उमा बापट – umaajitbapat@gmail.com

मुलांची अस्थिरता कमी करायची किंवा घालवायची म्हणजे एखाद्या यंत्रातील एखादा भाग नादुरुस्त झाल्यावर फक्त काढून टाकायचा आणि त्या जागी नवीन भाग बसवून यंत्र पूर्ववत सज्ज करायचं असं होऊ शकत नाही. पालकांना वाटणारी चिंताही अशी काढून त्याजागी निश्िंचतता मनात  घालता येत नाही. मुलांमध्ये स्थिरता यायला आणि पालकांनी आश्वासक जगायला आंतरिक सत् शक्तीची जोड हवी. ही ऊर्जा बाहेरून नाही, आतल्या निर्मळतेने मिळत राहते, ही जाणीव स्पष्ट व्हायला हवी. बाहेरच्या गदारोळातही निर्मळता तग धरू शकते. त्यासाठी आपलं अनुभवविश्वही निकोप ताकदीचं हवं.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

‘नाही निर्मळ जीवन, काय करील साबण?’ तुकोबा विचारतात, की पाणीच मळलेलं असेल तर साबण वापरूनही स्वच्छता कशी होणार? मुळात पाणी गढूळ होणार नाही याची दक्षता घ्यायला लागते. नुसते भरमसाट साबण वापरून पुरणार नाही. अभ्यासाची काळजी असेल तर लावा शिकवण्या, शिवाय आणा तयार उत्तरं देणारे पुस्तक संच, एवढं करून जर अभ्यासाची चिंता मिटली असती तर सगळ्यांनी असे साबण वापरून काम भागले नसते का? आपलं मूल अभ्यास करतच नाही ही मूळ धरणा. स्पर्धेला सामोरं जायचं असेल तर आपला टिकाव लागणारच नाही हे फलित आधीच निश्चित करून ठेवलेलं. गृहीतकच ते. मग कोणावर विश्वास? शाळेत जे शिकवतात त्यावर? शिकवण्यांवर? मुलाच्या मेहनतीवर? पुस्तक संचावर?.. नाही. तसा कोणावरही नाही! सतत धास्तावलेले.. निर्मळ लेणं अंगीकारलंच नाही तर शंका घेत राहण्याशिवाय जवळ काही उरणार नाही.. असं आतून वाटणारं अपुरंपण चिंतेला निमंत्रण देतं.

इतर लोक आपलं वाईट चिंततात, आपल्याला मागे खेचायलाच बसले आहेत, असं विनाकारण वाटण्याकडे काही मनोवृत्तीचा कल असतो. ही एक प्रकारची मानसिक विकृती असते. ती आता फक्त काही वेळा डोकं वर काढणारी, काही लोकांमध्ये उपटणारी अशी विकृती राहिलेली नाही, असं काहीसं चित्र दिसतं आहे. असुरक्षित मानसिकता कोणत्याही वयाला, भूमिकेला, सामाजिक, आर्थिक स्थितीला अपवाद राहिलेली नाही. जसं त्रासदायक तण चांगल्या पिकांच्या निकोप वाढीवर आक्रमण करतं, तसंच असुरक्षित साशंकतेनं निर्मळतेची वाढ अवघड होत चालली आहे. खेडय़ांमध्ये पूर्वी आणि काही प्रमाणात आजही घरांना कुलपं  लावण्याची गरज वाटत नाही. विश्वास हे जरी त्याचं कारण असलं तरी त्यामागे निर्मळ लेणं लेवूनच आपले खेडय़ातले बांधव वावरत होते, असतात. कोणी माझ्या घरात उगाच घुसणार नाही, असे अनुभव घेत मोठे झाल्यामुळे ते निर्मळ लेणं गावकऱ्यांच्या ठायी असू शकतं. साशंकता नसते. जो कोणाकडे शंकेखोर नजरेने बघत नाही, त्याच्या वाकडय़ात कोणी शिरत नाही. कोणाचंही वाईट न चिंतणं हे जसं निष्पाप मनाचं वैशिष्टय़, तसं कोणी माझं वाईट करेल अशी अवास्तव धास्ती ज्यांना स्पर्श करत नाही, ते निर्मळतेचं  लेणं. दुसऱ्यावर शंका न घेणारं, निर्मळतेने भरलेलं, आतून सुरक्षित असलेलं मन. म्हणूनच ते बाहेरच्या धुळीने माखत नाही. आजूबाजूला चिखल, दलदल असली तरी कमळ जसं स्वच्छ सौंदर्याचं अंगभूत लेणं लेवूनच उमलतं, तसं!

