मंजुला नायर

आजच्या पालकांपुढं असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ‘ऑनलाइन गेम्स खेळणं चांगलं आहे का?’ या कठीण भासणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र अगदी सोपं आहे. ‘होय, असे गेम्स खेळणं मुलांसाठी चांगलं असतं.’ मग ते धोकादायक का मानलं जातंय? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे ऑनलाइन गेमिंगलाही वाईट बाजू आहे. खासकरून त्यांचा जबाबदारीनं वापर केला नाही, तर मुलांवर मोठं संकटही ओढवू शकतं, ते काय हे सांगणारा ‘ऑनलाइन गेम्सचं जग’ या लेखाचा भाग पहिला..

ऑनलाइन गेमिंग हे शब्द उच्चारताक्षणी शाळकरी मुलांचे डोळे एकदम लकाकतात, तर प्रौढांच्या डोळ्यांत मात्र भीती, शंका, काळजी आणि अनिश्चितता या साऱ्यांचं मिश्रण दिसायला लागतं. या दोन्ही पिढय़ांकडून असा वेगवेगळा प्रतिसाद यायला एक कारण आहे. ते म्हणजे ऑनलाइन गेमिंगबद्दल असणारी माहिती किंवा तिचा अभाव!

नव्या पिढीचा जन्मच मुळी असे गेम्स तयार करण्यासाठी आणि ते खेळण्यासाठी झालेला आहे. एकवीसाव्या शतकात जन्मलेल्या मुलांच्या पालकांना मात्र त्याचं महत्त्व म्हणावं तितकं कळत नाही. तंत्रज्ञानाची पाश्र्वभूमी असणाऱ्या काही मोजक्या पालकांचा अपवाद सोडता, अगदी थोडे पालक आपल्या मुलांना ऑनलाइन गेम्स खेळण्याकरता प्रवृत्त करताना दिसतात. बहुसंख्य पालकांना आपल्या मुलांनी असे गेम्स अजिबात खेळू नयेत, असं वाटत असतं. अर्थात यामागे त्याबद्दलची काळजीच असते. सहसा पालकांनी ऑनलाइन गेमिंगबद्दल जे काही ऐकलेलं- वाचलेलं असतं त्या साऱ्याच गोष्टींमध्ये ‘ऑनलाइन गेमिंग’ ही एक मुलांना चटक लावणारी गोष्ट आहे आणि तिचा मुलांवर नकारात्मक प्रभाव होतो’, असं खोलवर ठसवलेलं असतं.

आपल्यापुढं असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘ऑनलाइन गेम्स खेळणं चांगलं आहे का?’ हा प्रश्न वाचूनच अनेक जणांच्या भुवया उंचावल्या असणार याची मला पक्की खात्री आहे. या कठीण भासणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र अगदी सोपं आहे. ‘होय, असे गेम्स खेळणं मुलांसाठी चांगलं असतं.’ अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे, की मर्यादित प्रमाणात डिजिटल किंवा व्हिडीओ गेम्स खेळल्यास मुलांचा प्रतिसाद, तार्किक विचार करण्याची शक्ती, विश्लेषण, प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आणि एका वेळी अनेक गोष्टी करण्याची क्षमता या साऱ्यांमध्येच वाढ होते. अशा खेळांमुळं स्मृती, मेंदूचा विचार करण्याचा वेग आणि एकाग्रता या साऱ्यांमध्ये वाढ झाल्याचं संशोधनांतून दिसून आलं आहे. ऑनलाइन गेमिंग किंवा एखाद्या गोष्टीचं खेळात रूपांतर करणं (गेमिफिकेशन) हे शिक्षणाकरता वापरलं जाणारं एक नवं साधन आहे, हे मोठय़ा माणसांनी समजून घेतलं पाहिजे. ऑनलाइन जगतात सादर केला जाणारा आशय सहसा रंजक असतो. त्यातले गेम्स गुंगवून ठेवणारे असतात, त्यामुळं मुलं त्यातून चटकन शिकू शकतात, दीर्घकाळ नव्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात. त्यामुळं आता नव्या शिक्षणपद्धतीमध्ये ऑनलाइन आशय हे ज्ञानार्जनासाठीचं एक प्रभावी साधन समजलं जातं. अर्थात, ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे ऑनलाइन गेमिंगलाही चांगल्या बाजूबरोबरच  वाईट बाजूही आहेत. खासकरून त्यांचा जबाबदारीनं वापर केला नाही, तर मुलांवर मोठं संकटही ओढवू शकतं, हे ध्यानात ठेवायला हवं.

