ch0331मध्यंतरी मुंबईतील दहावीची मुलं नाकाने ड्रग्ज हुंगताना पकडली गेली होती. त्यांची शिक्षिका हुशार मुलांकडे लक्ष देते आणि कमी गुण मिळविणाऱ्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करते या रागामुळे ती व्यसनाकडे वळली होती. या व्यसनाधीनतेची कारणे व उपाय याविषयी आजच्या भाग दोन मध्ये.
दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविलेल्या लोकेशला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि त्याचं महाविद्यालयीन जीवन सुरू झालं. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. महाविद्यालयाची नवलाई, नवीन मित्र-मैत्रिणी, एकूणच कॉलेज लाइफ तो छान, मस्त ‘एन्जॉय’ करीत होता. याच काळात त्याची महाविद्यालयातून काढून टाकलेल्या मुलांशी मैत्री  झाली. त्यांच्या बरोबरीने महाविद्यालयात धमाल करताना दारू, गांजा, म्याऊ  या व्यसनांशी कधी ओळख झाली आणि त्याची सवय कधी जडली हे कळलंच नाही. ज्या दिवशी पॉकेटमनी मिळायचा तो दिवस म्हणजे त्याच्यासाठी जणू महागडी ड्रग्ज खरेदी करण्याचा दिवस असायचा. तीच त्याच्या व्यसनाधीनतेची सुरुवात होती. पालकानांही त्याचं वागणं खटकायला लागलं होतं, पण अभ्यासात एवढा हुशार असलेला मुलगा अमली पदार्थाच्या आहारी जात असेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.
  परिणाम शेवटी व्हायचा तोच झाला. तासन्तास तो एकाच जागी बसून राहायला लागला. त्याचा चेहरा निस्तेज, उदासीन दिसायला लागला आणि हिमोग्लोबिन ९ ग्रॅमपर्यंत खाली आलं. कमी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. खरी परिस्थिती समोर आली तेव्हा पालकांना धक्का बसणं स्वाभाविक होतं. आणि बहुतेक घरात होतं तेच झाले, वडिलांनी आईला दोष द्यायला सुरुवात केली आणि आपली जबाबदारी झटकली. पण याने प्रश्न सुटणार नव्हता. लोकेशला ढासळलेली प्रकृती पाहता आधी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि त्यानंतर त्याची रवानगी व्यसनमुक्ती केंद्रात केली गेली. केंद्रात उपचारांना सुरुवात होताच लोकेश घरी जाण्यासाठी वडिलांकडे हट्ट करू लागला. पालक इथेच पहिली चूक करतात आणि उपचार थांबवून मुलांना घरी घेऊन जातात. पण त्याने प्रश्न आणखी जटील बनतो. सुरुवातीचे उपचार रुग्णालयात किंवा व्यसनमुक्ती केंद्रात राहूनच घेणे गरजेचे असते. कारण त्यामुळे मेंदूला पूर्ण विश्रांती मिळते आणि मेंदू शांत झाला की समुपदेशनाने मनातील तगमग दूर करणे सोपे जाते. योगासने, सगळ्यांनी एकत्र बसून केलेली मनमोकळी चर्चा, नियमित व्यायाम, ध्यानधारणा, उपचारादरम्यान घेतले जाणारे सांघिक खेळ आणि गप्पा असा या केंद्रातील दिनक्रम असतो आणि तो घरी राबविता येत नाही. त्यासाठी तिथे राहणे आवश्यक असते.  
 तणाव कसा कमी  करावा, नाती जोपासण्याचे कौशल्य कसे आत्मसात करावे आणि व्यसनांकडे जाण्यापासून स्वतला कसे रोखावे याचे शिक्षण तिथे दिले जाते. लोकेशला यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या शिक्षकांनी खूप मदत केली आणि त्याच्या वडिलांना समजावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘अमली पदार्थ वाईट आहेत, तुमचा मुलगा वाईट नाही.’ असे शिक्षकांनी सांगितल्यावर त्यांनाही आशा वाटू लागली. व्यसनापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करीत असताना महिन्याभरात लोकेशने पुन्हा एकदा गांजाचे सेवन केले. हे समजताच वडिलांच्या मनातील आशा निराशेत बदलली. त्यांनी तातडीने आम्हाला बोलावून घेतले आणि ‘या मुलाला घरापासून कुठेतरी लांब घेऊन जा’ असे ते सांगू लागले. या प्रकाराला ‘वन टाइम एरर’ म्हणतात. पूर्वस्थितीत आल्यानंतर मात्र मुलांनी त्यांना व्यसनाकडे ओढणाऱ्या सगळ्या संकेतांपासून दूर राहायला पाहिजे.  व्यसन करणाऱ्या मित्रांपासून दूर राहणे, व्यसनाकडे ओढणाऱ्या किंवा व्यसनांच्या ठिकाणांपासूनसुद्धा दूर राहायचे. रस्त्यावरून जाताना बार दिसला तरी तिकडे फिरकायचे नाही आणि आपल्या रिकाम्या वेळेचे चांगले व्यवस्थापन करायचे. समुपदेशकाच्या साहाय्याने हे शक्य असते. लोकेश त्याच्या रिकाम्या वेळेत बॅडिमटन  खेळायला लागला, ड्रम्स वाजवायला शिकला आणि रोज जवळच्या देवळात ध्यानधारणा करू लागला. त्याचे पालक त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि आज वडील त्याचे सर्वात जवळचे आणि चांगले मित्र आहेत.  
