वैभव मांगले

vaibhavmangale@gmail.com

Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

माझ्या गद्धेपंचविशीचा काळ खूप महत्त्वाचा ठरला माझ्यासाठी. या काळात मी जे पेरून ठेवलं होतं तेच उगवलं.. म्हणजे कुठल्याही प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, म्हणजे चांगलं पेरता तेव्हाच तुम्हाला पुढे चांगले प्रोजेक्ट मिळतात, चांगलंच उगवतं.. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे परेश मोकाशीबरोबरचं माझं पहिलं नाटक. हे नाटक आणि दिग्दर्शक स्वीकारण्याच्या निर्णयाबरोबरच मी काही महत्त्वाचे निर्णय याच ‘गद्धेपंचविशी’त घेतले आणि मला हवं तसं काम करता आलं.. पेरलेलं कसदार उगवत गेलं..

मला वाटतं, विशी ते पंचविशी हा कालखंड प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचा असतो, कारण तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असतं. तुम्ही बाल्यावस्था, पौगंडावस्था पार करून तारुण्यात प्रवेश केलेला असतो. या काळामध्ये आपण जे निर्णय घेतो, आपण जे मार्ग निवडतो त्याचे फार दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात म्हणूनच या दहा वर्षांमध्ये तुम्हाला काही तरी ठामपणे करायचे असते. तरच तुम्ही वयाच्या चाळिशीपर्यंत आणि पुढे जाऊन काही तरी ठोस करू शकता. माझ्यासाठी माझ्या गद्धेपंचविशीचा काळ खूपच मोलाचा ठरला..

आपण नेहमी म्हणत असतो की, बाळपणीचा काळ सुखाचा. ते खरंही असतं, कारण हौसमौज होत असते, खेळ सुरू असतो, अभ्यास सुरू असतो, मज्जा सुरू असते, मित्र, मैत्रिणी, आजूबाजूचा परिसर आणि मुळात वैचारिक समज नसते. त्यामुळे ते खूप छान छान गोड गोड वाटत असतं. शिवाय पालकांचं संरक्षणात्मक कवच असतं. त्याच्या पुढचा, पौगंडावस्थेचा काळही खूप महत्त्वाचा असतो. यात खूप शारीरिक बदल होत असतात. मात्र या काळामध्ये जर पालक तुमच्याबरोबर नसतील किंवा पालक म्हणतील तेच जर तुम्हाला करावं लागत असेल, तर तुमच्या आयुष्यावर त्याचा फार मोठा परिणाम होतो. या सगळ्यातून मी गेलो आहे. मी ज्या देवरुखमधून आलोय ते खेडेगाव होतं. तिथे रोजगाराचा फार मोठा स्रोत नव्हता. दहावीपर्यंत मी फार हुशार विद्यार्थी नव्हतो. एक सामान्य बुद्धी असलेला, अभ्यासात गती असलेला मुलगा होतो. ६०-६५ टक्क्यांपर्यंत माझी गती होती. दहावीला मला तेवढेच टक्के होते, बारावीलाही मला तेवढेच गुण मिळाले. दहावीनंतर खरं तर मला मराठी घेऊन एम.ए. करायचं होतं, प्रोफेसर व्हायचं होतं. त्या काळात माझ्या अंगी अनेक कला आहेत हे कळायला लागलं होतं. मला गाणं बऱ्यापैकी कळायला लागलं होतं. मी अभिनय करत होतो. मिमिक्री, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा यातून भाग घेत होतो; पण या सगळ्या गोष्टींसाठी घरच्यांचं प्रोत्साहन कधी मिळालं नाही किंवा ‘हे तू कर, हे छान आहे’ असं जे प्रोत्साहन लागतं ना ते कधीच मिळालं नाही. ते दिलं शाळेतल्या शिक्षकांनी. त्यांनी ‘हे तुला चांगलं जमतं,’ म्हणत पाठ थोपटली.