अगदी प्राथमिक शाळेतसुद्धा हल्ली मुलं एकमेकाला मागे खेचायला कमी करत नाहीत. असं वागण्याचं मूळ कधी कधी घरच्या वातावरणात असू शकतं. एका प्राथमिक शाळेत घरून कागद, सजावटीसाठी टाकाऊ वस्तू, असं सामान आणायला सांगितलं होतं. ते वापरून शाळेत काही कलाकृती करायला मुलांना वेळ दिला होता. शाळेतल्या शिक्षिका प्रत्येक मुलाच्या जवळ जाऊन त्याचं काम बघत, कलाकृती निरखत एक प्रकारे परीक्षण करत होत्या. कलिकाची कलाकृती खरोखर कल्पक, वेगळी वाटत होती. बाई तिची कलाकृती कौतुकाने बघत आहेत, असा अंदाज आजूबाजूच्या मुलांना यायला लागला. स्वत: कलिकालाही जाणवत होतं, की बाईंना आपलं काम आवडलं आहे. तितक्यात राकेश लगेच आणि बाईंनी काही विचारलंही नसताना म्हणाला, ‘‘बाई, कलिकानं ते कागद घरूनच कापून आणले होते.’’ ही शक्यता नाकारता येत नाही. पण कलिकानं मात्र घरून असं काही आणलं नव्हतं. एखाद्याचं कौतुक होताना न बघवणं हे  इतक्या लहान वयात  सुरू व्हावं, ही आजच्या समाजाची चिंतेची बाब नक्की आहे. जोरात, न घाबरत बोलणाऱ्या मुलांच्या बोलण्यातील आशयात तथ्य आह

े का हे शिक्षकांनी बघायला हवं. तसंच गप्प राहून शिक्षकांशी वाद न घालणाऱ्या मुलांचं काही अव्यक्त पण दखल घेण्याजोगं मत आहे का, याच्या खोलात शिरायला हवं. मनाच्या निर्मळतेला छेद देणाऱ्या या प्रवृत्ती मुलं कुठून शिकतात, याचा गांभीर्यानं शोध घेत, या प्रवृत्ती बळावणार नाहीत यावर शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी प्राधान्यानं प्रयत्न केले तर विधायक बदल होतील. ते फार गरजेचं आहे.

माध्यमिक शाळेच्या वयातला प्रतीक मला सांगत होता, ‘‘वर्गात मी एकटय़ानंच मराठीत कविता लिहिली. शाळा इंग्रजी माध्यमाची होती. एका विषयावर आपलं मत व्यक्त करायला कोणत्याही भाषेत लिहा, असं त्यांना सांगितलं होतं. मराठीतही त्यानं ओघवतं लिहिलं म्हणून शिक्षकांनी त्याचा विशेष उल्लेख केला. यामुळे जरी त्याला आनंद झाला होता, तरी तो दुखावलाही होता. त्याच्याशी विस्तारानं बोलल्यावर म्हणाला,‘‘वर्गातल्या एकाही मुलाला साधं म्हणावंसंसुद्धा वाटलं नाही. बघू तुझी कविता, मला वाचायला आवडेल. कोणी कौतुक सोडा, दखलही घेत नाही. कोणाला काहीच वाटत नाही. मुलांना फक्त एवढंच दिसत होतं, की माझं कौतुक झालं आणि त्यांचं नाही. ही काही स्पर्धा नव्हती. नुसतं कवितेबद्दल बोलायला काय झालं?..’’

साध्या साध्या गोष्टींबाबत इतकं असुरक्षित वाटण्याचं काय कारण? तेव्हा इतरही काही मुलामुलींशी झालेला संवाद आठवला. त्या मुलीला घरातून सांगितलं होतं, की तू ज्या शिकवणीला जातेस ते कोणाला सांगू नकोस. एकाच परीक्षेसाठी तिला दोन शिकवण्या लावल्या होत्या. त्यातला एक शिकवणी वर्ग सर्वाना माहितीचा असा होता. पण दुसऱ्या वर्गाबाबत मात्र इतर कोणाला कळू नये, असं त्या घरातल्यांना वाटत होतं. जेव्हा माहिती इतरांना न सांगण्याच्या मागे भावनिक असुरक्षितता डोकं वर काढते, तेव्हा मुळातली सत् शक्ती कमकुवत झालेली असू शकते. आपलं यश हे दुसऱ्याचं काही कमी आहे म्हणून मिळावं की आपलं काम चोख, परिपूर्ण होतं म्हणून मिळावं? हा संस्कार जेव्हा निर्मळ आचरणातून होतो, तेव्हा त्यासाठी वेगळी शिकवण द्यावी लागत नाही. कितीही स्पर्धा वाढली तरी त्याच्या ताणाने निर्मळ मूल्यांचा

बळी द्यावा लागत नाही. आपलं कामच उत्तम करणं ही आपली जबाबदारी. उत्तम कामामागे यश चालून येतं.

