27 February 2021

News Flash

मी, रोहिणी.. : ‘बा’ समजून घेताना..

मी आजवर वेगवेगळ्या भूमिका के ल्या, पण सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटातील ‘कस्तुरबां’च्या भूमिके नं मला दिलेली  वेगळी ओळख मात्र कायम राहिली.

‘स्क्रीन टेस्ट’ साठी घेतलेला हा फोटो कस्तुरबांची भूमिका मिळण्यासाठी साहाय्यभूत ठरला

रोहिणी हट्टंगडी – whattangadyrohini@gmail.com

मी आजवर वेगवेगळ्या भूमिका के ल्या, पण सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटातील ‘कस्तुरबां’च्या भूमिके नं मला दिलेली  वेगळी ओळख मात्र कायम राहिली. माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या भूमिके नं दिलेली ती ओळख.., त्यावेळचं ते अचानक ‘स्क्रीन टेस्ट’साठी आलेलं बोलावणं, पहिल्यांदाच घडलेला विमान प्रवास, सर रिचर्ड यांची भेट आणि ज्यांच्याविषयी फारसं साहित्य उपलब्ध नाही त्या ‘बां’ना समजून घेण्याचा प्रवास निव्वळ रोमांचक होता..’’

कलाकाराच्या आयुष्यात त्याला ओळख देणारी एक व्यक्तिरेखा असते. मिळते असं म्हणू या हवं तर! त्याच छायेत तो वावरत असतो. अनेक विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारूनही ती त्याची ओळख कधीच पुसली जात नाही. तुलना नाही.. पण अमिताभ बच्चनचा ‘अँग्री यंग मॅन’ किंवा अमजद खानचा ‘गब्बर सिंग’.. तशी माझी ‘कस्तुरबा’! ‘बा’च्या भूमिकेनं मला इंडस्ट्रीमध्ये एक ओळख दिली. माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीलाच मला ही भूमिका साकारायला मिळाली.. तशी काही कल्पना नसताना!

झालं असं, मी होते माझ्या ‘रथचक्र’ नाटकाच्या दौऱ्यावर. कुणी मला त्या वेळी सांगितलं असतं की १५ दिवसांत तू इंग्लंडला जाणार आहेस तर मी त्याला वेडय़ात काढलं असतं! कारण माझ्याकडे पासपोर्टच नव्हता! पण अहो आश्चर्यम्! मी १२ जुलै १९८० ला सर रिचर्डना (तेव्हा ते ‘सर’ होते. ‘लॉर्ड’चा किताब त्यांना नंतर मिळाला. त्यामुळे मी त्यांना सर असं उल्लेखलं तर माफ करा. सवय!) भेटले आणि २१ जुलैला मी लंडनमध्ये ‘स्क्रीन टेस्ट’ देत होते. केवळ अविश्वसनीय ना? या दरम्यान कमलाकर सारंग यांनी नाटकाचे प्रयोग सांभाळून घेणं, माझा पासपोर्ट (टेंपररी) मिळणं, मी ‘सीन’साठीची तयारी करणं- म्हणजे अगदी साडी-ब्लाउजपासून कुंकू-मंगळसूत्र यांची जमवाजमव करणं. दिलेला सीन डोळ्याखालून घालणं. त्यातही ‘रथचक्र’चे प्रयोग. पासपोर्ट मिळायलाही उशीर लागत होता आणि कुणाला ‘मी आयुष्यात प्रथमच परदेशी जाणार’ असं सांगायचीही चोरी! न जाणो ऐनवेळी नाहीच मिळाला तर? पासपोर्ट एका शनिवारी संध्याकाळी हातात पडला आणि माझा जीव भांडय़ात पडला. (यात, माझी नंतर छान मैत्रीण झालेली डॉली ठाकूर हिचा महत्त्वाचा हात होता.) आणि तीन दिवसांसाठी मी इंग्लंडला गेले.

आयुष्यात प्रथमच भारताबाहेर जात होते. आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा विमानाचा प्रवास करणार होते, तीही एकटी. अशा लोकांमध्ये जात होते जिथं इंग्रजी शब्द अडला तर हिंदी किंवा मराठीचा आधार घेता येणार नव्हता. शिवाय स्क्रीन टेस्ट.. म्हणजे परीक्षाच ती. किती ते टेन्शन! तरी बरं, जयदेवनं (हट्टंगडी) समोर बसून मला नीट समजावून सांगितलं होतं, ‘‘तू अभिनय चांगला करशीलच, त्याबद्दल मला काळजी नाही. फक्त तू रंगभूमीवर नाहीस, कॅमेऱ्यासमोर असणार आहेस. ते भान ठेवून सीन कर. आणि दुसरं, ‘मला ही भूमिका पाहिजेच’ असा विचार करू नकोस. आपलं काम चोख करायचं. मग जे व्हायचंय ते होईल. नसता विचार करत कामावर परिणाम होऊ द्यायचा नाही.’’ आयुष्यात अनेक गोष्टी कायमच्या मनावर ठसतात त्यातली ही आणखी एक- आपलं काम चोख करायचं, व्हायचं ते होणारच!

हे अनुभव लिहिताना ‘काय लिहिलं नाही तरी चालेल’ असा विचार करायला लागतो..

तिथे विमानतळावर मला घ्यायला राणी दुबे (कार्यकारी निर्मात्या) आल्या होत्या. त्यांनी मला सर रिचर्ड यांच्या घरी नेलं चहासाठी. तिथं रिचर्ड यांनी एक खूण घातलेलं जाडजूड पुस्तक उघडून दिलं आणि ‘या मुलाबरोबर तुला उद्या स्क्रीन टेस्ट करायची आहे’ असं सांगितलं. तो बेन किंग्जलेचा फोटो होता आणि खाली त्यांची संपूर्ण माहिती म्हणजे ‘बायोडाटा’. ते पुस्तकच तसं होतं- प्रत्येक पानावर एक कलाकार. दुसऱ्या दिवशी स्क्रीन टेस्ट. मी स्टुडिओत पोहोचले. अर्थात गाडी पाठवलीच होती. मला मेकअप रूममध्ये घेऊन जायला एका सहाय्यकाला सांगितलं. इमारतीत एक लांब कॉरिडॉर आणि खोल्या होत्या. एका खोलीपाशी तो थांबला. आत जाताना माझं लक्ष गेलं, दारावर माझं नाव लिहिलं होतं- फडऌकठक ऌअळळअठॅअऊ. स्पेलिंगची चूक न करता. ओहो! काय भारी वाटलं म्हणून सांगू! पण एकटीच सगळं अनुभवत होते ना!

मी तयार झाले. तयारी करूनच आले  होते. सीन दिला होता -दक्षिण आफ्रिकेत असताना कस्तुरबा संडास साफ करायला नकार देतात तो. भांडणाचा. वाक्यं फार नव्हतीच. सर रिचर्डनी मला पाहिलं. चेहऱ्यावरून खूश वाटले. म्हणालेसुद्धा, ‘‘यू आर लुकिं ग लाईक बा इन फोटो!’’ मग मला बेनच्या रूममध्ये घेऊन गेले, ओळख करून दिली. मग म्हणाले, ‘‘आता मी शॉटच्या तयारीला लागतो.’’ ते निघून गेले. मी विचार करत राहिले. बेनला म्हणावं का, की एकदा संभाषण बोलून पाहू या. इथं काय पद्धत असते माहिती नाही. कसं वाटेल त्याला.. आणि अचानक तोच म्हणाला , ‘‘शुड वुई डू अवर लाईन्स रोहिणी?’’ हुश्श झालं मला. म्हटलं, सगळीकडे त्याच पद्धती! लाईन्स काय चार-पाचच होत्या. तरीही एकदा बरोबर म्हणून पाहिलं की एकमेकांचा अंदाज येतो, आवाजाची पट्टी कळते, मूड लक्षात येतो. मग मंचावर, सेटवर एकमेकांशी जुळवून घेता येतं आणि आपण ‘केमिस्ट्री’ म्हणतो ती जुळून येते. बेनबरोबर जी जुळली ती अगदी शेवटपर्यंत!

