20 January 2021

News Flash

अपमानाचं जिणं मागे सारताना..

अपमानाचं जगणं जणू त्यांचं प्राक्तन होतंच, पण त्याही पलीकडे जाऊन मारहाण, लैंगिक अत्याचार हाही अनेकांच्या आयुष्याचा भाग होता.

ते आहेत तृतीयपंथी/‘ट्रान्सजेंडर’. योग्य कायदेशीर, घटनात्मक तरतुदी, त्यांच्या हक्कासाठी जागरूक असणाऱ्या, लढणाऱ्या संस्था आणि या व्यक्तींना मोकळेपणाने स्वीकारणारा समाज, थोडक्यात, एकूणच येत असणारे भान, या सर्व गोष्टींमुळे तृतीयपंथी/ ट्रान्सजेंडर व्यक्तींचे आयुष्य किमान सामान्य होत असल्याचे नजरेत येत आहे.

शुभा प्रभू साटम – shubhaprabhusatam@gmail.com

अपमानाचं जगणं जणू त्यांचं प्राक्तन होतंच, पण त्याही पलीकडे जाऊन मारहाण, लैंगिक अत्याचार हाही अनेकांच्या आयुष्याचा भाग होता. समाजाची तिरस्कृत नजर आणि अस्पर्शाची वागणूक हे तर त्यांनी कायमच गृहीत धरलं होतं; परंतु होतं..  होता.. हा शब्दप्रयोग त्यांच्याबाबतीत वापरता येणं हेच समाजाचं बदलतं रुप.  ‘ट्रान्सजेंडर’- तृतीयपंथी घटकासाठी समाज-मानसिकतेतला हा बदल नक्कीच जगण्याचा आनंद देणारा.. आज अनेक तृतीयपंथीयांना लोकांनी त्यांच्यात सामावून घेतलं आहे. त्यांचे विविध समाजमाध्यमांवर हजारोंनी ‘फॉलोअर्स’ आहेत. तिरस्काराची नजर मावळली आहे. मात्र त्यासाठी या घटकातील त्या प्रत्येकाने प्रचंड मेहनत, कष्ट घेतले आहेत. म्हणूनच आज अनेक जण मोठय़ा पदांवर कार्यरत आहेत..  महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल, न्यायाधीश, वकील, पोलीस अधिकारी, आमदार, सरपंच, प्राध्यापक, इतकं च नव्हे तर  ते अभिनेता, मॉडेल, आर्टिस्ट आहेत.. अशा अनेकांनी अपमानाचं जिणं मागे सोडलं आहे..

समाज सर्वसमावेशक होत आहे किंवा झालाय हे कसे समजावे? तर वर्षांनुवर्षे समाजाच्या ज्या घटकांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले गेले, ज्यांच्या पदरी अवहेलनेचे जिणे आले, सतत विकृत म्हणून संभावना केली गेली, अशा घटकाला जेव्हा मुख्य समाजरचनेत जागा मिळून, त्यांचा एक स्वतंत्र माणूस, नागरिक म्हणून विचार होतो, तेव्हा  समाज संवेदनशील, प्रगल्भ झालाय असे ठरवायला हरकत नाही. अनेक जण ते आयुष्य अक्षरश: पिढय़ान्पिढय़ा जगले. तिरस्काराची तप्तमुद्रा त्यांनी कायमची कपाळी बाळगली. यातलाच एक समाज समाजात हळूहळू स्वीकारला जाताना दिसतो आहे..

