News Flash

जगणं बदलताना : मनातला कॅमेरा रिकामाच?

अनेक अविस्मरणीय क्षण मनाच्या कॅमेऱ्यानं टिपण्यासाठी लागणारी संवेदनशीलता आपण हरवत चाललो आहोत का? 

अपर्णा देशपांडे

प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोनरूपी कॅमेरा आला आणि माणसं आपला प्रत्येक क्षण त्यात बंदिस्त करू लागली.  पुढे तर समाजमाध्यमांच्या गदारोळात, शेअरिंग, लाइक्सच्या नादात, प्रदर्शनाच्या हव्यासात स्वत:चं खासगीपणही विसरूलागली. काय स्वत:पुरतं आणि काय जगाला दाखवायचं यातला विवेक हरवला तर गेलाच, पण या फोटो शेअर करण्याच्या नादात तो क्षण अनुभवणंही माणसं विसरूलागली.. इतकं की तो क्षणही म्हणत असेल ‘उरलो फोटोपुरता..’ अनेक अविस्मरणीय क्षण मनाच्या कॅमेऱ्यानं टिपण्यासाठी लागणारी संवेदनशीलता आपण हरवत चाललो आहोत का? 

‘‘हे बघितलंत का? अमोल-अनयानं त्यांचे हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकले आहेत.’’ समिधाताई आपला फोन पुढे करत म्हणाल्या, तसं विश्वासरावांनी वर्तमानपत्र बाजूला सारून मोबाइल हातात घेतला.

‘‘अरे वा! मस्तच! आपण बघितलेत की जवळपास सगळेच फोटो.’’

‘‘मी आपल्या बघण्याबद्दल बोलतेय का? आपण घरचेच आहोत हो. पण जगाला दाखवायची काय गरज आहे? हल्लीची लोकं किती विकृत आहेत माहितेय ना? कसा कुठे वापर करतील.. काळजी वाटते. तुम्ही सांगा ना अमोलला..’’ समिधाताईंना आपल्या मुलाची आणि सुनेची काळजी वाटत होती.

‘‘खरं सांगू समिधा, आपल्याला पण त्यांनी अगदी ‘सगळेच’ फोटो दाखवायची काय गरज होती? काही क्षण त्यांचे म्हणून स्वत:चे असतात ना. खरंतर जोडप्यांनी फार सलगीचे फोटो काढूच नयेत. प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात पकडायचा अट्टहास का? मेंदू दिलाय ना देवानं.. तो रिकामा ठेवायचाय का? तिथे साठवाव्यात की काही आठवणी. ते म्हणजे आपल्या हक्काचं लॉकर. हवं तेव्हा उघडावं आणि भूतकाळाची सैर करून यावी. पण आज लोकांना सारखं फोटो काढायचं व्यसन लागलंय. आणि त्यात पुन्हा हल्लीच्या मुली फिरायला गेल्या की काय कपडे घालतील नेम नाही. त्या कपडय़ांत फोटो काढायचे, घरातल्या मोठय़ांना दाखवायचे आणि पुन्हा ‘सोशल मीडिया’वरही टाकायचे?’’ इति विश्वासराव.

‘‘अहो आपल्याशी खूप मोकळेपणानं वागतात आजची पोरं, हे एका दृष्टीनं चांगलंच आहे. आपल्याबरोबर हसून खेळून बोलतात तरी. आता कधी फॅशनच्या नावानं थोडं भान विसरायला होतं, मान्य. पण त्यावर आपण फक्त सुनेला बोलणं बरोबर नाही बाई!’’ समिधाताई म्हणाल्या.

‘‘तुला आठवतं? आपण लग्नानंतर फिरायला गेलो होतो..’’

‘‘डोंबल फिरायला! बालाजीला गेलो होतो, तेही तब्बल सहा महिन्यांनी.’’

‘‘बरं बाई, अजून ऐकवतेस ते तू मला. तेव्हाच्या फोटोंचा अल्बम लपवून त्यातले

दोन-चार फोटो नाना-माईला दाखवायला गेलो, तर त्यांनी पटकन विषय बदलला होता. त्यांनाच अवघडल्यासारखं झालं होतं.’’

‘‘इतकं तोंड फिरवण्यासारखं काही नव्हतं बरं! गणपती मंदिरात नमस्कार करतानाचा फोटो होता तो! आणि अंगभर साडी नेसून होते मी. पंजाबी सलवार-कमीज तर लपवून ठेवावा लागत होता मला. बोलणं पण अवघड होतं.’’

‘‘तो काळ वेगळा होता गं! आता तर जीन्सही वापरतेस ना तू? काळानुरूप बदल होतच असतात. ज्येष्ठांचीही मतं बदलतात. पण तू ते ‘फेसबुक’चं बोललीस ते पटलं मला.’’ विश्वासरावांनी विषय पुन्हा मूळ मुद्दय़ावर आणला.

