अय्यप्पाची टेकडी वृक्षारोपणासाठी अगदी सुयोग्य ठिकाण होते.. उत्साहाच्या भरात एक डझनभर आंब्याची रोपे घेऊन आम्ही तिघे टेकडीवर दाखल झालो आणि आमची झाडे टेकडीवर ‘स्थायिक’ झाली. पुढच्याच आठवडय़ात आणखी १०-१५ रोपे लावून आलो. दर आठवडय़ाला झाडांना ‘बघायला’ जाण्याचा कार्यक्रम सुरू झाला! पण जसेजसे दिवस जाऊ  लागले तशा एक-एक अडचणी समोर येऊ  लागल्या..
दे हूरोडची अय्यप्पा टेकडी हे तसे आमचे नेहमीचेच फेरफटका मारण्याचे ठिकाण; पण अय्यप्पा टेकडीशी आमचे खरे नाते जुळले ते मागच्या पावसाळ्यात! घरच्या खताच्या खड्डय़ात टाकलेल्या आंब्याच्या कोयींना पावसाळ्याच्या सुरुवातीला लालचुटूक कोंब फुटले आणि आपसूकच ही आंब्याची रोपे कुठे तरी लावावीत, असा विचार आम्हा तिघांच्या- माझ्या, आई प्रज्ञा आणि बाबा यशवंतच्या मनात ‘मूळ’ धरू लागला! रोपे लावण्यासाठी अय्यप्पा टेकडी हे ठिकाणही अगदी एकमताने ठरले.
अय्यप्पा टेकडी तशी छोटीशीच. माथ्यावर दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर मंदिर, वपर्यंत जाणारा वळणा-वळणाचा डांबरी रस्ता.. दर्शनाला, फिरायला आणि व्यायामाला येणाऱ्या माणसांची वर्दळ, अंगाला झोंबणारे वारे आणि टेकडीवरून दिसणारा सूर्योदय-सूर्यास्ताचा मनोहर देखावा! टेकडीवर झाडे मात्र मोजकीच. पावसाळ्यात गुडघ्यापर्यंत वाढणारे गवत हीच काय ती टेकडीवरील प्रमुख वनस्पती! अशी ही अय्यप्पाची टेकडी वृक्षारोपणासाठी अगदी सुयोग्य ठिकाण होते..
उत्साहाच्या भरात एक डझनभर आंब्याची रोपे घेऊन आम्ही तिघं टेकडीवर दाखल झालो. सोयीस्कर जागा बघून कोय आत जाईल इतपत खड्डे खणले आणि आमची झाडे टेकडीवर ‘स्थायिक’ झाली. पुढच्याच आठवडय़ात अजून १०-१५ रोपे लावून आलो. त्या सुमारासच त्याच टेकडीवर आणखी काही जणांनी आणखी काही आंब्याचीच झाडे लावली. आमचा आनंद द्विगुणित झाला! पाऊस चांगला होताच. त्यामुळे झाडांनी चांगले बाळसे धरले. मग काय, दर आठवडय़ाला झाडांना ‘बघायला’ जाण्याचा कार्यक्रम सुरू झाला! झाडे आपल्या घरातीलच एक आहेत असे वाटू लागले! पण जसेजसे दिवस जाऊ  लागले तशा एक एक अडचणी समोर येऊ  लागल्या..
पावसाळा सरत आला तसे टेकडीवरचे गवत इतके वाढले, की त्यात आमची झाडे सापडेनाशी झाली! शिवाय गवत तुडवताना साप, विंचू चावायची भीती होतीच. यावर कडी म्हणून की काय, पण गवत वाळायला लागल्यावर त्याच्या टोकदार बिया कपडय़ात अडकून घरापर्यंत येऊ  लागल्या आणि त्या काढण्याचा एक नवीनच कार्यक्रम होऊन बसला.. पण एक गोष्ट मात्र लक्षात आली, की ज्या झाडांच्या मुळाशी गवत आहे, त्या झाडांना पाणी कमी लागत होते. हिवाळा आला, तशी झाडांना आठवडय़ातून एकदा तरी पाणी घालायची गरज भासू लागली. टेकडीवर पाण्याची सोय नाही. मंदिरात नळ आहे, पण तिथून पाणी आणणे जरा गैरसोयीचेच.. मग घरून पाणी घेऊन जाऊ  लागलो. जसा उन्हाळा सुरू झाला तसे १.५ लिटरच्या बाटल्यांवरून ५ लिटरचे कॅन आणि मग १० लिटरचे कॅन लागू लागले! आठवडय़ातून एकदा जाणेही पुढे अपुरे पडू लागले. मग दर ३-४ दिवसांनी आमची वारी ‘अय्यप्पा’ला जाऊ  लागली. होता होता मे महिना सुरू झाला. टेकडीवरचे गवत पूर्णत: वाळून गेले. असेच एक दिवस पाणी घालायला गेलो आणि आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! टेकडी वणवा लागून पूर्णपणे काळीठिक्कर पडली होती.. आम्ही सुन्न होऊन झाडांच्या भग्नावशेषांकडे पाहात राहिलो. वाळलेल्या गवताबरोबरच वणव्याने आमच्या कोवळ्या झाडांनाही गिळंकृत केले होते.. डोळ्यांतले पाणी त्या करपलेल्या झाडांना घालून आम्ही खालमानेने घरी परतलो. मग मात्र आमची विचारचक्रे वेगाने धावू लागली. असे का घडले? आपले काय चुकले? हे टाळता आले असते का? वणवा लागूनही झाडे वाचू शकली असती का?
