संस्कृत भाषेची आवड असतानाही आपल्या कर्णबधिर मुलासाठी या मुलांसाठीचं विशेष प्रशिक्षण घेऊन त्यांनी त्याच शाळेत शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली आणि अचानक मुलाचा मृत्यू झाला. पुन्हा संस्कृतकडे वळावं, या विचारात असतानाच, ‘‘तुमची मुलं तुमची वाट पाहात आहेत,’’ हे एक वाक्य त्यांच्या, शोभाताईंच्या आयुष्यातलं ‘टर्निग पॉइंट’ ठरलं.
संस्कृत हा विषय घेऊन बी.ए.ला मुंबई विद्यापीठात मी तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. पुढच्या शिक्षणासाठी विद्यापीठाची ‘लोटस् फाऊंडेशन’ ही स्कॉलरशिप मिळाली नि मी एम.ए. झाले. संस्कृतमधील जुन्या संहितांना वैज्ञानिक आधार देऊन काही संशोधन करावं, ही मनातली इच्छा होती; पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं..
दरम्यान माझा विवाह झाला आणि  मातृत्वही प्राप्त झालं! उंच, सुदृढ असलेल्या माझ्या मुलाला, इयानला ऐकू येत नसल्याचं निदान झालं. कर्णबधिर मुलांच्या विशेष शाळेसाठी बोरिवली ते मुंबई सेंट्रल असा प्रवास सुरू झाला. इयानला अधिक चांगल्या तऱ्हेने शिकवता यावं यासाठी शाळेतच असलेल्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतलं. लगेचच शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूक केली गेली. आई आणि शिक्षिका अशा दुहेरी भूमिकेत वावरताना नियती परत एकदा फासे टाकण्याचा विचार करू लागली.
त्या वर्षी जून महिन्याच्या नवीन सत्रात इयान माझ्याच वर्गात आला. शाळेत आणि घरी श्रवणयंत्र लावून त्याच्या बोलण्यासाठी- भाषावाढीसाठी प्रयत्न चालू असतानाच, ऑगस्ट महिन्यात दोन दिवसांच्या तापाचं निमित्त झालं आणि इयान सोडून गेला, कायमचा.. परत कधीच न येण्यासाठी.. आता मी फक्त शिक्षिका राहिले होते.
मनासमोर परत एकदा द्वंद्व उभे राहिले. ज्याच्यासाठी हे प्रशिक्षण घेतलं, तोच गेला, तेव्हा आता परत आपल्या आवडीच्या संस्कृत विषयाकडे जावं, त्यात रमावं. इतक्यात शाळेतून मुख्याध्यापिका व माझ्या गुरू डॉ. कुंदाताई दळवी यांचा फोन आला, ‘‘तुझी मुलं तुझी वाट पाहात आहेत.’’ विद्यार्थ्यांच्या या वाट पाहाण्याने निर्णय घेणं सोपं झालं. मुलाच्या मृत्यूनंतर पंधराव्या दिवशी शाळेत गेले, वर्गातला एक मुलगा मात्र कायमचाच गैरहजर राहणार असताना!
‘आठ वर्षांपर्यंत ‘अपत्यसुख’ भोगले. ज्यांना मूलच होत नाही, अशांपेक्षा आपण सुखी आहोत,’ असा विचार करून आम्ही दोघांनी परत मातृत्वाचा विचारही केला नाही. कर्णबधिर मुलाचे पालक म्हणून ज्या यातना भोगल्या त्या यातना इतर पालकांना थोडय़ा सुसह्य़ व्हाव्यात, कर्णबधिरत्वाचे निदान लवकरात लवकर होऊन मुलाच्या कानात मशीन घातले जावे, यासाठी घरी प्रशिक्षण कसे सुरू करावे? या जागृतीसाठी प्रयत्न करायचे ठरवले. संपूर्ण महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांतून लेख लिहिले. आकाशवाणी, दिवाळी अंक, बालअंक, मासिके- संधी मिळेल तिथे लिहीत गेले.
‘स्पंदने कर्णबधिर मुलांची’ या विषयावर आजवर अनेक संस्थांत व्याख्यानं दिली. जोडीला शैक्षणिक, साहित्यिक, ललित अशा विषयांवर व्याख्यानं देते. तसेच माझी साहित्याची आवड जपू देणाऱ्या मराठी गीतांच्या मैफलींचे आयोजन करते व मी निवेदन करते. एक ध्यास व मराठीचे संवर्धन म्हणून करत असलेल्या या साऱ्यांतून मिळणारे मानधन विद्यार्थ्यांच्या श्रवणयंत्रांसाठी देते, कारण पाच वर्षांचं आयुष्य असणाऱ्या मशीनची किंमत अंदाजे ६०,००० ते १ लाख २० हजार इतकी आहे.
एक पालक म्हणून ज्या शाळेत प्रवेश केला, त्या शाळेत ‘पालकांसाठी सर्जनशील उपक्रम’ राबवला ज्याला राष्ट्रीय परिषदेत (NCED India) Best Innovative Paper Award मिळालं आणि हा उपक्रम गौरवण्यात आला. एनसीईडी दिल्ली या संस्थेनेही मुलांच्या भाषावाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर गौरवलं.
माझ्या आवडीचं संस्कृत विसरू नये म्हणून दहावीच्या १०० गुणांच्या पेपरसाठी बारा वर्षे घरी क्लासेस घेतले. खरं तर मधल्या काळात मुंबईतल्या दोन प्रथितयश महाविद्यालयांत शिकवण्याची संधी मिळाली होती; पण आयुष्याला मिळालेली कलाटणी सारं बदलून गेली; पण केलेले प्रामाणिक प्रयत्न नि मेहनत यामुळे आजवर अनेक मानसन्मान गाठी आले. याचा कळस म्हणजे ५ सप्टेंबर २०१३ रोजी भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार! खरं तर नियतीच्या या टर्निग पॉइंटलाच सलाम!   

Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Muslim Students Learning Sanskrit Video:
हिंदू मंदिरात पुजारी होण्यासाठी मुस्लिम विद्यार्थी घेतायत संस्कृतचे धडे? Video तुन सावधानतेचा इशारा पण? खरं..
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?