आमचं जुळत नाही, या कारणास्तव घटस्फोट घेण्याची वेळ आली, की अनेक जण समुपदेशनाचा मार्ग धरतात. त्यावेळी बऱ्याच गोष्टी हातून निसटून गेलेल्या असतात. हे आधीच कळलं असतं तर किंवा हे आधी केलं असतं तर या जर-तरच्या गृहीतकांमध्ये अडकू न नातं तुटू नये यासाठी विवाहपूर्व समुपदेशन महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे अनेक संसार समाधानी झाले आहेत. अर्थात त्याविषयी कायदा करावा का यावर मतभिन्नता असू शकते, तरीही विवाहपश्चात समुपदेशनापेक्षा विवाहपूर्व समुपदेशन नक्कीच फायदेकारक ठरू शकतं. गेली २0 वर्ष विवाहासंदर्भात समुपदेशन करणाऱ्या वंदना कुलकर्णी यांचा लेख.

गोवा हे भारतातील अगदी छोटंसं राज्य गेल्या आठवडय़ात एका वेगळ्याच बातमीनं चर्चेत आलं. घटस्फोटाची संख्या- विशेषत: करोनाच्या काळात बरीच वाढल्याचं लक्षात आल्यामुळे (२ वर्षांत १० टक्के  वाढ) गोवा सरकारनं लग्न होण्यापूर्वी (ठरवण्यापूर्वी नव्हे!) विवाहपूर्व समुपदेशन सक्तीचं करण्याचा निर्णय जाहीर केला. पहिल्यांदाच कुठल्या तरी राज्यानं असं पाऊल टाकल्यामुळे त्याचं स्वागत होत आहे असं वाटत असतानाच, या निर्णयाबद्दल बरीच मतमतांतरं, खडाजंगी, पालकांचाच (?) विरोध होऊन तो मागे घ्यावा लागला. आता तर गोव्याचे कायदेमंत्री नीलेश काब्राल यांनी आपण या मुद्दय़ावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचं म्हटलं आहे. यातील वादात न शिरता, कुणाला तरी असं पाऊल टाकावंसं वाटलं हे विशेष वाटतं. खरोखरच एकूण घटस्फोटांची आणि प्रत्यक्ष घटस्फोट झाले नाही तरी विवाहातील बेबनावांची (Marital discord) वाढती संख्या बघता विवाहपूर्व (शास्त्रीय) समुपदेशन ही काळाची गरज झाली आहे असं वाटतं. मात्र या संकल्पनेची डोळस जाणीव किती जणांना आहे? हा मुख्य मुद्दा आहे.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने

सध्या सगळीकडे करोना प्रतिबंधक लस हा प्राधान्याचा विषय आहे. लशीचे दोन्ही डोस घेतल्यावरही करोना विषाणूचा संसर्ग होत नाही असं नाही, हे आपल्याला कळलंय. पण त्याची तीव्रता कमी असेल, रुग्णालयात दाखल व्हावं लागण्याच्या, ऑक्सिजन लागण्याच्या शक्यता बऱ्याच कमी होतील असंही यातील तज्ज्ञ सांगत आहेत. म्हणून आपण लशीचे दोन डोस घेण्यास तयार झालो आहोत आणि काहींचे ते घेऊनही झाले आहेत. विवाहपूर्व समुपदेशन हे असंच प्रतिबंधक आहे. ते झालं असेल, तर मुळात जोडीदाराची निवड योग्य निकषांवर, विवेकानं आणि विचारपूर्वक, उभयतांच्या सविस्तर चर्चेनं झालेली असेल; कारण नेमकी चर्चा कशावर करायची याचे सुयोग्य आणि मानसशास्त्रावर आधारलेले मुद्दे समुपदेशनातून सामोरे येतात. त्यामुळे आपल्या निर्णयाबद्दल आत्मविश्वास वाटतो. कुणाच्या तरी दबावाखाली, केवळ भावनांच्या प्रभावाखाली येऊन, अविवेकी निर्णय घेण्याच्या (आणि पुढे प्रत्यक्ष जीवनात ते निभावता न येण्याच्या) शक्यता कमी होतात. बेबनाव हाताळण्याच्या, नातं निकोप आणि समाधानी करण्याच्या क्षमता वाढतात. लग्न बहुतेकजण करतात; किंबहुना प्रत्येक जण शक्यतो लग्न करेलच (त्याची/ तिची तशी इच्छा, ओढ असो वा नसो) याची काळजी पालक, नातेवाईक आणि एकूणच आपला समाज घेत असतो! करिअर उत्तम होण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा चांगल्या गुणांनी पास व्हावं म्हणून ‘अभ्यास करा’चा धोशाही हीच सगळी मंडळी एकमुखानं लावत असतात. परंतु चांगल्या चाललेल्या करिअरइतकेच वैवाहिक आणि पुढे जाऊन कौटुंबिक नातेसंबंध सुदृढ असणं हे आपल्या भावनिक सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. पुढील एकत्रित किमान पन्नासएक वर्षांचं दीर्घकालीन वैवाहिक नातं निर्माण करण्यापूर्वी, तीही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होण्यासाठी या विषयाचा विचार, अभ्यास, नियोजन करा, हे समाजातील किती लोक सांगतात?