सवयीप्रमाणे दोन दिवसांनी पुन्हा टेकडीवर गेलो आणि जळलेल्या झाडांना पाणी घालून आलो. वेडी आशा- फुटतीलही पानं पुन्हा कदचित.. मुळं शाबूत असतील तर जगतीलही झाडे! दिवस सरत राहिले, पाणी घालत राहिलो आणि काही दिवसांनी काही झाडांना (आणि आमच्या आशेलाही!) पालवी फुटू लागली!! एकूण ३० पैकी ८ ते १० झाडे तरारली.. जगण्याची व जगविण्याची इच्छा प्रबळ असावी लागते हेच खरे; पण इथेही नशीब(!) आडवे आले. या वर्षी उन्हाळा लांबला. पावसाचे चिन्ह दिसेना. काही झाडे प्रखर उन्हामुळे वाळून गेली. टेकडीवर खेळायला येणाऱ्या मुलांनी काही झाडे उपटून टाकली.. टेकडीवर प्रचंड वारा.. वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटू लागली. एका जरी झाडाला काही झाले तरी आमचा जीव वरखाली व्हायचा.. पण २४ तास लक्ष ठेवणे तर शक्यच नव्हते.
‘गरज ही शोधांची जननी असते’ म्हणतात ना, तसेच काहीसे घडले. मातीत पाणी टिकून राहावे म्हणून झाडांच्या मुळाशी नारळाच्या शेंडय़ा घालायला सुरुवात केली. शेंडय़ा मिळवण्यासाठी नेमाने दर शनिवारी मारुतीचे दर्शन घेणे सुरू केले! याच दरम्यान घोराडेश्वराच्या टेकडीवर वृक्षारोपणाचा प्रकल्प राबविणारे धनंजय शेडबाळे यांच्याशी संपर्क आला. त्यांच्याशी बोलण्यातून काही गोष्टी लक्षात आल्या –
* झाडे लावताना किमान १ ते १.५ फूट खोल खड्डा खणायला हवा आणि पाणी अडविण्यासाठी उताराला काटकोनात लावायला हवीत.
* कमी पाण्यात टिकाव धरतील अशी चिवट आणि भारतीय वंशाची झाडे लावायला हवीत. उदा. वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच, शिरीष, जांभूळ, करंज, कांचन इ.
* झाडांना वणव्यापासून वाचविण्यासाठी हिवाळा संपताच झाडाभोवतीचे गवत काढून झाडांच्याच मुळापाशी मातीत गाडायला हवे.
* झाडांचे वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी झाडे टेकडीच्या उत्तर-दक्षिण उतारावर लावायला हवीत.
* छोटी मडकी / पाण्याच्या बाटल्या तळाला छिद्रे पाडून झाडांजवळ पुरायला हव्यात, जेणेकरून त्यात भरलेले पाणी हळूहळू झिरपत राहील.
यातून आम्ही धडे घेतले. या वर्षी लावण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वरील प्रकारची रोपे करायला घेतली. त्यातूनही खूप शिकायला मिळाले! चिंचोके व जांभळाच्या बिया पेरल्यानंतर ८ ते १० दिवसांत झाड उगवायला सुरुवात होते. लिंबोण्या पेरल्यावर २० ते २५ दिवसांनी झाडे येतात (१ लिंबोणीतून ३-४ झाडे!). वड आणि पिंपळाची झाडे बिया टाकून पटकन उगवत नाहीत वगैरे वगैरे.. मग वड आणि पिंपळाची रोपे शोधायला आम्ही गल्ली-बोळ पालथे घालू लागलो! गच्चीवर, इमारतींच्या भिंतींवर, टाक्यांवर, इतकेच काय, अगदी रस्त्यामधील डिव्हायडरवर उगवलेली रोपेदेखील आमच्या घरी दाखल होऊ  लागली. मित्र-मैत्रिणीही बिया / रोपे देऊ  लागले. बघता बघता शंभर-एक रोपे तयार झाली आणि अखेर पाऊस आला! आमच्या मनमोराचा पिसारा फुलला!! टेकडीवर आयसीयूमध्ये असणाऱ्या आमच्या ५-६ झाडांना जीवदान मिळाले.. आता नुकतीच नवीन रोपे नव्या दमाने आणि नव्या शिकवणुकीनुसार टेकडीवर लावून आलो आहोत!!
टेकडीवर येणारे-जाणारे आमचे कौतुक करतात, पण खरी गरज आहे त्यांनी हाताला हात लावण्याची, अर्थात संघटित प्रयत्नांची! जवळच्या शाळांमधील विद्यार्थी, अय्यप्पा मंदिरातील पुजारी आणि भक्तगण या सर्वानाही या उपक्रमात सामील करून घेण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येक जण आठवडय़ातून एकदा १ बाटली पाणी जरी घेऊन आला तरी हे काम सोपे होऊ  शकेल, त्याची व्याप्ती वाढू शकेल आणि आपल्यासारख्या अनेकांच्या खारीच्या वाटय़ांनी हा पर्यावरण रक्षणाचा महासेतू बांधला जाऊ  शकेल!    n