06-turning‘पटकथा कशी वाटली?’ मी घाबरत घाबरत गदिमांना विचारलं.ते म्हणाले, ‘कशी वाटली? अरे, तुझं शिक्षण दिसतंय तुझ्या लिखाणातून. अरे, पंचपक्वान्नांचा स्वयंपाकच करून ठेवलाहेस. ओगराळय़ानं वाढायचं काम शिल्लक ठेवलं आहेस माझ्यासाठी.’ त्यांच्या उद्गारांनी मला हुरूप आला. माझ्यासाठी त्यांचे शब्द, खरोखर टर्निग पॉइंट ठरले आणि चित्रपट लेखन, गीत लेखन हेच माझे ध्येय ठरवले.’’ दिवंगत ज्येष्ठ पटकथाकार, संवाद लेखक, निर्माते अण्णासाहेब देऊळगावकर यांच्या कन्येने, प्रीती वडनेरकर यांनी पाठविलेला त्यांचा हा ‘टर्निग पॉइंट’ त्यांच्या रोजनिशीतून.

पुण्यातल्या शुक्रवार पेठेत स्वत:चं दुमजली घर. वडील दशग्रंथी ब्राह्मण. कर्मठ, तापट, कडक शिस्तीचे. आम्ही चार भावंडं. दोन थोरल्या बहिणी, एक धाकटा भाऊ आणि मी. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाचा डोलारा आईनं सावरला. आम्हा भावंडांना लहानाचं मोठं केलं, शिकवलं. आम्ही चौघंही बुद्धीनं कुशाग्र. मला साहित्यात अधिक रुची असल्यानं, एम.ए.ला संस्कृत आणि मराठी साहित्य हे विषय होते. एम.ए. झाल्यावर पीएच.डी. करून कॉलेजमध्ये प्राचार्य होण्याचं स्वप्न होतं. साहित्यात महान कार्य करण्याची महत्त्वाकांक्षा होती.

