04 December 2020

News Flash

महामोहजाल : डिजिटल दिवाळी अंकांची वीस र्वष!

पारंपरिक छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही स्वागत करू या.

पहिला ‘डिजिटल’ स्वरूपातील दिवाळी अंक २००० मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर डिजिटल रूपात संगणकावर, मोबाइलवर आणि किंडल किंवा टॅब्लेटवर वाचता येणारे दिवाळी अंक, ऑडिओ बुक दिवाळी अंक, व्हिडीओ रूपात संवाद साधणारे दिवाळी अंक अशी एक नवी परंपराच सुरू झाली.

प्रसाद शिरगांवकर – prasad@aadii.net

पहिला ‘डिजिटल’ स्वरूपातील दिवाळी अंक २००० मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर डिजिटल रूपात संगणकावर, मोबाइलवर आणि किंडल किंवा टॅब्लेटवर वाचता येणारे दिवाळी अंक, ऑडिओ बुक दिवाळी अंक, व्हिडीओ रूपात संवाद साधणारे दिवाळी अंक अशी एक नवी परंपराच सुरू झाली. या परंपरेनं जसं लोकप्रिय साहित्य जगभरातल्या मराठी भाषकांना तळहातावर उपलब्ध करून दिलं, तसंच यातून अनेक नवे लेखक घडले. पारंपरिक छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही स्वागत करू या.

पहिला ‘ऑनलाइन’ मराठी दिवाळी अंक प्रकाशित झाल्याच्या घटनेला यंदा वीस र्वष पूर्ण झाली. मराठी दिवाळी अंकांना ११२ वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. शंभराहून अधिक र्वष दिवाळी अंकांच्या माध्यमातून मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण झालं आहे. दिवाळी अंकांच्या व्यासपीठामुळे मराठीला अनेक कसदार साहित्यिक मिळाले आहेत. गेल्या शतकात छापील माध्यमात प्रकाशित होत असलेले बहुसंख्य दिवाळी अंक अजूनही छापील माध्यमात आहेतच. मात्र डिजिटल तंत्रज्ञानासारख्या आधुनिक माध्यमांचा वापर करून गेली वीस र्वष वेगवेगळे डिजिटल दिवाळी अंक करण्याचे अनेक प्रयोग झाले, अजूनही होत आहेत. या सदरात नेहमी प्रसिद्ध होणाऱ्या डिजिटल वा आंतरजालावरील धोक्यांची माहिती देण्याच्या प्रयत्नांच्या थोडं हटके  जात समाजमाध्यमातील प्रयोगांचा हा आढावा.

पहिला ऑनलाइन डिजिटल दिवाळी अंक

नव्वदच्या दशकात झालेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातल्या क्रांतीमुळे मराठी युवक खूप मोठय़ा संख्येनं कामासाठी जगभर जायला लागले. इंग्लंड, अमेरिका, युरोपपासून सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँडपर्यंत जगभर मराठी मंडळी मोठय़ा प्रमाणावर जायला लागली. त्याआधीही मराठी माणसं कामासाठी जगभर जात होतीच, पण नव्वदच्या दशकात हे प्रमाण वेगानं वाढत गेलं. जगभरातल्या मराठी माणसांना जोडणारं पहिलं ऑनलाइन व्यासपीठ ‘मायबोली डॉट कॉम’च्या रूपानं १९९८ मध्ये सुरू झालं. तांत्रिक भाषेत सांगायचं, तर हा एक ‘युजर फोरम’ होता, म्हणजे समाजमाध्यमांचं (सोशल मीडिया) अगदी सुरुवातीच्या काळातलं रूप. (म्हणजे ‘फेसबुक’ सुरू व्हायच्या आधीच्या काळातही ‘मराठी सोशल मीडिया’ सुरू झाला होता!). तर ‘मायबोली’वर जगभरात विखुरलेले अनेक मराठी युवक-युवती आपले प्रश्न मांडून त्यावर चर्चा करायचे. मग त्यावर स्वनिर्मित कविता, ललित लेख, कथा इत्यादीही प्रकाशित करायला लागले. या लेखनाला जगभरातल्या तेव्हा ऑनलाइन असलेल्या मराठी लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळायला लागला. या साऱ्यातून २००० मध्ये ‘मायबोली’चा पहिला ऑनलाइन दिवाळी अंक तयार करण्याचं ठरलं. लेखन क्षेत्रातलं कोणतंही प्रथितयश नाव नसलेला, प्रामुख्यानं ऑनलाइन लिहिणाऱ्या युवकयुवतींनी एकत्र येऊन तयार केलेला तो मराठीतला पहिला ऑनलाइन दिवाळी अंक.