ते आहेत तृतीयपंथी/‘ट्रान्सजेंडर’. योग्य कायदेशीर, घटनात्मक तरतुदी, त्यांच्या हक्कासाठी जागरूक असणाऱ्या, लढणाऱ्या संस्था आणि या व्यक्तींना मोकळेपणाने स्वीकारणारा समाज, थोडक्यात, एकूणच येत असणारे भान, या सर्व गोष्टींमुळे तृतीयपंथी/ ट्रान्सजेंडर व्यक्तींचे आयुष्य किमान सामान्य होत असल्याचे नजरेत येत आहे. आधी म्हटले तसे मुख्य प्रवाहात ही माणसे आलीत आणि त्यातली काही रुळून चक्क लोकप्रिय झाली आहेत. या प्रवासात त्यांनी आपली खरी ओळख कुठेही लपवली नाही. मी असा/अशी आहे, असे स्वच्छ सांगत ते जगतात; अगदी तुमच्या आमच्यासारखे. मित्रमैत्रिणी, नोकरी, व्यवसाय, सण-समारंभ, इतकेच काय पण ‘सोशल मीडिया’सुद्धा.. सगळीकडे त्यांचा आत्मविश्वासपूर्वक वावर असतो; पण महत्त्वाचे आहे ते त्यांना स्वीकारणारा समाज. त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यापुरतंच नव्हे तर त्यांना सन्मानाने घरी बोलावणारेही अनेक जण आहेत, त्यांना व्यवसाय देणारे, व्यवसायात सहभागी करून घेणारेही आहेत. इतकं च नव्हे तर समाजमाध्यमावरही  त्यांचे हजारोंनी फॉलोअर्स आहेत. हे बदलत्या समाज-मानसिकतेचं लक्षण आहे.

पूजा शर्मा हे एक उदाहरण. नखशिखांत देखणी, सुरेख साडी, गजरा, वेणी आणि सफाईदार मेकअप करून पूजा विरार ते बोरिवली ट्रेनमध्ये जेव्हा चढते तेव्हा ‘सेलेब्रिटी’ होते. अनेक जणी तिच्याबरोबर ‘सेल्फी’ काढतात. नवरात्रीमध्ये तिला घरी पूजेसाठी बोलावतात. लग्न, बारसे अशा वेळी तर तिला खास आमंत्रण असते. मंगलप्रसंगी तृतीयपंथीयांचे टोळके घरी येणे नवे नाही; पण त्यांचा स्पर्शसुद्धा घरातल्या बायकांना त्याज्य असायचा, परंतु आज पूजा अनेक तरुण मुलींची ‘फॅशन आयकॉन’ झाली आहे. पूजा मूळची पश्चिम बंगालची. आपण वेगळे आहोत याची जाणीव वयात आल्यावर  तिला प्रकर्षांने झाली. शरीराने पुरुष असला तरी बायकी कपडे, मेकअप, नाच, यात तिला रस होता जे तिच्या परंपरागत, रूढीवादी घरात कदापि पसंत नव्हते. डॉक्टर, अंगारे-धुपारे, वैदू, मारहाण, उपाशी ठेवणे, सगळे प्रकार ‘नॉर्मल’ करण्यासाठी झाले; पण पूजा बदलली नाही. टिंगलटवाळी, लैंगिक अत्याचार, बलात्कार, छेडछाड.. कोवळ्या वयात अशा नरकयातना भोगत जगत असताना एके दिवशी ती एका कार्यक्रमात गेली आणि तिथे उत्स्फूर्त नाचली. ही घटना तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. ती मुंबईत आली. किन्नर/ तृतीयपंथी समाजाची ‘त्रिवेणी समाज विकास केंद्र’ संस्था आहे. त्यांचा तिला भक्कम पाठिंबा, मदत मिळाली. आज तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना चांगली मागणी आहे. आजच्या घडीला पूजाचे ‘इन्स्टाग्राम’वर ३२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ‘टिकटॉक’वरही तिचे फॉलोअर्स होते. अपमानाचे जिणे तिने आता मागे टाकले आहे.

