22 September 2019

News Flash

युगंधर ते गांधी

मला मोहनदास करमचंद गांधी हे श्रीकृष्णानंतरचे दुसरे पूर्ण पुरुष वाटत आले आहेत. माणूस म्हणून जगताना गांधीजींच्या हातून अनेक चुका घडल्या,

| March 22, 2014 12:41 pm

मला मोहनदास करमचंद गांधी हे श्रीकृष्णानंतरचे दुसरे पूर्ण पुरुष वाटत आले आहेत. माणूस म्हणून जगताना गांधीजींच्या हातून अनेक चुका घडल्या, पण या चुका लिहिण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे जे सातत्याने प्रयत्न केले त्याला तोड नाही. मला जर पूर्ण पुरुष व्हायचं असेल तर मी किमान माणूस आहे का? माझ्यात इतरांबद्दल आदर आहे का? मी समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी स्वतला जोडू शकतो का? हे प्रश्न विचारायला हवेत.
वर्ष १९८८. एका सहृदय बिल्डरने माझा मित्र महेंद्र याला,‘ तुझे वडील इतकी वर्षे महिलांसाठी ‘मानिनी’ हे मासिक काढत होते, तर तू पुरुषांसाठी असा खास दिवाळी अंक काढू शकशील का?’ असा सवाल केला. क्षणभर महेंद्र गोंधळला आणि ‘उद्या सांगतो.’ असे सांगून तिथून सटकला. त्याच दिवशी रात्री माझ्या घरी आला. चेहेऱ्यावर टेन्शन दिसत होतं. पूर्वी मी अनेकदा त्याला म्हणालो होतो, संधी आपलं दार ठोठावत असते, पण आपले कान ते ऐकण्याइतके सावध नसतात. माझं हे वाक्य लक्षात ठेवून तो आला होता असे त्याने नंतर सांगितले. तो म्हणाला,‘पुरुषांसाठी असा वेगळा दिवाळी अंक असू शकतो का, हा माझ्यापुढचा प्रश्न आहे.’ मी खरे तर पत्रकारितेतला माणूस. दिवाळी अंक वगरे फक्त वाचणारा माणूस. मला समजेना उत्तर काय द्यावे? महेंद्रला वेगळे काहीतरी करून दाखवायची संधी होती. पसे दुसराच माणूस देणार होता. सर्व जोखीम त्याची होती. त्या कामाबद्दल महेंद्रला पसे मिळणार होते. मला त्याच्या विचारांचा अंदाज होता, पण वाचक ‘पुरुषांसाठी अंक’ ही कल्पना कशी स्वीकारतील अशी माझ्या मनात शंका होती. मराठीत तेव्हा आणि अजूनही ‘फक्त पुरुषांसाठी’ म्हणजे खिडकी चित्रे असलेले, चावटपणा भरपूर असलेले किंवा बया, अप्सरा, रंभा असे काही दिवाळी अंक प्रकाशित होत असत. त्या सगळ्या दिवाळी अंकांची ‘फक्त प्रौढ पुरुष’ वाचकांनी वाचायचे आणि लपवून ठेवायचे अंक’ असा छापा असायचा. महेंद्रला मी म्हणालो, ‘माझ्या मते पुरुषांसाठी असे लेबल न लावता पुरुषांचे मासिक असे त्याचे स्वरूप ठेवलेस तर कदाचित वाचकांना काहीतरी वेगळे देण्याचे समाधान मिळेल.’ अगदी खरं सांगतो, ते शब्द माझ्या तोंडून कसे गेले हे आजपर्यंत मला कळले नाहीये.
 त्याला ती कल्पना आवडली. तो म्हणाला, ‘पुरुष म्हणजे केवळ चावटपणा किंवा कामोत्तेजक साहित्य वाचणारा माणूस अशी त्याची प्रतिमा आजपर्यंत संपादकांनी खूणगाठ म्हणून धरून ठेवली आहे आणि या फक्त पुरुषांच्या दिवाळी अंकांनी एका मोठय़ा वाचक वर्गाचा ताबा घेतला आहे. या वाचक वर्गाचे काहीअंशी रंजन करावेच लागेल, पण पुरुष म्हणून जगत असताना त्याच्या विविध भूमिकांना पूरक ठरेल अशी माहिती द्यावी लागेल. त्यांच्या भावविश्वात नेमके काय होते आहे याचा आढावा घ्यावा लागेल आणि सर्वात प्रथम पुरुष हा माणूस म्हणून कसा घडायला हवा याचीही माहिती तज्ज्ञांकडून लिहून घ्यावी लागेल.’ नंतर तो खूप वेळ बोलत होता. इंग्रजीमध्ये विनोद मेहता आणि अनिल धारकर, ‘डेबोनेर’ हे पुरुषांचं मासिक काढीत असत. त्यात पुरुषत्वाचे अनेक पलू हाताळले जात. परंतु त्यातील अर्ध-नग्न मुलींच्या फोटोमुळे ते घरात लपवायचं मासिक होते. कित्येक जण फोटो फाडून घेऊन अंक रद्दीत टाकत असत.