मराठी ‘आंतरजाला’वरील दिवाळी अंक

‘मायबोली’च्या त्या पहिल्या दिवाळी अंकाला मिळालेला प्रतिसाद बघून पुढे पंधरा र्वष सलग ‘मायबोली’चे ऑनलाइन दिवाळी अंक प्रकाशित होत राहिले. त्यात अनेक प्रयोगही होत गेले. ऑनलाइन ऑडिओ दिवाळी अंक, ऑनलाइन व्हिडीओ दिवाळी अंक असे काही लक्षणीय प्रयोग ‘मायबोली’मध्ये झाले. २००८ मध्ये ‘तारांकित’ नावाचा एक विलक्षण प्रयोग ‘मायबोली’च्या दिवाळी अंकात केला गेला. त्या अंकाच्या संपादक मंडळात असलेले

चिन्मय दामले यांनी सांगितलं, की ‘‘२००८ मध्ये मराठी दिवाळी अंकांना शंभर र्वष पूर्ण झाली म्हणून काहीतरी वेगळा प्रयोग आम्हाला करायचा होता. आम्ही तेव्हा मराठीतल्या प्रथितयश कलावंत आणि साहित्यिकांना एकत्र आणून त्यांच्या ‘आवाजातला’ ऑडीओ दिवाळी अंक प्रकाशित केला. त्या अंकासाठी डॉ. श्रीराम लागू, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, सुनीताबाई देशपांडे, द. मा. मिरासदार इत्यादी दिग्गज साहित्यिकांचं साहित्य त्यांनी लेखन किंवा ध्वनी स्वरूपात आम्हाला दिलं आणि आम्ही ते मराठीतला पहिला ध्वनीरूप ऑनलाइन दिवाळी अंक म्हणून प्रकाशित करू शकलो.’’

‘मायबोली’पासून सुरूझालेलं मराठी आंतरजाल पुढे ‘मनोगत’, ‘उपक्रम’, ‘मिसळपाव’, ‘ऐसी अक्षरे’ इत्यादी संकेतस्थळांनी पुढे नेलं आणि बहरत ठेवलं. या सर्वच संकेतस्थळांवर अनेक नवे लेखक तयार होत गेले अन् या संकेतस्थळांनी आपापले ऑनलाइन दिवाळी अंकही प्रकाशित करणं सुरू केलं. यातील ‘मिसळपाव डॉट कॉम’चा यंदाचा दहावा ऑनलाइन दिवाळी अंक आहे. २०१६ ते २०१८ कालावधीत या अंकाचं संपादन करणारे इंग्लंडनिवासी ‘आदूबाळ’ यांनी ‘मिसळपाव डॉट कॉम’च्या (मिपा) दिवाळी अंकांविषयी सविस्तर माहिती दिली. ‘‘२०११ पासून ‘मिपा’चा ऑनलाइन दिवाळी अंक प्रकाशित करणं आम्ही सुरू केलं. २०१६ पासून पुढे दरवर्षी एकेका विषयाला वाहिलेला विशेषांक प्रकाशित करत आहोत. त्यामध्ये २०१६ मध्ये रहस्यकथा विशेषांक तयार केला होता, त्यासाठी नव्या दमाच्या लेखकांनी तब्बल १४ नव्या रहस्यकथा लिहिल्या होत्या.’’

मराठी आंतरजालावर प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांपैकी एक लक्षणीय अंक म्हणजे ‘ऐसी अक्षरे डॉट कॉम’चा. ‘ऐसी अक्षरे ..’च्या अंकाचं यंदाचं नववं र्वष आहे. हा दिवाळी अंक दर वर्षी एका विशिष्ट विषयाला वाहिलेला असतो अन् त्या विषयावरचं विविध प्रकारचं लेखन विविध क्षेत्रांमधल्या व्यक्तींनी केलेलं असतं. ‘ऐसी अक्षरे’च्या दिवाळी अंकांविषयी त्यांच्या संपादक मंडळाच्या अमेरिकास्थित सदस्य अदिती जोशी म्हणतात, ‘‘आम्ही तंत्रज्ञान वापरणारे लोक आहोत आणि जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत राहतो. छापील अंकाप्रमाणेच ऑनलाइन अंकही अत्यंत गांभीर्यानं आणि कष्टानं काढले जातात. अर्थात, हौशी आणि हुशार लोकांची सोबत असल्याशिवाय अंकाचा दर्जा सांभाळणं कठीण होईल. तंत्रज्ञान वापरून लोकांची सोय आणि अंकाचा दर्जा दोन्ही गोष्टी सांभाळता येतात. हा सगळा प्रकार आमच्या हौशीचा असला तरीही आम्ही लेखक-लेखिकांना मानधन देतो.’’‘ऐसी अक्षरे’च्या संपादन, प्रकाशनाच्या प्रक्रियेमध्ये अमेरिकेत राहाणारे राजेंद्र बापट आणि पुण्यातील अभिजीत रणदिवे यांचा सक्रिय सहभाग असतो.

