आयुष्यात एक घटना अशी घडते की त्यापूर्वीचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. मग ती घटना सुखदही असू शकते वा दु:खदही, पण त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णत: बदलून जातं. आजच्या अंकात अशाच दोन स्त्रियांचं आयुष्य. जे एका घटनेमुळे आमूलाग्र बदललं. अनामिका त्या एका क्षणानंतर मोकळी झाली, हसू लागली तर शैलाच्या येण्यानं अनघांचं आयुष्य समाजकार्याकडे वळलं. अनेक स्त्रियांना त्यांनी जगणं शिकवलं.. आयुष्यातला एक यू-टर्न त्यांच्या आयुष्याचा टर्निग पॉइंट ठरला. हे सदर वाचकांकडून आलेल्या उदंड ‘यू-टर्न’ अनुभवांवर आधारित आहे. वाचकांच्याच मागणीवरून या सदराचं नाव ‘टर्निग पॉइंट’.
हा खरं तर शैला आणि अनघा या दोघींच्या आयुष्यातला टर्निग पॉइंट. वर्तमानपत्रात एक लेख प्रसिद्ध झाला आणि शैला मरता मरता वाचली, तर अनघाताईंनी ‘अभिनव आनंद सेवा (आस) फौंडेशन’ची स्थापना केली.
आयुष्याला मिळालेलं आणि आयुष्याला नवी दिशा देणारं ते वळण वादळी नव्हतं, बालपणापासून कृतज्ञतेच्या संस्काराचं बीज मनात रुजलं होतं त्यालाच अंकुर फुटले, एका छोटय़ा प्रसंगानं, नव्हे एका गाठीभेटीनं! आपण समाजाचं देणं लागतो. आपलं यश आणि समृद्धीमागे अनेकांचे त्याग, आयुष्य असतं असे संस्कार बालपणीच रुजले होते. शैला पवारशी संवाद झाला आणि शरीरमनावर पसरलेली सुखवस्तूपणाची सुस्ती वितळून गेली. स्वत:पलीकडे जाण्याचं एक नवीन पर्व सुरू झालं. स्वत:शिवाय इतरांचा विचार करण्याची, त्यांच्यासाठी जगण्याची, त्यांच्यामागे उभे राहण्याची प्रेरणा मिळाली आणि नवा मार्ग निवडला.    
    शैला पवार, धुणी-भांडी करणारी मुलगी. हातात एक जुनाट, चुरगळलेली वही घेऊन आली, वय वीस ते बावीस, त्या वहीत तिनं काही चारोळय़ा, स्वरचित कविता लिहिल्या होत्या. मला लेखन, अध्यापनाची आवड म्हणून दाखवायला आली असावी. चेहऱ्यावर वेदना, कारुण्य होतं. मला म्हणाली, ‘‘वडील नाहीत, धाकटी भावंडं मोलमजुरी करतात. मला ब्रेन टय़ूमर झाला आहे. उपचाराला तर सोडून द्या. सीटी स्कॅन तपासणीला पैसे नाहीत, बसनं यायला-जायलाही नाहीत, मी डिस्परिन खाऊन ब्रेन टय़ूमरच्या वेदना थांबवायचा प्रयत्न करते पण त्या थांबत नाहीत. रात्रभर हातपाय झाडत, डोकं आपटत असते, कशीतरी मालकिणीकडून पैसे घेऊन ट्रीटमेंट चालू केली, पण चाळीस रुपयाला एक गोळी, अशा रोज पाच घ्यायच्या, कशा परवडणार? म्हणून सोडून दिली ट्रीटमेंट. नववीत शिकत होते, शाळाही बंद करावी लागली. मी काही बरी होणार नाही, मरणापूर्वी एकच इच्छा आहे. हा माझा कवितासंग्रह प्रसिद्ध करायचा आहे. तुमच्या ओळखीनं प्रयत्न कराल? माझी शेवटची इच्छा पूर्ण कराल?’’ मी स्तब्धच झाले. जीवन-मरणाच्या दारातली एक व्यक्ती, अगतिकतेनं येते आणि वेगळीच इच्छा प्रकट करते. ती निघून गेली. मी कविता वाचू लागले. अतिशय सुंदर कविता होत्या. खऱ्या जगण्यातून, संघर्षांतून, वेदनेतून निर्माण झालेल्या.
-‘देव देण्यासाठी दैव घेण्यासाठी
मग हा देण्या-घेण्याचा खेळ कोणासाठी?’
