उल्हास कशाळकर – chaturang@expressindia.com

‘‘एखादी कला आपल्यात मुळातच असणं किं वा त्याची आवड असणं आणि कलेत स्वत:ची काही भर घालू शकणं या दोन्हीच्या मध्ये एक मोठा प्रवास असतो. स्वत:चं स्थान निर्माण केल्यावरही हा प्रवास संपत नाही, कारण ते चिरंतन शिकणं असतं. प्रवासाला निघतानाच योग्य दिशा मिळाली तर पुढची माहीत नसलेली वाट सापडणं अधिक शक्य. अंगातलं बालपण सरून खऱ्या अर्थानं जगाची समज येऊ लागते त्या तरुण वयातच ही गोष्ट ठरत असल्यामुळे ‘पंचविशी’ महत्त्वाचीच..’’ सांगताहेत ‘पद्मश्री’, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ आणि ‘तानसेन सन्मान’प्राप्त ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर.

article about elon musk india visit elon musk investment in india
अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

वयाची २० ते ३० र्वष या ऐन तारुण्याचा काळ तुमच्यासाठी कसा होता, या प्रश्नावर मी विचार करतो तेव्हा ज्याला शब्दश: ‘गद्धेपंचविशी’ म्हणावं, असं मला काही आठवत नाही. मी कधी कुठला अविचारच केला नाही, अशी प्रौढी सांगण्याचा हेतू नाही. पण हा काळ माझ्यासाठी एकाच एका ध्येयानं भारलेला होता आणि त्यानं मला इतर कशाचाही विचार करू दिला नाही. ते ध्येयच तितकं  मोठं होतं, आहे. सहज साध्य होणाऱ्यातलं नाही. त्या मार्गावर चालण्याची माझी सुरुवात विशी ते तिशीच्याच काळात खऱ्या अर्थानं झाली. जेव्हा मी हे म्हणतो, तेव्हा एक मजेशीर गोष्ट जाणवते, की मी आयुष्यभर के वळ शास्त्रीय संगीत करणार आहे, हे मात्र मी आधीपासून ठरवलं नव्हतं आणि वयाची तीस र्वष उलटेपर्यंतही मी ते निश्चित के लं नव्हतं. पण मी पूर्णवेळ संगीत शिकत होतो, रियाज करत होतो. आता विचार करता असं वाटतं, की ही विद्या अशाच प्रकारे करायला हवी.

माझा जन्म पांढरकवडा, यवतमाळचा, १९५५ चा. घरात गाणं होतंच. माझे वडील (अ‍ॅड. नागेश कशाळकर) गायचे आणि मी लहानपणापासून त्यांच्याकडे शिकत होतो. माझे भाऊही गायचे. त्यामुळे घरात संगीतसाधनेसाठी कायम प्रोत्साहनाचं वातावरण होतं. मी नागपूर विद्यापीठातून ‘बी.ए.’ आणि नंतर संगीत विषयात ‘एम.ए.’ के लं. ते करताना मला हे समजलं, की के वळ या प्रकारे संगीताचं शिक्षण होऊ शकणार नाही. संगीतातली माहिती त्यातून मिळेलही, पण शिक्षण हवं असेल तर ते परंपरागत पद्धतीनंच घ्यावं लागेल. त्यामुळे कॉलेजचे तास संपल्यावरही मी गाणं शिकायला जायचो. आम्हाला ‘एम.ए.’ला शिकवणारे प्राध्यापक राजाभाऊ कोगजे (अनंत के शव कोगजे), प्रभाकरराव खर्डेनवीस हे विद्वान होते. याच काळात मला कें द्र सरकारची संगीतासाठीची एक शिष्यवृत्तीही मिळाली होती. ती होती, ३०० रुपये. ‘एम.ए.’ पूर्ण झाल्यावर अगदी गुरूगृही नाही, पण गुरूंच्या सान्निध्यात राहून पूर्णवेळ संगीत शिकण्याचा विचार मी पक्का के ला. मला पं. राम मराठे आणि पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडे शिकायची इच्छा होती. मला ‘एम.ए.’ला दोन सुवर्णपदकं ही मिळाली होती. या परिस्थितीत चांगली नोकरी मिळवणं त्या काळी अवघड नक्कीच नव्हतं. अशा वेळी मला गजाननबुवांकडे रीतसर गुरू-शिष्य परंपरेत शास्त्रीय संगीत शिकावंसं तळमळीनं वाटणं आणि त्यासाठी झोकू न देणं ‘गद्धेपंचविशी’त अनपेक्षित होतं.