माझा गळा गाता होता. वडिलांचाही आवाज चांगला होता. उडत्या चालीची गाणी म्हणायला फार आवडायचं त्यांना. आईचाही आवाज चांगला होता. आईचे वडील संगीत नाटकांतून काम करायचे. त्यामुळे आवाज आणि सुरांची समज माझ्या रक्तातच आहे. मलाही शास्त्रीय संगीत शिकायचं होतं, पण घरातून प्रोत्साहन  मिळालं नाहीच, तरीही गाणं मी माझ्या पद्धतीने वाढवलंच. माझा आवाज चांगला असल्याने सुरांची जपणूक झाली माझ्याकडून. गाण्यातली रसिकता, गाण्यावरचं प्रेम माझ्यात खोलवर रुजण्यासाठी किशोरीताईंच्या आणि लताबाईंच्या गाण्याचा फार उपयोग झाला. या दोघीही माझ्यासाठी संगीतातलं, सुरांमधलं दैवत आहेत.

माणसाला जगण्यासाठी कला आवश्यक असते हेही गद्धेपंचविशीतच लक्षात आलं. मी अभिनय ही कला व्यवसाय म्हणून निवडली आहे, तर संगीत ही माझ्या जीवनासाठी आवश्यक कला आहे. नटाला सगळ्या कलांचा आस्वादक व्हावं लागतं तरच तो त्याच्या अभिनयामध्ये त्यातील छोटय़ा छोटय़ा गोष्टी झिरपून त्याचं काम चांगलं होत असतं, हा माझा आजवरचा अनुभव आहे. चित्रकला ही सुद्धा फार महत्त्वाची कला आहे. संगीत आणि चित्रकला या आदिम कला आहेत. त्याच्यामध्ये माणसाचं ‘एक्स्प्रेशन’ आहे, तो काय विचार करतो, तो जीवन कशापद्धतीनं स्वीकारतो. ज्या माणसाला चित्रकलेची आवड आहे, ज्या माणसाला अभिजात शास्त्रीय संगीताची आवड आहे, तो माणूस खूप खोलात जाणारा असतो असं मला वाटतं. अलीकडे हे सिद्ध झालंय की ज्या लोकांना अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता येतो, ज्याला सुरांचा आस्वाद घेता येतो, त्याचा बुद्धय़ांकही जास्त असतो. मला वाटतं, या जीवनासाठी आवश्यक कला आहेत. आयुष्यातलं सौंदर्य जर तुम्हाला टिपायचं असेल तर तुम्हाला या कलांचा आस्वादक व्हावंच लागतं.

व्हॅन गॉग मला फार महत्त्वाचा चित्रकार वाटतो. मी जेव्हा अ‍ॅमस्टरडॅमला त्याची चित्र पाहात होतो, तेव्हा त्याच्या कलेतून त्याच्या चित्रातून त्याचं मन दिसतं. त्याची दृष्टी दिसते. तो बोलतो त्याच्या चित्रातून आज इतकी वर्ष झाली त्याच्या चित्रांना. त्याची चित्रं बघताना मला कधीकधी किशोरीताईंचं गाणं आठवतं आणि किशोरीताईंचं गाणं ऐकताना मला त्याची चित्रं दिसतात. म्हणजे संगीत आणि चित्रकला या एकमेकांशी फार निगडीत असलेल्या कला आहेत. अभिनय मला त्या अर्थाने दुय्यम दर्जाची कला वाटते. चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला चांगला लेखक लागतो, चांगला दिग्दर्शक लागतो, चांगले सहकलाकार लागतात आणि ते काम पोहोचवणारे अनेक लोक असतात त्याच्या मागे, तेव्हा तुमची कला सगळ्यांसमोर येत असते. पण संगीत आणि चित्रकला बघा, एक तंबोरा असेल तर तुम्हाला संगीतातलं जग उभं करता येतं, काही रंग असतील, एक ब्रश आणि कॅनव्हास असेल तर तुम्हाला त्याच्यावर काय निर्माण करता येत नाही? म्हणून मला वाटतं या दोन कला फार श्रेष्ठ आहेत आणि कलाकाराला या दोन कलांचा आस्वाद घेता आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही, तुमचं आयुष्य आणि तुमची कला समृद्ध होते.

