वंध्यत्व असलेल्या जोडप्यामध्ये कितीतरी वेळा असं दिसतं, की पत्नीच्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया झाल्या, तरी स्वत:ची धातूची तपासणी करायला कित्येक पतिराज सुखासुखी तयार नसतात. डॉक्टरांचा सल्ला सरळ धुडकावून देऊन; सत्य परिस्थिती जाणण्यासाठी दोघांच्या आवश्यक त्या तपासण्या करून त्यावर उपाय न करता; तिच्यावर दोष ठेवून तिला माहेरचा रस्ता दाखवणे व दुसरी बायको करणे हे योग्य आहे का?
एकदा महाराष्ट्राच्या एका आडगावातून पस्तिशीच्या आतली एक स्त्रीरुग्ण माझ्याकडे आणली. बरोबर होते तिचे भाऊ आणि आई. तक्रार होती – हिला मूल का होत नाही म्हणून तपासा- अशी ! मी विचार केला, ‘मी जरी गायनॅकॉलॉजिस्ट नसून सर्जन असले; तरी तिची केस हिस्टरी विचारून तिला तपासायला तर लागू. मग योग्य वेळेस काही प्राथमिक तपासण्या करून घेऊन आपल्या गायनॅकॉलॉजिस्ट मित्रांकडे पाठवता येईल.’ म्हणून मी तिची विचारपूस सुरू केली.
तिची मासिक पाळी नियमित, वेदनारहित होती. लग्नाला ८ वष्रे झाली होती.. तिला अन्य काहीही आजार नव्हता. तब्येतीने धडधाकट होती. वैगुण्य होतं ते हेच – की ‘तिला’ मूल होत नव्हतं. नवऱ्याने वाट बघून बघून मागच्या वर्षी दुसरी सोयरीक केली होती आणि हिला माहेरी पाठवून दिली होती. ‘मूल का होत नाही, ते तपासा म्हनावं तुम्ही येकदा’ असं म्हणून त्याने तिला आई -बापांकडे आणून सोडली.
साहजिकच या पाश्र्वभूमीवर ती निराश, मिटलेली, अपराधी भावनेने ग्रासलेली ओढग्रस्त अशी स्त्री होती. तिच्या सर्व शरीरसंस्था तपासून, गायनॅक चेकअप करून झाल्यावर वरकरणी तरी तिच्यात काही दोष सापडला नाही. आता जरुरी होती, ती वेगवेगळ्या तपासण्या व चिकित्सांची! ‘काय ते एकदाच करून घ्या, अन् हिच्यात दोष हाये का न्हाई त्ये आम्हाला सांगा म्हणजे हिच्यावरचं किटाळ तरी जाईल. मग भले तो मेला हिला नांदवो वा सोडो, आम्ही हिला कसंबी पोसू. फक्त हिचा दोष हाय की न्हाई हे एकदाच सांगा, तिची म्हातारी आई सांगत होती.
पडद्याआड तपासताना मी तिला विचारलं, ‘मूल होत नाही म्हणून तुझ्या नवऱ्याच्या आत्तापर्यंत काय काय तपासण्या झाल्या?’ तिने सांगितले, ‘न्हाई बाई, त्यो म्हन्तो, दोष तुज्यातच असंल, मी तर चांगला बाप्या माणूस, माज्यात काय बी खोट न्हाई. मी काय बी तपासनी करणार न्हाई,’ असं म्हणून कोणत्याही डॉक्टरने सांगितलेली त्याची एक प्राथमिक धातूची तपासणीदेखील त्याने कधी केलेली नव्हती. बायकोला मात्र ‘तुझ्यातच दोष’म्हणून शिक्का मारायला हा पहिला! तिच्याही तपासण्या- खíचक असल्याने आत्तापर्यंत केलेल्या नव्हत्या. ८ र्वष एका स्त्रीशी (माणसाशी नाहीच का?)आपण मनाने, तनाने जवळीक करून, तिला दोषी ठरवून ही जबाबदारी मात्र आपण पुन्हा तिच्या आई-वडिलांच्या माथी मारतो; ही काय मानसिकता आहे? यात कोणती मर्दुमकी आहे? मुलगी जन्माला आल्यावर तिच्या या अवस्थेपर्यंतची जबाबदारी पण तिच्या आई-वडिलांची का?
खरंच, वंध्यत्व असलेल्या जोडप्यामध्ये कितीतरी वेळा असं दिसतं, की पत्नीच्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया झाल्या, तरी स्वत:ची धातूची तपासणी करायला कित्येक पतिराज सुखासुखी तयार नसतात. स्त्री वर वंध्यत्वासाठी कुठल्याही ्रल्ल५ं२्र५ी म्हणजे शरीराला दुखापत होणाऱ्या चाचण्या करून घेण्यापूर्वी पुरुषाची धातूतपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे, असे स्त्री-रोगशास्त्राची पुस्तके ठळक अक्षरात सांगतात, कारण दोष हा पुरुषात पण असू शकतो. पण डॉक्टरांचा हा सल्ला सरळ धुडकावून देऊन;  सत्य परिस्थिती जाणण्यासाठी दोघांच्या आवश्यक त्या तपासण्या करून त्यावर उपाय न करता; तिच्यावर दोष ठेवून तिला माहेरचा रस्ता दाखवणे व दुसरी बायको करणे हे योग्य आहे का?
इकडे पडद्यामागे निराशेच्या सावटाखाली मिटलेली ती अभागी स्त्री; तर पडद्याबाहेर -मायेच्या लेकीला ‘वांझ’ म्हणून टाकणाऱ्या जावयाला कधी एकदा ही ‘निर्दोष’ असल्याचे  सिद्ध करीन म्हणून आतुर झालेली अशिक्षित आई, आणि दोन्हीच्या सीमारेषेवर -हिला कोणत्या तपासण्या क्रमाक्रमाने सांगायच्या याचा काथ्याकूट करणारी मी एक शिक्षित स्त्री- अशी अवस्था झाली. काही प्राथमिक तपासण्या सांगून मी ते रिपोर्ट घेऊन मी तिला स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जायला सांगितले.