‘‘आपलं सगळंच खासगी आयुष्य असं समाजमाध्यमांवर उघडं करण्याची काय गरज म्हणते मी! नोकरी लागली, की टाक फोटो. गाडी किंवा घर घेतलं, की लगेच टाका फोटो. लग्न लागलं रे लागलं, की लगेच टाका फोटो. अगदी घर कसं सजवलंय हेही दाखवतात! काय गरज आहे? चोरांना तुमच्या घराची रचना दाखवायची असते का? ये रे बाबा ये, कर चोरी! अतिरेक आहे नुसता. एखादी छानशी भाजी केली कीसुद्धा पोटात घास पडायच्या आधी सोशल मीडियावर फोटो टाकायची घाई. शेजारच्या घरी वाटीभर देणार नाहीत, मात्र साऱ्या जगाला दाखवणार. किती तो प्रदर्शनाचा हव्यास!’’

‘‘पण मी अमोलला काय सांगणार गं? लहान आहे का तो आता? आणि आपले कोणते फोटो शेअर करावेत, कोणते नाही, हे अनयाला ठरवू देत ना! आपण कसं बोलायचं?’’ विश्वासराव विषय लावून धरत म्हणाले.

‘‘अहो थोडी बिनधास्त आहे आजची तरुण पिढी. पण आपण कुणी तिऱ्हाईत आहोत का? त्यांचं चुकतंय असं वाटलं तर ते शांतपणे निदर्शनास आणणं आपलं काम आहे.’’ समिधाताई ठामपणे म्हणाल्या.

‘‘आज बोलूया आपण. समजून घेतील मुलं. त्यांच्या खासगी आयुष्यात त्यांनी वाटेल तो पेहराव करावा, हवे तसे फोटो काढावेत.. फक्त त्याचं सगळ्या जगासमोर खुलं प्रदर्शन करू नये.’’ म्हणत वर्तमानपत्र घेऊन विश्वासराव उठले. ‘वर्तनाला विवेकाची जोड हवीच, नाहीतर जगण्याचा डौल बिघडतो,’ म्हणत आपल्या कामाला लागले.

नयनानं सुट्टीच्या दिवशी भरपूर मेहनत घेऊन खमंग पदार्थ बनवले. ताटात वाढल्यावर अतिशय सहजपणे सुदीपनं विचारलं, ‘‘आता खायचं ना? फोटो टाकले फेसबुकवर?’’

‘‘नाही ना.. एकीनं याच पदार्थाचे फोटो टाकलेत. मग आता काय उपयोग? शंभर लाइक्सपण मिळणार नाहीत!’’

‘‘म्हणजे लाइक्स मिळत नसतील तर तो पदार्थ तू पुन्हा करणार नाहीस की काय?  नाही, त्या देवदर्शनासारखं व्हायचं, म्हणून म्हटलं!’’

‘‘देवांचं काय आता मध्येच?’’

‘‘खोटं बोलून ऑफिसमधून सुट्टी काढली, जमवलेले पैसे घातले आणि तुझ्या इच्छेखातर गाडी करून देवीच्या दर्शनाला गेलो. इतक्या गर्दीतूनही मी डोळाभरून दर्शन घेतलं. पण तू बाहेर येऊन मला म्हणालीस, ‘बघ किती मस्त फोटो काढला देवीचा!’ त्या काही क्षणांत मी सगळं विसरून देवीचं प्रसन्न रूप डोळ्यांत भरून घेत होतो आणि तुझं लक्ष फक्त फोटोतच होतं.  आणि वर किती छान दर्शन झालं म्हणून दहा ग्रुप्समध्ये फोटो पाठवलेस तू. प्रत्यक्ष दर्शन घेणं महत्त्वाचं नाही का? यूटय़ूबवर  सगळ्या मंदिरांचे आणि मूर्तीचे फोटो आहेतच की. तेच बघायचे होते मग. स्थानमाहात्म्य म्हणून जातो ना आपण तिथे?’’ सुदीप म्हणाला.

खरंच, कित्येकदा असंच होतं. प्रत्यक्ष तो क्षण जगणं, त्याची अनुभूती घेणं विसरत चाललो का आपण? नेमकं कशाला महत्त्व द्यावं याचं भान का नसतं आपल्याला? फोटो हे खरंच पुनप्र्रत्ययाचा आनंद देतात, अगदी मान्य. पूर्वी सतत कॅमेरा बाळगणं हा महागडा शौक होता. त्यातली फोटो फिल्म धुऊन आणणं या प्रक्रियेमुळे का होईना, फोटो काढण्याचं प्रमाण आटोक्यात होतं. तेव्हा इंटरनेटचा ‘इ’पण अस्तित्वात नसल्यानं जगाला आपले फोटो दाखवण्याचा प्रश्नच नव्हता. पण आता त्याचा अतिरेक झाला आहे. आता कॅमेरा कायम सरसावलेलाच असतो. उत्तम कॅ मेरा असलेले आणि हजारो छायाचित्रं जपून ठेवण्याची क्षमता असलेले मोबाइल घेऊन फिरताना प्रत्येक जण कसलेल्या फोटोग्राफरसारखा आव आणत असतो.