मला गद्धे पंचविशीच्या दरम्यान चित्रं पाहण्याची गोडी लागली. कुठल्याही शहरात गेलो तर तिथे काही जुन्या चित्रांचा संग्रह असेल, वस्तुसंग्रहालय असेल तर ते जाऊन पाहणं हा माझा छंद होता. कोल्हापुरात, बडोद्याला, इंदौरला त्या काळातली ‘चित्रं’ मी पाहात होतो. मला डच चित्रकारांची चित्रं पाहण्याचीही त्या काळात आवड निर्माण झाली. त्याच्यामध्ये व्हॅन गॉग होता, रेम्ब्रां होता, या सगळ्याच्या आस्वादनाचा परिणाम तुम्ही जी कला सादर करता त्याच्यावर होत असतो. जी कला केवळ शाळेपुरती मर्यादित होती ती कला मी गेल्या तीन चार महिन्यांमध्ये आत्मसात करून पेंटिंग करायला लागलो आणि मला त्याचीही गोडी लागली. म्हणजे रंग, सूर हे किती महत्त्वाचे असतात आयुष्यामध्ये आणि ते तुमच्या अभिनयात कसे उतरतात, उतरवता येतात तो पण एक अभ्यासाचा चिंतनाचा विषय असतो.

यासाठीची प्रेरणा ही घालावी लागत नाही तर ती असावी लागते तुमच्या रक्तामध्ये. ती प्रेरणा माझ्याकडे होती. त्यामुळे घरातून प्रोत्साहन मिळालं नसलं तरी माझ्यातल्या अस्वस्थतेने मार्ग मिळवलाच. मला वाटतं की, पंचविशीच्या कालखंडामध्ये तुमच्या मनाला उद्विग्नता आली पाहिजे, संतप्त झालं पाहिजे तुमचं मन! तुम्हाला बंडखोर होता आलं पाहिजे. तुम्हाला विरुद्ध बोलता आलं पाहिजे. या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या आतमध्ये काही तरी ‘शिजत’ असतं.

दहावीनंतर वडिलांनी मला विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायला लावून बीएस्सी करायला लावलं. मनाविरुद्ध केलेल्या गोष्टीचा शेवटही तसाच झाला. मी बीएस्सीच्या शेवटच्या वर्षी नापास झालो. अतिशय भणंग अवस्था झाली होती माझी त्या काळात. मला नोकरी नव्हती. ६०-७० टक्के मिळवलेली मुलं स्पर्धेत असताना माझ्यासारख्या रीपीटरला कशी नोकरी मिळणार होती? त्या काळात हे सगळं स्वीकारणं फार भयंकर होतं. पुढे काय करायचं हे ठरत नव्हतं म्हणून ‘बीएड’ला प्रवेश घ्यायचा ठरवला. तिथे प्रवेश मिळाला नाही म्हणून ‘डीएड’ला प्रवेश घेतला, पण उद्विग्नतेत भरच पडली, कारण ‘डीएड’ची मुलं ही दहावी-बारावी पास होती, त्यांच्यात मी बीएस्सी झालेला, त्यामुळे ‘अरे हा एवढा मोठा कोण आलाय आपल्यात शिकायला?’ अशा पद्धतीचं त्याचं बघणं त्रासदायकच ठरलं माझ्यासाठी.

माझे चुलते, वडिलांचे आतेभाऊ  विलास कोळपे, ते मला नेहमी म्हणायचे की, ‘मांगले, तुझ्यामध्ये अभिनय कौशल्य आहे. तू अभिनय कर. मुंबईला जा.’ मी ‘डीएड’ झालो तेव्हा माझं वय होतं २५-२६. त्याच वेळी त्यांचा मला फोन आला, की मुंबईला निघून ये. माझे काही मित्र आहेत. त्यांच्याशी ओळख करून देतो. त्यांच्या म्हणण्यानुसार मी मुंबईला गेलो, सगळ्यांना भेटलो. घडलं काहीच नाही, पण देवरुख सोडून मुंबईला जायची ऊर्मी मिळाली. मला आलेल्या भणंग अवस्थेमुळेच मी हा निर्णय घेतला, हे मला लख्ख आठवतंय. तिथेच कुठे तरी नोकरी लागली असती तर मला नाही वाटत, की मुंबईत येऊन अभिनयात करियर केलं असतं.