दुसरा प्रकार म्हणजे कॉकटेलमधून केले जाणारे व्यसन. मुलीसुद्धा सहजपणे याकडे ओढल्या जातात. एके दिवशी शालिनी जेव्हा रात्री उशिरा पार्टीहून परतली तेव्हा तिची मद्यधुंद अवस्था पाहून तिच्या पालकांना मोठा धक्काच बसला. ती धड चालू शकत नव्हती आणि विस्कटलेल्या कपडय़ांचेसुद्धा तिला भान राहिले नव्हते. तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिची अवस्था पाहून तिला घरापर्यंत आणून सोडले होते. तिचा  मी अभ्यास केला तेव्हा ती एकटीच नव्हे तर त्या विशिष्ट वयोगटातील अनेक मुलांमध्ये मला ही समस्या आढळून आली. याची सुरुवात नववी-दहावीत म्हणजे शालेय गटातील मुला-मुलींमध्ये होत असल्याचे दिसले. विशेष म्हणजे व्यसन करण्याची त्यांची पद्धतसुद्धा अगदी एकसारखी होती. म्हणजे पार्टीला जाण्यासाठी ही मुलं उतावीळ व्हायची आणि पालकांनी परवानगी देईपर्यंत ते त्यांचा पिच्छा सोडायची नाहीत. पालक नाही म्हणाले तर थेट जिवाचं काहीतरी बरं-वाईट करून घेण्याची धमकी द्यायची. एकदा मद्यपान केलं की त्यांना त्यांच्या कपडय़ाची शुद्ध नसायची तर काहींना त्यांनी मद्यातून काय सेवन केला आहे हेसुद्धा आठवायचे नाही.  
एक मुलगी सातत्याने मद्यपान करायची आणि त्यापासून तिला रोखण्याचे पालकांचे प्रयत्न निष्फळ ठरू लागले होते. मी त्या मुलीशी बोललो तेव्हा तिने अनेक गोष्टी शेअर केल्या. दारू प्यायल्याने सर्दी-खोकला होत नाही, वजन वाढते, ताण-तणाव दूर होतात,आत्मविश्वास वाढीस लागतो, सेक्सलाइफ अधिक उत्साहपूर्ण होतं वगैरे वगैरे अर्थात या सगळ्या दंतकथा होत्या आणि ती त्याच खऱ्या मानून चालली होती. त्यातच तिचे वडील तिच्याशी याबाबत अतिशय अपमानास्पद बोलायचे आणि असभ्य भाषेत दटावायचे. त्यामुळे गोष्टीतील चूक कळण्याऐवजी ती त्याच विचारांना कवटाळून बसली होती. तिच्यावर दोषारोप किंवा तिचा अपमान न करता आम्ही तिला या दंतकथांमधून बाहेर आणलं. अशा मुलांशी सारखा संवाद साधत राहणं आणि त्यांना बोलत ठेवणं फार गरजेचं असतं. त्यातूनच ही मुलं नेमकी कशी या मार्गाला वळली याचा छडा लावता येतो. मनोविकार तज्ज्ञांबरोबर केलेल्या दीर्घ चर्चा आणि गाठी-भेटीनंतर त्या मुलीच्या डोक्यात आपण काय करीत होतो याबद्दल प्रकाश पडला आणि ती खडबडून जागी झाली.