परवा अशीच एक स्त्री ओ.पी.डी.संपताना माझ्याकडे आली. तिची अडचण ऐकून कुठल्या काळात राहतोय आपण असं वाटायला लागलं. तिला ७ व ६ वष्रे वयाच्या दोन मुली होत्या. दोन्ही वेळेस सीझर करावं लागलं. वंश चालवण्यासाठी घराण्याला मुलगा दिला नाही म्हणून तिला रोज तिची सासू ऐकवायची, ‘काय दिवटी सून आणली घरात! विकतच्या दोन मुली दिल्या (का, तर म्हणे सीझरचा खर्च आला ना!)आणि वर मुलगा नाही तो नाहीच. मी आता माझ्या मुलाचं दुसरीशी लग्न लावून देते; म्हणजे माझ्या घरात नातू खेळेल बघ!’ अशी मुक्ताफळं तिला रोज आल्या-गेल्यासमोर ऐकायला मिळायची. कहर म्हणजे या सासूनेच तिच्या दुसऱ्या सीझरच्या वेळेला तिच्या दिराला सांगून परगावी असलेल्या तिच्या नवऱ्याची फोनवरून परवानगी घेऊन तिचं फॅमिली प्लॅिनगचं ऑपरेशन करून घेतलं होतं; जेव्हा ही अर्धवट गुंगीत होती आणि आता तीच सासू तिला मुलगा नसण्यावरून त्रास देत होती. माझा या घटनेवर विश्वास बसेना म्हणून मी तिला दुसऱ्या सीझरच्या वेळेचे सर्व कागदपत्र घेऊन परत बोलावली. बघते, तर त्यात खरंच सीझरबरोबर त्याही ऑपरेशनचा उल्लेख होता. आता हा रोजचा छळ बंद व्हावा, व नवऱ्याने दुसरे लग्न करू नये म्हणून ती स्वत:ची ३४ुस्र्’ं२३८ (गर्भाशयाच्या कापून बांधलेल्या नळ्यांची पुन्हा जोडणी करणे)करून घ्यायला आली होती. तिसऱ्या वेळी तरी मुलगा होईल का, हे नशीब अजमवायचं होतं बिचारीला. तिचा नवरा त्याच्या आईला सांगे, ‘अगं, आई, तू हिला एवढी घालून-पाडून का बोलतेस? तिला दरवेळेस मुलगी होत असेल तर तो दोष माझा आहे, तिचा नाही. मला तू दुसऱ्या लग्नाचं खूळ अजिबात सांगू नकोस. त्या लग्नामुळे तरी मला मुलगाच होईल ‘याची कोण खात्री देईल?’ खरं तर दर वेळेस मुलगी होण्यामागे शास्त्रीयदृष्टय़ा त्याच्याकडे जबाबदारी जात असेल तरी, तो दोष त्याचा नक्कीच नव्हता. बाईला मुलगा होणार की मुलगी हे स्त्री अंडं फलित होताना पुरुषाचा -स्त्रीवाचक की पुरुषवाचक शुक्रजंतू त्याच्याशी संयोग पावतो यावरून ठरतं; अर्थात, हे फक्त निसर्ग ठरवतो- त्यावर ना बायकोचा ताबा आहे, ना नवऱ्याचा.. नवरा सुज्ञ असूनही आईच्या हुकूमशाहीपुढे तो कदाचित मान तुकवील, ही भीती तिला वाटत होती. तिच्या गोजिरवाण्या दोन मुलींकडे व तिच्या झाकोळलेल्या भविष्यकाळाकडे बघून मला आत कुठेतरी गलबललं. मी तिला म्हटलं, ‘अगं, ३४ुस्र्’ं२३८ हे ऑपरेशन पोट उघडून किंवा दुर्बणिीने करायला आपण त्यातले तज्ज्ञ डॉक्टर माझ्याकडे बोलावूनसुद्धा घेऊ. पण त्यानंतर दिवस राहण्याची १०० टक्के खात्री तुला कोणीही डॉक्टर देऊ शकणार नाही, शिवाय दिवस गेले तर तिसरंही सीझरच करावं लागेल, तो मुलगा असेल का मुलगी हे पुन्हा देवाच्याच हातात; हे सारं तुझ्या लक्षात येत आहे का? या दैवाधीन गोष्टीसाठी तू तुझ्या शरीराला किती धोक्यात घालते आहेस? तू तुझ्या नवऱ्याला व सासूला माझ्याकडे का आणत नाहीस? मी त्यांना समजावून सांगेन, माझ्या बोलण्यातली सर्व अशाश्वती, त्रास लक्षात घेऊन ती स्वत:च म्हणाली, ‘नाही मॅडम, मी नाही या फंदात पडणार; मला नव्हतं वाटलं की हे इतकं अवघड असतं ते! या दोन गोंडस मुलींना शिकवीन, मोठं करीन; त्या नाही मला म्हातारपणी दूर लोटणार. नवऱ्याने साथ दिली तर त्याच्यासकट आणि नाही दिली तर त्याच्याशिवाय- पण हाच माझा अंतिम निर्णय.’
तिच्या बोलण्यातून एक गमावलेला आत्मविश्वास परत आल्यासारखं वाटलं. व्यवस्थित शास्त्रीय माहिती दिल्यावर तिने स्वत:चा निर्णय स्वत: घेतल्याचं मला मोठं समाधान वाटलं.