लाखो रुपये खर्चून मनाली, दार्जिलिंग किंवा देशाबाहेर कुठे कुठे ट्रिपला जाणारी कुटुंबं बघावीत. तिथला निसर्ग मनमुराद अनुभवायचं सोडून जिथे जमेल तिथे फक्त आणि फक्त फोटोंत यांचा जीव. छायाचित्रण ही फार सुरेख कला आहे. आठवण म्हणून फोटो काढावेतच, त्यात दुमत नाही. पण ते काढणं आणि सगळ्या जगाला दाखवणं, याला काही मर्यादा असावी ना? अगदी कडय़ाच्या टोकाला उभं राहून ‘टायटॅनिक पोझ’ देण्याच्या नादात कडेलोट करून घेणाऱ्या अतिरेकी जमातीला काय म्हणावं?

मुलांच्या शाळेत स्नेहसंमेलनात जेव्हा रंगमंचावर मुलांचे कार्यक्रम असतात तेव्हा पालकांचा वेडेपणा चीड आणणारा असतो. आपल्या पाल्याचं नृत्य किंवा कार्यक्रम आपल्याबरोबर इतरांनीही बघावा असं वाटत नाही का त्यांना? स्टेजच्या समोर ही गर्दी करतात! सगळं कॅमेऱ्यात कैद करण्याची मरमर. अरे आपल्या बाळाचं कौतुक शांतपणे समोर बसून करा ना! बहुतांश शाळा त्यासाठी फोटोग्राफर नेमतात. ते देतील ना तुम्हाला ढीगभर फोटो! मग लोकांना कंटाळा येईल इतके फोटो टाकत बसा सगळीकडे..

वागण्यातलं तारतम्य अशा वेळेला फार गरजेचं आहे. मनाला खूप समाधान देणारे अनेक प्रसंग असतात आयुष्यात. त्यांचा भरपूर आनंद घेणं महत्त्वाचं. उत्तम मोबाइल हातात असतो, कित्येक मेगापिक्सेलचा कॅमेरा त्यात असतो, मग बेभान होत शेकडो क्लिक्स ‘मारायच्या’ असतात. नको असलेले फोटो पुसून टाकण्यासाठी एखादा मदतनीस नेमतात की काय लोक.. कारण ते खरंच एक वेळखाऊ प्रकरण असतं!

पाटील काकूंच्या घरातही असंच काही सुरू होतं. त्यांच्या मुलीचं- मेधाचं लग्न ठरलं होतं. जोडी अगदी छान होती. आठ दिवसांवर साखरपुडा होता. तरुण जोडपं खूश होतं. एकमेकांना भेटवस्तू देणं, बाहेर हॉटेलमध्ये जेवण, कधी सिनेमा, तर कधी जवळपास फिरायला जाणं, अशा भेटीगाठी सुरू झाल्या आणि त्यात कुणाला काहीच गैर वाटत नव्हतं. मोठय़ांच्या आशीर्वादानंच लग्न होणार होतं. सगळ्या समाजमाध्यमांवर जोडीचे फोटो झळकायला लागले.. एक कुल्फी दोघांत खाताना, गळ्यात गळे घालून नदीकाठी बसलेले.. आणि तसेच असंख्य फोटो फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर, सगळीकडे दिसू लागले. अभिनंदनाचा वर्षांव सुरू झाला.. आणि अचानक दोघांत काही तरी बिनसून ते लग्न मोडलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबांना किती तरी दिवस त्या विषयाचा खूप मनस्ताप झाला. सगळीकडचे फोटो समेटून घेताना दमछाक झाली. दोन्ही बाजूंनी समंजसपणा दाखवला नसता तर? किती अवघड होऊन बसलं असतं?..

कुठल्या गोष्टीला जीवनात किती स्थान द्यायचं याचा विवेकनिष्ठ विचार व्हायलाच हवा. कधी निवांतपणे जुने अल्बम चाळण्यात खूप मजा आहे. आपल्याच जुन्या रूपाकडे बघून हसायला येतं. कृष्णधवल छायाचित्रांतील आजी-आजोबा, त्यांच्या काळातील वेशभूषा, अगदी साधे समारंभ, यांचा पट डोळ्यांसमोर उलगडणं फार आनंददायी आहे. इथून पुढे कदाचित फोटो अल्बम फक्त स्क्रीनवरच असतील. काही वर्षांनंतर ते फोटो बघताना तितकाच आनंदही असेल. पण काय आपल्या पडद्यावर दिसावं आणि काय जगाला दाखवावं, यातला फरक समजणं गरजेचं आहे. काहीच खासगी न उरलेल्या आजच्या जगात किमान आपली वैयक्तिक काही छायाचित्रं तरी खासगी ठेवू शकतोच आपण,  हेही नसे थोडके! अन्यथा, प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात मनाचा कॅमेरा रिकामाच राहील,त्याचं काय?

adaparnadeshpande@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:08 am

Web Title: unforgettable moments with the camera of the mind zws 70
Next Stories
1 स्मृती आख्यान : मेंदूतलं ‘मेमरी कार्ड’
2 पुरुष हृदय बाई : या रिंगणाबाहेर पडायला हवं..
3 जोतिबांचे लेक  : कोई नाम न दो..
Just Now!
X