स्क्रीन टेस्टसाठी आणखी चौघं होते. नसिरुद्दीन शाह, स्मिता पाटील यांची एक जोडी आणि जॉन हर्ट आणि भक्ती बर्वे यांची दुसरी. लागोपाठ तीन दिवस तीन जोडय़ा. माझी टेस्ट पहिली झाली. तिसऱ्या दिवशी रिचर्ड ती बघणार होते. आदल्या दिवशी संध्याकाळी स्मिता, भक्ती, नसीर आणि मी, आम्हा चौघांना रिचर्ड डिनरसाठी घेऊन गेले. तेव्हा रिचर्डनी मला चार वेळा म्हटलं असेल, ‘‘उद्या मी तुझी टेस्ट बघणार आहे.’’ मला राहावलं नाही. शेवटी मी विचारलंच, ‘‘मीसुद्धा बघू शकते का?’’ उत्तर आलं, ‘‘येस लव्ह, ऑफकोर्स!’’ तीन-चार मिनिटांचा सीन तो. पटकन संपला. बघायला रिचर्डव्यतिरिक्त चार लोक होते. रिचर्ड यांच्या पत्नी शीला (म्हणजे शीला सिम. त्यांना मी ‘शीलाजी’ म्हणायची. आवडायचं त्यांना! आणि मलाही. ‘एनएसडी’मध्ये आमच्या अभिनयाच्या शिक्षिका शीला वत्स होत्या त्यांची आठवण.)  राणी दुबे, मायकेल स्टॅन्ले इव्हान्स- हे दुसरे कार्यकारी निर्माते आणि मी. मी गप्पगप्पच होते. कोणी चर्चा वगैरे करायचा प्रश्नच नव्हता. कारण बाकी टेस्ट्स झाल्या नव्हत्या. पण रिचर्डनी मला विचारलं, ‘‘सो.. हाऊ डिड यू लाईक इट?’’ आता काय उत्तर देणार? मी आपलं जरा मान डोलावून ‘‘ओके .’’ असं काहीतरी म्हटलं असावं. रिचर्ड हसले आणि जे जयदेवनं निघायच्या आधी सांगितलं होतं तेच मला सांगितलं, की हा कॅमेरा आहे. नुसता विचार जरी केलास तरी कॅमेरा अचूक टिपतो तुमचा चेहरा. उगाच जास्त अ‍ॅक्टिंग करायला गेलात की तो ‘मेलोड्रामा’ वाटतो.

लंडनहून परत आले आणि ‘थँक्यू’ म्हणायला डॉलीला फोन केला. मला तिनं काही बोलू न देता सर रिचर्डचा निरोप सांगितला, की मी माझं वजन कमी करायला हवं. निदान आठ किलो. फार नाही, मी होते थोडी वजनदार! पण २७ ते ७४ वर्षं अशी वयाची ‘रेंज’ दाखवायची तर जरा बेतात हवं ना? देहयष्टीप्रमाणे तुमच्या भूमिकाही ठरवल्या जातात ना. म्हटलं, काम मिळणं न मिळणं नंतर बघू या. तरी वजन कमी करून आपलाच फायदा. असो.

यानंतर जवळपास एक महिन्यानंतर मला सांगण्यात आलं, म्हणजे सर रिचर्डनीच फोनवरून सांगितलं, की ‘‘येस रोहिणी, यू आर ऑन!’’ मग मात्र खरीखुरी तयारी सुरू झाली. माझी पिढी स्वातंत्र्योत्तर काळातली. आम्हाला गांधीजी माहिती ते स्वातंत्र्यलढय़ातले. मनात येत होतं, काय असं दाखवण्यासारखं असेल त्यांच्या जीवनात? त्यामुळे ‘सत्याचे प्रयोग’ हे गांधीजींचं आत्मचरित्र वाचणं अपरिहार्य. ते आणून वाचलं. मग कळलं!

