‘उ: शापित’ ही अंजन डे यांच्या आयुष्यातल्या सत्य घटनांवर आधारित कादंबरी आहे. सर्वसाधारण सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या इंजिनीअरिंगला असलेल्या मुलाला कॉलेजच्या रुटीन वैद्यकीय तपासणीच्या वेळी आपल्याला कुष्ठरोगाची लागण झाल्याचे कळते. त्याच्या आयुष्यात उत्पातच होतो. त्या उत्पातांची आणि त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या अंजन डे यांची कहाणी मी कादंबरी रूपाने मांडली आहे. एकाच वेळी झपाटलेपण आणि आत्यंतिक क्लेश अशा दोन्हींचा अनुभव लेखनाच्या काळात मला आला.
कादंबरीचा विषय गंभीर आणि दुर्लक्षित असल्याने वाचकाला पूर्ण माहिती तर द्यायची पण माहितीची जंत्री होऊ द्यायची नाही. प्रसंगांमधून, पात्रांच्या संवादांमधून ती माहिती पेरणे भाग होते. नाहीतर कथानक माहितीमध्ये हरवले असते. कथानकाचा ओघ मंदावून वाचनीयता कमी झाली असती. सत्याचा अपलाप न होता लेखकाच्या सर्जनशीलतेला वाव मिळायला हवा होता. सत्य आणि कल्पना यांच्या बेमालूम मिश्रणातून हे घडायला हवं होतं, हे आव्हानच होते.
ठिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे माझ्या पुढे सत्य घटनांचे ठिपके होते. त्यांची जोडणी करून त्यातून आकर्षक, सुबक आकृती बनवायची होती, आल्हाददायक रंगसंगती साधायची होती. रुग्णांच्या भयानक परिस्थितीचे यथार्थ दर्शन घडविण्यासाठी फक्त अंजनचे एकटय़ाचे अनुभव वापरून चालले नसते. इतर रुग्णांचे अनुभवही त्यात विखरून टाकायचे होते.
अंजनची आणि माझी भेट अनेकदा झाली, पण त्यांच्या मानसिक अवस्थेविषयी, प्रक्षोभांविषयी मी त्यांच्याशी काहीच बोलले नाही. त्यांची देहबोली वाचत त्यांनी जेवढे सांगितले ते ऐकून ठेवले. नायकाच्या मनाची आंदोलने दाखविताना मला माझे समुपदेशनाचे प्रशिक्षण आणि अनुभव उपयोगी पडले. पण हे करताना मी समुपदेशकाची तटस्थता मात्र राखू शकले नाही. त्याच्या जागी स्वत:ला कल्पून ती सर्व आंदोलने मी नायकाच्या बरोबरीने अनुभवली. त्याच्या यशामुळे, आनंदामुळे मला त्याच्यापेक्षाही जास्त आनंद झाला. लेखकाला अलिप्तता टिकवता न येणे चांगले की वाईट, चूक की बरोबर हे मला माहीत नाही. पण तसे घडले एवढे मात्र खरे आहे.
अंजन-उमा यांच्या वैवाहिक जीवनाविषयी, नातेसंबंधांविषयी आम्ही एक अक्षरही बोललो नव्हतो. आजही मला त्याविषयी माहिती नाही. कोंढव्याच्या हॉस्पिटलात काम करणाऱ्या एका निरोगी मराठी मुलीनं त्यांच्याबरोबर विवाह केला एवढेच मला माहीत होते. त्यावरून त्यांची प्रेमकहाणी तरल पातळीवर रंगवण्याचा, त्यांच्या नात्यात येत गेलेली परिपक्वता दाखवायचा प्रयत्न मी केला. विवाहानंतरचे प्रसंग, घटना काल्पनिक आहेत.