  -एखाद्या गोचिडाप्रमाणे ही गरिबी आम्हाला चिकटली
कुणीच नव्हतं आमच्यासाठी आम्हीच आसवं पुसली’
मग शैलाच्या भेटी झाल्या. ती उत्तम स्वयंपाक करायची, मेंदी सुरेख रेखाटायची, रांगोळय़ा तर किती प्रकारच्या काढायची धान्याच्या, मिठाच्या, फुलांच्या, पाण्यावरल्या, पाण्याखालच्या. तिला शिवणकाम येत होते. स्नॅक्सचे पदार्थ उत्तम करत होती. तिची एकेक गोष्ट बघत मी शैलामय झाले, झपाटून गेले. तिच्यावर एक लेख लिहिला. तो वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आणि सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्या लेखानं मदतीचा ओघ तिच्याकडे वाहत आला. अनेक लोक पैसे घेऊन आले. कित्येकांनी ऑर्डर्स दिल्या. तिची झोपडी शोधून घरपोच पैसे दिले. तिच्या कवितांचं पुस्तक छापायची तयारी दाखवली गेली. सीटी स्कॅन, ऑपरेशनसाठी मदत दिली, बरी होईपर्यंत सर्व खर्च करायला तयार होते सगळे. मी आणि ती अक्षरश: भारावून गेलो. कुणाचं जीवन मार्गी लावण्यात, कुणाला वाचवण्यात केवढा आनंद होता! खरं तर शैलाच्या आयुष्यातलाही हा टर्निग पॉइंट होता. मरणासाठी तयार झालेली शैला कविता प्रसिद्ध होण्यासाठी धडपडली. तिच्यावरचा लेख प्रसिद्ध झाला नि एका लेखामुळे अक्षरश: जगली. पुनर्जन्मच तिचा. शैला बरी झाली आणि  झोपडपट्टीतल्या शेकडो स्त्रिया माझ्याकडे येऊन म्हणू लागल्या ‘आमच्यावर लेख लिहिता का? आमची दु:खं अशीच मोठी आहेत. त्यांच्या कथा-व्यथा ऐकताना मी त्यांची होऊन गेले. व्यसनग्रस्त, संशयी, गुन्हेगार, बाहेरख्याली, परागंदा, मनोरुग्ण, जुगारी असे त्यांचे नवरे, एकटीनं संसाराचा गाडा ओढत होत्या. शिक्षण नाही, कौशल्य नाही, रोजगार नाहीत, पोटाला अन्न नाही. काहींना नवऱ्यांनी एड्स दिलेला. त्याशिवाय आरोग्याच्या गंभीर समस्या, छळ, मारहाण, उपासमार, गर्भारपण, बाळंतपण हेच जीवन! अनेक विधवा, परित्यक्ता, नवऱ्यांनी टाकून दिलेल्या, फसवल्या गेलेल्या- मुलगी झाली म्हणून, संशयावरून, माहेरून पैसा आणावा म्हणून, मूल होत नाही म्हणून. स्वयंपाक बिघडला व तो येत नाही म्हणूनही त्यांना टाकून दिलं होतं, अनेकींच्या नवऱ्यांनी दुसरी-तिसरी लग्नं केली होती. काहींनी पैशासाठी स्वत:च्या बायकोला वाममार्गाला लावलं होतं. बलात्कार, अत्याचार होत होते. गरिबी तर टोकाची. मला फक्त फिल्मी गरिबी माहिती होती. शैलाच्या उदाहरणानं स्फूर्ती मिळाली. त्यांच्यावरही लेख लिहिले, भाषणं दिली. त्यांना संघटित केलं. त्यांच्यासाठी ‘अभिनव आनंद सेवा (आस) फौंडेशन’ची स्थापना केली. चारशे-पाचशे स्त्रियांना रोजगार मिळवून दिला. भुकेल्यांसाठी धान्य बँक उघडली. मुठीनं, वाटीनं धान्य गोळा करून पुरवलं. चहा, साखर, साबण, तेल अनेक रूपांनी मदत मागून त्यांच्यापर्यंत पोचवली. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांचे हात अनेक होते. अनेकांनी विश्वास आणि प्रेमानं मदत दिली. मग ग्रामीण भाग, आदिवासी भागातल्या गरिबांपर्यंत मदत देत गेले. जुने कपडे, वस्तू, भांडी, खेळणी, चप्पल बूट गोळा करून वाटू लागले. जुनी पांघरुणं रस्त्यावर झोपलेल्या उघडय़ा-नागडय़ा लोकांच्या अंगावर घालू लागले. मीही महिलांना केटिरगचं प्रशिक्षण देऊन घरपोच डबा, स्नॅक्स, पुरणपोळय़ा, मोदकांचा व्यवसाय सुरू करून दिला. कर्नाटकी कशिदा शिकवून त्यांच्या ऑर्डर्स मिळवून दिल्या. त्यांचं महिला मंडळ स्थापन करून त्या निरक्षर स्त्रियांना बोलतं केलं. त्यांना आदर्श महिला पुरस्कार मिळवून दिला. त्यांच्यातले गुण, कला यांचा प्रसार केला. प्रत्येक घरात सिंधुताई सपकाळ आहेत. बहिणी, भावाची, वस्तीतली, नात्यातली, रस्त्यावर टाकलेली, भटकणारी मुलं एवढय़ा बिकट परिस्थितीतही त्या सांभाळतात. लहानाची मोठी करतात हे समजलं.
इकडे सुखवस्तू समाजाची देण्याची वृत्ती, सामाजिक जाणीव, दानत दिसली. दोन्ही भागांनी जीवन समृद्ध केलं. त्याहीपेक्षा जास्त माझी दु:खं छोटी करून मला सुखी केलं. वस्तीतल्या अनाथ मुलांना अनाथाश्रमात प्रवेश मिळवून दिला. गणित, विज्ञानाचे मोफत क्लासेस, जुन्या सायकली मिळवून दिल्या. मानवाधिकार आयोगापर्यंत जाऊन पिवळी रेशनकरड मिळवून दिली. कुणाचा जीव वाचतो. कुणाचा सावरतो, कुणी मार्गी लागतो, कुणी पोटभर जेवतो, याचे समाधान वाटते. आयुष्यात एखाद्याचं तरी कल्याण आपल्या हातून व्हावं, अशी सुप्त इच्छा होती. त्या वेगळय़ा वळणानं अनेक रूपांनी ती पूर्ण झाली, त्या वळणाबद्दल मी ऋणी आहे. त्या बुद्धी देणाऱ्या परमेश्वराची! ‘आस’च्या कार्यात आपण मदत करू शकता आपल्या इच्छेनुसार! असा हा पुनर्जन्म!