मद्यपानाचे व्यसन अनेक समस्यांना आमंत्रण देते. जसे की वेगाने आणि बेदरकारपणे गाडय़ा चालवणे, स्वभावात आक्रमकता येणे, कोणत्याही गोष्टीचा पटकन उलगडा न होणे, शून्यात हरवून जाणे, शिक्षण अध्र्यावर बंद पडणे किंवा शिक्षण पूर्ण करण्यास विलंब लागणे, कामात लक्ष न लागणे आणि शेवटी नोकरी गमाविण्यापर्यंत वेळ येते. या व्यसनातून मुलं अविचारी, अविवेकी तर होतातच, पण अशा व्यसनांमधून ते नेमकं काय शोधतात? आनंद, थ्रील की आणखी काही? ‘बॉयफ्रेंडने आग्रह केला म्हणून मद्यपान केलं’ असं मुलींचं नेहमीचं सांगणं असतं. समुपदेशन करताना मग इतर गोष्टीही हळूहळू बाहेर येतात जसं की व्यसनाची सवय लागल्यापासून घरातील पैसे, सोन्याच्या वस्तू गायब झाल्या आणि त्या पैशातून ड्रिंक्स घेतल्याचे मुलं सांगतात. या समस्या वेळीच सोडवाव्या लागतात. काही केसेस मध्ये मुलांबरोबर त्यांच्या पालकांनाही समुपदेशनाची गरज असते. अल्कोहोल किंवा ड्रग्ज व्यतिरिक्त इतर काही कारणांसाठीसुद्धा मुले घरातून पैसे चोरतात. उपचारासाठी काही वेळेस मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागते आणि त्यानंतर त्यांना दीर्घकालीन समुपदेशनाची गरज असते, पण या सगळ्या प्रक्रियेदरम्यान पालकांची साथ महत्त्वाची असते.    
अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या इंदरपाल सिंगला कोडीनमिश्रित कफ मिक्स्चर पिण्याची सवयवजा व्यसनच लागले होते. कोडीन हे एक प्रकारचे द्रव्य असून ते खसखसच्या झाडापासून घेतले जाते. ते काही प्रमाणात औषधी द्रव्य असले तरी त्याचा प्रमाणाबाहेर वापर केल्यास आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होतात. म्हणूनच त्याच्या वापरावर आणि उपलब्धतेवर अन्न आणि औषध प्रशासनाने अतिशय कडक र्निबध घातलेले आहेत. हे द्रव्य नशा आणणारे असून त्याचे व्यसन जडल्यास फार गंभीर परिणाम शरीरावर होऊ  शकतात असे सिद्ध झाले आहे. या परिणामांची इंदरपालला कल्पना नव्हती. त्यामुळे तो त्या द्रव्याच्या व्यसनात बुडत गेला. एकदिवशी कफाचे औषध न मिळाल्यामुळे कासावीस झालेल्या इंदरपालला मेंदूत झिणझिण्या यायला लागल्या आणि तो घरातच बेशुद्ध होऊन पडला. यावरून त्या ड्रग्जचा दुष्परिणाम तुमच्या लक्षात येईल. नार्कोटेस्टमध्ये तसेच काही औषधांमध्ये काही अंशी कोडीन, हिरॉइन ही द्रव्य वापरली जातात. अर्थातच योग्य त्या आणि तेवढय़ाच प्रमाणात, पण त्याचं प्रमाणाबाहेर सेवन केलं तर तीच औषधं आपल्या मुळावर उठतात हे इंदरपालला समजावून दिलं. कोडीनवर उतारा म्हणून काही औषधोपचार केल्यानंतर इंदरपालला बरं वाटलं आणि वडिलांबरोबरची त्याची भांडणं, रोजची धुसफूससुद्धा कमी झाली. कॉलेजमध्ये त्याच्या प्राचार्यानी त्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवण्याची आणि त्याला अभ्यासात मदत करण्याची जबाबदारी एका शिक्षकावर टाकली. लवकरच इंदरपालमध्ये चांगला बदल दिसून येऊ  लागला. व्यसनाधीनतेच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढताना त्याचे पालक, मित्र आणि शिक्षक यांची मदत लागतेच आणि त्यांच्या मदतीशिवाय त्यात यश मिळणे अवघड असते. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून मुलांनाही व्यसनातून बाहेर यायला मदत होते. मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक त्यांना या बाबतीत मदत करतात आणि नेहमी त्यांच्याबरोबर असतात. यामुळे मुलांनासुद्धा सगळे आपल्याबरोबर आहेत असा विश्वास वाटतो.  
