मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

प्रस्थापित पारंपरिक शिक्षणपद्धती राबवणाऱ्या अनेक मराठी शाळांपुढे अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला असताना यातील काही शाळा आपल्या स्तरावर नवीन प्रयोग करत आहेत. शिक्षणसंस्थांच्या संचालक मंडळाला विश्वासात घेऊन, पालक आणि माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत प्रगती साधत आहेत. मुलांना इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत घालण्याची मानसिकता बोकाळली असताना मातृभाषेतील शाळांचे हे प्रयत्न इतर मराठी शाळांसाठीही दिशादर्शक ठरू शकतील.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
ग्रामविकासाची कहाणी
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

पालक मुलांच्या शाळा प्रवेशाच्या वेळी कोणत्या गोष्टींना महत्त्व देतात हे आपण मागच्या लेखात पाहिलं. वेगवेगळ्या वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या गरजा, त्यांच्या पालकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देत, पालकांच्या अपेक्षा पूर्ण  करत आपलं अस्तित्व टिकवताना प्रस्थापित पारंपरिक पद्धतीतील शाळांना काय अडचणी येतात आणि ते हे आव्हान कसं पेलतात, हे जाणून घेण्यासाठी आम्ही एका मराठी शाळेत पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक असलेल्या रती भोसेकर आणि दुसऱ्या एका शाळेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे  मुख्याध्यापक शिवाजी कांबळे आणि गुणवंती कांबळे यांच्याशी संपर्क साधला.

सरस्वती मंदिर शाळेच्या रती भोसेकर यांनी शाळेच्या यशाचं श्रेय प्रामुख्यानं कालानुरूप बदल आणि कृतीशील शिक्षणपद्धतीला दिलं. ही प्रस्थापित शाळा असूनही काळाप्रमाणे त्यांनी आपल्या पद्धती बदलल्या आहेत. शाळेत पालकांच्या सहभागाला खूप महत्त्व दिलं जातं. शाळेत अनेक अभिनव उपक्रम चालवले जातात. उदा. पालक दिन- या दिवशी पालक शाळा चालवून बघतात. मुलांचे खेळ, अभ्यास या गोष्टी करताना त्यांनाही मुलांशी, शाळेशी समरस होता येतं. शाळेचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. तीन वर्षांच्या चिमुरडय़ांना शाळेत जाण्याचा बदल सोपा जावा म्हणून सोफा, गाद्या वगैरे ठेवून शाळा ही घराचा अनुभव देणारी करतात. आजूबाजूच्या आजी-आजोबांना शाळेत बोलावले जाते. शाळेत नवीनच आल्यानं रडणारी मुलं आजी-आजोबांच्या प्रेमानं त्यांच्याजवळ जाऊन शांत होतात. मुलं शाळेत रुळल्यावरही लेखन-वाचनाची घाई केली जात नाही. आनंददायी, सहज शिक्षणावर भर दिला जातो आणि तसे उपक्रम आखले जातात. उदा. सध्या मुलांचं शिक्षण ‘ऑनलाइन’ होत आहे. त्यात मुलांच्या शैक्षणिक खेळांमधून तयार  होणाऱ्या वस्तूंचा ‘कामाचा कोपरा’ घरोघरी करण्यात आला आहे. एवढंच नव्हे, तर तीन र्वष पूर्वप्राथमिकमध्ये राहून ही मुलं जेव्हा पुढे संस्थेच्या प्राथमिक शाळेत जातात, तेव्हा मार्चमध्ये मुलांच्या क्षमतांचा अहवाल त्या त्या  इयत्तेच्या  शिक्षिकेला आणि मुलांच्या आई-बाबांनाही दिला जातो. त्यामुळे पुढच्या वर्गाचे शिक्षक आणि पालक यांत दुवा साधण्यात मदत होते.

