News Flash

हिंसाचार शारीरिक आणि मानसिकही

मी शिकत असतानाची गोष्ट.. आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्या दिवशी जोरदार चर्चा होती. एका शिक्षिकेच्या हाता-पायांवर जखमा तर होत्याच, शिवाय एका हातातून खूप रक्तस्राव झाल्याचंही कळलं

| April 18, 2015 01:13 am

मी शिकत असतानाची गोष्ट.. आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्या दिवशी जोरदार चर्चा होती. एका शिक्षिकेच्या हाता-पायांवर जखमा तर होत्याच, शिवाय एका हातातून खूप रक्तस्राव झाल्याचंही कळलं होतं. तपासणाऱ्या डॉक्टरांचं ठाम मत पडलं होतं की या जखमा पाय घसरून पडल्याने होऊच शकत नाहीत. त्यांच्या त्या सतत प्रश्न विचारण्याने त्या बाई त्रस्त झाल्या होत्या आणि रागावल्याही होत्या, पण काही बोलू शकत नव्हत्या. तेवढय़ात त्यांची मुलगीच म्हणाली, ‘बाबांनी खुर्ची फेकून मारली, म्हणून तिला इतकं लागलेलं आहे.’ तेव्हा ही गोष्ट सगळ्यांना कळली. त्या वयात माझ्यासाठी हे नवीन होतं, पण तेव्हा कळलं की शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या डॉक्टर कुटुंबातही घरगुती अत्याचार होतो. बायकोला इतकी टोकाची मारहाण केली जाते.

कुठल्याही कृतीमुळे व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रास आणि इजा होत असेल तर तो अत्याचार म्हणतात. पण त्याही पलीकडे जर व्यक्तीच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत असेल तर तोही अत्याचारच समजावा. अत्याचार शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक आणि लैंगिक असू शकतो. कुटुंबातली जबाबदार आणि विश्वासू व्यक्ती जर आपल्या जबाबदाऱ्या पार पडून इतर कुटुंबीयांना आवश्यक असणारी सुरक्षा, त्यांचा योग्य सांभाळ आणि जिव्हाळा देत नसेल तर तोही एक प्रकारचा अत्याचारच आहे. बहुतेक वेळेला स्त्रीच या अत्याचाराला बळी पडते, त्यानंतर घरातील मुलं आणि क्वचित घरात पुरुषावरही अत्याचार होत असतो.
नाकापेक्षा मेाती जड असताना..
मीनलताई माझ्याकडे समुपदेशनासाठी आल्या होत्या. त्यांना कंबरदुखी, अंगदुखी होतीच, शिवाय मधून मधून त्या बेशुद्ध पडत होत्या आणि त्यांना अतिअशक्तपणा आला होता. सर्व तपासण्या करून झाल्या. काहीच निष्पन्न होत नव्हतं. श्रीमंत घराण्यातील मोठी सून म्हणून त्यांना सर्व जण खूप मान देत असत. त्यांचं घर दवाखान्याच्या अगदी जवळ असूनही त्यांचे पती बोलावल्यावरही एकदाही भेटायला आले नाहीत. मीनलताई पतीपेक्षा जास्त शिकलेल्या आणि देखण्या होत्या. ते सतत मीनलताईंना टोमणे मारत. घरातल्या- बाहेरच्या माणसांपुढे त्यांचा अपमान करत. छोटीशी चूक झाली तर आठवडा- आठवडा अबोला धरायचे आणि खूप माफी मागितल्यावरच त्यांचा राग शांत व्हायचा. त्यांची मर्जी असेल तेव्हा जबरदस्तीने जवळ येत, मीनलताईंची इच्छा नसेल तेव्हासुद्धा. त्यामुळे त्या सतत दु:खी असायच्या परंतु घरी मारहाण होत नव्हती आणि सर्व गरजेच्या गोष्टी मिळत होत्या, म्हणून मीनलताईंना आपल्यावरचा हा अत्याचार आहे, असं कधी वाटलं नाही.
