सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच भारतातील तृतीयपंथीयांचे अधिकार मान्य केले. ‘ट्रान्सजेण्डर’ वा तृतीयपंथी या संज्ञेत हिजडा, किन्नर मानल्या गेलेल्या व्यक्तींपलीकडेही अनेक जण येतात. जे फक्त जन्मत: शारीरिक गुंतागुंतीमुळे ‘वेगळे’ ठरले आहेत. या निर्णयामुळे सर्व तृतीयपंथीयांना, आपण कोण असावे? पुरुष, स्त्री की तृतीयपंथी? हे स्वत: ठरविण्याचा कायदेशीर अधिकार, हक्क प्राप्त होणार आहे. समाजात त्यांची होणारी शारीरिक, मानसिक अवहेलना कमी होऊन शिक्षण, रुग्णालये, नोकरीच्या ठिकाणी त्यांनाही सामान्य नागरिकांप्रमाणे स्थान मिळण्यास याची मदत होऊ शकेल. इतकेच नव्हे, एक नागरिक म्हणून राष्ट्रीय प्रवाहात त्यांना स्थान मिळू शकेल..

मंगळवार, १५ एप्रिल २०१४ हा दिवस भारतातील मानवी हक्काच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा, संस्मरणीय दिवस ठरणार आहे. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने भारतातील तृतीयपंथीयांचे हक्क, अधिकार मान्य केले. प्रस्तुत लेखात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर चर्चा, ऊहापोह, त्यातील सूचितार्थ आणि त्याचे भविष्यातील संभाव्य परिणाम यावर विचार करणार आहेच, तथापि तृतीयपंथी अर्थात ‘ट्रान्सजेण्डर व्यक्ती’ (ट्रान्सजेण्डर हा शब्द जगभर मान्यता पावलेला आहे) म्हणजे कोण? आणि यासारख्या न्यायालयीन निर्णयाची गरज का होती, ते सर्वप्रथम थोडक्यात जाणून घेणे इष्ट ठरेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वृत्तपत्रीय आणि दृक्श्राव्य माध्यमांतील ‘कव्हरेज’ तसेच ‘ट्रान्सजेण्डर’ शब्दाचा परंपरागत एकच एक रूढ अर्थ विचारात घेता, ‘ट्रान्सजेण्डर’ हा हिजडा, किन्नर किंवा ‘अर्धनारी’ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, असा सर्वसाधारण समज आहे असे वाटावे. परंतु  खरे तर ‘ट्रान्सजेण्डर’ हा खूप व्यापक शब्द आहे. जन्माच्या वेळी व्यक्तीला जे लिंगनाम देण्यात आलेले असेल (उदाहरणार्थ- मुलगा, मुलगी) त्याच्याशी त्याची प्रत्यक्ष लिंग प्रकृती समरूप नसेल, अशा सर्व व्यक्तींना ‘ट्रान्सजेण्डर’ अभिनाम लागू आहे.
जन्मानंतर प्रत्येकाला साधारणपणे विशिष्ट लिंगनाम प्रदान केले जाते. उदाहरणार्थ- स्त्री, पुरुष.. हे लिंगनाम ज्याच्या त्याच्या शारीरिक रचनेप्रमाणेच मुख्यत्वे निश्चित केले जाते आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत ते योग्य असते. उदाहरणार्थ- ज्याला ‘पुरुष’ हे लिंगनाम दिले जाते, तो मुलगा म्हणून वाढतो. पुढे वय वाढले की पुरुष होतो. तसेच स्त्रियांच्या बाबतीतही आहे. ‘स्त्री’ हे लिंगनाम देण्यात आलेली व्यक्ती मुलगी म्हणून वाढते, विशिष्ट वयानंतर ती ‘स्त्री’ ठरते. आता अशा काही व्यक्ती पाहा की जन्मानंतर त्यांना ‘पुरुष’ अथवा ‘स्त्री’ यापैकी कोणतेही लिंगनाम दिले जाऊ शकत नाही (कारण त्या व्यक्तीची शरीररचना काहीशी ‘वेगळी’ आहे.) अशा ‘वेगळय़ा’ प्रकृतीच्या व्यक्तीची मानसिक द्विधावस्था, उभयापत्ती (काहीही केले तरी दोष, संकट ओढवणारच अशी स्थिती) फार वाईट असते. आपण कल्पना तरी करू शकतो का? समजा, अशा ‘वेगळय़ा’ शरीररचनेच्या व्यक्तीला स्त्रीप्रमाणे राहणे, बोलणे, वस्त्रे परिधान करणे. तशी त्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे अथवा तसे करण्याची सक्ती त्या व्यक्तीवर करणे कसे ठरेल? हीच गोष्ट दुसऱ्या एखाद्या ‘अशा’ व्यक्तीला पुरुषासारखे वागणे, बोलणे, कपडे घालण्याची सक्ती करणे हेसुद्धा अयोग्यच. जेव्हा जेव्हा या व्यक्ती आरशात स्वत:ची प्रतिमा न्याहाळतील, तेव्हा तेव्हा त्यांना ती प्रतिमा आपल्या व्यक्तिमत्त्वाशी समरूप नाही तर विजोड आहे हेच जाणवत राहाणार! ही मानसिक घालमेल असह्य़ असते.