व्यसनाधीनता रस्त्यावरच्या अनाथ किंवा भिकाऱ्यांच्या मुलांमध्ये असते असे समजले जायचे, पण आता या भ्रमात राहून चालणार नाही. रस्त्यावरची मुलं आडोशाला बसून नाकाने काहीतरी हुंगताना दिसायची, पण आजकाल नाकाने ड्रग्ज हुंगण्याचे व्यसन सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलांमध्येसुद्धा पाहायला मिळते. मध्यंतरी मुंबईतील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकणारी मुलं नाकाने ड्रग्ज हुंगताना पकडली गेली होती. त्यांची शिक्षिका संस्कृत विषय घेतलेल्या वर्गातील हुशार मुलांचे नेहमी कौतुक करते, त्यांच्याकडे लक्ष देते आणि तुलनेने कमी गुण मिळविणाऱ्या या मुलांकडे दुर्लक्ष करते, दुजाभाव करते असा त्यांचा आरोप होता. शाळा आमच्यात आणि हुशार मुलांच्यात भेदभाव करते, आम्हाला अपमानास्पद वागणूक देते आणि त्या रागामुळे ती मुलं व्यसनाकडे वळली होती. काही वर्षांपूर्वी मराठीत ‘दहावी फ’ नावाचा एक अतिशय उद्बोधक आणि आवर्जून पाहावा असा चित्रपट आला होता. या मुलांची कथा ही त्या चित्रपटातील कथानकाच्या खूपशी जवळ जाणारी मला वाटली. आपल्याला आपण आत्ता जसे आहोत तसेच्या तसे समोरच्या व्यक्तीने (इथे समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञाने) स्वीकारले आहे, आपली समस्यासुद्धा त्याने स्वीकारली आहे हे जेव्हा मुलांच्या लक्षात येते तेव्हा त्यांच्यात होणाऱ्या बदलाचा वेग वाढतो आणि ती लवकर पूर्ववत होतात. वरच्या उदाहरणात मुलांचा शाळेवरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता आणि हुशार मुलांच्या बाबतीत त्यांच्या मनात अढी निर्माण झाली होती. त्या परिस्थितीत शाळेकडून सहकार्य मिळणं कठीण होतं. म्हणून आम्ही सर्वात आधी नाकाने हुंगण्याचे द्रव्य (ग्लु) उपलब्ध होऊ  न देणे, दिवसभर त्या मुलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्या खासगी शिकवणीच्या शिक्षकांकडून त्यांचा अभ्यास करून घेणे यावर भर दिला. याचा चांगला परिणाम झाला आणि त्या मुलांनीही परीक्षेत चांगले गुण मिळविले.
 ‘ड्रिंकिंग विथ डॅड इज अल्सो बॅड’ या म्हणीबद्दल आम्ही पालकांना वारंवार जागृत करीत असतो. काही वेळेस वडील आणि मुलगा दोघेही व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. अशा केसेसमध्ये वडिलांनी आपले व्यसन पूर्णपणे थांबवून सहकार्य केल्याशिवाय मुलांमधील व्यसन दूर करता येत नाही. वडिलांना कोकेनचे व्यसन आहे आणि मुलगा सिगारेटमधून गांजा ओढतोय अशा बाप-लेकांच्या जोडय़ा मी पाहिल्या आहेत. अशावेळी तुम्ही मुलांना कितीही वेळा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केलेत तरी जोपर्यंत वडील आपले व्यसन सोडत नाहीत तोपर्यंत रुग्णालयातील उपचारांचा परिणाम होत नाही.
किशोरवयीन मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा सामावलेली दिसते; पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेकदा ती भलतीकडेच जाते. आव्हान केवळ व्यसनाधीनतेमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचे नसून या मुलांना स्वत:तील चांगल्या गोष्टींकडे पाहण्यासाठी मदत करणे, या मोहमयी जगातील भुरळ घालणाऱ्या गोष्टींपासून सावध राहायला शिकवणे आणि आपली नौका भलतीकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टींपासून दूर राहायला शिकविण्याचे आहे. काही ‘अतिउत्साही’ लोक मुलांच्या दुर्दशेचा फायदा उचलतात. अशा मुलांमध्ये अंधश्रद्धा पसरवून, लालूच दाखवून त्यांच्याकडून प्रार्थना म्हणवून घेतात आणि त्यांचे धर्मातर करतात. हा प्रकार एखाद्या गुन्ह्य़ाइतकाच भयंकर आहे. व्यसनाधीनतेचा विळखा सोडविता येतो. त्यासाठी प्रार्थना, धर्मातराची गरज नाही तर योग्य वैद्यकीय उपचारांची आणि समुपदेशकाची गरज असते.  
डॉ. हरीश श़ेट्टी –    harish139@yahoo.com 
( शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी )

100 Ghungaru Nagin Chappal Price Will Shock You Watch Video
७ नागाचे फणे, सहा किलो वजन, पंढरपूरच्या दानवेंची ‘नागीण चप्पल’ दिसते कशी? किंमत ऐकून थक्कच व्हाल
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!