माझ्याकडे येणाऱ्या अनेक उदाहरणांतून काही निष्कर्ष नक्कीच काढता येतात. बहुतेक पुरुषांना ‘मी पुरुष म्हणून मी श्रेष्ठ’ असं वाटत असतं. स्त्रीला मारणं आणि त्यांना नियंत्रणात ठेवणं त्यांचे हक्कच नाही तरी ते आपले धर्म समजतात. हा समाज काही स्त्रियांमध्येही असतो. साहजिकच स्त्रीवरचा अत्याचार हे गरवर्तन समजलं जात नाही. त्यातून घरातील स्त्रीचं आपल्यापेक्षा शिक्षण, सौंदर्य, माहेरची परिस्थिती किंवा कमाई जास्त असेल तर पुरुषांना आनंद वाटण्याऐवजी असुरक्षित आणि स्वतबद्दल कमीपणा वाटतो. तिचा हेवा वाटतो आणि त्यातूनच तिच्यावर अत्याचार करून तिला कमी लेखण्याचा आणि स्वत:च्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न हे पुरुष करू लागतात. म्हणूनच आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणातून असं निष्पन्न झालं आहे की शिकलेल्या स्त्रियांना कौटुंबिक अत्याचार मोठय़ा प्रमाणात सहन करावा लागतो.
शिकलेली स्त्री आपलं मत बनवू शकते आणि ते मांडू शकते. कारण शिकलेल्या वा नोकरी करणाऱ्या स्त्रीला अधिक धाडस वा आत्मविश्वास शिकवला गेलेला असतो, पण त्याउलट पुरुषांना तिच्या या वागण्यावर सकारात्मक प्रतिक्रिया कशी द्यायची हेच शिकवलेलं नसतं. साहजिकच अशा पुरुषांना तिचं मोकळं वागणं-बोलणं पटत नाही आणि त्याचा राग येतो. मग तिला गप्प ठेवण्यासाठी आणि आपले वर्चस्व गाजवण्यासाठी तिच्यावर हात उचलला जातो.
असंही आढळून आलं आहे की कमी शिकलेल्या पुरुषांमध्ये न्यूनगंड आणि जास्त शिकलेल्या पुरुषांमध्ये अहंगड असतो. म्हणून असे पुरुष अत्याचार करण्याची शक्यता जास्त असते. आधीच पुरुषी अहं, त्यात तो अधिक शिकलेला असला तर त्याच्यात श्रेष्ठत्वाची जाणीव वाढून तो अहंकारी होतो. मी घरातल्या कोणत्याही व्यक्तीला कसंही वागवलं तर मला कोण विचारणार? या उद्दामपणातून घरच्यांवर अत्याचार सुरू होतो. याचं कारण पदवी मिळाली, गुणवत्ता सिद्ध केली तरी एकमेकांशी कसं वागावं हे संस्कार त्याच्यावर झालेले असतीलच असं नाही. तसं त्याला शिकवलंच जात नाही, ही आपल्या आजच्या समाजाची शोकांतिका आहे.
शिक्षण आणि संस्कारातील फरक
एक शिकलेल्या नोकरीदार जोडप्याला त्यांच्या दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी माझ्याकडे पाठवलं होतं. बायको आपली बाजू मांडत असताना तिचा नवऱ्याला राग आला आणि तो तिला अद्वातद्वा बोलू लागला. नवऱ्याविषयी असं बोलतात का म्हणून दमात घेऊ लागला. पत्नीने माफी मागून त्याला शांत केलं. खरं तर राग येण्यासारखं ती काहीच बोलली नव्हती. तरीही तिलाही असं वाटलं की आपल्या बोलण्याने नवरा दुखावला गेला म्हणून तो रागावला. म्हणून तीच त्याची माफी मागत राहिली. अशा अनेक जणी भेटतात. आजही मुलींना लहानपणापासूनच धीट आणि स्वतंत्र बनवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न फारच क्वचित वेळा केला जातो. आणि मुलांनाही मुलींशी कसं वागावं याचं शिक्षणही क्वचित दिलं जातं. उलट मुलींना शिकवताना बहुतेक वेळेला त्यांचं व्यक्तिमत्त्व शिक्षणामुळे आक्रमक होणार नाही, याची काळजी घेतली जाते. आणि मुलांना आक्रमक होऊन सर्व मिळवण्याची ताकद ठेवण्यासाठी उत्तेजन दिलं जातं. कुटुंबांकडून आणि समाजाकडून स्त्री-धर्म म्हणजे तिने घरात नमतं घेणं आणि कुटुंबाच्या सुखात स्वत:चं सुख शोधण्याची वृत्ती वाढवणं हेच सतत िबबवलं जातं. त्यामुळे दुसऱ्यांना खूश ठेवण्याची मानसिकता आपोआपच तिच्यात निर्माण होते. आणि म्हणूनच जेव्हा असा घरगुती हिंसाचार घडतो तेव्हा आपण त्यांच्या मनासारखं वागलं नाही म्हणून आपल्याला मार पडला, असे निष्कर्ष काढून असंख्य जणी स्वत:वर आरोप ओढून घेतात. हे अगदी उच्चवर्गातही घडतं.