आपण कोण आहोत.. स्त्री.. पुरुष. त्यानुसार आपण वाढताना, मोठे होताना आपली राहणी, वागणूक, वस्त्रे लेणे ठरवीत असतो, निश्चित करीत असतो. आपल्या लिंगनामाशी (स्त्री, पुरुष) समरूप अशी आपली राहणी असते. लहानपणीच साधारणपणे ती निश्चित होते. तथापि हा काही मापदंड किंवा व्यावहारिक मार्ग नव्हे! एखादी व्यक्ती चाकोरीबाहेर वर्तणूक करते आहे असे दिसल्यावर ती व्यक्ती इतरजनांच्या दृष्टीने ‘विधिबहिष्कृत’ ठरते. प्रत्येक व्यक्तीबाबत समाजाच्या अपेक्षा या निश्चित स्वरूपाच्या असतात. व्यक्तीने ती सीमा ओलांडू नये अशी समाजाची अपेक्षा असते. ही सीमा ओलांडणारी व्यक्ती समाजात अप्रिय ठरते. थोडक्यात, पुरुषाने पुरुषासारखे, स्त्रीने स्त्रीसारखेच वागवे असे समाजाचे म्हणणे असते. समाजाच्या अपेक्षांची सीमा उल्लंघणारी व्यक्ती केवळ अप्रियच ठरत नाही, तर त्या व्यक्तीला त्याबद्दल शासन (शिक्षा) सुद्धा केली जाते. बऱ्याच वेळा ही शिक्षा जिवावर बेतणारी ठरते. अशा व्यक्तींना बहिष्कृत केले जाते, त्यांच्यावर दादागिरी केली जाते, दडपशाही केली जाते, त्यांना अपमानित केले जाते, त्रास दिला जातो, घराबाहेर हाकलून दिले जाते, किंवा घरातून पळून जाण्यास भाग पाडले जाते. शाळा-महाविद्यालयांतून हाकलून दिले जाते किंवा शिक्षण मधूनच सोडण्यास भाग पाडले जाते. काही प्रकरणांत विवाहाची सक्ती केली जाते, आजारपणाच्या वेळी रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही आणि जरी दाखल करून घेतले गेले, तरी त्यांच्या गरजांचा विचार केला जात नाही. त्यांना रोजगार, नोकऱ्या दिल्या जात नाहीत. प्रत्येक ठिकाणी सापत्नभावाची वागणूक दिली जाते. खडय़ाप्रमाणे वगळले जाते. त्यांच्या अपेक्षेची, अपमानाची यादी न संपणारी आहे.