एक दिवस असाच सकाळी सकाळी महेंद्र उगवला आणि म्हणाला,‘प्रसाद, हा अंक काढण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. त्याचे नावही ठरवले आहे-युगंधर. शिवाजी सावंत त्यावेळी श्रीकृष्णाच्या जीवनावर एक कादंबरी लिहीत होते. कादंबरी त्यानंतर अनके वर्षांनी प्रसिद्ध झाली. परंतु या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेविषयी त्यांचे काही लेख दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यापकी एका लेखात रामायण-महाभारत काळापासून एकच पूर्ण पुरुष झाला तो म्हणजे – युगंधर श्रीकृष्ण असा उल्लेख होता. त्या आधारावर ‘पूर्ण पुरुषांचा दिवाळी अंक’- युगंधर असे बारसे झाले. १९८८ मध्ये बरेच धाडस करून त्याने अंक प्रकाशित केला.
‘युगंधर’ सर्व दिवाळी अंकांपेक्षा अतिशय वेगळा होता. तेव्हाचे टाटा स्टीलचे सर्वेसर्वा रुसी मोदी यांची व्यवस्थापन कौशल्य सांगणारी दीर्घ मुलाखत अगदी सुरुवातीला छापलेली होती. त्याच्या पाठोपाठ सुहास भास्कर जोशी यांचा ‘कैझान’ या जपानमधील कार्यकुशलता वाढणाऱ्या प्रक्रियेवरचा लेख होता.  त्या अंकात रहस्यकथा, गूढकथा, शृंगारिक कादंबरी-अनुवाद- माधव मनोहर हे ‘युगंधर’मध्ये होतेच. मुंबईचे मधुकर तळवलकर यांनी व्यायामाची पूर्वतयारी फोटोसह दिली होती. कार आणि बाईक या दोन गोष्टी पुरुषांच्या प्राधान्यक्रमात बसतात म्हणून तेही होतं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुखपृष्ठावर खांदे उघडे ठेवलेली मॉडेल तर अंतरंगात ‘ओलेती’ ही फक्त पांढरी साडी घालून चिंब भिजलेली नायिका होती. महेंद्रच्या मते हा अंक पुरुषांचा अंक होता, पण पुरुषांना तो त्यांच्यासाठी असलेल्या अंकांप्रमाणे वाटला नाही आणि जेमतेम ५०० प्रती खपल्या.
हा सगळा प्रसंग आठवायचे कारण घडले. आमच्या संस्थेत डॉ. आलोक वाजपेयी हे ‘महात्मा गांधी एक माणूस’ या  विषयावर व्याख्यान देण्यासाठी आले होते. गाडीतून त्यांना आणायला मी गेलो होतो. बोलता बोलता ते म्हणाले, ‘गांधी हा मला खरोखर पुरुष माणूस वाटतो. माणूस म्हणून जगताना त्याच्या हातून अनेक चुका घडल्या, पण या चुका लिहिण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे जे सातत्याने प्रयत्न केले त्याला तोड नाही. महात्मा गांधी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या षड्रिपुंनी युक्त होते. कारण ते माणूस होते आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी ज्या चुका केल्या त्याचे प्रायश्चित्त त्यांनी घेतले. एकेकाळी कस्तुरबा गांधींवर हात उचलायला कमी न करणारे मोहनदास करमचंद गांधी १९४२ च्या ‘चले जाव’ अगोदर जेव्हा त्यांना अटक झाली, तेव्हा कस्तुरबांवर जबाबदारी सोपवून अटकेत गेले. स्वतच्या मुलांवर त्यांनी अन्याय केला, पण ते देशाचे पिता  बनले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या हातून घडलेले प्रमाद त्यांनी आपणहून लिहून ठेवले.