मुंबईत आल्यानंतर काय करायचं हा प्रश्न होताच. मिळेल तेथे राहिलो, एक वेळच जेवलो; पण मला त्या काळातही जाणवायचं की, मला जो अभिनय येतो त्याच्यात काही तरी वेगळी गंमत आहे. मुंबई-पुण्याचे लोक जे काम करतात, त्या तुलनेचं काम मला करता येतं. संधी मिळाली तर याच्यापेक्षाही चांगलं काम मी करून दाखवेन. तसा मला आत्मविश्वास होता, काम करण्याची ऊर्मीही होती. वयाच्या पंचविशीच्या टप्प्यात मुंबईत आलो आणि सुरुवातीलाच मला चांगली माणसं भेटली. अर्थात चांगली माणसं भेटली असं म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या शोधात असलं पाहिजे. परेश मोकाशीसारखा माणूस मला भेटला ही मला वाटतं माझ्यासाठी खूप आनंदाची आणि भाग्याची गोष्ट होती. कारण त्याच्या सगळ्या आयुष्याचा, त्याच्या विचारांचा माझ्या आयुष्यावर फार मोठा पगडा पडलेला आहे. त्याचं शिस्तप्रिय असणं, त्याचं वेळेत कुठेही जाणं, अत्यंत विचारपूर्वक बोलणं, विचारांमध्ये फाफटपसारा न मांडणं, सरळ मुद्दय़ाला हात घालणं. त्याचं असं म्हणणं असतं, ‘आपण काय करतो? तर वरवरच्या फांद्या छाटत बसतो. त्याच्या मुळाशी जात नाही. झाडाच्या मुळाशी जाता आलं पाहिजे. मुळाशी गेलं की समस्या सोडवता येते आणि काय करायचा याचा निर्णय घेता येतो. उगाचच शब्दांमध्ये अडकून वाद निर्माण करू नका.’ माझा वैज्ञानिक दृष्टिकोन परेशमुळे बळावला. मी धार्मिक माणूस नाही, देवभोळा तर मी कधीच नव्हतो; पण परेशमुळे मी नास्तिकही बनलो. देव ही संकल्पनाच माझ्या डोक्यातून निघून गेली. त्याच्यामुळे कार्यकारणभाव मी जाणायला शिकलो. लॉजिक वा तर्क तपासायला मला त्याची फार मोलाची मदत झाली.

मला असं वाटतं की, तुम्हाला एक बुद्धी लागते माणसं निवडण्याची. तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय विचार करून आला आहात, तुमचं वाचन काय आहे, सामाजिक जाणिवा कशा आहेत, तुम्ही माणूस म्हणून समाजाबद्दल, स्वत:बद्दल, देशाबद्दल, जगाबद्दल काय विचार करता, रसिक म्हणून तुम्ही किती समृद्ध आहात, तुम्ही भावनिक आहात का? भावनिक असाल तर तुमच्या भावना किती प्रगल्भ आहेत? हा सगळा शिक्षणाचा भाग असतो. तुम्हाला या गोष्टींचं सतत शिक्षण घेत राहावं लागतं. याच्यासाठीसुद्धा एक मूळ प्रेरणा लागते. एखादं पुस्तक वाचल्यानंतर मी त्याच्या पुढचं पुस्तक वाचलं पाहिजे, एखादा चित्रपट वा नाटक बघितल्यानंतर त्याच्या पुढचा चित्रपट, नाटक बघितलं पाहिजे. दहावी-बारावीत असतानाच माझं श्री.ना. पेंडसे वाचून झाले होते, भालचंद्र नेमाडे वाचून झाले होते. त्या काळात जर ते मला आवडलं होतं, कळलं होतं, तर आता मला त्याच्या पुढचंच वाचायला आवडेल ना? त्याच्यापेक्षा कमी मूल्य असलेलं साहित्य मी कसं वाचेन? या तुलनेत जेव्हा मी म्हणतो की, हे हे माझं वाचून झालंय, हे हे मला आवडलंय आणि हे हे मला नाही आवडलंय, तर त्यात कुणाला कमी लेखण्याचा माझा उद्देश नसतो, माझा हेकटपणा नसतो. उलट मला वाटत असतं की, याच्या पुढचं आता वाचलं पाहिजे. त्याच्या पुढची भूक माझ्यात निर्माण झालेली असते. हे बरेचदा लोकांच्या लक्षात येत नाही आणि मग गोंधळ निर्माण होतो. असो.