     अशा ‘वेगळय़ा’ व्यक्तीपैंकी काही जण मग ‘हिजडय़ा’च्या (किन्नर, अर्धनारी) समूहात सामील होतात. कारण आपल्याला सामावून घेणारा हा एकमेव समूह आहे अशी त्यांची धारणा झालेली असते, आणि समाजाने त्यांच्यासाठी तेवढा एकच पर्याय शिल्लक ठेवलेला असतो. या समूहाने एक सांस्कृतिक स्थान, जागा प्राप्त केलेली आहे. परंतु तेवढय़ाने काही त्यांचा संघर्ष कमी होतो असे नव्हे; उलट माझ्या मते, त्यांचा आणि त्यांच्या समूहात सामील होणाऱ्यांचा जीवनसंघर्ष वाढतच जातो. याशिवाय आणखी बऱ्याच प्रकारच्या ‘ट्रान्सजेण्डर’ व्यक्ती आहेत. काही जन्माच्या वेळी ‘स्त्री’ लिंगनाम दिल्या गेलेल्या, तर काही ‘पुरुष’ लिंगनाम दिल्या गेलेल्या. त्यांचा संघर्ष, त्यांचे जिणे समाजाला दिसून येत नाही, कळून येत नाही. त्यांचे वेगळे अस्तित्व आपल्याला, समाजाला जाणवत नाही. वास्तविक ते सर्वत्र असतात. ‘लिंग’या शब्दाची फार पूर्वी करण्यात आलेली संकुचित व्याख्या सोडून, आता त्याच्याकडे जीवनपट म्हणून व्यापक दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे. ‘ट्रान्सजेण्डर’पैकी काही जण स्वत:ला स्त्री तर काही जण स्वत:ला पुरुष समजतात (जन्माच्या वेळी त्यांना जे लिंगनाम प्रदान करण्यात आले असेल त्याच्या उलट ते स्वत:ला समजतात) काही जण स्वत:ला अर्धनारी किंवा अर्धपुरुष समजतात, तर काहींची शारीरिक रचना अशी असते की पुरुष की स्त्री यापैकी काय ते स्पष्ट होत नाही. काही जण तर स्वत:ला लिंगरहित मानतात. काही जण वैद्यकीय प्रक्रिया करून घेऊन आपण पुरुष की स्त्री हे निश्चित करण्याचा प्रयत्न करतात. शरीराची वाढ करणारे संप्रेरक (हार्मोन्स) बदल प्रक्रिया, निरनिराळय़ा सर्जरी करून घेऊन आपल्या लिंगनामाशी अनुरूप असे रूप धारण करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ‘एस.आर.एस.’ (सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी) अधिक उपयोगी ठरते. तथापि अशी सर्जरी करून घेणे सर्वानाच श्रेयस्कर वाटते असे मात्र नाही. कारण शेवटी या गोष्टी आपल्या शरीर प्रकृतीला कितपत झेपतील याचाही विचार करावा लागतो. शिवाय अशा उपाय योजनांची माहिती प्रत्येकाला असतेच असेही नाही. सर्वाची प्रकृती सारखीच असते असेही नव्हे, अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. प्रत्येकाचे जीवन भिन्न असते. त्यांच्यातील एकमेव सामायिक सूत्र म्हणजे जन्माच्या वेळी प्रत्येकाला प्रदान करण्यात आलेल्या लिंगनामाशी त्यांची आजची स्थिती समरूप नाही, आणि ही एकच गोष्ट त्यांना ‘ट्रान्सजेण्डर’ या छत्राखाली एकत्र आणते. त्यांच्या जीवनासंबंधीची अन्य कोणतीही गृहीतके ही निव्वळ गृहीतकेच आहेत.
आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय उल्लेखनीय ठरतो. ऐतिहासिक ठरतो. या प्रकरणी मूळ अर्ज जो होता, तो केवळ ‘ट्रान्सजेण्डर’ (तृतीयपंथी व्यक्ती) अस्तित्वाला कायदेशीर मान्यता देण्याची विनंती करणारा होता. सांस्कृतिक तृतीयपंथीय (हिजडा, अरावणी, कोडी, शिव-शक्ती इत्यादी) समूहापासून वेगळे मानून कायदेशीर मान्यता द्यावी, अशा व्यक्तींच्या कल्याणासाठी पावले उचलले जावीत (उदा. समाजाकडून होणारी अवहेलना, हेटळणी, मानसिक छळ या गोष्टी थांबाव्यात) अशा मागण्या त्यासोबत