ते जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते, तेव्हासुद्धा त्यांची वकिलीची पद्धत खटला लढण्यापेक्षा सामोपचाराने समेट घडवून आणणारी होती. अिहसेचे सारे प्रयोग त्यांनी तिथेच सुरू केले. त्यांनी अस्पृश्य माणसांपर्यंत श्रीराम पोहोचवला. तोपर्यंत श्रीरामाची मक्तेदारी फक्त ब्राह्मण समाजाकडे होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना फाळणी नको होती. फाळणी भारताचे दुस्वप्न असेल याची पूर्ण कल्पना होती. म्हणूनच एकीकडे स्वातंत्र्य सोहळा चालू असताना ते धार्मिक दंगली आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहिले.
मला मोहनदास करमचंद गांधी हे श्रीकृष्णानंतरचे दुसरे पूर्ण पुरुष वाटत आले आहेत. श्रीकृष्ण चरित्र जसे नटखटपण, शृंगार, सामोपचार, स्वधर्मपालन, अर्जुनाबरोबर केलेलं मनसोक्त मद्यप्राशन, द्रौपदीचा सखा, रुख्मिणी असो वा सत्यभामा या त्याच्या पत्नींवर असलेलं अलोट प्रेम, सुभद्राहरणात केलेली चापलुसी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ अशा पौरुषाने भरलेल्या कहाण्यांनी ठासून भरलेलं आहे, तसंच गांधी चरित्राकडे बघणे म्हणजे पूर्ण पुरुष असलेल्या माणसाचे चरित्र आहे.
गांधी क्रोधी, खोटे बोलणारे आणि विलासी होते तर उर्वरित जीवनात ते सात्त्विक, अिहसेचे पुजारी आणि साधी राहणी अंगीकारणारे झाले. त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्याकडे एक इंच जमिनीची सुद्धा मालकी नव्हती. उत्तर आयुष्यातील त्यांचे ब्रह्मचाऱ्याचे प्रयोग टीकेस पात्र ठरले तरी त्यांना स्वतला स्वतच्या संयमाची परीक्षा घ्यायची होती आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांनी भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती अस प्रश्न विचारला तर, ‘मतभेद कितीही टोकाचे असले तरी समोरच्या व्यक्तीचा माणूस म्हणून आदर करणे’ हेच उत्तर ओठावर येते.
आपलं दुर्दैव असं की गांधींकडे आपण तुकडय़ातुकडय़ांत पाहतो. त्यामुळे गांधी आपल्याला परके वाटतात. गांधींनी कधीही दावा केला नाही की सबंध भारतातील करोडो लोक त्यांच्या पाठीमागे असतात. त्या पूर्ण पुरुषाची हत्या झाली. अिहसेचा ज्यांनी आयुष्यभर स्वीकार केला, त्यांचा अंत थेट हिंसेने झाला. आता कुठे राहिलेत या पुरुषाचे विचार? साधी राहणी आता विसरली गेली आहे. माणसाला दैवत्व दिले की तो पूजेपुरता राहतो आणि देखल्या देवा दंडवत घातला जातो.
मला जर पूर्ण पुरुष व्हायचं असेल तर मी किमान माणूस आहे का? माझ्यात इतरांबद्दल आदर आहे का? मी समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी स्वतला जोडू शकतो का? मी माझ्या आíथक जबाबदाऱ्या पेलतो का? मी स्त्रीला तिचे स्वातंत्र्य देतो का? माझं काम म्हणजेच माझा स्वधर्म असे मी मानतो का? इतरांना वा स्वतला त्रास न देता माझे जीवन आनंदी ठेवतो का? मी हिंसा त्याज्य मानतो का? आणि मी मला समजलेल्या सत्याच्या मार्गावर आहे का? हे प्रश्न विचारायला हवेत.
त्याची स्वतशी प्रामाणिक राहून उत्तरे दिलीत तर मी कुठे आहे ते मला समजेल. तेच पूर्ण पुरुष होण्याच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल ठरेल! पूर्ण पुरुषांची लक्षणे वाचूया ५ एप्रिलच्या अंकात.    

First Published on March 22, 2014 12:41 pm

Web Title: ugandhar to gandhi
टॅग Gandhi