प्रवृत्ती आणि मानसिकता
एकदा आम्ही बाबाच्या मित्राकडे, काकांकडे जेवायला गेलो होतो.
आमची जेवणं झाल्यानंतर आतून एक आजी आल्या. कुणीही त्यांच्याशी बोललं नाही. त्यांनी आपलं ताट वाढून घेतलं आणि गुपचूप जेवल्या. आई आणि काकी तिथेच होत्या, पण काकीने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. माझी आई आजीकडे बघून हसली, तर आजी लगेच जवळची खुर्ची ओढून बसल्या आणि आईशी बोलू लागल्या. तेवढय़ात त्या काकींनी फ्रीजमधून आइसक्रीम काढून बाहेर वाढायला नेलं, आईला आग्रह केला, पण आजींना मात्र बोलावलं नाही. ती आजी म्हणजे काकांची आई होती. काकीचा स्वभाव विचित्र आहे हे सर्वाना माहीत होतं, पण काकासुद्धा आजीबरोबर बोलले नाहीत. त्यांच्या या वागण्याचा आजींवर होणारा हा मानसिक अत्याचार किती भयानक असेल.
पुरुषांवरील आणि मुलांवरील अत्याचार
घरातल्या स्त्रीवर अत्याचार होतो हे सर्वश्रुत आहे, मात्र असा अत्याचार पुरुषांवरही होत असतात. कुणाला सांगितलं तर ‘हा बायकोकडून मार खातो’ अशी खिल्लीसुद्धा उडवली जाऊ शकते. म्हणून तो अनेक र्वष हे गुपचूप सहन करतो. बहुतेक वेळेला पुरुषांची शारीरिक शक्ती स्त्रीपेक्षा जास्त असल्यामुळे, पुरुषांवरही अत्याचार होतो या बाबीवर कुणी विश्वास ठेवत नाही. त्याशिवाय बहुतेक कायदेसुद्धा स्त्रीच्या बाजूने आहेत. पुरुषावर अत्याचार झालेल्या क्वचितप्रसंगी त्यांना सहानुभूती, मदत किंवा संरक्षण मिळणं कठीण होऊन जातं. बऱ्याचदा हे पुरुष मग जास्त जास्त वेळ घराबाहेर राहण्याचा प्रयत्न करतात आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता वाढते. समाजातील वरच्या स्तरांतले पुरुष असा अत्याचार जास्त सहन करतात हेही सर्वेक्षणात आढळून आलं आहे.
लहान मुलांवरचे अत्याचार ही कौटुंबिक समस्यांमधली सर्वात गंभीर बाब आहे. अत्याचारांमुळे मुलांची मानसिक आणि शारीरिक वाढ खुंटते. ते सारखे आजारी पडतात आणि त्यांना मानसिक आजार होतात. मोठेपणी त्यांचे व्यक्तिमत्त्व अस्थिर, असमाधानी राहतं आणि नातं- संबंधांमधील आस्था निघून जाते. त्यांना बेदम मारणं आणि सर्वात वाईट म्हणजे लैंगिक व्यवहार करणं- या गोष्टी आर्थिकदृष्टय़ा वरच्या स्तरांतल्या घरातही होतात. मुलांनी सांगितलं तर त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. आणि मोठी माणसं आपापसातील नातेसंबंध जपण्यासाठी अतिगंभीर घटनाही लपवतात. आणि त्यावर फारशी कारवाई केली जात नाही. एका ६ वर्षांच्या मुलाची गोष्ट अशीच होती. त्याचे वडील त्याच्या आईला आणि त्याला सर्व प्रकारे त्रास द्यायचे. त्यामुळे तो छोटा मुलगा रागीट, आक्रमक आणि मारकुटा झाला होता. शाळेत अभ्यास तर नाहीच, पण शिक्षकांशीही उद्धटपणे वागायचा. त्याच्या मामाने आई-मुलाला या अत्याचारापासून दूर आपल्याकडे बोलावले होते. पण या वडिलांना कोण बघेल? त्यांचं कसं होईल? म्हणून आई त्यांना सोडून जायला तयार नव्हती आणि मुलगा आईशिवाय राहू शकत नव्हता, साहजिकच त्याचं भविष्य कठीण झालं.
मुलांसाठी गप्प राहणं?