वरील सर्व उदाहरणांमध्ये संपादन मंडळातील एकेकाच व्यक्तीचं नाव दिलं असलं, तरी ऑनलाइन दिवाळी अंकांच्या प्रकाशन प्रक्रियेमध्ये त्या त्या संकेतस्थळाच्या स्वयंसेवकांचा मोठा चमू दरवर्षी काम करत असतो. हे अंक वाचण्यासाठी मुक्त उपलब्ध असतात. यातील लेखन, संपादन, मुद्रितशोधन, रेखाटनं ही कामं स्वयंसेवक विनामूल्य करतात.

‘ब्लॉगर्स’चे दिवाळी अंक आणि ‘ई-बुक’ दिवाळी अंक

२००० च्या पहिल्या दशकाच्या शेवटी मराठी ब्लॉगविश्व अत्यंत झपाटय़ानं वाढत होतं. अनेक पत्रकार, लेखक आणि नवोदित मंडळीही स्वत:चा ब्लॉग तयार करून त्यावर नियमितपणे लिहीत होती. या काळात काही ब्लॉगर्सनी एकत्र येऊन आपले ऑनलाइन दिवाळी अंक काढण्याचे प्रयत्नही झाले. यातला एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे प्रसिद्ध फूड ब्लॉगर सायली राजाध्यक्ष यांनी २०१४ ते २०१७ अशी चार र्वष प्रकाशित केलेला ‘डिजिटल दिवाळी’ हा ऑनलाइन दिवाळी अंक. त्यांनी काढलेल्या चार अंकांपैकी एक जागतिक खाद्यसंस्कृतीला वाहिलेला वैशिष्टय़पूर्ण दिवाळी अंक खूपच गाजला होता अन् ८० देशांमधल्या वाचकांनी तो वाचला होता, अशी आठवण राजाध्यक्ष यांनी सांगितली.

सध्याच्या दशकाच्या सुरुवातीला ‘अ‍ॅमेझॉन किंडल’सारखी ई-बुक रीडर्स आणि आयपॅड, टॅब्लेट्स यांचा वापर वाढायला सुरुवात झाली. अशा ‘ई-रीडर’ माध्यमांसाठी दिवाळी अंक केले तर ते जगभर पोहोचणं आणि जगातल्या

कु णालाही विकत घेऊन वाचता येणं सोपं झालं. मराठी पुस्तक विक्रीला वाहिलेल्या ‘बुकगंगा डॉट कॉम’नं २०११ मध्ये पारंपरिक छापील माध्यमातले अनेक दिवाळी अंक त्यांच्या संकेतस्थळावर त्यांच्या स्वत:च्या ई-बुक माध्यमात प्रकाशित करायला सुरुवात केली. गेली दहा र्वष ते सातत्यानं अनेक पारंपरिक दिवाळी अंक ई-बुक स्वरूपात प्रकाशित करत आहेत आणि त्यांना जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय अ‍ॅमेझॉनच्या ‘किंडल’ प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेले दिवाळी अंकही गेली काही र्वष प्रकाशित होत आहेत. यामध्ये माझा स्वत:चा ‘प्रासादिक मोबाइल दिवाळी अंक’ (२०१५ ते २०१९), ‘मीडिया वॉच’ हा दिवाळी अंक (२०१७-२०२०), ‘कालनिर्णय’ (२०१७-२०२०), ‘उल्हास प्रभात’, ‘मैफल मोबाइल दिवाळी अंक’ इत्यादींचा समावेश आहे.

