योगेश शेजवलकर

तुम्ही कधी एकटय़ानं थिएटरमध्ये जाऊन आवडत्या चित्रपटाचा आस्वाद घेतलाय? आवडतो म्हणून एखादा पदार्थ हॉटेलात जाऊन एकटय़ानं फस्त के लाय? चांदण्या रात्री एकटय़ानंच मस्त फिरला आहात? दरवर्षी भर पावसात तुडुंब भिजला आहात? आवाज चांगला नाही हे माहीत असूनही आवडतं गाणं मित्रांच्या मैफलीत मनसोक्त गायला आहात? जाडी वाढलीय, हे कपडे मला कसे दिसतील याचा विचार न करता ते घालून यथेच्छ भटकला आहात? कोण काय म्हणेल याचा विचार न करता हे सगळं तुम्ही तेव्हाच कराल जेव्हा तुम्ही स्वत:च्या प्रेमात असाल. उद्याच्या ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्तानं करा असा प्रयत्न. उघड होतील तुमच्याच मनाची काही खास गुपितं.. जगाल वेगळ्याच आवेगानं.. आनंदानं..

दर रविवारी सकाळी मला आमच्या डॉक्टरांच्या आवाजामुळे जाग येते. अर्थात यात घाबरण्याचं काही कारण नाही. आमचे हे डॉक्टर पलीकडच्याच बिल्डिंगमध्ये राहातात आणि इतर दिवशी सकाळी, स्वत:च्या खोलीत करत असलेला गाण्याचा रियाज रविवारच्या निवांत वातावरणात गच्चीत येऊन करतात. अनेक वर्ष सुरू असणाऱ्या त्यांच्या या सरावामुळे आमच्या दिवसाची सुरुवात मात्र अगदी प्रसन्न होते..

मग वेध लागतात कट्टय़ावर जाण्याचे. गप्पा.. मित्रमंडळींना भेटणं हे तिथे जाण्याचं मुख्य कारण असलं, तरी आकर्षण असतं ते ‘तो’ आणतो त्या डब्याचं. रविवारी सकाळी लवकर उठून एखादा उत्तम नवीन पदार्थ आपल्या हातानं बनवायचा आणि मग तो आम्हा मित्रमंडळींना खाऊ घालायचा त्याला भारी शौक आहे. स्वयंपाक करण्याची त्याची हातोटी ही केवळ वाखणण्याजोगी आहे. कट्टय़ावर जाताना काहीतरी सामान आणण्याची यादी घरून मिळालेलीच असते. ते घेऊन बाराच्या सुमारास पुन्हा घराच्या दिशेनं निघालं की बहुतेक वेळा ‘ती’ दिसते. पहाटेच्या वेळी असलेली बुलेट राइड पूर्ण करून ती घरी आलेली असते आणि घराच्या अंगणात आपल्या बुलेटला साग्रसंगीत आंघोळ घालण्याचा तिचा कार्यक्रम सुरू असतो. ते सुरू असतानाच आमच्या गप्पा होतात. त्या दिवशी राइडमध्ये काही चांगले फोटो मिळाले असतील तर तेही ती दाखवते आणि राइडचा पूर्ण वृत्तांतही देते.

मग तिनं केलेलं ते सगळं वर्णन ऐकून पुन्हा एकदा, आपण बुलेट घ्यावी की नाही?, घ्यायचीच झाली तर ती नेमक्या कोणत्या वयात घ्यावी?, घरातल्या मंडळींना त्यासाठी कसं तयार करावं?, या अनेक वर्ष मला पडणाऱ्या प्रश्नांवर स्वार होऊन मी रस्त्याच्या कडेकडेनं घरी परत येतो. तोपर्यंत घरातल्या टेबलावर एका ओळखीच्या काकूं च्या शेतातली भाजी किंवा फळं आलेली असतात. शहराजवळ घेतलेल्या जागेत आवड म्हणून, पण मोठय़ा चिकाटीनं त्या शेती करतात आणि आम्हाला घरपोच ताजी भाजी मिळत राहाते.

मग दुपारी जरा आडवं पडल्यावर ‘या रविवारी तरी बरेच दिवस न केलेल्या आपल्या आवडीच्या गोष्टी नक्की करायच्या’ हा निर्धार पहिला आठवतो आणि त्या पाठोपाठ राहिलेल्या गोष्टी आठवू लागतात. अचानक अर्धा दिवस संपून गेल्याची जाणीव होते आणि अपराधीपणाची भावना बळावते. आपल्याच अवतीभवतीचे लोक त्यांच्या आवडीच्या गोष्टी वेळात वेळ काढून किती निष्ठेनं करत असतात, याचंच अप्रूप वाटत राहातं आणि ते आपल्याला का जमत नाही?, हा प्रश्नही पडतो. पाण्यात पोहायचं तर आहे पण भिजायचं मात्र नाही, या स्वत:च्या स्वभावामुळे अस्वस्थ व्हायला होतं आणि मागे उरतो एकच प्रश्न- ‘या मंडळींना हे नेमकं जमतं तरी कसं?’