शिक्षकांचं सहकार्य आणि सहभाग असल्याशिवाय कोणतेही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाहीत, असं रती भोसेकर आवर्जून सांगतात. त्या स्वत: प्रत्येक उपक्रमाच्या आखणीत आणि अंमलबजावणीत सक्रिय भाग घेतात. शिक्षिकाही मोकळेपणाने आपली मते मांडतात तसेच अतिशय तन्मयतेनं या उपक्रमांवर परिश्रम घेतात. उपक्रमाची संकल्पना समजावून घेऊन, त्यावर अभ्यास करून, पालकांशी संवाद साधून ते प्रत्यक्षात आणतात. अगदी सध्याच्या ‘करोना’च्या काळातही त्यांनी यात कुठे कमतरता  येऊ दिली नाही. शाळेचे विश्वस्तही  पुरोगामी विचारांचे असल्यानं कोणत्याही नवीन उपक्रमांना त्यांच्याकडून मान्यता मिळवणं सोपं जातं, याचाही भोसेकर यांनी  उल्लेख केला. पूर्वप्राथमिकमधील शिक्षणाचं महत्त्व सध्याचे विश्वस्त पूर्णपणे जाणतात. त्यांच्याशी मोकळेपणे विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. त्यामुळे विचारांचा, प्रयत्नांचा समन्वय साधता येतो.

‘आर. एम. भट’ ही परळमधील पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंत वर्ग असणारी अनुदानित शाळा आहे. शाळेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे  मुख्याध्यापक म्हणून शिवाजी कांबळे यांनी आठ र्वष आणि गुणवंती कांबळे यांनी तीन र्वष काम पाहिलं आहे. शिवाजी कांबळे यांनी ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या इतरही शाळांतून  प्राचार्यपद भूषवलं आहे. शाळेत पूर्वी प्रत्येक इयत्तेच्या पाच तुकडय़ा असत- चार पूर्ण मराठी माध्यमाच्या आणि एक ‘सेमी-इंग्रजी’ची. प्रत्येक वर्गात ७५-८० मुलं असत आणि असं असूनही अनेक पालकांना प्रवेश नाकारायला लागत असे. गेल्या काही वर्षांत मराठी माध्यमाची मुलं कमी होत गेलेली याही शाळेनं अनुभवलं आहे. सध्या या ठिकाणी मराठी माध्यमाच्या चारऐवजी तीनच तुकडय़ा आहेत. गोखले शिक्षण संस्थेच्या मुंबईबाहेरील शाळांमध्येही काम केल्यानं शिवाजी कांबळे आणि गुणवंती कांबळे यांनी ग्रामीण भागातली स्थिती बघितली आहे. तिथेही आता दहा-दहा किलोमीटरवर इंग्रजी शाळा आहेत. त्या वाहनव्यवस्थाही पुरवतात. त्यामुळे पालक मुलांना गावातल्या मराठी शाळेत न घालता लांबच्या इंग्रजी शाळेत घालतात. त्यांनी या संदर्भात तलासरीचं उदाहरण दिलं. तिथे १९८५ मध्ये फक्त एक मराठी शाळा होती. पण आता तिथे दोन इंग्रजी शाळा आहेत. शिवाजी कांबळे यांच्या स्वत:च्या कोल्हापूरजवळच्या गावातील मुलंही गावातल्या शाळेत न जाता, जवळच्या, आठवडय़ाचा बाजार भरतो त्या गावी असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. त्यांच्या मते याचं कारण म्हणजे आपल्याकडे शिक्षण हे रोजगारासाठी, पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी घेतलं जातं. शिक्षक, शाळा  जेव्हा पालकांचं माध्यमाविषयी प्रबोधन  करायचा प्रयत्न करतात तेव्हा पालकांना वाटतं, की ते आपली शाळा चालावी म्हणून हे सांगत आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांत अनेक शिक्षणतज्ज्ञ, मराठीप्रेमी आणि साहित्यिक यांनी यासंबंधी बरंच प्रबोधन के लं आहे. पण त्याचा जनमानसावर फारसा परिणाम होत नाही असं वाटतं. रोजगारही आवश्यक आहे, पण शिक्षण हे माणसाला प्रगल्भ करण्यासाठी आहे आणि व्यवसाय हा कार्यक्षमतेवर अवलंबून आहे, हे जोपर्यंत पालकांना कळत नाही तोपर्यंत असंच चालणार असं कांबळे यांचं मत आहे. दोन वाक्यं इंग्रजीतून  बोलला तर तो माणूस विद्वान, पण हेच जर मातृभाषेतून बोलला तर त्याला काही फारसं जमत नाही, अशी जी समाजाची मानसिकता आहे, तीच मोठा अडसर आहे.  यातून मार्ग काढण्यासाठी मराठी शाळांतून शिक्षण घेऊनही यशस्वी होता येईल, असं पालकांचं प्रबोधन केलं पाहिजे. पण कित्येक मराठी शाळांची दुरवस्था झाली आहे, हे दुर्दैवी सत्यही नाकारता येणार नाही. बहुतेक शाळा अनुदानित असतात, त्यांना पैशांची नेहमीच गरज असते. बहुतेक वेळा निधी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नवीन काही करायचं तर सहज शक्य होत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत खेळापासून सर्व गोष्टींची उत्तम सुविधा असते, त्यामुळे पालकही साहजिकच आकर्षित होतात. मराठी शाळेतल्या शिक्षकाचंही प्रबोधन व्हायला हवं. त्यांनी इंग्रजी विषय उत्तम प्रकारे शिकवला, कृतीयुक्त, आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर पालकही मराठी शाळेकडे वळतील असं ते आपल्या अनुभवातून सांगतात.