What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

मधल्या काळात दोघी बहिणींची लग्नं झाली. मोठय़ा बहिणीचे यजमान डॉक्टर आणि आर्मीमध्ये कर्नल. तिच्यापेक्षा लहान बहिणीचे यजमान ‘प्रभात’ फिल्म कंपनीत सर व्यवस्थापक आणि प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह. त्यामुळे त्यांच्याबरोबर ‘प्रभात’मध्ये जाणं-येणं सुरू झालं. व्ही. शांताराम (बापू), गजानन जहागीरदार, दामले मामा, फत्तेलाल यांच्याशी अगदी जवळून संबंध आला. फिल्म प्रॉडक्शन, स्क्रिप्ट रायटिंग, अ‍ॅक्टिंग, डायरेक्शन, एडिटिंग, म्युझिक, गीतं, वितरण साऱ्यांची माहिती झाली. तसा नाटक-सिनेमामध्ये पहिल्यापासून रस होताच. पण ‘प्रभात’मुळे उत्तम दर्जाच्या कलाकृतींमागच्या साऱ्या गोष्टींचं सखोल ज्ञान झालं.
कळत-नकळत चित्रपटांच्या मायावी नगरीचं आकर्षण वाटायला लागलं. अभिनयाची ओढ नव्हती. मात्र स्क्रिप्ट रायटिंग करण्याची इच्छा अनिवार व्हायला लागली. पण कुटुंबाचा कर्ता असल्यानं, त्या वेळी मिलिटरी अकाउंटस्ची नोकरी पत्करली. स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने ब्रिटिशांबद्दल असंतोष होता. त्याच काळात स्क्रिप्ट रायटिंगचा अभ्यास केला, अनेक पुस्तकं वाचली.
दरम्यान, प्रभात फिल्म कंपनीत बऱ्याच कुरबुरी सुरू झाल्या. शांताराम बापूंनी, स्वत:ची संस्था ‘राजकमल’ मुंबईला सुरू करून वेगळी चूल मांडली. खरं तर त्यांनी ‘माणूस’, ‘शेजारी’, ‘कुंकू’सारख्या अजरामर कलाकृतींनी जनमानसावर आपला आगळावेगळा ठसा उमटवला होता. ‘संत ज्ञानेश्वर’, ‘संत तुकाराम’, ‘रामशास्त्री’, ‘गोपाल कृष्ण’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपट ‘प्रभात’च्या नावावर जमा होते; परंतु एक एक करून सारेच विभक्त झाले. माझे मेहुणे बाळासाहेब पाठक यांनी प्रथम भागीदारी तत्त्वावर, नंतर स्वत:ची ‘माणिक चित्र’ संस्था काढून चित्रपट निर्मिती सुरू केली. पहिला चित्रपट ठरला ‘सीता स्वयंवर’. तोपर्यंत पटकथा लिहिण्यासाठी माझी तयारी झाली होती. ‘सीता स्वयंवर’चे लेखक अर्थातच ‘गदिमा’ ठरले होते. पौराणिक कथा माझ्या जिव्हाळय़ाच्या असल्याने मी ठरवलं की, ‘सीता स्वयंवर’ची संपूर्ण पटकथा लिहायची आणि मी निश्चय करून सत्तर ते ऐंशी दृश्यांची संपूर्ण पटकथा, एका बैठकीत, सहा तासांत लिहून काढली. ती घेऊन मी गदिमांकडे गेलो. त्यांनी लगोलग ती वाचूनही काढली. माझ्याकडे आपादमस्तक पाहून त्यांनी विचारलं, ‘काय शिकतोस?’ ‘एम.ए. मराठी, संस्कृत वाङ्मय’ मी चाचरत उत्तरलो. ‘पटकथा कशी वाटली?’ मी घाबरत घाबरत विचारलं. ‘कशी वाटली? अरे, तुझं शिक्षण दिसतंय तुझ्या लिखाणातून’ ते म्हणाले.
‘म्हणजे?’ मी विचारलं.
‘अरे, पंचपक्वान्नांचा स्वयंपाकच करून ठेवलाहेस. ओगराळय़ानं वाढायचं काम शिल्लक ठेवलं आहेस माझ्यासाठी.’ त्यांच्या उद्गारांनी मला हुरूप आला. आनंद गगनात मावेनासा झाला. माझ्यासाठी त्यांचे शब्द, खरोखर टर्निग पॉइंट ठरले आणि चित्रपट लेखन, गीत लेखन हेच माझे ध्येय ठरवले. ‘माणिक चित्र’च्या कथा-निवडीचे आणि पटकथा लेखनाचे काम माझ्याकडे आले.
एकाहून एक चित्रपट माझ्याकडून लिहिले गेले. पंचवीस चित्रपटांचं लेखन, काहींचं गीत लेखन, वितरण, निर्मितीही केली. त्यांपैकी काही म्हणजे ‘सुभद्रा हरण’, ‘सतीचं वाण’, ‘सासुरवाशीण’, ‘सतीची पुण्याई’, ‘लेक चालली सासरला’, ‘धूमधडाका’, ‘दे दणादण’, ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’, ‘नशीबवान’, ‘माहेरची साडी’, आदी. चित्रभूषण पुरस्कार, गदिमा पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार असे नावाजलेले पुरस्कार प्राप्त झाले. लोकप्रियता आणि लोकमान्यता मिळाली. कृतकृत्यता मिळाली.
मागे वळून पाहता ‘टर्निग पॉइंट’ची आठवण येते आणि वाटतं, तो टर्निग पॉइंट आयुष्यात आलाच नसता तर? तर कदाचिद पीएच.डी. होऊन प्राचार्य झालोही असतो. पण चित्रपट लेखनाचं काम माझ्याकडे आलंच नसतं आणि पटकथा-संवाद लेखक, गीतकार झालोच नसतो. पुरस्कार मिळालेच नसते.