11 August 2020

News Flash

‘अर्थ’ कारण

मध्यंतरी 'अर्थ' या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने कळला आणि डोळे उघडले. 'अर्थ' हा संस्कृत धातू आहे. त्याचा अर्थ 'इच्छा करणे.' परंतु व्यवहारात मात्र 'अर्थ' हा

| May 31, 2014 01:01 am

मध्यंतरी ‘अर्थ’ या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने कळला आणि डोळे उघडले. ‘अर्थ’ हा संस्कृत धातू आहे. त्याचा अर्थ ‘इच्छा करणे.’ परंतु व्यवहारात मात्र ‘अर्थ’ हा शब्द पसा, साधन-सुविधा इत्यादी अर्थानी वापरला जातो.
‘प्रार्थना’ म्हणजे प्रकर्षांने असलेला अर्थ. म्हणजेच प्रकर्षांने, तीव्रतेने, मनापासून इच्छा करणे. ‘परमार्थ’ याचा अर्थ परम अर्थ! परम म्हणजे जी गोष्ट अत्यंत श्रेष्ठ, निरतिशय असेल तीच! अर्थात अशी परम गोष्ट म्हणजे परमात्माच असू शकते. म्हणजे ‘परम’ तत्त्वाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा म्हणजे परमार्थ हे न समजता आपण पूजा, कर्मकांड, धार्मिकता, परोपकार या अर्थाकडे परमार्थाला वळवितो. आपण परमेश्वराला हात जोडतो ते फक्त स्वार्थासाठीच! परमात्म्याचे ज्ञान व तो प्राप्त होण्यासाठी केलेली साधना हे सारेच उच्च कोटीचे हवे. ‘अहं ब्रह्मास्मि’ स्थिती येण्यासाठी या जन्मात खूप काही करता आले नाही तरी आपण करीत असलेला व्यवसाय, गृहस्थधर्म या साऱ्यात पारमाíथक वृत्ती आणली तरी अंतकरणाची शुद्धता प्राप्त होईल.
पादधीरासन
पादधीरासनाचा या विचारावर मनन करीत आज पादधीरासनाचा सराव करू या. विधिवत वज्रासन घालून घ्या. छातीसमोर हातांची घडी घाला. हातांचे तळवे विरुद्ध बाजूच्या काखांमध्ये ठेवावेत. हातांचे अंगठे वरच्या दिशेने असावेत. डोळे बंद करून प्राणधारणा, म्हणजेच श्वासावर लक्ष एकाग्र करा. प्राणायामाच्या पूर्वतयारीसाठी हे आसन केल्यास दोन्ही नाकपुडय़ा उघडायला मदत होते. दोन श्वासांमधील अंतर, लयबद्धता, श्वास घेताना नाकपुडय़ांना जाणवणारा गारवा, श्वास सोडताना हवेचा नाकपुडय़ांना होणारा उबदार स्पर्श या साऱ्यांवर सजगतेने लक्ष द्या.

संगणकाशी मत्री : प्रवासासाठी ऑनलाइन बुकिंग
संकलन :गीतांजली राणे-  rane.geet@gmail.com
हल्ली रेल्वे किंवा बसने कुठेही जायचे असेल तर आरक्षण करण्यासाठी भलीमोठी रांग लावण्याची गरज नाही. आता आपण घरबसल्याही संगणकावरून रेल्वे, बस किंवा विमानाचे तिकीट आरक्षित करू शकतो. यासाठी सर्वप्रथम तुमचा स्वत:चा मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. तसेच संगणकावरून तिकीट काढताना तुमच्या बँकेचे ऑनलाइन खाते किंवा मास्टर कार्ड डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे, अन्यथा व्यवहार पूर्ण होऊ  शकत नाही.
 रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला www.irctc.co.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:चे खाते तयार करावे लागेल. हे खाते विनामूल्य तयार करता येते. खाते तयार केल्यानंतर देण्यात आलेला संकेतशब्द (पासवर्ड) आणि युजरनेम (आयडी) जपून ठेवावा. प्रत्येक वेळेस तिकीट काढताना हा देण्यात आलेला युजरनेम व पासवर्ड वापरून खाते सुरू करून तिकीट काढावे लागते. या खात्यावरून तुम्ही रोजच्या प्रवासाचा लोकलचा पासही घरबसल्या काढू शकता. संगणकावरून तिकीट काढताना तुमच्या बँकेचे ऑनलाइन खाते किंवा मास्टर कार्ड डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे, अन्यथा व्यवहार पूर्ण होऊ  शकत नाही.
  राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसचे तिकीट आरक्षित करण्याकरिता www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर खाते असणे आवश्यक आहे. या संकेतस्थळावरून आरक्षण करतानाही संकेतशब्द (पासवर्ड) आणि युजरनेम (आयडी) यांची आवश्यकता असते.
 (पुढील भागात आपण .irctc.co.in वरून आणि www.msrtc.gov.in च्या संकेतस्थळावरून खाते कसे तयार करावे याची माहिती घेणार आहोत.)