आपण साऱ्यांनीच कॅण्डी क्रश, बबल शूटर, फार्म व्हिल, टेम्पल रन, सबवे सर्फर, ल्यूडो, कोडी, बार्बी किंवा कुकिंगसारख्या खेळांबद्दल कधी ना कधी ऐकलेलं असतं. जर हे गेम्स मर्यादित वेळेतच खेळले गेले तर ते सुरक्षित समजले जातात. मात्र मुलांच्या जगतातल्या टॉप १० गेम्स पुढीलप्रमाणे आहेत (मात्र हा क्रम कुठल्याही विशिष्ट प्राधान्यानुसार नाही). क्लॅश ऑफ क्लॅन्स (CoC), मॉर्टल कॉम्बॅट, काऊन्टर स्ट्राइक, ग्रॅण्ड थेफ्ट ऑटो (GTA), पोकेमॉन गो, कॉल ऑफ डय़ुटी, फ्री फायर आणि अर्थातच आज सगळ्यात लोकप्रिय असणारा गेम- पबजी (प्लेयर अननोन्स बॅटल्स ग्राऊंडस्) हे गेम्स अत्यंत आक्रमक किंवा हिंसक स्वरूपाचे आहेत. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर लैंगिक आशयदेखील असतो. जगभरात वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून किंवा वृत्तपत्रांतून याबाबत अनेक प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असतात.

मुलं शाळकरी वयात असताना त्यांच्यावर ऑनलाइन गेम्सचा नेमका कोणता परिणाम होत असतो, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण त्याबद्दल मुलांना जागरूक करणंही आवश्यक आहेच. आमचा अनुभव पाहता, मुलांना ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून कितीतरी वेळा धमक्यांना सामोरं जावं लागतं. बहुतेक वेळा मुलं आपल्या पालकांना अशा धमक्या किंवा धोके याबद्दल सांगत नाहीत. असं केलं तर आपल्या हातातलं डिजिटल उपकरण काढून घेतलं जाईल, अशी भीती त्यांना वाटत असते. आभासी जगाशी संपर्क तुटणं ही मुलांसाठी सर्वात कठोर शिक्षा असते. शिवाय बहुतेक वेळा पालकांनादेखील आपली मुलं ऑनलाइन जगतात काय करत आहेत किंवा ती कोणते गेम्स खेळत आहेत याची अजिबातच कल्पना नसते.

‘पबजी’ या लोकप्रिय गेममध्ये असणारी विशेष सुविधा म्हणजे व्हॉइस चॅट! या सुविधेचा वापर करून खेळाडूंना आपल्या सोबत खेळणाऱ्या अन्य लोकांशी बोलता येतं. आपल्यासोबत खेळाडूंची टीम तयार करण्यासाठी इतरांशी मत्री करता येते आणि मग सगळ्यांना हा खेळ एकत्रितपणे खेळता येतो. अनेकदा आपण मुलांना मोबाइल फोनवर गेम खेळत असताना हेडफोन घालून (किंवा त्याशिवायसुद्धा) मोठमोठय़ांदा ओरडत असताना पाहिलं असेल. अशा वेळी बरेचदा ही मुलं एखाद्या नि:शुल्क वायफायवर ‘पबजी’ खेळत असतात.

आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी घेतलेल्या एका प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान त्यात सहभागी झालेल्या एका मुख्याध्यापकांनी आपला अनुभव सांगितला होता. त्यांच्या शाळेतील पाचव्या इयत्तेतल्या असित नावाच्या मुलाची ही गोष्ट. असित फक्त ११ वर्षांचा असला तरी तो नियमितपणे ‘पबजी’ खेळत होता. अनेकदा लहान मुलं आपली खरी ओळख लपवून भलत्याच नावानं गेम्स खेळत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण काय करतो हे उघडकीला येऊ नये याकरता ती असं करत असतात. एके दिवशी असितच्या घरी कुणीच असणार नव्हतं. त्यामुळं त्यानं आपल्या आभासी जगतातील पबजी खेळणाऱ्या मित्रांना घरी बोलावलं होतं. त्या आधी गेम खेळताना त्यांनी चॅट केलेलं होतं. त्यात असितसोबत असणारे बाकी खेळाडूही म्हणजे त्याच्या वयाचीच मुलं होती. ती सगळी घरी येण्याची असित आतुरतेनं वाट पाहात होता. तेवढय़ात अनपेक्षितपणे त्याचे बाबा घरी आले. ते ऑफिसला जाताना एक फाइल न्यायला विसरले होते. तितक्यात दारावरची बेल वाजली. दारावर तिघेजण होते. ते  तिथं ‘प्रो-वॉरियर’ राहातात का अशी चौकशी करत होते. अशा नावाचं कुणी इथं राहात नसल्याचं असितच्या बाबांनी त्यांना सांगितलं. मात्र ‘प्रो-वॉरियर’ हे नाव ऐकून असित लगेच आपल्याला कोण बोलावतय, हे पाहायला दाराकडं धावला. पबजी गेम खेळताना असित ‘प्रो-वॉरियर’ हा आयडी वापरत होता. त्या वेळी त्याच्यासोबत खेळायला घरी खरं तर काही ‘मुलं’ येणार होती. बाहेर कोण आलं आहे हे हळूच खिडकीतून पाहिल्यावर मात्र त्याला जबरदस्त धक्का बसला. ज्यांना तीन मुलं समजून त्यानं घरी बोलावलं होतं, ते तिघे जण चांगले पन्नाशीतले होते. ते लोक विचित्र आणि भीतीदायकही दिसत होते. असित घाबरून घरात लपून बसला. काही तरी गडबड आहे हे त्याच्या बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली. त्यांनी खोदून खोदून विचारल्यानंतर असितनं सगळी माहिती दिली. मघाशी आलेले तीन जण म्हणजे त्यानं घरी ‘पबजी’ खेळायला बोलावलेले ‘मित्र’ होते. हे सारं ऐकून- पाहून त्याच्या बाबांनाही चांगलाच धक्का बसला. बहुधा या तीन लोकांचा उद्देश असितसारख्या लहान मुलांशी मत्री करून त्यांचं अपहरण करण्याचा असावा, हे त्यांच्या लक्षात आलं. या तिघांनीही आपली खरी ओळख पटणार नाही याची गेम खेळताना काळजी घेतलेली होती. असितच्या बाबांनी तातडीनं जवळच्या पोलीस चौकीत धाव घेतली, मात्र तोवर ते तिघे जण गायब झाले होते. आता त्यांचा छडा लावणं कठीण होतं.

