मी डिप्लोमा इंजिनीअर पण करिअरची दिशा बदलणारा पहिला टर्निग पॉइंट माझ्या आयुष्यात आला आणि कर्करोगाच्या दुसऱ्या जीवघेण्या टर्निग पॉइंटमधून सावरण्यासाठी तोच चैतन्यथेरपी ठरला.
मी लहानाची मोठी बेळगावात झाले. इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतला आणि लग्न झालं. नवऱ्याची पुण्याजवळ नोकरी असल्याने सासूबाईंनी तळेगावला आधीच घेऊन ठेवलेल्या ब्लॉकमध्ये आम्ही बिऱ्हाड थाटलं. संसाराला हातभार लावण्यासाठी चार पैसे मिळवणं गरजेचं असल्यामुळे मी वर्तमानपत्रात कंपन्यांच्या जाहिराती शोधू लागले. माझ्या आजेसासूबाईंचं घर आमच्या जवळच होतं. त्यांचा आम्हाला मोठा आधार होता. त्या म्हणाल्या, ‘अगं तू पुण्याला जाऊन-येऊन नोकरी करणार? मग तर तुझं चिपाडच होऊन जाईल. त्यापेक्षा इथल्याच एखाद्या शाळेत शिकवलंस तर? शाळेची नोकरी बेस्ट.’ मी चाचरत म्हटलं, ‘शाळेत? तसं माझं शिक्षणही नाही आणि अनुभवही शून्य. मग मला कोण देईल शाळेत नोकरी?’ त्या म्हणाल्या, ‘ते मी बघते.’
तळेगावच्या बालविकास विद्यालयात त्यांची ओळख होती. त्यांनी शब्द टाकला आणि ‘डिप्लोमा इंजिनीअर’ या पदवीवर मला नोकरी मिळाली. पण प्रत्यक्षात मुलांना शिकवायचा दिवस उजाडला तेव्हा मला काय-काय व्हायला लागलं. हातापायांना घाम फुटला.. जीभ कोरडी पडली. एकेका वर्गात साठ-पासष्ट मुलं होती. एखादी शिक्षिका पसंतीस उतरली नाही तर मुलं तिला कसं सळो की पळो करून सोडतात याचा विद्यार्थिदशेत घेतलेला अनुभव ताजा होता. वाटलं त्यापेक्षा पळून बेळगावलाच जावं. पण ते शक्य नव्हतं. मी पाय ओढत शाळेत पोहोचले.
‘बालविकास’ शाळेतला माझा पहिला दिवस माझ्या करिअरमधला टर्निग पॉइंट ठरला. मी जे काही शिकवलं ते मुलांना आवडलं. मलाही शाळा आवडली. मुलांपासून ते शाळेच्या शिपाईकाकांपर्यंत सर्वाशी माझी दोस्ती जमली. मुलांनी तर सलग तीन र्वष मला ‘मोस्ट फेव्हरिट टीचर’ हा किताब दिला. हे क्षेत्र मनापासून आवडल्याने मी बी.ए. करायचं ठरवलं. अर्थात शाळा सांभाळून. नंतर बी.एड. केलं आणि मग ‘इंग्रजी साहित्य’ विषय घेऊन एम.ए. पदवीही मिळवली. सर्व परीक्षांत फर्स्ट क्लास मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढला. या धावपळीत सात र्वष कुठे निघून गेली ते कळलंच नाही.