खा आनंदाने ! : ‘खाण्याची कला’
वैदेही अमोघ नवाथे  -vaidehiamogh@gmail.com  (आहारतज्ज्ञ )
होय, आजी-आजोबांनो, अन्न खाणे हीदेखील एक कला आहे. आपण काय, कुठे, कसे आणि कधी खातो याचे संतुलन असणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसभरातील उद्योग, झोप आणि खाणं जरी रोजच घडत असेल तरी या तिघांची सांगड घालता आली तर आपल्या उत्साही, आनंदी आणि नावीन्यपूर्ण आरोग्याचा, आयुष्याचा आविष्कार होऊ  शकतो. फलित जर इतकं सुंदर आहे तर ही कला शिकायला काय हरकत आहे? अवघड तर अजिबातच नाही. आपल्या आरोग्यामध्ये आपण अंतर्बाह्य़ चांगले बदल सहज घडवून आणू शकतो यात शंकाच नाही. diet शब्दाचा खरा अर्थ आहे आहार, म्हणजेच आपण जे खातो ते! त्यात वेगळं काही नाही. एक गुपित असं आहे की हे आपलं खाणं चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर आणि तेवढंच आरोग्यदायी असू शकतं. आरोग्य मिळवण्यासाठी बेचव/ रूक्ष अन्न खा, असं कोण सांगतं? एक आहारतज्ज्ञ आणि तुमची मैत्रीण या नात्याने माझी एवढीच इच्छा आहे की रोजच्या जीवनात तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण आनंदात घालवला पाहिजे. कसा? स्वत:ला मानसिक, शारीरिक आणि आत्मिक आरोग्य देऊन!
आरोग्य टीप:
थोडं खा, पण आरोग्यदायी खा.
उपमा / पोहे / खिचडी असेल  तर वरून थोडी कोथिंबीर / खवलेला नारळ / किसलेलं गाजर घालून बघा. थोडी भूक वाढेल.
आंबट, गोड, तिखट चव आपल्या तब्येतीनुसार कमी-जास्त करा. लिंबू चालत नाही तर कोकम वापरा, साखर नसेल खायची तर थोडा गूळ वापरा, मिरची सोसत नसेल तर थोडी काळी मिरी, आलं वापरा.
जेवणामध्ये वैविध्य पाळा.
कुस्करलेली पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर डाळ-ढोकळी खा, थालीपीठ चावता येत नाही तर भाजणीचा उपमा करा.
प्रत्येक आजी ही सुगरण असतेच. (शंकाच नाही) मग कंटाळा न करता आपल्याला जमेल तसं जेवण करा. कारण एक खात्री आहे की तुझ्या हाताची चवच न्यारी असते आणि आपण स्वत: केलेले पदार्थ एक आत्मिक समाधान देतात.  
लहान मुलांसाठी / स्त्रियांसाठी / गरोदरपणात जसे विविध व्यायामप्रकार आहेत तसेच तुमच्या वयासाठी असलेले योग्य व्यायाम प्रकार शिकून घ्या, जमेल तसं चालायचा सराव ठेवा, म्हणजे हाडांच्या कुरबुरी कमी राहतील.
झोपेची वेळ लवकर ठेवा. मग कधीतरी रात्री ८ वाजताच दमल्यासारखं वाटतं तर तेव्हा झोपायलासुद्धा हरकत नाही. भिंतीवरच्या घडय़ाळापेक्षा शरीराच्या घडय़ाळाचं गणित जमलं की पुरे.
राहून गेलेल्या आवडीनिवडी जपायला वयाचं बंधन नसतं. मन आणि शरीर साथ देईल तर कधीही आवडीनिवडी जोपासू शकता.
एका वयानंतर साथीदाराची सोबत सुटू शकते, एकटेपणा असतो, मुलं दूर असतात, आरोग्याच्या तक्रारी असतात, आर्थिक चणचणसुद्धा असू शकते. आता प्रत्येक प्रश्नांसाठी उत्तर शोधाल तर सापडेल. एकटे असाल तर ‘स्वत:’ बरोबर राहायला शिका / चालण्याचा त्रास असेल तर काठी आपलीशी करा – किमान घरात तरी शतपावली घाला / नवीन मित्र-मैत्रिणी करा. जरुरी नाही की ते तुमच्याच वयाचे असतील.   
चटपटीत रताळं –
उकडलेल्या रताळ्याचे काप बेस म्हणून वापरायचे आणि त्यावर आपल्या आवडीचे पदार्थ ठेवायचे नि मस्त मजेत खायचे. उदा. उकडलेले मूग, बारीक चिरलेला टोमॅटो-कांदा-कोथिंबीर, खजूर चटणी आणि हिरवी चटणी.
 अन्न विचार-  पोषक आहाराच्या माध्यमातून आरोग्य साधणे हा एक आनंददायी प्रवास आहे.