अनेकदा मुलं आम्हाला सांगत असतात, की अशा, एकत्र खेळ खेळण्याच्या गेममध्ये (मल्टिप्लेयर प्लॅटफॉर्मवर) आपण अनेकदा अनोळखी व्यक्तींसोबत खेळत असतो. बरेचदा हे लोक मुलांना त्रास देतात किंवा त्यांच्यावर दादागिरी करत असतात.

स्वीटी नावाच्या नववीतल्या मुलीबाबत असंच घडलं. ती बरेचदा अनोळखी लोकांसोबत ‘पबजी’ खेळत असे. खेळादरम्यानच्या व्हॉइस चॅटमध्ये तिच्या टीममधल्या काही सदस्यांनी तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. अल्पावधीतच हे सारे लोक एकमेकांचे मित्र झाल्यानं तिचा त्यांच्यावर चटकन विश्वास बसला होता. मग ते गेमव्यतिरिक्तही अन्य माध्यमांतून चॅट करू लागले. त्यातूनच वैयक्तिक चॅट, फोटोंची देवाणघेवाण इत्यादी सुरू झालं. काही काळानं या मित्रांत जो एरवी आपण १६ वर्षांचा खेळाडू असल्याचं सांगत होता, तो एक मध्यमवयीन प्रौढ माणूस असल्याचं लक्षात आलं. त्यानं स्वीटीला तिच्या फोटोंचा वापर करून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आपण तिच्या पालकांना याबाबत सांगू, असं तो तिला धमकवायला लागला. स्वीटीच्या पालकांना तिच्या ऑनलाइन जगातल्या वावराबद्दल कल्पना नाही, ते खूप कडक आहेत, हे त्या माणसाला ठाऊक होतं. त्यानं तिच्याकडं पशांची मागणी करायला सुरुवात केली, पण त्याला द्यायला तिच्याकडं अर्थातच पैसे नव्हते. मग तो तिच्याकडं अश्लील छायाचित्रं पाठवण्याची किंवा तसं चॅट करण्याची मागणी करू लागला. या साऱ्यामुळं स्वीटीला जबरदस्त मानसिक त्रास होत होता. आपण नेमकं काय करावं, हे तिला समजेचना. याबद्दल कुणाला सांगावं हे तिला कळत नव्हतं. आपल्या सुटकेचा कुठलाच मार्ग तिला दिसत नव्हता. अखेर त्या वयानुसार तिला एकमेव मार्ग सापडला.

आपण आत्महत्या करून या साऱ्यातनं मोकळं व्हावं असं तिनं ठरवलं. आपल्या मृत्यूमुळं हे सारे प्रश्न सुटतील अशी तिला पक्की खात्री वाटत होती. अखेर एके दिवशी तिनं धावत्या बसमधून बाहेर उडी मारली. नशिबानं तिला फारशी दुखापत झाली नाही, मात्र तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागले. अखेर सारा प्रकार उघडकीला आला. स्वीटीला असं टोकाचं पाऊल उचलावं लागल्यानंतर तिच्या पालकांना जाग आली. या साऱ्या प्रकरणाची पोलिसांना कल्पना देण्यात आली. तपास सुरू केल्यावर तिला धमक्या देणारा हा माणूस परदेशातील एक गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

ऑनलाइन गेमिंगच्या जगतातील धोक्यांबाबत आणि सावधगिरीबाबत आणखी माहिती घेऊ या पुढच्या लेखात. तोवर टेक केअर!

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी