12 December 2019

News Flash

तारणारे वनमित्र

सुरेशकुमार व जयशंकर यांच्या ‘वनमित्र’या संघटनेने गेल्या ७-८ वर्षांत अक्षरश: हजारो प्राणी, पक्षी, सापांची सुटका केली आहे.

| March 14, 2015 01:01 am

ch10सुरेशकुमार व जयशंकर यांच्या ‘वनमित्र’या संघटनेने गेल्या ७-८ वर्षांत अक्षरश: हजारो प्राणी, पक्षी, सापांची सुटका केली आहे. बचाव मोहिमांसह जनजागृतीसाठी शिबिरं, व्याख्यानं, चित्रफिती, जंगल प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी मोहिमा अशा विविध माध्यमातून जीवनदान देणाऱ्या या दोन तरुणांच्या कार्याविषयी..

एक दिवस रेल्वेच्या फाटकातून आत शिरत असताना माझं लक्ष बाजूच्या ट्रान्सफॉर्मरजवळ जमलेल्या गर्दीकडे गेलं. जमावातील काहींच्या हातात काठय़ा होत्या, तर काहींच्या हाती लोखंडी सळय़ा. बघता बघता एकाने हातातली सळई आत खुपसली आणि म्हणाला, ‘अरेरे! थोडक्यात हुकला!’ हे शब्द ऐकताच मी धावलो अन् त्याच्या हातातली सळई काढून घेतली. सर्वाना बाजूला केलं आणि मग ‘स्नेक हुक’च्या साहाय्याने आत अडकलेल्या सापाला बाहेर काढलं. तो चांगला सशक्त आणि साडेसहा फूट लांब होता. बाहेर येताच त्याने आपला फणा काढला. त्याचं ते राजस रूप पाहून सगळेच अवाक् झाले. म्हणू लागले, ‘आज आपल्या हातून केवढं पाप घडणार होतं.’ मी फक्त एवढंच म्हणालो, ‘मारणं आणि तारणं दोन्हीला तेवढाच वेळ लागतो. काय करायचं हा निर्णय तुमचा.’ वनमित्र टीमचा सुरेश कुमार आपला एक अनुभव सांगत होता. वन्यजीव व मनुष्यप्राणी यांच्यातील संघर्षांच्या अशा अनेक प्रसंगांतून ‘वनमित्र’ संघटना रोज मार्ग काढतेय.
वन्यजीवन आणि पर्यावरण यांच्या संरक्षणासाठी बेंगळुरूच्या सुरेश कुमार (वय ३५) व जयशंकर (वय २६) या दोन तरुणांनी २००९ साली ‘वनमित्र’ ही संघटना (एन.जी.ओ.) स्थापन केली. काम त्याआधीच सुरू झालं होतं. या छोटय़ाशा गटाने गेल्या ७-८ वर्षांत अक्षरश: हजारो प्राणी, पक्षी, साप इत्यादींची सुटका करून त्यांना पुन्हा आपापल्या जगात सोडलंय. त्याचबरोबर शिबिरं, व्याख्यानं, चित्रफिती, जंगल प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी मोहिमा.. अशा माध्यमातून त्यांनी गावकरी, शेतकरी, विद्यार्थी यांनाच नव्हे तर वनखात्याचे कर्मचारी, पोलीस, होमगार्डस्, इंडो-तिबेटियन सरहद्दीवरचं संरक्षक दल अशा २५ हजारांहून जास्त नागरिकांना वन्यजीवन रक्षणाच्या बाबतीत जागृत केलंय.
ही एवढी तळमळ का तर निसर्गाचं रक्षण व्हावं.. जंगलातील पर्यावरणाचा तोल सांभाळणारी अन्नसाखळी अबाधित राहावी.. प्राण्यांमार्फत बीजप्रसार होऊन माणसाचे ‘झाडं लावा, झाडं जगवा’ मोहिमेचे कष्ट कमी व्हावे.. आणि मुख्य म्हणजे पुढच्या पिढय़ांना जंगलं म्हणजे काय ते समजण्यासाठी मुळात ती अस्तित्वात राहावी यासाठी.