प्रत्यक्षात असलेली व्यक्ती साकारणं हे जरा अवघडच. अनेक जणांनी त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं असतं. तुलना होते. मी त्या बाबतीत नशीबवान. कारण गांधीजींइतक्या बा कोणीही फारशा बघितल्या नव्हत्या. त्यांच्या आणि माझ्या चेहऱ्याच्या ठेवणीत अजिबात साम्य नाही. त्यामुळे त्यांच्या अंतरंगापर्यंत जाणं गरजेचं होतं. तेच मला करायचं होतं. ‘बां’बद्दल जमेल तेवढी माहिती गोळा करायला सुरवात केली. कुठे काही लिहिलेलं मिळत नव्हतं. गांधीजींवरची किती पुस्तकं वाचणार? मग मुंबईच्या ‘मणी भवन’मध्ये गेले. तिथे लावलेले ‘बा’चे फोटो पाहिले. नुसत्या फोटोंनी काम होणार नव्हतं. म्हणून माहितीपट पाहिला. तिथेही फार कमी दर्शन झालं. दिल्लीला दोन पुस्तकं मिळाली- ‘हमारी बा’ आणि ‘बा और बापू की शीतल छाया में’. शेवटी दिल्लीला ‘हमारी बा’च्या लेखिका वनमालाबेन पारीख यांची भेट झाली. त्यांचं लहानपण ‘बा’बरोबर आश्रमात गेलं होतं. त्यांच्याकडून कस्तुरबांबद्दल बरीच माहिती मिळाली. हळूहळू ‘बा’ माझ्या मनात आकार घेत होत्या. आता प्रश्न होता, जो गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य भाग- चरखा! चित्रीकरण दिल्लीत सुरू होणार होतं. ते सुरू व्हायच्या आधी एक महिनाभर तिथे जाऊन राहायला लागणार होतं. चालू असलेली दोन नाटकं सोडून जायला लागलं. गेले. चरखा आणि स्पष्ट इंग्रजी या दोन गोष्टींचं ‘ट्रेनिंग’ चालू झालं. त्यांना इंग्रजी शब्दोच्चार व्यवस्थित व्हायला हवे होते. ‘इंडियन इंग्लिश’ असलं तरी!

चित्रपटाचं स्क्रिप्ट  मिळालं होतं. आता त्यावरही काम करायचं होतं. ‘बां’च्या २७ व्या वर्षांपासून ७४-७५ व्या वर्षांपर्यंत हळूहळू वयाचं स्थित्यंतर दाखवायचं होतं. कुठल्या प्रसंगात किती वय असेल त्याचा हिशेब मांडला. त्यासाठी घटना आणि त्या वेळी कस्तुरबांचं वय काय असेल, त्याचा मेळ घालायचा होता. त्यानंतर मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसरबरोबर चर्चा करून केस कसे हळूहळू पांढरे होत गेलेले दाखवायचे, ते ठरलं. त्यासाठी वेगवेगळे दोन विग बनवून घेतले. मेकअपसाठी आधीच इंग्लंडला जाऊन माझ्या चेहऱ्याचा ‘मोल्ड’ त्यांनी तयार करून घेऊन त्यावर काम केलं होतंच. आणि हे सगळं चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी बरं! ‘ऐन वेळी पाहू’ हा दृष्टिकोनच त्यांना माहिती नाही. सगळं कसं शिस्तबद्ध. ‘प्लॅन ए’, ‘प्लॅन बी’ सगळं तयार. तुमची भूमिकेसाठी निवड झाली म्हणजे पुढची सगळी तयारी, अभ्यास तुम्हीच करायचा, हीच अपेक्षा. मला ते फार जड नाही गेलं याचं कारण माझी नाटकाची पाश्र्वभूमी. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातलं माझं शिक्षण. पोशाखावर लक्ष द्यायला भानूजी (वेशभूषाकार भानू अथैया) होत्याच. त्यांनी मुंबईतच ‘ट्रायल्स’ वगैरे घेतल्या होत्या. त्यांनी  ‘बां’च्या एका फोटोवरून बघून एक साडी भरतकाम करून घेतली होती. अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांचं काम होतं आणि त्याची पावती त्यांना ‘ऑस्कर’ पुरस्काराच्या रूपात नंतर मिळालीच.

अशा जय्यत तयारीनिशी २७ नोव्हेंबर १९८० ला ‘गांधी’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 1:09 am

Web Title: understading baa from gandhi movie mee rohini dd70
Next Stories
1 वसुंधरेच्या लेकी : द अँग्री ब्लॅक गर्ल!
2 गद्धेपंचविशी : अनुभवसमृद्धीची ‘पंचविशी’!
3 शांतता, टोमणे सुरू आहेत..
Just Now!
X