News Flash

क्रोधातून साधनेकडे

मायकेल अँजेलोनं लिहिलं आहे की जेव्हा जेव्हा क्रोध माझा ताबा घेतो आहे असं वाटतं, तेव्हा मी आपली छिन्नी उचलून मूर्ती बनवायला लागतो. दगडांवर घाव घालतो.

| August 29, 2014 01:10 am

मायकेल अँजेलोनं लिहिलं आहे की जेव्हा जेव्हा क्रोध माझा ताबा घेतो आहे असं वाटतं, तेव्हा मी आपली छिन्नी उचलून मूर्ती बनवायला लागतो. दगडांवर घाव घालतो. आणि मग मलाच माझं आश्चर्य वाटतं की छिन्नीचे घाव घालता घालता पाच-सात मिनिटांत मला हलकं वाटायला लागलय. क्रोध गळून गेलेला असतो. कुणा माणसावर त्या क्रोधाचा प्रहार करण्याची गरज उरलेली नसते.

माणूस पशुपातळीवर उतरतो हे एक प्रकारे त्याच्या ठायी असणाऱ्या मनुष्यतत्त्वाचं विस्मरण असतं. बेचैनीपासून मुक्ती मिळवण्याचा तो अल्पकालीन उपाय असतो. पण हे समाधान थोडय़ा काळात लुप्त होतं. कारण वास्तवतेचं विस्मरण किती काळ टिकून राहणार? वास्तवता जाणूनबुजून विसरण्याचा केलेला प्रयत्न कधी तरी समाप्त होतो. माणूस रागाच्या भरात पशूसारखा वागू शकतो. थोडा वेळ क्रोधामुळे त्याला बरं वाटतं. पण क्रोधावस्था समाप्त झाली की मी इतका कसा रागवलो, माझ्यावर ताबा का राहिला नाही, रागाच्या भरात माझ्या हातून इतकं नीच कृत्य कसं घडलं, अशा तऱ्हेचा पश्चात्ताप सुरू होतो. त्यातून आलेली बैचेनी घालवण्याचा एक उपाय आहे.
हा उपाय म्हणजे आपलं आणि परमात्म्याचं अद्वैत जाणून घेणं. आपल्या अंतरात लपलेल्या आत्मस्वरूपाला प्रकट करणं. भविष्यकाळात तो जे परमपद प्राप्त करू शकतो ते प्राप्त करून घेणे. मग त्याच्या ठायी अशी निर्मळ शांती येईल, जशी गाईच्या डोळय़ात असते. म्हणूनच कदाचित संतांच्या डोळय़ात पशूंसारखा निर्मळ निष्पाप भाव दिसून येतो. संत-महंत शांतचित्ताचे असतात. त्यांची स्वप्नावस्था संपून त्यांना सत्यप्राप्ती झालेली असते म्हणून संत पूर्णत्वाला पोहोचलेले असतात. आता ते अपूर्ण नसतात. बेचैनी अपूर्णत्वात असते.  सगळी सर्वसामान्य माणसं बेचैन असतात. या बेचैनीचा कसा उपयोग करायचा? भविष्यकाळात जे साध्य करायचं आहे त्यासाठी, आपण जे बनू शकतो त्यासाठी याचा उपयोग करायला हवा. मात्र बेचैनीत अडकून पडणं योग्य नाही. बेचैनीचं ओझं वाहात राहणं सोडून द्या आणि आपल्या साध्यासाठी तिचा साधन म्हणून उपयोग करा.