या संदर्भात गुणवंती कांबळे यांनी मुंबईच्या ‘डी. एस. हायस्कूल’चा दाखला दिला.  त्यांनी त्यांच्या वेळापत्रकात इंग्रजी संभाषणासाठी दोन तासिका राखीव ठेवल्या आहेत आणि त्यासाठी वेगळे शिक्षक आहेत. त्यांचे माजी विद्यार्थीच त्यांचे संचालक असल्यानं ते अतिशय नेटानं आपल्या शाळेची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे नवीन उपक्रम सुरू करायला सोपं जातं. त्यामुळे शाळेकडे पालक आकर्षित होतात. ‘आर. एम. भट’ शाळेच्या प्रयत्नांबद्दल बोलताना गुणवंती कांबळे यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या शताब्दीच्या निमित्तानं एकत्र येऊन शाळेच्या नूतनीकरणात आणि आधुनिकीकरणात सिंहाचा वाटा उचलल्याचं सांगितलं. शाळेच्या चाळीस वर्गात आता प्रोजेक्टर्स, व्हाइट बोर्ड्स आहेत. शाळेतील स्वच्छतागृहं वगैरे मूलभूत सुविधाही सुधारण्यात आल्या आहेत. पूर्वप्राथमिक शाळेतही आकर्षक खेळणी आणली आहेत. माजी विद्यार्थ्यांनी वर्ग दत्तक घेऊन ते सुंदर केले. बाक, फ्लोअरिंग, वायरिंग, रंग सगळं नवीन करून शाळेचं रूपच बदलून टाकलं. मग नवीन पालकांनासुद्धा आपल्या मुलाला अशा शाळेत घालायला आवडतं. पण माजी विद्यार्थ्यांचं असं सहकार्य सगळ्या शाळांना मिळेल असं नाही. तेव्हा पालकांची जर इंग्रजी शाळांचं शुल्क भरायची तयारी असेल, शिकवण्या लावायची तयारी असेल, तर त्यांनी मराठी शाळांनासुद्धा सढळ हातानं मदत करायची तयारी ठेवायला हरकत नसावी. पण तसं प्रत्यक्षात दिसत नाही. त्यासाठीही पालकांचं प्रबोधन व्हायला हवं, असं गुणवंती कांबळे यांना वाटतं.

अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना कोणताही नवीन उपक्रम राबवण्यासाठी  सरकारचे नियम पाळावे लागतात. जर शाळेत मुलांसाठी नृत्य, वाद्यवादन किंवा मल्लखांबसारख्या खेळाचा वर्ग सुरू करायचा असेल तर  संस्थेची परवानगी लागते. या संदर्भात ‘आर. एम. भट’मध्ये क्रिकेटचा संघ कसा सुरू झाला, ते गुणवंती यांनी सांगितलं. शाळेतली काही मुलं शिवाजी पार्कमध्ये क्रिकेट  खेळत असत. पण शाळेत क्रिके ट संघ नसल्यामुळे त्यांनी शाळा सोडायचं ठरवलं. गुणवंती कांबळे यांनी त्यांना थोपवलं. मग शिवाजी कांबळे यांनी शाळेच्या समितीची  परवानगी घेतली. माजी विद्यार्थ्यांनी कपडे, किट्स विकत घ्यायला मदत केली आणि शाळेचा क्रिके ट संघ तयार झाला. उन्हाळी शिबिरांद्वारे काही उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात. वेगवेगळ्या कार्यशाळा, भाषणं, वेगवेगळ्या स्थळांना, संस्थांना भेटी यामुळे मुलांचं अनुभवविश्व समृद्ध होत राहातं. शिक्षक प्रशिक्षण, पालक प्रबोधन, समुपदेशन यासाठीही  शाळांनी सक्रिय राहायला हवं, असं दोघांनीही नमूद केलं. संस्थेच्या संचालकांनी विश्वासानं मुख्याध्यापकांना शाळा सुधारण्यासाठी आवश्यक गोष्टी करायची संधी देणं, शिक्षकांचा सहभाग आणि माजी विद्यार्थ्यांचं सहकार्य मराठी शाळा टिकण्यासाठी आवश्यक आहेत. मुख्याध्यापक आणि संचालक यांचे संबंध चांगले असले तर सुधारणा, नवीन  उपक्रमांना मान्यता मिळवणं सोपं जातं. त्याबरोबरच उपक्रमांचं सातत्य जरुरीचं आहे. मुख्याध्यापकांच्या उमेदीवर खूप गोष्टी अवलंबून असतात. मुख्याध्यापक बदलला की उपक्रम बदलले किं वा थंडावले असं होता कामा नये. यासाठी संचालकांनी दक्ष राहायला हवं. उपक्रम यशस्वी होण्यासाठी  सर्व शिक्षकांनाही बरोबर घेऊन  जायला हवं. त्यांच्या सहकार्याशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक हा माजी विद्यार्थी आणि शाळा यातलाही  दुवा असतो. हा दुवा सबळ असल्याशिवाय त्यांचं सहकार्य मिळू शकणार नाही. याशिवाय आणखी एक गोष्ट दोघांनी सांगितली, ती म्हणजे आजच्या विपणनाच्या जमान्यात शाळा आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शाळेनं वेगवेगळ्या- म्हणजे फेसबुकसारखी समाजमाध्यमं, वर्तमानपत्रं आणि इतरही माध्यमांचा वापर कुशलतेनं करून घ्यायला हवा.

रती भोसेकर, शिवाजी कांबळे आणि गुणवंती कांबळे यांनी अगदी मोकळेपणानं त्यांचे अनुभव सांगितले. शाळेचे संचालक, शिक्षक, पालक यांचं सहकार्य मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी जरुरीचं आहे, तसं मराठी शाळांच्या अस्तित्वासाठीही जरुरीचं आहे, हे यातून प्रकर्षांनं  जाणवलं. एवढंच नव्हे, तर माजी विद्यार्थ्यांचं योगदानही महत्त्वाचं ठरतं. मराठी शाळा आणि त्यांचे माजी  विद्यार्थी याची नक्कीच दखल घेतील अशी आशा आहे.