तर परेश मोकाशीबरोबर मी पहिलं नाटक केलं ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’. नंतर ‘लग्नकल्लोळ’. ‘लग्नकल्लोळ’साठी मला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं. हे पारितोषिक म्हणजे तुम्ही चांगले अभिनेते आहात यासाठी मिळालेलं प्रोत्साहन, उत्तेजन असतं. ते मला मिळालं. त्या काळात मी बरीच नाटके केली. त्यानंतर माझे ‘झी मराठी’ दूरचित्रवाहिनीशी सूर जुळले. श्रीरंग गोडबोलें बरोबर काम केलं. ‘घडलंय-बिघडलंय’ केलं. सुधीर भटांबरोबर मधल्या काळात ‘इथं हवंय कुणाला प्रेम’ केलं. नाटकांनिमित्त परदेश दौरे केले. संतोष काणेकरबरोबर ‘एक डाव भटाचा’ नाटक केलं. त्यातही सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं. एक अभिनेता म्हणून मला ओळख मिळत होती; पण ‘सेलेब्रिटी स्टेटस’ येण्यासाठी एक पंच हवा असतो तुमच्या आयुष्याला. तो पंच मला ‘फू बाई फू’च्या निमित्ताने मिळाला.

वयाच्या ३१ व्या वर्षी मी लग्न केलं. लग्नाच्या बाबतीत मी फार भाग्यवान ठरलो, असं वाटतं. माझी पत्नी मयूरी अंधेरीची. एमएस्सी डिस्टिंक्शनमधून पास झालेली. ‘सिप्ला’मध्ये काम करणारी. लग्न करायचं ठरवलं तेव्हा माझ्याकडे फुटका चमचाही नव्हता. त्या वेळी भाडय़ाचं घर घेण्यापासून ते संसार उभा करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आम्ही दोघांनी केल्या आहेत. तिने मला नेहमीच समजून घेतलंय. मी भावनिक असल्यामुळे कठोर वागतो कधी कधी. माझ्या भावनिक असण्याचा तिला अनेकदा त्रास होतो; पण मयूरी फार समंजस आहे. १४ वर्षे झाली आमच्या लग्नाला. या टप्प्यावर असं वाटतं की, हे सहजीवन आहे आणि ते छान, आनंदानंच एकमेकांबरोबर निभावायचं आहे..

मी नाटक करत राहिलो. उगाचच मालिका किंवा चित्रपटांच्या मागे पळत राहिलो नाही. लॉबी नाही म्हणणार मी, पण तिथे जो दिग्दर्शक असतो तो त्याच्या आवडीचे लोक घेत असतो. ते एक युनिट असतं. तिथे त्याच्या मर्जीतले, त्याला हवं तसं काम करणाऱ्या नटांना तो घेत असतो असे म्हणू या. मालिकेच्या बाबतीत तसं होतं असं म्हणता येत नाही, तिथे ऑडिशन्स असतात. तुम्ही त्या देत राहता. तिथे तुमची निवड होते किंवा होत नाही. वाहिन्यांची गरज वेगळी असते हेही लक्षात घेतले पाहिजे. नाटकांमध्ये तुम्ही काम करता म्हणजे नाटकांसाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागतो, कमी पैशांत काम करावं लागतं. तिथलं ‘इकॉनॉमिक्स’ इतरांच्या तुलनेत कमी आहे, पण नाटक ही सर्वात जिवंत कला आहे, तिला पर्याय नाही, असं मला वाटतं.

..तर मी नाटक करत राहिलो, कारण मुंबईत आल्या आल्या मी तेच केलं होतं. तो माझा ‘कंफर्ट झोन’ होता म्हणा किंवा तिथे मला एकातून एक नाटकं मिळत गेली. चित्रपट किंवा मालिका या गोष्टी अशा आहेत, की तिथे आपल्या हातात फारसं काही नसतं. नाटकात काम करणं, चांगलं काम करणं, चांगलं नाटक निवडणं हे आपल्या हातात असतं. म्हणून मी ते करत राहिलो. ‘फू बाई फू’ करण्याआधी मी ‘ई टीव्ही’वर ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ करत होतो. मात्र तिथे स्पर्धा नव्हती. तिथे फक्त जायचं आणि स्कीट करायचं, असं स्वरूप होतं. ‘फू बाई फू’च्या निमित्ताने स्पर्धेचा वेगळा प्लॅटफार्म मिळाला. ते करण्याआधी माझ्या मनात विचार आला की, ‘कॉमेडी एक्स्प्रेस’मध्ये मी तेच करतो, मग पुन्हा तेच का करायचं? पण ‘झी’ मराठीचे नीलेश मयेकर म्हणाले, ‘‘कर मांगले, तुला त्याचा फायदा होईल.’’ माझी बायको म्हणाली, ‘‘झी वाहिनी चांगली आहे, खूप लोक बघतात. चांगला प्लॅटफॉर्मही मिळेल..’’ मी ते करण्याचा निर्णय घेतला.