विलक्षण गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या या प्रश्नाचं अगदी साधं सोपं उत्तर आहे.. ते म्हणजे ‘स्वत:वर प्रेम केल्यामुळे’. हे उत्तर जरा वेगळं वाटत असेल, तेव्हा थोडं स्पष्ट करून सांगतो.. म्हणजे त्याचं असं आहे, की आपण सगळेजण समाजात, नातेवाईक-मित्रमंडळी यांच्या गोतावळ्यात, कुटुंबात, आपल्या जोडीदाराबरोबर राहात असतो. असं असलं, तरीही आपलं स्वत:चं असं एक आयुष्य असतं. त्या आयुष्याच्याही माफक का होईना, पण काही गरजा असतात. आनंदाच्या, समाधानाच्या स्वतंत्र व्याख्या असतात.  संसाराच्या रहाटगाडग्यात नकळत का होईना, पण त्याच्याकडे दुर्लक्ष होत राहातं.

अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या निभावताना, त्याच्या जोडीला स्वत:चा आनंदही तितकाच महत्त्वाचा आहे हे ओळखून, तो आनंद नेमका कशात आहे हे शोधून, ती गोष्ट सातत्यानं करत राहाणं.. स्वत:ला आनंदात ठेवण्याला प्राधान्य देणं, म्हणजेच स्वत:वर प्रेम करत राहाणं. त्यात खरोखर काही अवघड नसतं. बरेचदा स्वत:वर असं प्रेम करावं हे कळत असतं, पण वळत नसतं. फक्त स्वत:च्या आनंदासाठी एखादी गोष्ट करणं, म्हणजे काहीतरी भयंकर पाप आहे, असा विचार करून आपण स्वत:ला रोखून धरतो. शिवाय आपल्याला मनापासून आवडणारी गोष्ट जर आपल्या कुटुंबात, मित्रमंडळीतल्या लोकांना आवडणारी नसेल, तर ‘ही गोष्ट तुला आवडूच कशी शकते?’ या इतरांच्या अनावश्यक मताचंही दडपण आपणच मानगुटीवर बसवतो. तेव्हा हे सगळं झुगारून आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारणं आणि आपल्या असण्यावर प्रेम करणं खूप गरजेचं असतं.

थोडा शांतपणे विचार केल्यावर जाणवतं, की आपण रंगानं, रूपानं, आकारानं जसे आहोत तसे स्वीकारायला कमी पडतो. कोणाकडे तरी बघून, तुलना करून आपण तसं असावं, असं आपल्याला वाटत असतं, त्या आभासी प्रतिमेच्या प्रेमात पडून आपण स्वत:ला स्वीकारताना आढेवेढे घेतो आणि तिथून घोळ सुरू होतो.

आपण जसे आहोत तसे मान्य करण्यात नेमकी अडचण कसली आहे? ज्या गोष्टी आपल्याकडे जन्मत:च नाहीत त्याबद्दल इतकं वाईट वाटण्याचं कारण तरी काय असतं? हे आपल्यालाही स्पष्टपणे सांगता येत नाही.  एकदा ते मोकळेपणानं मान्य केलं की गोष्टी सोप्या होतात. ते नाकारत राहिलं की काहीतरी अर्धवट.. उसनं.. तडजोड केलेलं जगतो आहोत, असं सतत वाटत राहातं.

हे सगळं समजून घेतलं आणि मग एके दिवशी ठरवून जाळ्या-जळमटं साफ करावीत तशी विचारांची साफसफाई केली. कल्पनेच्या पलीकडे गोष्टी सोप्या होत गेल्या. अनेक वर्ष अशक्य वाटणारी ‘सोलो ट्रिप’ प्रत्यक्षात आली. घरात कोणालाही न आवडणारा, उगाचच ‘ट्रॅशी’ म्हणून शिक्का मारलेला, पण माझ्या अतिशय आवडीचा चित्रपट, कोणाच्याही टोमण्यांची पर्वा न करता मी बिनदिक्कत बघू लागलो. हॉटेलमध्ये कधी एकटय़ानं आवडीच्या पदार्थावर ताव मारण्याचा प्रसंग आला, तर ‘आपण सर्वाना सोडून का खातोय?’ हा विचार आता त्या पदार्थाची चव बिघडवत नाही. गाण्याच्या मैफलीत एकटय़ानं सहभागी होताना आता काहीही विचित्र वाटत नाही. आकार, वजन यांचा न्यूनगंड न बाळगता कोणते कपडे आवडले तर ते बिनधास्त परिधान करता येतात. त्याचबरोबर आपल्या जोडीदाराच्या किंवा घरातल्यांच्या आवडीनिवडी आपल्यापेक्षा भिन्न असू शकतात आणि तसं असण्यात काहीही वाईट नसतं हाही साक्षात्कार झाला आहे. मुख्य म्हणजे स्वत:बरोबरच एक मोकळेपणा आलेला आहे. स्वत:बरोबरचा संवाद वाढलेला आहे. थोडक्यात, प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेली बुलेट घराच्या पार्किं गमध्ये लवकरच दिसेल अशी चिन्हं दिसू लागली आहेत.