या टप्प्यावर यांनी आई एकटी आहे म्हणून आपली बदली ठाण्याजवळ ऐरोलीला करून घेतली आणि आम्ही ठाणेकर झालो. आता माझ्यापाशी पदवी होती. अनुभव होता. मी तीन शाळांत इंटरव्ह्य़ू दिला आणि गंमत म्हणजे सर्वानीच मला ‘या’ म्हटलं. मी घराजवळच्या ‘बिलाबाँग’ इंटरनॅशनल स्कूलला पसंती दिली. एअरकंडिशन शाळा. वर्गात फक्त २५ विद्यार्थी. शिकवण्याची स्मार्ट क्लास पद्धत.. इथलं सगळंच वेगळं.  मी ५ वी, ६वीच्या मुलांना इंग्रजी व भूगोल शिकवू लागले. मुलांबद्दल उपजत प्रेम असल्याने इथेही रुळायला मला वेळ लागला नाही. माझ्या नेमणूकपत्रात ३ वर्षांनी कायम करणार असं लिहिलं होतं (त्यातलं पहिलं वर्ष टेम्पररी आणि पुढची दोन प्रोबेशनवर). पहिलं वर्ष संपत आलं. एप्रिल महिना उजाडला. पेपर्स तपासणं आणि रिझल्ट तयार करणं याची धामधूम सुरू होती. नेमका त्याच वेळी माझा काही महिन्यांपूर्वी सुरू झालेला खोकला प्रचंड वाढला. रात्र रात्र झोप लागत नसे. त्यातच डावा खांदा व मान विलक्षण दुखू लागली. सहन होईना इतकी खाज अंगभर सुटू लागली. छोटे-मोठे इलाज सुरू होते. मी विचार केला, आता लौकरच ‘मे’ची सुट्टी लागेल तेव्हा कोणा तरी मोठय़ा डॉक्टरला दाखवू. पण एक दिवस माझं खोकणं ऐकवेना म्हणून सासूबाई मला तातडीने त्यांच्या विश्वासातील डॉक्टर संतोष ठाकूर यांच्याकडे घेऊन गेल्या आणि स्वप्नातही कल्पिलं नव्हतं असं एक क्रूर सत्य माझ्यासमोर येऊन उभं राहिलं. त्यांनी निदान केलं, ‘नॉन हॉचकिन    लिम्फोमा’ (एक प्रकारचा ब्लड-कॅन्सर).. आयुष्यातील कल्पनेपलीकडचा थांबा!
त्यानंतर सुरू झाली एक जीवघेणी लढाई.. ते वेदनामय उपचार.. काळवंडलेली त्वचा.. केसांचं गळणं. घरच्यांची भक्कम साथ आणि साईबाबांवरची श्रद्धा या बळावर मी सर्व काही सहन करत होते. चार-पाच महिन्यांत केमो संपल्या. आता एक महिना रेडिएशन. डॉक्टर म्हणाले, दिवसातले दोन-तीन तास तरी काम करायला लागा. कामात असला की माणूस लौकर बरा होतो. मला वाटे, ‘या आजाराचं कळल्यावर कोण घेईल मला कामावर? आणि मला तरी झेपेल का आठ तास उभं राहून बोलणं, शिकवणं? पण खर्चही खूप झाला होता. थोडेफार हात-पाय हलवणं भाग होतं. १ नोव्हेंबर २०१३. रेडिएशनचा शेवटचा दिवस. चला, ट्रीटमेंट सध्या तरी संपली. रिक्षातून घरी परत येत असताना वाटेतच मोबाइलची रिंग वाजली. माझ्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम बोलत होत्या, ‘प्रिया कशी आहेस तू? ११ नोव्हेंबरला दुसरी टर्म सुरू होतेय. तू येऊ शकशील का?’ मी उडालेच. सगळं माहीत असूनही एवढय़ा मोठय़ा शाळेने मला परत बोलावलं होतं.. तेही सन्मानाने. सगळं थांबलंय आता असं वाटत असताना आयुष्याने ‘यू टर्न’ घेतला. पुन्हा आनंद मिळवून देणारा. माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निग पॉइंट.
 फक्त सहा महिन्यांच्या गॅपने मी शाळेत पुन्हा हजर झाले. मुलांचा प्रेमळ सहवास, सहशिक्षकांची आपुलकी, सासूबाईंनी मायेनं सांभाळलेलं पथ्यपाणी.. झेपत गेलं हळूहळू. त्यानंतर गॅदरिंग.. मग स्पोर्ट्स डे.. दु:ख कुरवाळायला वेळंच कुठे होता? ही चैतन्यथेरपी मला अचूक लागू पडली. करिअरची दिशा बदलणारा माझ्या आयुष्यातील पहिला टर्निग पॉइंट दुसऱ्या जीवघेण्या टर्निग पॉइंटमधून सावरण्यासाठी एक उत्तम टॉनिक ठरला.