आणखी एक महत्त्वाचा निर्णय या काळात घेतला तो म्हणजे, मी कुणाहीबरोबर काम केलं नाही. मी ठरावीक लोकांबरोबरच, पण चांगलं काम केलं. चांगल्या कामासाठी एकत्र येऊन काम केलं. अर्थात पैशांसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्याचा जो दोष असेल तो मी माझ्या पदरी घेतोच आहे. त्यात मला काही वावगं वाटत नाही, कमीपणा वाटत नाही; पण मला वाटतं की, गद्धेपंचविशीचा काळच असा असतो. या काळात जे मी पेरून ठेवलं होतं तेच नंतर उगवलं ना. आपल्याकडे एक म्हण आहे, ‘पेराल ते उगवतं’ म्हणजे काय? तर कुठल्याही प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, म्हणजे चांगलं पेरता तेव्हाच तुम्हाला पुढे चांगले प्रोजेक्ट मिळतात, चांगलं उगवतं.

‘फू बाई फू’नंतर पैशांसाठी कुठेही जाऊन स्कीट करण्याची वेळ आपल्यावर येता कामा नये, हा याच काळात घेतलेला आणखी एक महत्त्वाचा निर्णय. कारण ते करताना आपल्यातला नट हळूहळू मरत जातो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कलाकार म्हणून माझं हे काम नाही. मी देवरुखवरून हे काम करण्यासाठी आलेलो नाही. मी सकस अभिनय आणि चांगल्या लोकांबरोबरच, चांगल्या प्रोजेक्टमध्येच काम करायचं हे या काळातच ठरवलं होतं.

आयुष्यात घेतलेले निर्णय फारसे चुकलेत असं नाही वाटत. खासगी आयुष्यातले असतील थोडे फार, परंतु व्यवसायात मात्र  निर्णय चुकल्यासारखं अजिबात नाही वाटत. कारण ते निर्णय तुम्ही एकटय़ाने घेतलेले नसतात. तुमच्या आजूबाजूला काय परिस्थिती असते. लोक तुमच्याबरोबर काय व्यवहार करतात, तुम्हाला कसे निर्णय घ्यायला भाग पाडतात किंवा तुम्ही कुणाच्या तरी अधीन होऊन निर्णय घेता का, परिस्थिती तसे निर्णय घ्यायला लावते का? तसं करावं लागलं असेल तर चूक की बरोबर याला काय अर्थ उरतो?

आज मागे वळून पाहताना असं लक्षात येतं की, त्या काळातल्या फारशा घटना किंवा किस्से लक्षात नाहीत. ही माझ्यातली फार सकारात्मक गोष्ट आहे. मी मागचं फार आठवत बसत नाही. मात्र तरीही मला माझ्या बालपणातल्या, पौगंडावस्थेतल्या काही गोष्टी आठवतातच. फार निराशाजनक होत्या त्या. त्याचा दूरगामी परिणाम माझ्यावर झाला आहे. समज येण्याच्या काळात जे घडतं त्याचा दूरगामी परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. म्हणून त्या काळात आपल्या मुलांशी फार काळजीपूर्वक वागावं लागतं, संवाद साधावा लागतो. पालकांकडून अशी कुठलीही गोष्ट होता कामा नये, की त्याचा वाईट परिणाम मुलांच्या आयुष्यावर होईल. ते मी शिकलो. म्हणूनच माझ्या मुलांच्या बाबतीत मी काही गोष्टी फार कटाक्षाने पाळल्या आहेत. त्यामुळे आयुष्यातले निर्णय चुकले असं वाटत नाही. होतात काही गोष्टी हातून, त्यातूनही शिकत राहतो. चुका होण्यापेक्षा त्यातून शिकणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