होत्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ती विनंती तर मान्य केलीच, शिवाय ‘ट्रान्सजेण्डर’ या संज्ञेची व्याप्ती वाढवून हिजडा, किन्नर, अर्धनारी, अरावाणी, कोडी, शिव-शक्ती यांच्या व्यतिरिक्त ज्या इतर व्यक्ती तृतीयपंथी (ट्रान्सजेण्डर) आहेत, त्यांचाही त्यात समावेश केला. लिंग अस्तित्वाची व्याख्या करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ‘लिंग अस्तित्व’ (जेण्डर आयडेंटिटी) ही व्यक्तीची आंतरिक प्रेरणा, आतंरिक भावना आहे, आपण कोण असावे? पुरुष, स्त्री वा तृतीयपंथी (ट्रान्स) हे ज्याचे त्याला ठरवू द्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व तृतीयपंथीयांना, आपण कोण असावे? पुरुष, स्त्री की तृतीयपंथी हे स्वत: ठरविण्याचा कायदेशीर अधिकार, हक्क प्राप्त होणार आहे. जन्माच्या वेळी त्यांना प्रदान करण्यात आलेले लिंगनाम कोणत्या एखाद्या समूहाशी, समाजाशी  त्यांची असलेली संलग्नता, तसेच त्यांनी ‘एस.आर.एस.’ (सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी) करून घेतलेली असली, तरी यापैकी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता  त्यांना हा कायदेशीर अधिकार हक्क प्राप्त होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
अशा ‘वेगळय़ा’ (ट्रान्स) व्यक्तींची समाजाकडून सर्वसाधारणपणे अवहेलना होते, त्यांना त्रास दिला जातो. याचाच अर्थ समाज एकप्रकारे अशा ‘वेगळय़ा’ व्यक्तींना प्रगतीपासून रोखतो. त्यांच्या ठायी असलेली क्षमता, सुप्त गुण विकसित होण्यास प्रतिबंध करतो. राष्ट्राच्या विकासात अशा व्यक्ती योगदान देऊ शकत असतानाही समाज त्यांना अडवितो, थोपवितो, ही बाब एकूणच राष्ट्राच्या प्रगती, विकासाच्या दृष्टीने मारक, घातक असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा ‘ट्रान्स’ व्यक्तींना मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने सकारात्मक पावले उचलावीत असेही सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे.
माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने घटनेतील कलम १४ (कायद्यापुढे सर्व समान), कलम १५ (धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या सारख्या गोष्टींच्या आधारे एखाद्याची होणारी अवहेलना, भेदभाव), कलम १६ (सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार, नोकऱ्यांमध्ये समान संधी), कलम १९ (विचार आणि भाषण स्वातंत्र्य), कलम २१ (जीव आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण) या कलमांचा ज्या पद्धतीने यथायोग्य अर्थ लावला आहे, त्या कलमांमधील तरतुदींची ज्या पद्धतीने अर्थ निष्पत्ती केली आहे, ती कमालीची न्यायदृष्टीची आहे. कलम १५ आणि १६ यांची व्याप्ती वाढवून, तसेच कलम १९ मध्ये ‘जेण्डर एक्सप्रेशन’ अंतर्भूत करून तृतीयपंथीयांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. (पान १ वरून) सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची बातमी केवळ ‘वेगळय़ा’ (ट्रान्सजेण्डर) व्यक्तींच्याच दृष्टीने नव्हे, तर सर्वच भारतीयांच्या दृष्टीने शुभवार्ता आहे. कारण एखादी व्यक्ती आजपर्यंत कशा प्रकारे आयुष्य जगत आली, त्यानुरूप त्याबरहुकूम त्यांच्या घटनादत्त अधिकारांचे, हक्काचे विवेचन करण्यात आले आहे.
