘प्रसाद’ देत राहते. त्यामुळे इतक्या लवकर बाळाला सवय लावण्याला तितपतच महत्त्व आहे हे लक्षात घ्यायला हवं.
अलीकडे बाळाला शू-शीसाठी पायांवर घेण्याची जागा पॉटीनं घेतली आहे. दिसायला आकर्षक, रंगीबेरंगी गुळगुळीत कडांची आणि स्वच्छ करायला एकदम सोपी पॉटी बाळाला सवय लावण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
आपण काहीही प्रयत्न केला नाही तरी बाळाच्या शी-शू क्रियांमध्ये जन्मापासून पुढे वर्ष-दीड वर्ष आपोआप फरक पडत जातो. पहिल्या महिन्यात दिवसातून ७-८ वेळा आणि रात्रीतून २-३ वेळा शी करणारं बाळ पुढच्या महिन्यापासून ३-४ वेळाच शी करतं. शूची संख्यापण कमी होत जाते. सहा महिने ते वर्षांपर्यंतच्या काळात रात्रीची शी बहुधा थांबते. दोन शी-शूमधलं अंतर हळूहळू वाढलं, तीन तासांइतकं झालं, की त्याचा अर्थ बाळाच्या मूत्राशयाचा – मोठय़ा आतडय़ाचा आकार वाढला, मलमूत्र धरून ठेवण्याची स्नायूंची क्षमता वाढली असा होतो. असं बाळ आता पॉटीवर बसवण्याइतकं मोठं झालंय असं समजायला हरकत नाही. ६-७ महिन्यांचं बाळ आधाराशिवाय नीट बसायला लागलं, की पॉटी सीटवरपण व्यवस्थित बसतं, त्याचे पायही खाली आरामात टेकतात.
सर्वसाधारणपणे जेवणानंतर थोडय़ाच वेळानं बाळाला शी होते. याचं कारण बाळाचं पोट भरलं, की जठरापासून मोठय़ा आतडय़ापर्यंत एक संदेश जातो आणि आतडय़ांचे स्नायू कार्यरत होतात, शी होण्याची क्रिया सुरू होते. म्हणून बाळाचं पोट भरलं की थोडय़ा वेळानं लंगोट काढून त्याला पॉटीवर बसवावं. आईबाबा कोणी तरी जवळ बसावं. पुस्तक, खेळणं दाखवून त्याला रिझवावं. पाच-सहा मिनिटांत त्याला शी झाली नाही तर किंवा त्याला कंटाळा आला, मूड गेला तर त्याला उतरवून घ्यावं, पुन्हा कपडे चढवावेत. हाच प्रकार झोपेतून उठल्यावर, बाहेरून आल्यावर, झोपण्यापूर्वी करावा. हळूहळू पॉटीचा स्पर्श झाला की प्रतिक्षिप्त क्रिया सुरू होऊन बाळ व्यवस्थित शी-शू करतं.
मात्र ६ महिने ते एक वर्ष या वयात केलेली पॉटीची सवय म्हणजेसुद्धा एक ‘कंडिशनिंग’ आहे. त्यात जठर- मोठं आतडं या प्रतिक्षिप्त क्रियेचा उपयोग केलेला आहे. याचा अर्थ बाळाला या गोष्टी नियंत्रित करता येतात असा नाही. तर मग शू-शीवर बाळाचं नियंत्रण म्हणजे नेमकं काय? तर ते एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. त्यासाठी किमान तीन गोष्टींचा विकास होणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मूत्राशय किंवा मोठं आतडं भरलं आहे, ही संवेदना होणं. दुसरं ही संवेदना आणि प्रत्यक्ष शी-शू होण्याची क्रिया यांचा परस्परसंबंध बाळाच्या लक्षात येणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला जाणवणारी संवेदना आणि ही गरज शब्दात व्यक्त करून आईबाबांचं लक्ष वेधून घेण्याचं कौशल्य विकसित होणं. या सर्वासाठी बाळाचा मेंदू आणि मज्जासंस्था तेवढी परिपक्व व्हायला हवी आणि ही परिपक्वता मुलांमध्ये केव्हा येते हेसुद्धा नक्की ठरलेलं नसतं. सर्वसाधारणपणे १५ महिने ते २ वर्षे हा काळ हा टप्पा गाठण्यासाठी आवश्यक समजला जातो; परंतु प्रत्येक मूल हे वेगळं एकमेव असते. त्याच्या विकासाचे टप्पेही वेगळे असतात. तर मग आपण कसं समजायचं, की आपलं बाळ तेवढं ‘मोठं’ झालंय की नाही? त्याच्याही काही विशिष्ट खुणा आहेत.