गाणं ही २-३ वर्षांत शिकण्याची गोष्ट नाही आणि त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल, हे माझ्या घरच्यांना मान्य होतं. घरची खूप मोठी अशी काही जबाबदारी माझ्यावर नव्हती. त्यामुळे मी अगदी वयाच्या तिसाव्या वर्षांपर्यंत जरी पूर्णवेळ गाणं शिकलो आणि या काळात नोकरी-व्यवसाय के ला नाही, तरी घरच्यांची त्याला परवानगी होती. मी असा निर्णय घेतला होता, तरी आधी म्हटल्याप्रमाणे आयुष्यात के वळ गाणंच करायचं हा निर्णय तोपर्यंत झालेला नव्हता. अर्थात कु णी लहानपणापासूनच तसं ठरवायला हरकत काहीच नसावी. पण या क्षेत्रात स्वत:चं काही मिळवायचं असेल, तर त्याला वेळ लागतो. नावही उशिराच होतं. एखादा उत्तम खेळाडू पस्तिशीच्या सुमारास निवृत्तीची तयारी करत असेल, पण शास्त्रीय संगीतातला गायक तिशी-पस्तिशीतही नवोदितच समजला जात असतो. शिवाय प्रत्येकाला या क्षेत्रात अपेक्षित यश मिळतंच असंही नाही. कदाचित या सर्व गोष्टी नकळत माझ्या डोक्यात सुरू असतील. पण तेव्हा तरी मला संगीतसाधना अधिक महत्त्वाची वाटत होती, व्यावसायिक गायक बनण्याचा विचार नव्हता. वयाची विशी ते तिशी हा पुढच्या आयुष्यासाठी पायाभरणीचा काळ म्हणतात. तसा माझाही या रियाजाच्या निमित्तानं पाया मजबूत करण्यात गेला.