अर्थात, इतर कायदेशीर, न्यायिक दस्तऐवजांमध्ये असतात अशा काही अस्पष्ट बाबी या निकालातही असल्याचे दिसते. काही ठिकाणी वापरण्यात आलेली विशिष्ट प्रकारची भाषा, अन्य काही ठिकाणी मुद्दे व्यवस्थितपणे स्पष्ट होत नाहीत. आणखी एक गोष्ट ती म्हणजे हा ‘वेगळय़ा’ व्यक्तींचा समूह (ट्रान्स कम्युनिटी) एकजातीय, एकजिनस नाही हे आधीच सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे या निकालावरील त्या व्यक्तींच्या प्रतिक्रियासुद्धा वेगवेगळय़ा आहेत, असतील. काही जणांना या निकालाने खरोखरच आनंद झाला आहे, काही जण काहीसे धास्तावलेले आहेत, काळजीग्रस्त आहेत, तर आता या निकालाची अंमलबजावणी कशा प्रकारे होईल? (योग्य पद्धतीने होईल की नाही?) अशी शंका त्यांना येऊ लागली आहे. तसेच यामुळे खरोखरच आपल्या जीवनात काही बदल-फरक पडेल का? हा बदल-फरक चांगला असेल की वाईट? आपले जीवन सुखी करणारा असेल की चिंता, काळजी, समस्या वाढविणारा (अधिक वाईट) असेल? अशा शंकांनी त्यांना ग्रासले आहे. वानगीदाखल एक गोष्ट सांगतो. अलीकडेच मी एका ‘ट्रान्स’ महिलेची मुलाखत पाहिली. ती सांस्कृतिक तृतीयपंथी समूहाची सदस्या आहे. या निकालामुळे आपल्याला आपला ओळखपुरावा (आयडी) बदलण्यास भाग पाडले जाईल का? बदलण्याची सक्ती केली जाईल का? असा प्रश्न तिला पडला आहे. आज ती ‘स्त्री’ म्हणून ओळखली जाते. ‘आयडी’ बदलण्याच्या सक्तीने ती ‘ट्रान्सजेण्डर’ किंवा ‘थर्ड जेण्डर’ म्हणून संबोधली जाईल काय? असे तिला वाटते, आणि समजा तसा बदल झालाच, तर ज्या कल्याणकारी योजनांच्या लाभांसाठी ती आज पात्र आहे, ते ती गमावून बसेल काय? हा प्रश्नही तिला सतावतो आहे. तर स्त्रीचे पुरुषात रूपांतरित झालेल्या अनेक ‘ट्रान्स’ व्यक्तींना, तसेच कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे की प्रसारमाध्यमे ‘ट्रान्सजेण्डर’ व्यक्तींना हिजडा किंवा किन्नर का समजतात? त्यांच्याशी तुलना का करतात? तृतीयपंथीयांचे इतर अनेक प्रकार असतात, त्याकडे दुर्लक्ष करून आमची तुलना हिजडा, किन्नर, अर्धनारी यांच्याशी का करतात? आजपर्यंत समाजसुद्धा हेच करीत आला आहे, अशी या लोकांची तक्रार आहे.
ही भीती अनाठायी आहे, खोटी आहे, दुर्लक्ष करण्यालायक आहे असे कोणी म्हणेल असे व्यक्तिश: मला तरी वाटत नाही. परंतु त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल एका समूहाचे हक्क, अधिकार मान्य करणारा आहे, तसेच या निकालाची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी करण्याची सूचना केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांना देत आहे ही वस्तुस्थिती कोणी दुर्लक्षित करू शकणार नाही. हा निकाल म्हणजे इच्छित स्थळी जाण्याच्या दृष्टीने प्रवासाचा नुसता प्रारंभ नव्हे, तर त्यापेक्षा जास्त आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. आता आपणा सर्वाना आपले सहकारी, केंद्र सरकार, विविध राज्य सरकार यांच्याबरोबर सहकार्याने काम करून आपल्याला हवे असलेले बदल प्रत्यक्षात घडवून आणण्याच्या दृष्टीने नेटाने काम करावे लागणार आहे. आपल्याला आपल्या अधिकारांची हक्कांची जाणीव आहे आणि कोणते बदल करणे आवश्यक आहे तेही आपल्याला माहिती आहे. अर्थात या मोठय़ा प्रदीर्घ प्रक्रियेत सहभागी होणे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. तथापि आपापल्या परीने काही छोटय़ा छोटय़ा गोष्टी वैयक्तिक पातळीवर करणे आपल्याला सहजशक्य आहे. एखादी व्यक्ती वेगळय़ा स्वरूपाची आहे म्हणून तिला शिक्षा करायची हा विचार सोडून देणारा नवसमाज आपल्याला निर्माण करायचा आहे, आणि त्यासाठी फार काही करावे लागणार नाही.