प्रत्येक नात्याचा पाया हा ‘विश्वास’ असतो. एकदा तो भक्कम असला की मग नातं कितीही तावूनसुलाखून निघालं तरी ते भक्कमच राहातं. हेच सूत्र आपलं स्वत:बरोबर जे नातं असतं, तिथेही नेमकं लागू पडतं. आज जे वेगवान आणि असंख्य ताणतणावांचं आयुष्य आपण जगतो, त्यात जगण्याची, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांची समीकरणं वेगानं बदलत आहेत. अनेकदा इच्छा पूर्ण होत नाहीत, हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाहीत. तेव्हा मग सगळ्याच गोष्टींचा उबग येणं किंवा अचानक सगळं काही नीरस वाटायला लागणं सुरू होतं. मग त्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढताना जी दमछाक होते ती कोणत्याही शब्दांत मांडता येत नाही. याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी घेतच असतो. अशा वेळी आपल्याला आपल्या स्वत:चीच सर्वात जास्त गरज असते. तेव्हा स्वत:बरोबरचं हे भक्कम नातं आधार देतं.

ही जशी एक बाजू झाली, तशी त्याची दुसरी बाजू म्हणजे जिथे एखादी गोष्ट करण्याची इच्छा असूनही निर्णय घेताना आपण कच खातो. करू का नको? अशा दोलायमान स्थितीत सापडतो तेव्हा पुढे जाण्यासाठी, नवा अनुभव घेण्यासाठी हाच स्वत:वरचा विश्वास उपयोगी पडतो. थोडक्यात, पोहणं शिकत असताना खोल पाण्यात जायचं तर असतं, पण ढकलणारं कोणीतरी गरजेचं असतं आणि त्याच वेळी बुडणार नाही याची काळजी घेणारंही कोणीतरी आवश्यक असतं. या दोन्ही गोष्टी आपला स्वत:वरचा विश्वास पक्का असेल तर आपोआप होतात.

तेव्हा सरतेशेवटी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या उंबरठय़ावर आज उभं असताना हेच सुचवावंसं वाटतं, की व्हॅलेंटाईन डेचे जे काही बेत असतील ते जरूर पूर्ण करा, पण त्याच बरोबरीनं ‘आपणच आपले व्हॅलेंटाईन’ बनण्याचा प्रयत्नही नक्की करा! आवर्जून प्रेमात पडावं असंच हे नातं आहे. त्यात स्थळ, काळ, वय, असं काहीही आड येत नाही. कोणाबरोबर तुलना करण्याची यात गरज पडत नाही. कोणता मुखवटा परिधान करण्याची गरज वाटत नाही. कोणी लपवाछपवी करेल ही भीतीच उरत नाही.  उलट या नात्यात सगळे मुखवटे दूर होतात, फसवी आभूषणं दूर केली जातात, झगमगाटापासून दूर होऊन मस्त गप्पा होतात. हातून काही चुका झाल्या असतील तर त्याची प्रांजळपणे कबुली दिली जाते.. मन मोकळं होतं. चुका सुधारण्याची स्वत:ला संधी दिली जाते. तशीच ती इतरांनाही देण्याची वृत्ती वाढून नात्यांकडे बघण्याची परिपक्वता आणखी वाढते. माणसाची ओळख ही त्यांच्या कपडे, फॅशन, चकचकाटाइतकीच मर्यादित नसते हे जाणवतं आणि मग आयुष्याशी निगडित प्रत्येक पातळीवर संतुलन साधता येतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘आपणच आपले व्हॅलेंटाईन’ असल्यावर हे नातं साजरं करण्यासाठी विशिष्ट दिवसाची, ठरावीक प्रकारच्या तयारीची गरज पडत नाही. रोजचा दिवस हेच एक प्रकारे ‘सेलिब्रेशन’ ठरतं.. जे दिवसागणिक या नात्याचे बंध फक्त आणि फक्त मजबूतच करतं. तेव्हा नात्याला आणखी काय हवं?

wyogeshshejwalkar@gmail.com