आयुष्यात एक घटना अशी घडते की त्यापूर्वीचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. मग ती घटना सुखदही असू शकते वा दु:खदही, पण त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णत: बदलून जातं. आजच्या अंकात अशाच दोन स्त्रियांचं आयुष्य. जे एका घटनेमुळे आमूलाग्र बदललं. अनामिका त्या एका क्षणानंतर मोकळी झाली, हसू लागली तर शैलाच्या येण्यानं अनघांचं आयुष्य समाजकार्याकडे वळलं. अनेक स्त्रियांना त्यांनी जगणं शिकवलं.. आयुष्यातला एक यू-टर्न त्यांच्या आयुष्याचा टर्निग पॉइंट ठरला. हे सदर वाचकांकडून आलेल्या उदंड ‘यू-टर्न’ अनुभवांवर आधारित आहे. वाचकांच्याच मागणीवरून या सदराचं नाव ‘टर्निग पॉइंट’.
तो तिचा बापच होता पण.. आयुष्यात हसणंच विसरून गेलेल्या ‘सदाफुली’च्या आयुष्यात एकाच्या विश्वासानं टर्निग पॉइंट आला आणि तिचं आयुष्य मोकळं झालं..
‘स दा हसणारी अशी ही सदाफुली’ कॉलेजमध्ये मला फिश पाँड पडला. सदाफुली.. म्हणजे मी.. कॉलेजमध्ये सदा का हसायची माहितेय? कारण मी घरी खूप रडायची, कोमजलेली असायची. त्यामुळे बाहेर पडल्यावर खूप मोकळं मोकळं वाटायचं. घराबाहेर पडल्याचा आनंद ओसंडून वाहायचा.. किंवा मी रडलेली, कोमेजलेली आहे हे कुणाला कळू नये म्हणून.. किंवा दोन्ही कारणास्तव! ते होतं कृत्रिम हसू फक्त मला माहीत असलेलं.
एखाद्या सुसंस्कृत (?) घरातील एकुलती एक कन्या एवढी कोमजलेली का असू शकते? मला व माझ्या कुटुंबीयांना ओळखणारी एकही व्यक्ती याची कल्पनादेखील करू शकणार नाही की, माझा बाप म्हणवणारा माणूसच.. आईनं मला कधीही घरात एकटं ठेवलं नाही म्हणून त्याला संधी मिळाली नाही नाहीतर केव्हाच त्यानं माझ्यावर.. तरीही मी नववीला असल्यापासून ते पदवी मिळेपर्यंत जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तो माझ्याशी अश्लील चाळे करायचा, मला अश्लील साहित्य वाचण्याची जबरदस्ती करायचा..
त्या काळात डोक्यावरून अंथरूण घेऊन रडत रडत झोपी जायचे मी. असं वाटायचं लग्न होऊन सासरी गेले तर हा त्रास तरी संपेल. दुर्दैवानं तेही होत नव्हतं. पण पदवी मिळाली आणि मी ते घर सोडलं..
माझा ‘बाप’ त्याच्या ऑफिसमध्ये एक ‘उत्तम प्रशासक’ आणि जनमानसात व नातेवाइकांमध्ये ‘भोळा शंकर’ (?) म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वाच्या मते त्याचा दुर्गुण एकच – रागीट स्वभाव! कुठेही त्याचा विषय निघाला की माझी नकारात्मक भावना उफाळून येई. मी खूप वाईट बोले. सर्व जण मलाच समजावण्याचा प्रयत्न करीत असत- ‘ते रागीट आहेत. पण तुझ्या भल्यासाठीच रागावतात. त्यांच्या तिरस्कार करणं योग्य नाही.’ सगळे मलाच सांगत. मी माझ्या ऑफिसमध्ये जायला लागले. मन रमवू लागले. तिथेही कधी कधी हा विषय येईच. इतर जण नातेवाइकांसारखंच मला समजावत, पण एके दिवशी मात्र वेगळं घडलं. असाच काहीसा विषय निघाला आणि मी वडिलांवर तोंडसुख घेऊ लागले. तेव्हा माझ्या कार्यालयातील एक सहकारी मित्र मला म्हणाला, ‘‘तुझ्यासारखी समंजस मुलगी स्वत:च्या वडिलांवर एवढी चिडते त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार. तू विनाकारण कुणाचा तिरस्कार करणार नाहीस याची मला खात्री आहे.’’    
 तो एक क्षण.. माझा बांध फुटला. वर्षांनुर्वष मनात साचलेलं मळभ क्षणात स्वच्छ झालं. आयुष्यात प्रथमच तो सगळा भयानक अनुभव भडाभडा बोलून गेले. त्या मित्रासमोर खूप खूप रडले. धुवांधार पाऊस पडून गेल्यावर आकाश निरभ्र व्हावं असं काहीसं झालं..
त्या एका क्षणी माझ्या आयुष्यानं ‘यू टर्न’ घेतला. ही सदाफुली खऱ्या अर्थी आतून-बाहेरून फुलून आली.. पूर्वी ज्या विषयाचा किंचित विचारही डोक्यात आला तर छातीत धडधड व्हायचं. श्वासांची लय बिघडायची, मी थरथर कापायची. आजही तेच होतं.. पण कमी प्रमाणात. आज मी रडत रडत का होईना कुणासमोर तरी स्वत:ला व्यक्त करून मोकळी होऊ शकते. आता तर मी माझ्या नवऱ्यासमोरही स्वत:ला व्यक्त केलंय. सांगून टाकलं त्यालाही. खूपच मोकळी झालेय आता! तुम्ही विचार तरी करू शकता का, की कुणीतरी आपल्यावर विश्वास दाखवल्यानं आपलं आयुष्य ‘यू टर्न’ घेऊ शकतं? माझ्या आयुष्यानं घेतलाय. पूर्वी मी मनातून बुजलेली असायची. आज माझ्यात आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला आहे. पूर्वी वाटायचं.. नर-मादी हेच नातं? आता जाणवतं- मनुष्यप्राण्यातही संस्कृती आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय माझा. ही किमया.. एका विश्वासाची! 
(खरं नाव टाकल्यानं अनेकांची आयुष्ये ढवळून निघतील, त्यामुळे हा निनावी अनुभव)