उदाहरणार्थ- समजा तुम्ही एका ‘ट्रान्स’ व्यक्तीचे पालक आहात. हे मूल म्हणजे तुमच्या पापाचे फळ आहे, शिक्षा आहे, असे अजिबात मनात आणू नका. उलट त्याला आयुष्य जगताना, जीवनात पुढे जाताना तुमच्या मदतीची गरज आहे हे प्रथम लक्षात घ्या. त्याला इतर मुलांसारखे वागण्याची, त्यांच्यासारखाच पेहराव करण्याची सक्ती करू  नका. इतर सर्वसामान्य मुले करतात ती कामे त्याला करण्यास सांगू नका. कारण त्याने त्याला मानसिक, शारीरिक यातना होऊ शकतात हे लक्षात घ्या. ते मूल कसे आहे याची जाणीव तुम्ही ठेवा आणि ‘आम्ही तुझ्यासाठीच आहोत’ असा धीर त्याला सतत देत राहा. असे तुमचे वागणे राहिले तर हेच बुजरे, अलिप्त राहणारे मूल एक दिवस चांगले खेळकर, सर्वामध्ये मिसळून राहणारे, झालेले तुम्हाला दिसेल. त्याच्यात आत्मविश्वास जागा झाल्याचेही तुम्हाला जाणवेल. आपले पालक आपल्यासाठी आहेत, या एका भावनेने त्याच्यात एवढा बदल झाल्याचे तुम्हाला दिसेल. तुमचा तुमच्या डोळय़ांवर विश्वास बसणार नाही. हा एवढा सकारात्मक बदल झाला तरी कसा? असा प्रश्न तुम्हाला पडेल आणि तो प्रश्न असला तरी सुखावणारा असेल.
 तुम्ही वैद्यकीय व्यावसायिक (डॉक्टर, वैद्य वगैरे) असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की माहिती असेल, की सर्वाची शरीर प्रकृती एकसारखी नसते. वेगवेगळय़ा प्रकारची असते. तुमच्याकडे रुग्ण येतात, काही रुग्णांसाठी विशेष आस्थापूर्वक उपचारांची गरज असते. त्यांच्या भावनाही जाणून घेणे आवश्यक ठरते. अनेक मानसिक आणि शारीरिक बाबी आपण जगत असलेल्या आयुष्याशी निगडित असतात. म्हणून अशा ‘वेगळय़ा रुग्णा’ची (ट्रान्स पेशंट) मानसिक अवस्था जाणून घेण्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे. त्यांच्यावरील उपचारप्रणाली निश्चित करण्याआधी हे करायला हवे.
तुम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत असाल तर वर्गातील अशा ‘वेगळय़ा’ मुलांवर कोणी दादागिरी, दडपशाही करणार नाही याकडे प्रामुख्याने लक्ष ठेवा अशा विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक वेळी सहभागी करण्याचा प्रयत्न करा, पण अशा विद्यार्थ्यांना इतर सर्वसाधारण विद्यार्थ्यांसारखे कपडे घालण्याची सक्ती  करू नका. (गणवेशाची सक्ती नको) ते विद्यार्थी त्यांच्या लिंग अस्तित्वाप्रमाणे (जेण्डर आयडेंटिटी) वागले आणि तुम्हाला ती गोष्ट खटकली, तरी त्यांना शिक्षा करू नका. अशा विशेष, ‘वेगळय़ा’ विद्यार्थ्यांच्या अस्मितेला आपल्याकडील शिक्षण संस्थांमध्ये स्थान नसल्यामुळे अशा अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण मधूनच सोडून द्यावे लागते. अशा पद्धतीने शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
सरतेशेवटी आणखी एक मुद्दा सांगतो, तुम्ही स्वत: जर अशा प्रकारचे ‘ट्रान्स’ व्यक्ती असाल, (विशेषत: तरुण ‘ट्रान्स’ असाल) तर तुम्ही एकटे नाहीत. तुमच्यात काही वैगुण्य आहे असे अजिबात समजू नका. आनंदी, परिपूर्ण जीवन जगण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. आज, या क्षणाला तुम्हाला परिस्थिती कठीण वाटत असेल, गोंधळाची वाटत असेल, तणावपूर्ण वाटत असेल, परंतु सदासर्वकाळ अशीच परिस्थिती राहात नाही. चांगला, सुखकारक बदल कालांतराने होऊ शकतो. आजची खुशखबर म्हणजे आपले जग बदलण्यास सुरुवात झालेली आहे. चांगल्या, विचारी माणसांच्या अथक परिश्रमांचे हे फलित आहे. नजीकच्या भविष्यकाळात लिंग विभिन्नता, विविधता केवळ स्वीकारार्हच नव्हे, तर प्रशंसनीय असेल, स्वागतार्ह असेल, साजरी केली जाईल.. आशा बाळगून राहा. धीर सोडू नका. कठीण परिस्थितीतही दृढनिश्चयी आणि ठाम राहा..!    