पं. राम मराठे ठाण्याला राहात असत, तर पं. गजाननबुवा जोशी डोंबिवलीत राहायचे. मग मीही डोंबिवलीला जाऊन राहाण्याचं ठरवलं. प्रसिद्ध साहित्यिक पु. भा. भावे यांचा तिथे बंगला होता. त्यांच्या घरात मला एक खोली भाडय़ानं मिळाली आणि ठाण्यात माझं संगीत शिक्षण सुरू झालं. तेही नागपूरचे आणि मीही. ते कधी कधी माझ्या खोलीवर येत, चौकशी करत. पं. राम मराठे हे नाटय़संगीतातलं प्रचंड मोठं नाव असूनही मी त्यांच्याकडे नाटय़संगीत कधीच शिकलो नाही, के वळ ख्याल गायकी शिकलो. ख्याल गायकीमध्ये त्यांची एक स्वतंत्र शैली होती आणि त्यात ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्यांच्या गायकीचा संगम होता. डोंबिवली आणि ठाणे हा भाग सांस्कृतिक कार्यक्रमांचं कें द्र असल्यासारखाच होता. अनेक संगीतकार, साहित्यिक, कलाकार या भागात राहायचे. संगीताचे कार्यक्रम, जाहीर भाषणं, कवीसंमेलनं, असे सतत काही ना काही उपक्रम सुरू असायचे. मी अशा खूप कार्यक्रमांना जात असे. या काळात शास्त्रीय संगीतातील उत्तुंग व्यक्तींचं  गाणं ऐकण्याची संधी मला मिळाली. मोगूबाई     कु र्डीकर, पं. भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर यांचं गाणं, पं. रविशंकरांसारख्या कलाकारांचं वादन मी ऐकत होतो. गणेशोत्सवामध्ये तर जवळपास दररोज एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ४-५ मोठय़ा कलाकारांचे कार्यक्रम सुरू असत. एकीकडे संगीताचं शिक्षण सुरू असताना मी हे ऐकत होतो, कलाकारांची बलस्थानं समजून घेत होतो. त्यातून मला जे घेता येईल, ते घ्यायचा प्रयत्न करत होतो. पु. भा. भावे, शं. ना. नवरे आणि विविध साहित्यिकांच्या भाषणांना जाऊन बसत होतो. संगीत नाटकं , इतर मराठी नाटकं  आणि चित्रपट पाहाणं, साहित्य वाचणं, अगदी कृष्णधवल टीव्हीवर क्रिके टचे सामने पाहाणं अशा सर्व गोष्टी मी या काळात के ल्या. ही सगळी एक शिक्षणाची प्रक्रिया होती. या गोष्टींचा आपल्यावर आपल्याही नकळत परिणाम होत असतो. चांगली कला अनुभवण्याचा प्रत्येक अनुभव विचारप्रवण करत असतो, वेगळी दृष्टी देत असतो.

हे वय आपण ‘कु णासारखं तरी’ व्हावं असं वाटण्याचंही असतं. इतक्या मोठमोठय़ा कलाकारांना ऐकत असूनही माझ्या डोक्यात ‘रोल मॉडेल’ ही संकल्पना नव्हती. याचं कारण असं, की प्रत्येक कलाकाराची त्याची म्हणून असलेली शैली त्या कलाकारांना ऐकताना मी समजून घेत होतो. अशी वेगळी शैली कमावण्यासाठी आपण स्वत:च काहीतरी करायला हवं, कु णाच्या गायकीसारखं मी गाणं योग्य नाही, हे उमजत होतं. माझ्या मर्यादा आणि माझ्यातले चांगले गुणही माझ्या लक्षात येत होते. शिवाय कान टोचायला गुरू होतेच. माझे गुरू   पं. गजाननबुवा जोशी स्वभावानं कडक. त्यांना अपेक्षित आहे, तसंच झालं पाहिजे यासाठी ते आग्रही असायचे. पण संगीत काय असतं, संगीताचा दर्जा काय असतो, याची दृष्टी त्यांच्याकडे मिळाली. मी त्यांच्याकडे संगीत तर शिकायचोच, पण ते रोज दुपारी व्हायोलिन वाजवत असत, संध्याकाळी त्यांच्याबरोबर फेरफटका मारायलाही जायचो. घरी सकाळी साडेसहा वाजता रियाजाला बसायचो, नंतर ९ वाजता गुरुजींकडे जायचो, त्यांच्याकडून १२ वाजता घरी येऊन दुपारी २ वाजताच्या सुमारास पुन्हा जायचो. रात्री घरी स्वत:चा रियाज सुरू होताच. रियाज ही नियमित करण्याची गोष्ट असल्यामुळे आमच्यासाठी सर्व दिवस सारखे होते. ‘गद्धेपंचविशी’ या शब्दात अपेक्षित असतो तसा तरुण वयात घडणारा अविचार माझ्याबाबतीत घडला नाही, याचं कारण इथं होतं. एका लक्ष्यानं आणि स्वप्नानंच आम्ही सर्वजण तिथे एकत्र आलो होतो.