गद्धेपंचविशीच्या काळापर्यंत माझं वाचनही बऱ्याच प्रमाणात झालं होतं. माझ्या वाचनात बुद्ध आला आणि मला मोठी संपत्ती सापडल्याचा साक्षात्कार झाला.  बुद्ध असा तत्त्ववेत्ता होऊन गेला ज्यानं जगणं सुसह्य़ कसं करावं, माणसानं आनंदी राहण्यासाठी, सुखी होण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी काय करावं हे शिकवलं आणि त्यानंतर मी सुखी झालो. त्याची तत्त्वं किती सुंदर आहेत, किती साध्या साध्या गोष्टी त्यानं सांगितल्या आहेत. अर्हता, दु:खमुक्तीचा मार्ग. दु:खमुक्तीचा मार्ग ही संकल्पनाच किती सुंदर आहे. तुझ्या दु:खाला तूच कारणीभूत आहेस.. तू अपेक्षा करतोस आणि अपेक्षांमध्ये दु:खाचं मूळ लपलेलं आहे. तू अपेक्षा करणंच सोडून दे. तू अपेक्षाच केली नाहीस तर तुला कशाचं दु:ख होईल? ही किती साधी गोष्ट आहे. तू तुझी परिस्थिती आहे तशी स्वीकार, तू दु:खी आहे तर दु:खी आहे, दु:ख मान्य करा म्हणजे ते हलकं होतं. बुद्ध म्हणतात, दु:खामध्येही समृद्धी असते. तर ही गोष्ट केवढी मोठी आहे. जी माणसं नास्तिक आहेत त्यांची जबाबदारी फार मोठी असते. कारण त्यांना आपल्या दु:खाचं, आपल्या अपयशाचं खापर कुणावरही फोडता येत नाही. ना दैवावर, ना देवावर. त्याला त्या सगळ्याचं श्रेय स्वत:कडेच घ्यावं लागतं. की हो, या सगळ्याला मीच कारणीभूत आहे, यावर मलाच उपाय केला पाहिजे. यासाठी भावनिकदृष्टय़ा कणखर असलं पाहिजे. मी देव न मानल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी असते, माझ्या सगळ्या गोष्टींची. ही गोष्ट मला बुद्धाकडून शिकायला मिळाली. तू जे समजतोस तो मी नाहीये, पण तू जे समजतोस तो मात्र तू आहे, हे किती सुंदर आहे. विशी ते तिशीने माझ्या आयुष्यात बुद्ध आणला आणि मी सुखी झालो..

माझ्या डोक्यावर मुळातच फार केस नव्हते. मी मुंबईत आलो तेव्हाच मला टक्कल पडायला लागलं होतं. परेश मोकाशीच्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’च्या वेळी टक्कल करणं क्रमप्राप्त होतं. कारण त्याचं म्हणणं होतं, ‘विग लावलेला दिसतो स्क्रीनवर. त्यामुळे टक्कल करणार असशील तरच चित्रपटामध्ये काम मिळेल.’ मी सरळ टक्कल करून टाकलं आणि ते चांगलं दिसलं. म्हटलं बरं झालं व्यापच गेला. कुणी टक्कल पडलं म्हणायला नको, हा टकला झालेला आहे, असं कुणी म्हटलं तरी चालेल. त्यात केस थोडे गेलेत, थोडेसे शिल्लक आहेत, ते दिसायलाही विचित्र दिसतं. आपल्याला केस नाहीत याबाबत मला कधीही दु:ख झालं नाही. मी मुंबईत हिरो बनण्यासाठी आलो नव्हतो, तर अभिनेता बनण्यासाठी आलो होतो, आलेलो आहे. मी चरित्र अभिनेता म्हणूनच काम करणार आहे, हे मला पक्कं ठाऊक आहे, त्यामुळे केस नसल्याचे वाईट नाही वाटले. उलट झालं ते बरंच झालं असं वाटतं. त्याच्यामुळे एक वेगळी ओळख तयार झाली. कधीही मला कुठलाही विग लावता येतो, मला नट म्हणून माझी मज्जा करता येते.