 अनुवाद : अनिल पं. कुळकर्र्णी
(मृदुल हा ‘ट्रान्स’पुरुष असून छअइकअ LABIA-  a Queer Feminist LBT Collective  या संघटनेचा सदस्य आहे.)
(साऱ्या प्रतिक्रिया http://www.labiacollective.org. या वेबसाइटच्या ‘ब्रेकिंग द बायनरी’ या संशोधन अहवालातून साभार. त्यांची नावे बदलली आहेत.)

असं दुहेरी जगणं किती दिवस?
माझं शरीर स्त्रीचं आहे, पण मला मात्र मी पुरुष असल्याचंच जाणवतं. मी पुरुषीपणच अनुभवतो. मला माझ्या या शरीराचा त्रास होतोय. मी इतका घट्ट बनियन घालतो की शरीर झाकले जाईल. त्यावर शर्ट, त्यावर जॅकेट असा पेहेराव करतो. मी मुलीसारखा दिसणार नाही याची काळजी घेतो. पण या घट्ट कपडय़ांमुळे मला बाहेर काही खाताच येत नाही. खाल्लेलं छातीजवळ अडकून पडल्याची भावना होते. घरी आलो की मी पहिल्यांदा हा जुलमी पेहेराव काढून फेकून देतो. हे लपवणं माझ्यासाठी आहेच, पण इतरांना माझ्याबद्दल कळू नये म्हणूनही आहे. किती दिवस चालणार हे? – अमर    

झोपेच्या गोळ्या घेतल्या
अनेक र्वष माझा भाऊ माझ्यावर दादागिरी करायचा, माझ्या अंगावर धावून जायचा, अगदी वडिलांप्रमाणे तोही तुच्छतेनेच वागवायचा. हळूहळू मला त्याची दहशत वाटू लागली मी एकटी पडत गेले. पुढे कॉलेजात गेल्यावर मला इतर तरुणांऐवजी मुलींचं आकर्षण वाटू लागल्याची जाणीव झाली आणि मी अधिक एकलकोंडी झाले. इतकी निराश झाले की मी झोपेच्या गोळ्या खाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी मी ३६ तास झोपून होते, पण कुणाच्या हे लक्षातही आलं नाही किंवा कोणी दखलही घेतली नाही. कुटुंबाने दुर्लक्षित केलं तर आधीच गोंधळात सापडलेल्या माझ्यासारख्यांचा आयुष्य जगण्याचा रसच निघून जातो. – प्रिती

बाबांना मी कळले
मी बिनधास्त मुलांबरोबर खेळायचे, झाडावर चढायचे, क्रिकेट, बास्केटबॉल, टेनिस, बॅडमिंटन असे अनेक मैदानी खेळ मला आवडायचे. बाबांनी मला कसलंही बंधन घातलं नाही. माझ्यातलं पुरुषीपण कदाचित माझ्या वडिलांना कळलं असावं कारण शॉपिंगला गेलो की जीन्स, टी-शर्ट घ्यायला लावायचे. आईला हे आजिबात आवडत नसे, ती याला विरोध करी. बाबांनी मात्र मला नेहमीच मुलगा असल्यासारखंच वागविलं. आणि त्यांच्या पश्चात माझे भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून त्यांनी मला माझ्या पायावर उभं केलं. खरी परिस्थिती स्वीकारून किती पालक हे करू शकतात?  – पलक

पोलिसांतच तक्रार केली
माझ्यासारख्याच एका व्यक्तीशी माझे प्रेमाचे सूर जुळले. मला मुलींसारखं राहायला, वागायला आवडायचं. यावरून माझ्या पार्टनरच्या घरच्यांनी मला स्वीकारलं नाही. माझ्या घरच्यांची याला परवानगी होती असं नाही पण थेट विरोधही नव्हता. पण माझ्या पार्टनरच्या घरच्यांनी माझ्याविरोधात थेट पोलिसांत तक्रार केली आणि मग सगळंच बिनसलं, माझ्या घरीही. आम्हाला मनस्ताप झाला. सामान्यांचं जगणं आमच्या नशिबी कधी येणार? कधी कधी मी जाते माझ्या घरी पार्टनरसह, पण आनंदाने स्वागत होत नाही, हे जाणवतं. लहानपणचे दिवस सुंदर होते.- नीरव