पूजाइतके दु:खभोग सुशांत दिवगीकरच्या वाटय़ाला आले नाहीत. समजूतदार प्रेमळ, सुधारकी विचारांचे पालक, मोठा भाऊ, नातेवाईक, इतकेच काय, पण शेजारपाजारचे लोक, सगळे जण सुशांतचे वेगळेपण सहज स्वीकारणारे होते. मुळात सुशांत उत्फुल्ल, हौशी, त्यात दिसायला देखणा. ज्याचा त्याने आपल्या करिअरसाठी उत्तम उपयोग करून मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्राची निवड केली. अनेक जाहिराती, टीव्ही शो, फॅशन शो या माध्यमांतून सुशांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. विविध पुरस्कार, पारितोषिकेही त्याला मिळाली आहेत. अर्थात त्याचा हा प्रवास सुखकर, सहज होता, असे बिलकुल नाही. जेव्हा जेव्हा तो टीव्हीवर, जाहिरातीत दिसायचा, तेव्हा कौतुक, प्रशंसा, शाबासकीबरोबर गलिच्छ, अर्वाच्य शेरेबाजीसुद्धा व्हायची. त्याच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जायचे. तथापि सुशांतच्या मते, जेव्हा तुमचा स्वत:वर विश्वास असतो, मुख्य म्हणजे स्वत:ची लाज वाटणे किंवा आपण वेगळे आहोत याचा गंड असणे हे जेव्हा तुम्ही दूर करता, तेव्हा तुम्हाला स्वत्व गवसते. कोणी टीका करतात, तेव्हा कोणी कौतुकही करतात. आपण काम करत राहाणे महत्त्वाचे!

नव्या सिंगनेही हेच मत मांडले. बिहार-कटिहारमधील सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात नव्या वाढली. सुरुवातीला तिच्या वेगळेपणाचे कौतुक झाले; पण नंतर मात्र वडील, शेजारी,  मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या वागण्यात फरक पडला. टोमणे, टीका, अवहेलना सगळे पदरात येऊ लागले. या खडतर काळात, तिची आई आणि काही स्नेही यांच्या पाठिंब्यावर नव्या तरली. आजूबाजूचे वातावरण अतिशय परंपरावादी, कर्मठ. त्यामुळे ही विकृत आहे, इथपासून हे पाप आहे, असे सर्व काही ऐकावे लागायचे. या सगळ्यात तिला तिच्या आईचा मात्र मूक पाठिंबा, आधार होता. नव्या गेली अकरा र्वष मुंबईत आहे. मॉडेल, अभिनेत्री, ‘मोटिव्हेशनल स्पीकर’, ब्रँड अँबॅसडर अशा अनेक भूमिकांमध्ये नव्या सहज वावरते, अनेक ‘वेबिनार्स’मध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करते. याचे श्रेय ती तिच्या स्नेही रीना राय यांना देते. त्या आणि तिची आई, या दोघी तिच्या यशाच्या शिल्पकार! ‘ट्रान्सजेंडर’ आयुष्य जगणे हे वाटते तितके सोपे नसते. कारण आजूबाजूचा समाज, कुटुंब, नियम, परंपरा यांनी ज्या चौकटी आखलेल्या असतात, त्यांच्या जरासे वेगळे वागले की  टीका होते. नव्याच्या मते हे अपरिहार्य आहे. यात पालक किंवा बाकी समाज यांनाही पूर्ण दोष देता येणार नाही. कारण ‘ट्रान्सजेंडर’ म्हणजे गलिच्छ विकृती असे मानणाऱ्या विचारधारेचा एक मोठा, अदृश्य दबाव असतो, जो कुटुंबीयांसाठीसुद्धा जीवघेणा ठरतो. अशा वेळी त्यांनाच त्यांचा मार्ग शोधावा लागतो. इथे महत्त्वाचे म्हणजे आपण वेगळे आहोत हे चूक किंवा विकृती नाही, हे स्वीकारायचे. आपल्यासारखे बरेच जण आहेत हे समजणे महत्त्वाचे असते. विनाकारण बाळगलेला अपराधगंड झटकायचा. तिच्या ‘मोटिव्हेशनल टॉक’मध्ये हे मुद्दे नव्या आवर्जून मांडते.