काँटिनेंटल प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या या कादंबरीचे स्वागत चांगले झाले. कुष्ठरोगावरची कादंबरी म्हणून माझ्या काही मत्रिणींना ती वाचावीशी वाटत नव्हती, पण ती वाचल्यावर मात्र आवडल्याचं मुद्दाम कळवलं. एका लेखिका मत्रिणीच्या मते, नायकाचे दु:ख अधिक भयाणपणे प्रकट व्हायला हवे होते. कारण त्याची दु:खे भयाण आहेत ती त्यांच्या मूळ स्वरूपात, भेसूरपणे उभी राहायला हवी होती.
या कादंबरीबाबत दु:खांची भयाणता असे जेव्हा मनात येते तेव्हा बोलणाऱ्याला विद्रुपता अभिप्रेत असते. पण वास्तवतेच्या नावाखाली बीभत्स आणि भीतीदायक वर्णने मला टाळायची होती. महारोगाविषयी लोकांच्या मनात असलेली किळस, आकस वाढू नये यासाठी मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला. माणसाच्या शारीरिक विद्रुपतेपेक्षा त्याला भेडसावणारे व्यावहारिक आणि भावनिक प्रश्न मी जास्त सखोलपणे मांडायचा प्रयत्न केला आहे.
माझ्या एका स्नेह्य़ाने कादंबरीत येणाऱ्या लंगिकतेविषयी नाराजी व्यक्त केली. पण त्याबाबत मी माझ्या मनाचा कौल मानला. जेव्हा तरुण पुरुषाला गंभीर दुखणे येते तेव्हा शरीरसुखापासून आपल्याला वंचित राहावे लागणार याची बोच कायम ठुसठुसत असते. ही न सांगता येण्यासारखी तीव्र घुसमट नायकाच्या वागण्यातून मला दाखवायची होती. शरीरसंबंधाबाबत आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे या विचाराची त्याच्या आयुष्याला सतत एक किनार आहे. लग्न ठरताना, ठरल्यावर, विवाह समारंभात आणि पहिल्या रात्रीच्या मीलनप्रसंगी त्याच्या सुप्त शंका मला अधोरेखित करायच्या होत्या. शारीरिक विद्रुपतेमुळे पत्नीकडून आपल्याला नाकारले जाण्याची धास्ती विवाहप्रसंगीच्या त्याच्या अस्वस्थतेतून दाखवलेली आहे. विवाहानंतर पत्नीकडून प्रणयात घेतला गेलेला पुढाकार आणि प्रतिसाद नायकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आहे. त्याच्या पुढील आयुष्याची दिशा आणि कर्तबगारी, भावी विकासाची आणि अहंमन्यतेची बीजे त्यात दडलेली आहेत हेच अप्रत्यक्षपणे सुचवलेले आहे.
एकूणच, जे मला भावले, पटले तेच मांडले.
ushakeskar@yahoo.com

‘असे शब्द.. असे अर्थ..’ हे सदर प्रसिद्ध झाले आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. स्त्री लेखिकांची  आणि स्त्रीकेंद्रित अनेक पुस्तके आमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद. सूचना – स्त्रियांनी लिहिलेल्या किंवा स्त्रीकेंद्रित पुस्तकांनाच या सदरात समाविष्ट करण्यात येईल. शब्दमर्यादा ५०० इतकी असून त्या पुस्तकाची किंवा ते पुस्तक का लिहावेसे वाटले, याची अगदी थोडक्यात माहिती देऊन पुस्तकामध्ये समाविष्ट न करता आलेले फक्त काही अनुभव, विचार पाठवायचे आहेत. लेखकांनी २०१२ नंतर प्रसिद्ध झालेली किंवा आगामी  पुस्तकेच फक्त या सदरासाठी पाठवायची आहेत. दर पंधरा दिवसांनी हे सदर प्रसिद्ध होणार आहे. कृपया पुस्तकांबाबत कोणताही संवाद साधला जाणार नसून अंतिम निर्णय संपादकांचा राहील.  
प्रकाशक वा लेखक आपली पुस्तके येथे पाठवू शकतात. –
पत्ता- चतुरंग, ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे,
नवी मुंबई- ४००७१०.
आमचा ई-मेल  chaturang@expressindia.com

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी