एके दिवशी माझ्या कर्करोगाने दुसरी पायरी गाठल्याचं कळलं. आज फिनिक्स पक्ष्याप्रमाणे मी त्या आजारातून बाहेर पडून एक नवीन जीवन जगत आहे. अनेक स्पर्धा, एकपात्री अभिनय, कथाकथन, वक्तृत्व, वाचिक अभिनय स्पर्धातून भाग घेऊन मंडळाला बक्षिसे, ढाली मिळवून दिल्या. माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण सोनेरी झाला.. उद्याच्या ‘नॅशनल कॅन्सर-रोज डे’ च्या निमित्ताने खास अनुभव.
से वानिवृत्त झाल्यावर खूप प्रवास करायचा, जग फिरायचं, म्हणून आम्ही दोघे पती-पत्नी युथ हॉस्टेलचे सभासद झालो. त्यांच्या जगभर शाखा आहेत आणि सर्व ठिकाणी छान सोय असते. आम्ही युरोप टूर करायचे ठरवले, त्याच्या आधी डिसेंबरमध्ये आम्ही एका प्रवासी कंपनीबरोबर सौराष्ट्र गुजराथ टूरला गेलो होतो. जुनागडला डोंगर चढताना उजव्या स्तनातून पांढरा द्राव जोरात वाहायला लागला. हाताला बारीक गाठ लागली, पण कोणालाही, अगदी यांनाही सांगितले नाही कारण अजिबात दुखत नव्हतं. टूर पूर्ण केली. मुंबईला आल्यावर मैत्रिणीला घेऊन तडक ‘टाटा’ला गेले. सर्व तपासण्या केल्या आणि रिपोर्ट आले.. माझ्या कर्करोगाने दुसरी पायरी गाठली होती.
    तातडीने दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, नंतर चार किमोथेरेपीचे डोस, सहा आठवडे रेडिएशनचे उपचार हे सर्व सोपस्कार पार पाडून, त्यातून सुलाखून मी टाटा हॉस्पिटलला ‘टाटा’ करून बाहेर पडले. पद्मश्री डॉ. राजेंद्र बडवे यांनी दोन्ही शस्त्रक्रिया तर केल्याच, पण दिलासाही दिला. तो आत्तापर्यंत पुरलाय..
 गेली १३ वर्षे मी आनंदात जगत आहे याचं कारण प्रभाताई जोग. त्या मला आयुष्याच्या एका टर्निग पॉइंटवर भेटल्या. त्यांच्या आग्रहामुळे मी लोकमान्य सेवा संघाच्या स्त्री शाखेची, वाचनालयाची, सखी मंडळाची (आता ‘सोबती’ आणि ‘दिलासा’ची सभासद) झाले. इथे मला खूप काही शिकायला, पाहायला, ऐकायला मिळालं या वास्तूशी माझे काही पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावेत असे वाटते.
वयाची ५८-६० ही निवृत्तीची वर्षे. मीही जून २०००ला वयाची ५८ वर्षे पूर्ण करून कार्यालयीन कामातून सेवानिवृत्त झाले, पण असं म्हणतात की फिनिक्स पक्षी राखेतून परत जन्म घेतो आणि विहार करायला लागतो, तशी मी कर्करोगाच्या आजारातून बाहेर पडून एक नवीन जीवन जगत आहे. अनेक स्पर्धा, एकपात्री अभिनय, कथाकथन, वक्तृत्व, वाचिक अभिनय स्पर्धातून भाग घेऊन मंडळाला बक्षिसे, ढाली मिळवून दिल्या. माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण सोनेरी झाला..
माझे पती वसंत नाईक माझा मोठ्ठा आधार. त्यांनी मला कधीच कुठल्याही कार्यक्रमात भाग घ्यायला आडकाठी केली नाही. मला दोन्ही मुलीच आहेत, वर्षां आणि ऋतिका (दीपाली) पण जावई चिंतामणी पंडित आणि वर्षांने खूपच काळजी घेतली. धाकटी मेलबर्नला असते, त्या दोघांचाही खूप मॉरल सपोर्ट एवढय़ा लांबून मिळत होता. सर्व जण मला खूप जपतात म्हणून तर मी बिनधास्त सगळीकडे फिरत असते. मुलगा नसल्याची खंत मला कधीच वाटली नाही.
आयुष्यात मी कधी कथा लिहीन असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते, पण सुप्रसिद्ध लेखिका माधवी कुंटे आणि डॉ. चारुशीला ओक यांनी आमचा कथा क्लब सुरू
केला. खूप मोलाचे मार्गदर्शन केले. करत आहेत. माझ्या पाच कथा मासिकात प्रसिद्ध झाल्या. एकही कथा परत आली नाही. वाचकांचा प्रतिसादही छान मिळाला. चारुताई आणि माधवीताईंनी पुढाकार घेऊन आमच्या दहा जणींच्या लघुकथांचा संग्रह ‘जिची तिची कथा’ या नावाने
प्रसिद्ध केला. अनेक मान्यवरांनी कौतुक केलं.
प्रख्यात लेखक ह. मो. मराठे यांनी फोन करून कथा आवडल्याचं कळवलं. आमच्या खूप सख्यांच्या कथा प्रसिद्ध होत आहेत. चारुताई, माधवीताई तुम्हाला सॅल्युट.
अजून खूप लिहायचे आहे, वाचायचे आहे. प्रवास करायचा आहे. लक्षद्वीप, सेवन सिस्टर्स, चारधाम, दोनदा ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया. खूप फिरले. भीती हा शब्दच मी हद्दपार केला आहे. दुसऱ्याला कळू न देता आपलं दु:ख आपणच सहन करायला शिकलं पाहिजे. जीवावरचे दोन अपघात मी नंतर पचवले. हीपण एक कला आहे. मग ती व्यक्ती कधीच दु:खी राहात नाही आणि जगालाही हसत राहायला शिकवते. कर्करोग झालेल्या खूप सख्यांना समुपदेशन केलं, करत आहे. १३ वर्षांपूर्वी तू परत एक सुंदर आयुष्य जगशील असं सांगितलं असतं, तर मी विश्वास ठेवला नसता, पण माझे बाबा नेहमी म्हणायचे, ‘मन सुद्ध तुजं गोष्ट हाये पृथिवी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गडय़ा भीती कुणाची.’
आज वयाच्या ७२व्या वर्षी मी उलट म्हणजे २७च्या उत्साहाने आयुष्य जगत आहे. माझ्यासारख्यांना मी इतकंच सांगेन. कधीही खचून जाऊ नका. संतुलित आहार, व्यायाम केला की काय बिशाद आहे कुठच्या रोगाची, पळून
जातात सगळे. मागे वळून पाहायचंच नाही. पुढचं जीवन सुखी करायचं. खूप भलेबुरे अनुभव आले, पण वाईट तडीपार केले. हसत हसत त्यांना वाकुल्या दाखवत! हाय का नाय!