सुशांत, पूजा आणि नव्या, तिघांनाही बघताना त्यांचे सौंदर्य आणि त्याला चार चाँद लावणारा मेकअप प्रकर्षांने जाणवतो. असाच सुंदर मेकअप केरळचा अविनाश चिटिया नववधूला सफाईदारपणे करतो. आई, वडील, बहिणी, भाऊ यांच्या सर्वसाधारण कुटुंबात अविनाश वाढला. कॉम्प्युटरचे शिक्षण घेतलेल्या अविनाशचे मन सुरुवातीपासून रमायचे ते कलात्मक, कल्पक गोष्टींत. आपल्या बहिणींचा मेकअप, वेशभूषा तो हौसेने करायचा. मूळच्या गुवाहाटीच्या असलेल्या अविनाशने मेकअपचा प्राथमिक अभ्यासक्रम करून मग फिल्म आणि मॉडेल मेकअपचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. ‘‘तुला हे करायला आवडते ना, मग त्याचे योग्य प्रशिक्षण घे,’’ असे सांगून पाठिंबा देणारे पालक अविनाशला मिळाले. दिल्ली विद्यापीठातून पुढील अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याने दिल्ली, आसाम, मुंबई येथे काम सुरू केले. अनेक प्रादेशिक तसेच हिंदी चित्रपटांत त्याने मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. त्याला असंख्य पारितोषिके मिळाली आहेत. गेली पाच र्वष अविनाश नववधूंचा मेकअप आणि के शभूषा करतोय. साध्यासुध्या मुलीचे देखण्या, सालंकृत वधूत रूपांतर अविनाशच्या कसबी हाताने घडते आहे. त्याच्या कामावर इन्स्टाग्राम, फेसबुकवर भरभरून स्तुती करणाऱ्या कमेंट्स पडतात, अनोळखी लोकही कौतुक करतात. शिवाय त्याची भावंडे, भाचे, भाच्या, पुतणे, पुतण्या, इतकेच काय, पण त्यांचे मित्रमैत्रिणीही कौतुक करतात. अविनाश अतिशय बिझी आहे. प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा आणि समाधान सर्व त्याच्याकडे आहे. अविनाशच्या मते तुम्ही कोणीही असा, एलजीबीटीक्यू किं वा कोणीही, ‘ते’ सत्य स्वीकारा. आपले वेगळेपण म्हणजे चूक किंवा विकृती किंवा रोग नाही हे मान्य करा. ‘मी काय आहे?’ यापेक्षा मला काय करायचे आहे? काय मिळवायचे आहे? याचा विचार करा आणि त्यासाठी प्रयत्न करा. या प्रवासात त्रास होईल; विरोध, टीका, निंदा असेल, पण त्याचबरोबर सहवेदन वा सहानुभूतीही प्राप्त होईल. तुमच्यासारखे अनेक जण भेटतील, पाठिंबा, प्रेम मिळेल. ते घेऊन मार्ग शोधा, यश मिळेलच, असं तो आवर्जून सांगतो.

नव्या, अविनाश, सुशांत आणि पूजा यांच्याप्रमाणेच नीता भेटली. (विनंतीवरून तिचे नाव बदलले आहे.) तिची आणि पूजाची कहाणी खूप समान. अतिशय कर्मठ घरात वाढलेली नीता. शरीर पुरुषाचे, पण आत्मा स्त्रीचा, अशा कोंडीत  मोठी झाली. अवहेलना, तिरस्कार, मारहाण, छळ सगळे सहन करत. समाजाला, घरच्यांना जसे हवे तसे जगण्याचा प्रयत्न तिने सतत केला; पण हे जगणे तिला जमेना, घुसमट होऊ लागली आणि मग एके दिवशी बाहेर पडून ती स्वतंत्र झाली. आज नीता पारंपरिक घरगुती प्रकारचे तेल करून विकते, लोकांना जेवणाचे डबे देते, जेवण पुरवते. आता कुठे तिला थोडी ओळख मिळू लागली आहे. आम्हाला सन्मान नाही दिला तरी चालेल, परंतु डोळ्यांतली तिरस्कृत नजर काढा, असे ती सांगते, कारण नीताच्या एका बहिणीच्या सासरच्यांनी बहिणीचे आयुष्य नको केले आहे, दुसऱ्या बहिणीचे लग्न जमत नाही, तर भावाला लग्नासाठी प्रस्ताव येणेच बंद झाले आहे, वडिलांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. जी शिक्षा द्यायची ती मला द्या, माझ्या घरच्यांचा काय दोष, असं ती कळवळून विचारते.