मनुष्यमात्राच्या आत अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत बेचैनी राहणारच आहे. तिचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. सर्वसामान्यपणे आपण उपयोग करून घेतोही. (पण तो योग्य असतो का?) आपण दोन प्रकारे उपयोग करतो आणि या दोन्ही प्रकारांत धोका असतो. बेचैनी बाहेर काढण्यासाठी आपण बेचैनीचा उपयोग करतो. क्रोध, घृणा, ईर्षां, प्रतिस्पर्धा, संघर्ष यांचा आपण बेचैनी काढण्यासाठी उपयोग करतो. यामुळे बेचैनी समाप्त होणार नाही. यातील एकही गोष्ट बेचैनीचं कारण नाही. जोवर अंत:स्थातील आत्मस्वरूप प्रकाशमान होत नाही, जोवर आत लपलेल्या बीजाचं फूल बनत नाही आणि आपला खरा स्वभाव प्रकट होत नाही, तोवर बेचैनी दूर होणार नाही. थोडा वेळ आपण आपली बेचैनी ओंजळ भरून उपसून दुसऱ्याच्या अंगावर टाकू शकता. असे केल्याने कदाचित तात्पुरतं समाधान मिळेलही, पण त्यामुळे आपण आपली शक्ती व्यर्थ वाया घालवत असतो. ज्या शक्तीमुळे खूप मोठी विकासयात्रा पार पडू शकते, त्या शक्तीद्वारे आपण दुसऱ्यांना आणि स्वत:लासुद्धा दु:ख आणि वेदना बहाल करत असतो.
याखेरीज आपण या बेचैनीचा आणखी कोणता उपयोग करतो? आपण जेव्हा बेचैनी काढून फेकू शकत नाही, तेव्हा आपण ती विसरण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी कुणी मद्यपान करतं, कुणी सिनेमागृहात जाऊन बसतं, तर कुणी संगीत ऐकू लागतं. आत ही जे वादळ आहे, जी खळबळ आहे ती विसरून जावी, तिची जाणीवही होऊ नये असा प्रयत्न असतो. हा प्रयत्नसुद्धा वेळ आणि शक्तीचा अपव्यय असतो.
   एक तिसरा आणि योग्य मार्ग आहे. तो म्हणजे या बेचैनीला समजून घ्या आणि तिचं साधनेत रूपांतर करा. ही बेचैनी साधनेत रूपांतरित होऊ शकते. तिला विसरण्याची गरज नाही. बेचैनीचा आध्यात्मिक उपयोग होऊ शकतो. तिचा शिडासारखा वापर होऊ शकतो. ही बेचैनी म्हणजे एक शक्ती आहे. छोटासा प्रयोग करा. तुम्हाला कदाचित जाणीव नसेल. तुम्हाला राग आला तर राग कुणावर तरी काढायचा किंवा दडपून टाकायचा अशा दोनच मार्गानी रागाचं शमन होईल असं तुम्हाला वाटतं. पण दडपलेला क्रोध मागेपुढे (कधी तरी) उसळून बाहेर पडणारच. ते विषारी रसायन आत खदखदत राहणार आणि कुठं ना कुठं बाहेर पडणार. यात आणखीच धोका असतो. कारण ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांवर राग काढला जाऊ शकतो. जो साऱ्या जीवनाचं नुकसान करेल.
  मायकेल अँजेलोनं लिहिलं आहे की जेव्हा जेव्हा क्रोध माझा ताबा घेतो आहे असं वाटतं, तेव्हा मी आपली छिन्नी उचलून मूर्ती बनवायला लागतो. दगडांवर घाव घालतो. आणि मग मलाच माझं आश्चर्य वाटतं. छिन्नीचे घाव पाषाणावर घालता घालता पाच-सात मिनिटांत मला हलकं वाटायला लागतं. क्रोध गळून गेलेला असतो. कुणा माणसावर त्या क्रोधाचा प्रहार करण्याची गरज उरलेली नसते. थोडक्यात काय, तर भावनांचा विलय नको, रूपांतरण हवे. मायकेल अँजेलोंच्या उदाहरणातून कळते की क्रोधाचं रूपांतर सृजनात्मक ऊर्जेत करण्याची ही साधना आहे.
   मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की तुम्हाला राग आला तर जोरात मूठ आवळा आणि हळू हळू बोटं मोकळी करा. असं पाच वेळा करा. तुमचा क्रोध नाहीसा झालेला आढळेल. तुम्हाला वाटेल हे इतकं सोपं आहे का? पण करून तर बघा. पूर्ण ताकद पणाला लावून, जितक्या जोरात मूठ आवळता येईल तितक्या जोरात आवळा. मग उघडा. असं पाच वेळा करा. मग फिरून आपल्या आत डोकावून बघा. क्रोध कुठं गेला? तुमचं तुम्हालाच आश्चर्य वाटेल. क्रोधाचं ओझं हलकं झालं. उतरलं. कुठे तरी हरवलं किंवा संपून गेलं.
   जपानमध्ये मुलांना असं शिकवलं जातं की जेव्हा क्रोध येईल तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. असं १५-२० वेळा करा. आणि हळूहळू क्रोध विरून गेल्याचं लक्षात येईल. क्रोधाला दडपण्याची किंवा कुणावर तरी त्याचा वर्षांव करण्याची गरज उरली नाही. २० वेळा दीर्घ-खोलवर घेतलेला श्वास आरोग्याला हितवर्धक ठरतो आणि क्रोध सृजनात रूपांतरित व्हायला लागतो.
   तुम्हाला क्रोध आला तर डोळे बंद करून क्रोधावर ध्यान करा. आणखी काहीही करू नका. क्रोधाला बघा. जाणा. काय आहे हा क्रोध? त्याचं पूर्ण दर्शन घ्या. केवळ साक्षी होऊन बघत राहा. जणू कुणी दुसरच क्रोधित झालेलं आहे आणि तुम्ही पाहता आहात. आपल्या क्रोधायमान प्रतिमेचं संपूर्ण निरीक्षण करा. असं थोडा वेळ निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की क्रोध समाप्त झाला. विलय पावला. मूठ आवळून उघडणाऱ्या प्रकारानं तो जसा विलीन होतो, मूर्ती बनविण्यासाठी पाषाणावर छिन्नी चालवण्यानं तो जसा विलीन होतो, तसाच संपूर्ण साक्षीत्वानं क्रोध विलीन होतो. मी असं म्हणणार नाही की क्रोध वाईट असतो. क्रोधित होता कामा नये. मी असाही विचार करणार नाही की हा क्रोध येतो तरी का? मी फक्त साक्षी भावानं बघत राहीन. जणू (क्रोध नाही तर) आकाशात एक ढग तरंगत जातो आहे अशा तऱ्हेनं आतल्या क्रोधाला बघेन. जसा रस्त्यावरून कुणी पथिक जात असावा असा त्या क्रोधाकडे बघीन. फक्त बघीन. काहीही करणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही क्षणातच तो क्रोध शांत झाला. त्याची जी शक्ती आहे ती तुमच्या अंतरंगात सामावली आहे.     ॠ
 
(‘विचारकिरण’ या साकेत प्रकाशनाच्या, माधवी कुंटे अनुवादित  पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:10 am

Web Title: towards peace of mind
टॅग : Chaturang
Next Stories
1 स्त्री आहे म्हणुनी..
2 तिच्या जगात, परदेशात : पुनर्वसन, पुनर्निर्माणातून विकास
3 स्वत:ला बदलताना : होते ओझे इतिहासाचे अन् पूर्वग्रहांचे!
Just Now!
X