ई-बुक माध्यमामध्ये ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर वाचण्यासाठी सोयीचा असा केलेला आणि व्हॉट्सअ‍ॅपवरच वितरित केला जाणारा ‘दृष्टी-सृष्टी’ हा एक वैशिष्टय़पूर्ण अंक गेली दोन र्वष प्रकाशित होत आहे. प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले या अंकाच्या मानद संपादक आहेत. कला आणि साहित्य क्षेत्राशी संबंधित मित्रमैत्रिणींच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून या अंकाची कल्पना निघाली. ‘‘दर्जेदार साहित्य निर्मितीतला आनंद मिळवण्यासाठी आणि वाचकांना नवं काहीतरी देण्यासाठी आम्ही हा अंक तयार केला. गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपवर हा अंक खूप मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला होता. यंदाचा अंक ‘आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या कलाकृती’ ही मध्यवर्ती कल्पना घेऊन केला आहे. यंदाच्या अंकात दिलीप प्रभावळकर,  सलील कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, गणेश मतकरी, सानिया भालेराव यांच्यासह अनेक नामवंत लेखक, कलाकारांचे लेख आहेत.’’ अशी माहिती अंकाची निर्मिती करणारे सुश्रुत कुलकर्णी यांनी दिली.

‘ऑडिओ बुक’ दिवाळी अंक

गेल्या तीन-चार वर्षांंमध्ये ‘ऑडिओ बुक’ प्रकाशित आणि वितरित करणारी अ‍ॅप्स उदयाला येऊन मूळ धरू लागली आहेत. मराठी ऑडिओ बुक्सच्या विश्वात ‘स्टोरीटेल’ हे अ‍ॅप लक्षणीय काम करत आहे. जुन्या दर्जेदार साहित्यकृती ऑडिओ माध्यमात आणणं आणि नवं दर्जेदार साहित्य तयार करणं अशा दोन्ही आघाडय़ांवर ‘स्टोरीटेल’चं काम सुरू आहे. गेली तीन र्वष ‘माहेर’, ‘मेनका’, ‘जत्रा’ आणि ‘स्त्री’ या नावाजलेल्या दिवाळी अंकांमधील निवडक कथा ‘स्टोरीटेल’वर ऑडिओ बुक रूपात प्रकाशित होतात. ‘‘ऑडिओ बुक्सना मिळणारा प्रतिसाद बघून यंदाच्या वर्षी ‘मौज’ हा अत्यंत प्रतिष्ठित दिवाळी अंक आम्ही ‘स्टोरीटेल’वर प्रकाशित करत आहोत. यातील निवडक भाग न घेता अथपासून इतिपर्यंत संपूर्ण अंक यंदा ‘स्टोरीटेल’वर असणार आहे. या दिवाळी अंकामध्ये वीणा देव, अनिल अवचट, श्रीरंग भागवत इत्यादी  मान्यवरांचं साहित्य अथवा त्याचं अभिवाचन  असणार आहे.’’ असं ‘स्टोरीटेल’चे मराठी विभाग प्रमुख प्रसाद मिरासदार यांनी सांगितलं.

नवोदित युवा लेखकांनी एकत्र येऊन हौसेनं प्रकाशित केलेल्या मराठीतल्या पहिल्या ऑनलाइन दिवाळी अंकापासून ते प्रथितयश लेखकांचंही साहित्य असलेल्या आणि नवनव्या डिजिटल माध्यमांमध्ये येणाऱ्या आजच्या दिवाळी अंकांपर्यंतच्या प्रवासाचा हा ढोबळ आढावा. मराठी लेखक, प्रकाशक, तंत्रज्ञ साहित्य क्षेत्रात- विशेषत: डिजिटल दिवाळी अंकांच्या बाबतीत करत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची ही संपूर्ण यादी नाही. अनेक प्रयोगांची नोंद करणं या लेखात राहून गेलं असल्याचीही शक्यता आहे. अनेक जण अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग करत आहेत. त्या साऱ्यांचं एकत्र नोंदीकरण (डोक्युमेंटेशन) करून ठेवणं गरजेचं आहे.

डिजिटल दिवाळी अंक हा मराठी दिवाळी अंकांच्या प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. दिवाळी अंकांच्या निमित्तानं नवं साहित्य निर्माण होणं, ते नवनव्या उत्साही लोकांकडून निर्माण होणं आणि जगभरात विखुरलेल्या अधिकाधिक मराठी भाषकांपर्यंत पोहोचणं या साहित्यविश्व समृद्ध होत राहाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. या गोष्टींना डिजिटल दिवाळी अंकांमुळे निश्चितच चालना मिळाली आहे. त्यातूनच मराठी साहित्य बहरत राहाणार आहे.

आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2020 1:40 am

Web Title: twenty years of digital diwali anka mahamohajal dd70
Next Stories
1 सायक्रोस्कोप : तसं घडायलाच नको होतं!
2 ‘डिंक’ स्वीकारताना..
3 स्त्री राजकारण्यांसाठीचा ‘जेसिंडा पॅटर्न’!
Just Now!
X