संगीतसाधनेत गुरू किती महत्त्वाचा असतो, हे मला या काळात प्रकर्षांनं जाणवलं. मी लहानपणापासून संगीताच्या सान्निध्यात वाढलो आणि तेव्हापासूनच गातही होतो. संगीत स्पर्धामध्ये सहभागी होत होतो, १४ व्या-१५ व्या वर्षांपासूनच जाहीर कार्यक्रमांमध्ये गाण्याची संधी मला मिळू लागली होती. लहानपणी या सगळ्याचं लोकांकडून खूप कौतुक होत असे. आता मी हे मान्य करतो, की ते माझं गाणं काही अप्रतिम म्हणावं असं नव्हतं, पण अनेकदा     ‘मी किती छान गायलो’ असं मलाच वाटून जात असे. अशा ठिकाणी तुम्हाला तुमची ओळख करून देणारा गुरू गरजेचा असतो.

पं. गजाननबुवांकडे शिकताना असा एखादा प्रसंग घडला, की ते मला त्याच संगीतकृतीचा कोणतातरी नवीन पैलू उलगडून दाखवत. त्यांचं ऐकल्यावर समजे, की त्यासारखं काहीच आपल्याला जमलेलं नाहीए!

ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा घराण्यांची गायकी, त्यांच्या शैलीची वैशिष्टय़ं मला आवडत होती. त्यात माझं असं काय निर्माण करता येईल याचा मी विचार करत होतो, तसा प्रयत्न करत होतो. खरंतर या घराण्यांच्या गायकीत खास साम्य असं काही सांगता येणार नाही. त्यामुळे त्यांचा मेळ घालत उत्तम काय सादर करता येईल, ही प्रक्रिया माझ्यातील विद्यार्थ्यांसाठी खूप रोचक होती, नवीन शिकल्याचा आनंद देणारी होती.

याच काळात मला साताऱ्यातील औंध संस्थान येथील ‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’साठी संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळाली. हे आणखी वेगळं आणि महत्त्वाचं शिक्षण होतं. अशा अनेक गोष्टी आपण करत असतो, ज्या करताना त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उपयोग होत आहे याची कल्पनाही येत नाही, तशी ती गोष्ट होती. आपल्या क्षेत्रातील नवीन माणसांना भेटताना ते क्षेत्र आणखी खोलवर जाऊन समजून घेता येतं.  वयाच्या २८-२९ व्या वर्षी मी मुंबईत ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये ‘प्रोग्रॅम एक्झिक्युटिव्ह’ म्हणून नोकरीला लागलो आणि चांगली ७-८ र्वष ही नोकरी के ली. व्यावसायिकदृष्टय़ाही के वळ संगीत करण्याचा निर्णय मी पुढच्या या काळात पक्का के ला. तोपर्यंत मला अनेक कार्यक्रमही मिळू लागले होते. याच काळात माझं लग्न झालं. माझी पत्नीही आकाशवाणीमध्ये प्रोग्रॅम एक्झिक्युटिव्ह होती.

पंचविशीच्या वयात मी जे करत होतो तो संगीताच्या शिक्षणाचा पाया होता. लवकरात लवकर संगीताचे जाहीर कार्यक्रम करायला लागावेत आणि प्रसिद्ध व्यावसायिक गायक व्हावं, असा अनावर मोह होण्याचं हे वय असतं. तसं वाटणं साहजिकही आहे. त्या वयात हा पाया मजबूत घातला जाणं किती महत्त्वाचं आहे, हे मला आता जाणवतं. हे शिक्षण कधीही न संपणारं, सतत नवीन शोधण्यासाठी आपल्याला जागं ठेवणारं आहे. त्याची दृष्टी विशी ते तिशीच्या वयात मिळणं हे म्हणूनच फार मोलाचं.

आज साठी सरल्यावर ‘गद्धेपंचविशी’ या शब्दावर जेव्हा रेंगाळतो तेव्हा सहज मनात येतं, पंचविशी आपल्या आयुष्यात आलीच, पण ती संगीताचा पाया मजबूत करून घेणारी! पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवणारी ‘पंचविशी’ होती.

शब्दांकन- संपदा सोवनी