श्रीमंत घरात नवरा चांगलं कमावत असेल तर स्त्री त्याच्यावर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून असते. म्हणून त्यांना अनेकदा आर्थिक स्वातंत्र्य नसतं. शिवाय अनेकदा काळाच्या ओघात त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. अशा घरात अनेक स्त्रिया केवळ आपल्या मुलांसाठी अत्याचार सहन करत राहतात. तसंच पुरुषही आपण वेगळे झालो तर आपल्या मुलांना कधीच परत भेटता येणार नाही, या भीतीने अनेकदा असह्य़ होत असूनही लग्न मोडत नाहीत. मुलांच्या चांगल्या वाढ-विकासासाठी आई-बाबा दोघेही पाहिजेत- हे बरोबर आहे. पण घरात अत्याचार घडत असला तर त्यांच्यावर वाईट परिणाम होतो हेही तितकंच खरं आहे. या मुलांवर दीर्घकालीन वाईट परिणाम होऊ नये म्हणून ज्या पती-पत्नींचं अजिबात पटत नाही त्यांनी वेगळे होणंच इष्ट. कोणत्याही प्रकारचा अत्याचार होत असलेल्या घरात मुलांवर नक्कीच दुष्परिणाम होतो.
बोलल्यावर काय होते?
खूप सहन केल्यानंतर, वेगळं होण्याच्या अंतिम निर्णयाला पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीने त्या दृष्टीने पावलं उचलली तरी तिला नेहमीच पाठिंबा मिळेल असं नाही. घरचेच लोक अविश्वास दाखवतात किंवा काय होणार त्याने, असं सांगत मागे खेचतात. काही करून कुटुंब एकत्रच ठेवण्याकडे सर्वाचा प्रयत्न असतो आणि तिने आपली तक्रार नोंदवली तर पोलीसदेखील पटकन मदत करायला मागे-पुढे बघू शकतात. तक्रार खरी आहे का? असं काही घडू शकतं का, असे प्रश्न त्यांच्याकडूनच उपस्थित केले जाऊ शकतात. तक्रार नोंदवणाऱ्यांवर प्रचंड मानसिक दबाव आणून तक्रार मागे घ्यायला दबाव आणला जातो. प्रतिष्ठितव्यक्तींच्या मोठय़ा ओळखी असल्यामुळे ते अत्याचाराविरुद्ध बोललेल्या व्यक्तीला त्रास देऊन, त्यांना हैराण करू शकतात. त्यापेक्षा अत्याचारच परवडले, अशी वाटण्याची वेळ येते. ९९ टक्क्यांपेक्षा जास्त वेळा स्त्रियांवरच अत्याचार घडत असतात. या टक्केवारीला अनुसरून भारतातील कायदे स्त्रियांच्या बाजूने असणं हेच योग्य आहे. ‘हुंडाबळी कायदा’ आणि घरगुती हिंसाचार कायदा’ हे दोन महत्त्वाचे कायदे आहेत. या कायद्यांतर्गत वरच्या स्तरातील लोकांकडून खूप कमी तक्रारी नोंदवल्या जातात.
आपलं सर्वाचं कर्तव्य आहे
घरात शांत आणि सुरक्षित वाटलं पाहिजे. अत्याचारामुळे त्याउलट घडतं. अत्याचाराविषयी समाज हवा तेवढय़ा गांभीर्याने विचार करत नाही. कोणती गोष्ट सहन करण्यासारखी असते, कोणती गोष्ट अजिबात सहन करू नये हे अनेकांना कळलेलं नाही. श्रीमंती, उच्च शिक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पडद्यामागे अत्याचार घडत आहेत. त्यांना थांबवण्याची जबाबदारी फक्त त्या कुटुंबाची नाही. त्यांच्या नातेवाईकांचीही आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा द्यायला हवा. योग्य शिक्षा देणाऱ्या तपासाची आणि न्यायालयीन व्यवस्थेची मागणी सर्वानीच केली पाहिजे.
आपल्या मुलांनी कौटुंबिकच काय पण कोणताच अत्याचार करू नये आणि त्याला बळीही पडू नये म्हणून लहानपणापासूनच त्यांना योग्य संस्कार देणं, हेच आत्ताच्या काळातलं पालकांचं महत्कर्तव्य आहे.
डॉ. वाणी कुल्हळी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:13 am

Web Title: torcher physical and mental
टॅग : Woman
Next Stories
1 रजोनिवृत्ती आणि नैराश्य
2 आहारवेद : केळी
3 गच्चीवरची बाग : बंगला/अपार्टमेंटजवळची मोकळी जागा
Just Now!
X