काही जुन्या मैत्रिणी भेटल्या. अनेक वर्षांपूर्वी पदवीनंतरचं शिक्षण घेतानासुद्धा एकत्र अभ्यास करणाऱ्या या मैत्रिणी.  अभ्यासक्रम खूप असल्याने आणि उपलब्ध पुस्तकांची कमी असल्याने ग्रंथालयात मिळणाऱ्या मोजक्या पुस्तकांतील विषय एकमेकींत वाटून घेऊन एकमेकीला मदत करत केलेल्या भरपूर अभ्यासाचे दिवस त्यांना आठवले. अभ्यासाचा ताण वाटला तरी तोही त्यांनी वाटूनच घेतला आणि अभ्यासातली मजाही. एकमेकांचे जे चांगले, ते शिकता आले. मात्र या सगळ्याच्या पाश्र्वभूमीला किंवा पूर्वतयारीला म्हणून आवश्यक आहे ते निर्मळ लेणं. शुद्ध मनात दुसऱ्याच्या चांगुलपणावर विश्वास उत्पन्न होऊ शकतो, वाढू शकतो. त्यासाठी मुलांनी ही निर्मळ वृत्ती पुरेपूर अनुभवलेली असायला हवी. बहुतेक कोणाच्याच आई-वडिलांनी अगदी लहानपणापासून त्यांना पढवल्याचं आठवलं नाही, की तू अमुक मुलीबरोबर अभ्यास करू नको, तुझ्या वह्य तिला दाखवू नको, किंवा अमुक-तमुक मुलीची उत्तरपत्रिका बघ, तिला का तुझ्यापेक्षा जास्त गुण आहेत त्या विषयात?..  याउलट त्यांच्या एकत्र अभ्यासाचं  घरातून भरभरून स्वागतच होत होतं.

लहानपणापासून हे निर्मळ लेणं लेवून शिक्षणानिमित्त मुलं घराबाहेर पडतात.  देशभरातली वेगवेगळी मुलं उच्च शिक्षणासाठी वसतिगृहात एकत्र येतात. तेव्हा ज्यांच्या अंगी निर्मळता मुरलेली आहे अशी नव्या आजच्या पिढीतली तरुण मुलंही आपली निर्मळता घराबाहेर, परक्या वातावरणात सांभाळू शकतात. वेगवेगळ्या रूपातली  निर्मळता बदलत्या काळाला धरून प्रकटताना दिसते. कोणाला गावाकडच्या सणाची आठवण झाली, तर परप्रांतातल्या मित्राला- ज्याला तो सणच माहिती नाही त्याला  सणानिमित्त भेट देऊ करतात. ज्याला ज्या विषयात रस आहे, त्याला वसतिगृहात चालणाऱ्या त्याविषयीच्या वेगळ्या उपक्रमांची आपणहून माहिती सांगतात. ज्याला बोली भाषा येते, ते परिसरातल्या लोकांशी त्या भाषेत बोलून इतरांना मदत करतात. एकाच वर्गात स्पर्धात्मक वातावरणात असतानाही मित्रमैत्रिणी अभ्यासातसुद्धा एकमेकांना मदत करतात. ही ताकद आजूबाजूच्या गढूळ पाण्यापासून साबणाशिवायही नितळ राहायला त्यांचा आंतरिक स्रोत बनते.माझ्या कुटुंबातलं असं निर्मळ लेणं मी कोणाचं, कधी, कसं अनुभवलं आहे? ते माझ्यात किती उतरलं असं मला जाणवतं? हे निर्मळ  लेणं बदलत्या परिस्थितीतही अबाधित राहू शकतं याची नव्या स्वरूपातली उदाहरणं मी निर्मळपणे टिपते/टिपतो का?.. धास्तावलेपण, अस्वस्थता, अशाश्वतता, अनिश्चितता हे तर आपल्या रोजच्या जगण्याचे पदर होऊन बसले आहेत. ते छाटून टाकायला कोणती जादूची कात्री सापडणार नाही. ते पदर मोकळे करायला नि निर्धास्त स्वस्थता, शाश्वतता, निश्चिंतता याचा गोफ विणायला निर्मळतेचा भक्कम खांब रोवायला हवा.

रोजच्या सकाळच्या दिनक्रमापासून रात्रीपर्यंत आठवून पाहू या की माझ्यातली निर्मळता मी जागी ठेवू शकते का?.. निर्मळतेचं अवसान उसनं आणता येत नाही, त्यामुळे ते माझ्यात झिरपतं आहे का? या निर्मळ लेण्याचं पुरेसं सामथ्र्य न जाणून आपण नको ते करायला लागलो नाही ना? जो खरा नाही तो ‘नखरा’ बाहेरून लेण्यापेक्षा आंतरिक निर्मळतेनं स्वच्छ, सुंदर राहू या. धुळीचे लोट आले तर घरटय़ाचा वरचा लेप मळेलही कदाचित, पण स्वत:च्याच चोचीनं, पंखानं स्वत:ला वरचेवर स्वच्छ करत राहणारं निरामय घरटय़ातलं पाखरू निर्मळतेने लख्ख उजळेल.