२०११ च्या जनगणनेमध्ये या घटकाला प्रथम सामावून घेण्यात आले आणि २०१४ मध्ये तृतीयपंथी किंवा ‘थर्ड जेंडर’ हा अधिकृत दर्जा/ वर्ग मिळाला. २०११ च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार येथे तृतीयपंथीयांची संख्या जास्त प्रमाणात आढळून आलेली आहे. पूर्ण भारतात एकूण ४.९ लाख व्यक्ती या वर्गात आहेत. तृतीयपंथी, ‘ट्रान्सजेंडर’, ‘ड्रॅग क्वीन’ अशी अनेक नावे या वर्गाला आहेत. एक समान धागा म्हणजे ते जसे जन्माला आलेय, त्याच्याविरुद्ध त्यांच्या लिंगभावना असतात. मात्र काही त्यातही सुदैवी निघतात.

सुशांत दिवगीकर सुशिक्षित, उदारमतवादी पालकांच्या पोटी जन्माला आला. नव्याला तिच्या आईने भावनिक पाठिंबा दिला. अविनाशचे पालक समजूतदार आणि संवेदनशील होते, तर पूजाला आणि नीताला मात्र अतोनात त्रास सहन करावा लागला. याचे कारण आजही आपले अपत्य वेगळे आहे, हे वास्तव आई-वडीलच स्वीकारायला तयार नसतात. शहरात, सुशिक्षित समाजात ही गोष्ट! तर मग गावखेडय़ात तर अशा माणसांचे आयुष्य नरक होते. नीताने अनेक उदाहरणे दिली, तर पूजानेही सामाजिक तिरस्काराबद्दल सांगितले. पूजा आणि नीता अल्पशिक्षित, गरीब कुटुंब आणि ग्रामीण भागातून आल्या आहेत. त्यांना समाज काम, रोजगार देत नाही किंवा स्वीकारत नाही. अशा वेळी भीक मागणे किंवा वेश्या व्यवसाय इतकेच पर्याय त्यांच्यासमोर उरतात; पण हल्ली अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी या वर्गासाठी स्वाभिमानाचा रोजगार मिळू लागला आहे. अशीच एक क्लीन्स वर्गीस यांची कंपनी आहे जी नेहमीच्या जाहिराती, प्रसिद्धी (प्रमोशन) या कामाव्यतिरिक्त तृतीयपंथी

किं वा ‘ट्रान्सजेंडर’ व्यक्तींना पुढे आणणे व त्यांच्या कलागुणांना वाव देणे, असे हटके काम करते. सध्या पूजाचा जो कायापालट झाला आहे ती क्लीन्सची किमया. ही किमया सर्व स्तरांवर हळूहळू का होईना होऊ लागली आहे. बदल, सुधारणा होऊ घातल्या आहेत. तृतीयपंथीयांमधील एक प्राध्यापक आहे, एक न्यायाधीश झालीय, एक पोलीस अधिकारी आहे, एक महाविद्यालयाची प्रिन्सिपलही आहे, एक ‘रेडिओ जॉकी’ आहे, एक लोकसभेची निवडणूक लढलीय, एक डॉक्टर आहे.. अशा अनेक जणी मोठमोठय़ा पदांवर आहेत.