आनंदाची निवृत्ती : आरोग्यदायी जीवनशैलीची त्रिसूत्री
डॉ. शैला निंबकर -Shaila.nimbkar@gmail.com
सतत शिकत राहून आणि माझ्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून जेव्हा मी एखादी नवीन गोष्ट घडवते तेव्हा ती माझ्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट असते. तिन्ही मुलांची शिक्षणं आणि लग्नकरय पार पडल्यानंतर सांसारिक जबाबदारीतून मी ‘काहीशी’ निवृत्त झाले आणि नवीन काही तरी शिकायची इच्छा उफाळून वर आली. वयाच्या एकसष्टाव्या वर्षी एक नवा अभ्यासक्रम शिकून मी आमचे न्यूट्रिशन सेंटर सुरू केले त्याची ही कथा!   
आहाराबद्दल मार्गदर्शन करताना पॅथॉलॉजी चाचण्यांचे महत्त्व वादातीत आहे. त्यामुळे पॅथॉलॉजिस्ट म्हणून व्यवसाय करीत असताना पॅथॉलॉजीला पूरक ठरेल असा आहारशास्त्राचा अभ्यास करण्याचा विचार मनात घोळत होता. मी मुंबईतील अभ्यासक्रमाची माहिती इंटरनेटवरून काढली व अत्यंत आवडीने, मन लावून हा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे कॅलिफोर्निया विद्यापीठातील तीन ऑनलाइन अभ्यासक्रम मी उत्तम मार्कानी पूर्ण केले. त्यांपैकी ‘न्यूट्रिशन फॉर हेल्थ प्रमोशन अँड डिसीज प्रिव्हेन्शन’ या अभ्यासक्रमामुळे मला फारच उपयुक्त माहिती मिळाली.
माझ्या ज्ञानाचा मी आधी स्वत:वर प्रयोग केला. गेल्या बारा वर्षांत अनेक वेळा संकल्प करूनही तीन किलो वजन कमी करण्यापलीकडे माझी मजल गेली नव्हती, पण कोणताही टोकाचा आहार (Fad Diet) न करता, जिममध्ये न जाता, केवळ जीवनशैलीत सुधारणा करून मी माझे वजन सहा महिन्यांत ११ किलोंनी कमी केले. त्यामुळे रुग्णांना मार्गदर्शन करण्याचा माझा आत्मविश्वास वाढीस लागला.
माझ्या मुलीने अनेक वर्षे आहारतज्ज्ञ म्हणून प्रथितयश जिममध्ये काम केले आहे, तिच्या साहाय्याने मी आमचे न्यूट्रिशन सेंटर सुरू केले. तसेच इंटरनेटचा वापर आणि उपयोग शिकल्यामुळे स्वत:ची www.nimbkars.comही वेबसाइटही सुरू केली. आज जगभर ओबेसिटी अर्थात स्थूलता हा वेगाने पसरणारा आजार झाला आहे. आमच्या सेंटरला येणाऱ्या बहुसंख्य रुग्णांची ‘वजन वाढतच जाणे’ ही समस्या असते. त्यातही चाळीस-पन्नाशीच्या अति प्रमाणात वजन वाढलेल्या स्त्रियाच जास्त असतात. आजपर्यंत अनेक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघांमधून मी ‘आरोग्यासाठी जीवनशैलीतील सुधारणा’ या विषयावर जनजागृतीकरिता व्याख्यान दिले आहे. अजूनही मी ऑनलाइन अभ्यासक्रम शिकत राहून आणि त्याचा रुग्णांच्या मार्गदर्शनाकरिता उपयोग करून आनंद मिळवत आहे. वयाच्या या टप्प्यावर एक नवीन विषय शिकून त्याचा इतरांना फायदा कसा होईल हे मी पाहते आहे. आनंद आणि समाधान मिळवते आहे.
    
धडपडे आजी-आजोबा : शतायुषी वॉटर स्कीअर
डॉ. फ्रँक शिअरर हे अवघ्या १०१ वर्षांचे हौशी वॉटर स्कीअर आहेत. या वयातलं त्यांचं वॉटर स्कीइंगसारख्या थरारक खेळाविषयीचं वेड अनेकांना आश्चर्यात पाडणारं आहे. वॉटर स्कीइंग हा छंद असणाऱ्या फ्रँक आजोबांनी पाच दशकांहून अधिक काळ डॉक्टरकी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी घोडेस्वारी, मासेमारी, विमान चालवणं असे अनेक छंद विरंगुळा म्हणून जोपासले आहेत. १९३० साली ते पहिल्यांदा वॉटर स्कीइंग शिकले, त्यानंतर या थरारक खेळाची त्यांच्यावर जणू मोहिनीच चढली. नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनच्या २००५ सालच्या अंकात त्यांच्यावर विशेष लेखाचा समावेश होता. यासह अनेक मासिकांनी त्यांच्या या धाडसी छंदाचं कौतुक केलं आहे. आजोबांची धडाडी व तंदुरुस्ती पाहून एका प्रथितयश गुंतवणूक व विमा कंपनीने त्यांना आपल्या एका जाहिरातीसाठी घेतलं. ही जाहिरात वॉल स्ट्रीट जर्नल, मनी, फोब्र्जसारख्या अनेक अग्रणी वृत्तपत्रं व मासिकांमध्ये झळकली आणि आजोबा माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2014 1:01 am

Web Title: truly to wish
टॅग Chaturang,God
Next Stories
1 अंतरंग साधना
2 देहबुद्धी
3 वासना
Just Now!
X