असं म्हणतात की बिबटय़ा हा प्राणी सहसा आपली जागा सोडून जात नाही. त्याच्या जागेवर गावकऱ्यांनी अतिक्रमण केलं तर त्याला गावातील ऊसाच्या वा अन्य शेतात राहण्याशिवाय पर्याय नसतो. अशा ठिकाणी जन्माला आलेले बछडे गावकरी पैशाच्या आशेने पळवतात. आईपासून दुरावलेली ही पिल्लं फार काळ जगू शकत नाहीत. चुकून माकून एखादं जगलंच तर कोणत्या तरी झूमध्ये कायमचं गजाआड जाऊन बसतं. अशा प्रकारे पळवलेल्या १२ बछडय़ांची वनमित्रांनी त्यांच्या आईशी पुनर्भेट करून दिलीय. सुरेश कुमारने सांगितलं, ‘या बछडय़ांना आसपासच्या जंगलात सोडलं की जास्तीत जास्त ३ दिवसांत त्यांची आई त्यांना घेऊन जातेच जाते.’ आपापल्या पिल्लांना शोधण्यासाठी जंगलभर टाहो फोडत वणवण भटकणाऱ्या त्या मातांचं दु:ख आणि पुनर्मीलनाचा आनंद दोन्ही या वनमित्रांनी जवळून पाहिलाय.
वनमित्रांचं काम वनखात्याच्या हातात हात घालून चालतं. वन्यप्राण्यांची तस्करी रोखणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग. भारतीय कासवांची खाण्यासाठी, औषधं बनवण्यासाठी अथवा सुशोभीकरणासाठी त्याचं कवच मिळावं यासाठी मोठय़ा प्रमाणात तस्करी केली जाते. त्यासाठी त्यांना अत्यंत निदर्यपणे उकळत्या पाण्यात वा तेलात टाकून मारलं जातं. एकदा शहराच्या विमानतळाजवळील एका घरात ४६८ कासवं एका पोत्यात कोंबून निर्यातीसाठी सज्ज असल्याचं वनखात्याला समजलं. वनमित्रांना घेऊन ते सर्व योग्य वेळी तिथे पोहोचले. त्यातली कित्येक कासवं तर अगदीच लहान होती. या गुदमरलेल्या जीवांना वनमित्रांनी वाळूचा एक बिछाना करून त्यावर सोडलं, खाऊ-पिऊ घातलं आणि पूर्वस्थितीला आल्यावर वनखात्याच्या मदतीने सुरक्षित जागी सोडलं.
‘वनमित्र’ संघटनेचे २४ तासांसाठी उपलब्ध असलेले कार्यकर्ते दोघेच असले तरी त्या त्या मोहिमेपुरते आवश्यक तेवढे स्वयंसेवक त्यांना नेहमी मिळत असतात. कधी कधी तर अशा लोकविलक्षण कामाकडे वळण्याला एखादी घटना कारणीभूत ठरते. वर्षभरापूर्वीची गोष्ट. एक ट्रक ड्रायव्हर रात्रीच्या वेळी हमरस्त्यावरून बेंगळुरूकडे येत होता. इतक्यात ट्रकच्या हेडलाइटच्या प्रकाशात त्याला रस्त्याच्या मध्ये चार डोळे चमकताना दिसले. रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून त्याने जवळ जाऊन बघितलं, तर ती लॉरीसया प्राण्याची जोडी होती. चाहूल लागताच एक बाजूच्या झाडीत पळालं, पण दुसरं जखमी असल्यामुळे पळू शकलं नाही. मागचा पाय दुखावलेल्या त्या लॉरीसला घेऊन तो ड्रायव्हर भल्या पहाटे शहरात पोहचला. वनमित्रांना ch11कळल्याक्षणी ते धावले. त्या प्राण्याला पूर्ण बरं करून तो बागडायला लागल्यावर पुन्हा त्याच जागी सोडण्यात आलं. या प्रक्रियेत त्या ड्रायव्हरचा रोज चौकशीसाठी फोन येत होता. आता तो वनमित्रांना जोडला गेलाय.