तुम्ही बाळाकडे बारकाईनं पाहाल तर तुम्हाला अगदी सहज समजतं, की शी लागलेल्या बाळाची शरीरभाषा बदलते. ते अंतर्मुख होतं. बूड उचलण्याचा प्रयत्न करतं. एकाग्रपणे जोर लावतंय हे बघणाऱ्याला व्यवस्थित दिसून येतं. असं बाळ पॉटीवर बसवण्याजोगतं झालेलं आहे. बाळ खेळताना अचानक थांबत असेल, चड्डीला किंवा डायपरला हात लावत असेल, स्वत:कडे खाली वाकून पाहात असेल तर त्याला शूची जाणीव होते आहे. कधी कधी शू झाल्यावर मगच बाळाला ते लक्षात येतं. काही बाळं त्यातच खेळत राहतात, तर काही अस्वस्थ होतात. चड्डी काढायला बघतात. रडून आईचं लक्ष वेधून घेतात. तुम्ही बाळाला वारंवार कपडे बदलून कोरडं ठेवत असाल, तर बाळाला ही जाणीव लवकर होईल. बाळाला ‘शू’ची जाणीव होतेय का इकडे लक्ष ठेवा.
९ महिने ते वर्ष या टप्प्यावर आपलं बाळ नवेनवे शब्द तोंडातून काढायला लागतं. हळूहळू शब्द आणि अर्थ यांची सांगड घालू लागतं. बाबा, दूदू, मंमं, टाटा या शब्दांचा वापर अर्थ समजून करू लागतं. अशा टप्प्यावर त्याला शू-शी या शब्दांचीही ओळख करून द्या. त्याच्याकडून सिग्नल मिळाला, की मुद्दाम विचारा ‘‘शू लागलीय? शी करायची? पॉटी पाहिजे?’’ असं वारंवार विचारल्यावर त्याला या दोन्हीचा परस्परसंबंध कळू लागेल. शक्यता आहे की, तुमचं त्याच्याकडे लक्ष नसेल तर तोच तुमचं लक्ष वेधून घेईल.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बाळांनी यशस्वीरीत्या पॉटीचा वापर केला, की त्याला शाबासकी द्या. टाळ्या वाजवून हसत ‘तू छान काम केलंयस’ हे सांगा. त्याच्यादेखतच पॉटी शौचकुपात नेऊन स्वच्छ करा. म्हणजे या आपल्या निर्मितीचं पुढे काय करायचं हे त्याला हळूहळू कळू लागेल. कौतुकाचा अतिरेक मात्र नको. नाही तर प्रत्येक वेळी पॉटीवर बसवल्यावर त्याला जबरदस्ती केल्याचा ताण येईल.
बाळ पॉटीवर बसायला बिलकूल तयारच नसेल, दोन-पाच मिनिटांतच उठून जात असेल, रडत असेल, तर तुमचे प्रयत्न थांबवाच. त्यानं इतरत्र कुठेही कार्यभाग उरकला (आणि असं पुन:पुन्हा घडणारच आहे.) तरी अजिबात रागवू नका. शांत राहा. आपला संयम आणि विनोदबुद्धी दोन्ही जागरूक ठेवा. जराही त्रागा न करता, किळस न दाखवता त्याला स्वच्छ करा. हा प्रकार वारंवार घडला तर तुमचं बाळ अद्यापि ही सवय लावून घेण्याइतकं ‘मोठं’ झालेलं नाहीये. मग त्याचं प्रत्यक्ष वय काही असो. (म्हणजे दोन- अडीच- तीनपर्यंत) काही दिवसांनी – एक-दोन महिन्यांनी पुन्हा प्रयत्न करा. काही आईबाबा बाथरूममध्येच स्वत: कमोडवर बसतात, बाळाला शेजारी पॉटीवर बसवतात आणि जोर करण्याचं प्रात्यक्षिक दाखवतात. बाळाला मजा तर वाटतेच, पण नेमकं काय करायचं याची कल्पनाही येते.
शू-शीविषयीचं बाळाचं हे ट्रेनिंग कित्येक आठवडे- महिने चालू शकतं. बाळाचं आजारपण, प्रवास, पाळणाघरात दाखल होणं अशा कारणांनी त्यात खंडही पडतो. शी खूप कडक असेल तर वेदनेमुळे पॉटीवर बसायला बाळ तयार होत नाही. पोट बिघडलं असेल तरी कपडे खराब होतात. बाळाला काय होतंय हे शोधून त्यावर इलाज करणं हे आईबाबांचं काम.
आपली आपली चड्डी काढून स्वत: शौचकुपात जाऊन बसणं, पाणी टाकणं, स्वच्छता करणं, हात धुणं, पुन्हा कपडे घालणं या पायऱ्या खूप पुढच्या. त्यासाठी अजून ३-४ वर्षे जावी लागतात.
drlilyjoshi@gmail.com
३१ ऑगस्ट रोजी ‘पालकत्वाचे प्रयोग’ या सदरातील
‘.. आणि कृतार्थ झालो’ हा लेख संजय जाधव यांनी लिहिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:01 am

Web Title: toilet training
टॅग Chaturang
Next Stories
1 .. आणि कृतार्थ झालो
2 समाधानी मी, तृप्त मी
3 अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट? घ्या सावधपणे
Just Now!
X