कायदा जरी अधिकार देत असला तरीही त्याचा वापर हा बहुसंख्य तृतीयपंथी लोकांकडून होत नाही. नोकरी, रोजगार मिळवतानाच काय, पण कुठलेही फॉर्म भरणे, जागा/ घर घेणे, रेशन कार्ड काढणे, पारपत्र मिळवण्यासाठी कागदपत्र जमा करणे, अशा साध्या गोष्टींत या घटकाला अपरिमित त्रास होतो, अडचणी येतात. ही व्यक्ती जर शिक्षित, शहरी असेल तर थोडे सुसह्य़ असते; पण गरीब, ग्रामीण भागातील व्यक्तीचे जगणे असह्य़ होत जाते. आपण या समाजाचे घटक, या देशाचे नागरिक आहोत आणि या घटनेने आपल्याला जगण्याचे, रोजगाराचे स्वातंत्र्य, अधिकार दिले आहेत, ही जाणीव या व्यक्तींना हळूहळू होऊ लागली आहे. वर जी उदाहरणे दिली आहेत, ती वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक वर्गातील आहेत. एकूणच या व्यक्तींना जे आत्मभान येऊन त्यांचा जो वावर, वागणे सुरू झाले आहे, ते निश्चितच उल्लेखनीय आहे. इथे बाकीचा समाज त्यांना वेगळे मानत नाही, की ही माणसे त्यांची ओळख लपवत, दिवाभीतासारखे जगत नाहीत. आता ही माणसे बाहेर येऊन मोकळा श्वास घेऊ पाहाताहेत. किरकोळ शारीरिक, मानसिक फरक वगळता, आपल्यासारखीच हाडामांसाची माणसे. आपल्याप्रमाणेच हसणारी, रडणारी. त्यांना वेगळे न वागवता आपल्यामधील एक म्हणणे हे महत्त्वाचे. भले तुम्हाला वैयक्तिकरीत्या पटो वा न पटो, तरी एक नागरिक म्हणून अशांचा घटनात्मक अधिकार मान्य करणे अपेक्षित आहे. ते अनेक ठिकाणी घडत नाही.

या लेखात उल्लेख आलेल्या व्यक्ती खऱ्या आहेत, पण त्याचबरोबर अनेक जण आजही गुप्त आहेत, हेसुद्धा सत्य. मात्र त्यामुळे या वर्गाची खरी लोकसंख्या जनगणनेत कायदेशीररीत्या दाखल होऊ शकत नाही. भारतीय जनमानसावरील हा रूढी-परंपरांचा पगडा या वर्गाच्या प्रगतीमधील मुख्य अडसर ठरतो. लोकशाहीत जे बहुमत महत्त्वाचे ठरते, ते यांना प्राप्त होत नाही. साहजिक मग राजकारणी वर्गाकडूनही दखल घेतली जात नाही. ग्रामीण, गरीब भागातून आलेले अनेक तृतीयपंथी लोक आजही परंपरागत व्यवसाय निवडतात हे खरे आहे; पण त्याच वेळी सुशांत, पूजा, नव्या, अविनाश आणि नीता यांच्यासारखे अनेक जण नवा मार्ग चोखाळून वेगळे उदाहरण समोर ठेवतात. आपले वेगळेपण मान्य करून समाजात स्वाभिमानाने जगतात..

समाज बदलतो आहे हे याचे लक्षण असले तरी अजून मोठा रस्ता पार करायचा आहे.. सध्या तरी माथी आलेले अपमानाचे जिणे मागे सारण्यात काहीजण यशस्वी ठरले आहेत.. असे या घटकातील सगळ्यांच्या आयुष्यात घडेल तो सुदिन!

‘ट्रान्सजेंडर’ अथवा तृतीयपंथी ही एक सर्वसमावेशक संज्ञा आहे. यात अनेक उपगट, वर्ग येतात. जसे शरीर पुरुषाचे; पण मन, भावना स्त्रीच्या असतात, तसेच शरीर स्त्रीचे, पण मन पुरुषाचे असेही असते. साधारणपणे १९८४ च्या सुमारास ‘ट्रान्सजेंडर’ ही संकल्पना अधिकृत झाली. भारतात एप्रिल २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय घटना/ संविधानानुसार तृतीयपंथी या संकल्पनेला कायदेशीर मान्यता दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:46 am

Web Title: transgender life dd70
Next Stories
1 अस्वस्थ वेदनेची शांत अखेर
2 यत्र तत्र सर्वत्र : फॅशन जगत
3 जीवन विज्ञान : चोथायुक्त आहार
Just Now!
X