त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र बेंगळुरू असलं तरी वनमित्रांचं काम कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील चार राज्यांतून चालतं. आपत्काळात लांबच्या ठिकाणी त्वरित पोहचणं शक्य नसतं अशा वेळी फोनच्या माध्यमातून अतिशय सावधपणे परिस्थिती हाताळावी लागते. केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरील एका कोळय़ाच्या घराबाहेर ठेवलेल्या जाळय़ात एकदा एक मोठ्ठा अजगर गुरफटला. चार दिवस सर्व तऱ्हेचे प्रयत्न करून झाले. शेवटी कोणाच्या तरी सांगण्यावरून वनमित्रांना फोन गेला. तेव्हा वनमित्रांनी प्रथम त्या कोळय़ाला विश्वास दिला की, एक अनमोल जीव तुझ्या हातात आहे आणि तू नक्की त्याचा जीव वाचवू शकतोस. आश्चर्य म्हणजे त्यानंतर वनमित्रांच्या सूचनाबर हुकूम त्याने त्या अजगराला मुक्त केलं. सुटका झाल्याक्षणी ते अजस्त्र जनावर सळसळत बाजूच्या झाडीत दिसेनासं झालं. सुरेश कुमारचं म्हणणं, ‘कोणताही प्राणी उगीच हल्ला करत नाही. तुम्ही त्यांच्या वाटेला जाऊ नका आणि त्यांनाही आपल्या मार्गाने जाऊ द्या.’ तो अगदी कळवळून म्हणाला, की एक वाटीभर पाणी रोज घराबाहेर ठेवण्याचा छोटासा नेम जरी तुम्ही केलात तरी अनेक पक्ष्यांचे प्राण वाचतील. शेवटी निसर्गच आपला तारणहार आहे, तो वाचला तरच आपण वाचू.’
अशा असंख्य अनुभवांची पोतडी वनमित्रांकडे आहे. त्यांची प्रत्यक्ष भेट नाही होऊ शकली, पण सुरेश कुमारशी फोनवरून बोलणं झालं. तेही अनेकदा ई-मेलद्वारे पाठी लागल्यावर. सगळी प्रश्नोत्तरे झाल्यावर मनात वारंवार येणारा प्रश्न मी एकदाचा विचारून टाकला.. तुम्ही पूर्णवेळ हेच करता मग पोटापाण्याचं काय? यावर तो मनमुराद हसला आणि म्हणाला, ‘सल्लामसलत (कन्स्लटिंग) व व्याख्यानं यातून जगण्यापुरता पैसा मिळतो.. और जिने को क्या चहिये?’ त्याने सांगितलं, ‘माझ्या आईवडिलांना माझा अभिमान जरूर आहे, पण त्यांनाही मी काही तरी कामधंदा करून पैसे कमवावे असं वाटतं.’ जयशंकरचीही तीच परिस्थिती आहे. त्याचं तर लग्नही झालंय, एक छोटा मुलगाही आहे त्याला. पण आमचा निर्धार पक्का आहे. या ईश्वरी कामासाठी कुणी तरी वेळ द्यायला नको का?
त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी नव्हतं. पण या देवदूतांना असंख्य वाचकांसमोर आणणं तर माझ्या हातात होतं, आणि मी तेच केलं.
waglesampada@gmail.com
संपर्क-ई-मेल vanmitraindia@facebook.com
वेब साईट : vanmitra.org

First Published on March 14, 2015 1:01 am

Web Title: vanamitra organisation
टॅग Wild Life
Just Now!
X