विवाहाचा नेमका अर्थ काय? निसर्गाच्या दृष्टीनं तो माणूस या सामाजिक प्राण्याच्या प्रजोत्पादनासाठीचा नर-मादी समागम असेल, तर त्यात आपल्या शरीर-मनाच्या नेमक्या काय भूमिका असतील? लग्न केवळ संसार करणं आणि मुलं जन्माला घालणं (तशी दोघांची इच्छा असेल तर) एवढय़ापुरतंच आहे, की त्या पलीकडे जाऊन शरीर-मनाच्या काही गरजा असतात? त्या असतील तर त्या भागवण्यासाठी वैवाहिक नात्यात काय असायला हवं? साहचर्य हा वैवाहिक नात्याचा प्राण असेल, तर असं साहचर्य ज्या भावनिक, वैचारिक, लैंगिक संवादातून, त्यातून निर्माण होणाऱ्या नात्यांच्या घट्ट बंधनातून (बाँडिंग) निर्माण होतं, त्यासाठी लागणारी काही किमान भावनिक, वैचारिक अनुरूपता, परस्परपूरकता आपल्यामध्ये आहे का?, हे लग्नाआधीच्या चर्चामधून जाणवलं आहे का? असे अनेक मुद्दे विवाहपूर्व समुपदेशनामध्ये चर्चिले जातात. गेल्या २५ वर्षांचा अभ्यास आणि अनुभव असं सांगतो, की फार कमी जणांना आजही अशा काही शास्त्रीय विचारांचा स्पर्श झालेला आहे. ‘वर पाहिजे’, ‘वधू पाहिजे’, या ‘चौकटी’मधल्या २५ वर्षांपूर्वीच्या अपेक्षा बघा आणि आजच्या बघा! अजूनही सर्व भर जे समोर ‘दिसतं’, ‘दाखवता येतं’, यावरच आहे. पालकांचा आणि मुलामुलींचासुद्धा! त्यामुळे जे दाखवायचं नाहीये ते लपवण्याची ‘सोय’ आपसूकच होते! लग्नानंतर हे धक्के सुसह्य़ नसतात. त्यात आता जगण्याची वाढती आव्हानं आणि कमी झालेली सहनशीलता!  त्यामुळे सर्व काही दुसऱ्याच्या माथी मारून आपला बाहेर पडण्याचा मार्ग माणसं मोकळा करून घेतात! फसवणाऱ्यानं समजा जरी फसवलं असेलच, तरी ‘आपण का बरं फसलो?’ हा प्रश्न स्वत:ला कुणीच विचारत नाही.

विवाहपूर्व समुपदेशनात कळीच्या असलेल्या व्यक्तिमत्त्व चाचण्यांचे अहवाल अशा फसवणुका टाळण्यासाठी शास्त्रीय मदत करतात. व्यक्तिमत्त्व दोषातून निर्माण होणारे वर्तनदोष, एकूणच एखाद्याच्या वर्तनाचा कल (जसं अबोलपणा, संतापी असणं, संशयग्रस्तता- वगैरे) समजतो आणि एकूण दोन माणसांची (विवाहबद्ध होऊ इच्छिणाऱ्या) स्वभाव-वर्तन वैशिष्टय़ं एकमेकांशी कितपत मिळतीजुळती आहेत?, तडजोड कुठे करावी लागेल?, त्यासाठीच्या क्षमता किंवा कमतरता, हे या चाचण्यांमधून जाणून घेता येतं. मानसिक अस्वास्थ्य, आजार, व्यसनं याचीही कल्पना येते. एकूण केवळ काही मिनिटांच्या आणि काही प्रश्नांची ‘हो-नाही’मध्ये उत्तरं द्यायच्या या साध्या चाचण्यांमधून सुयोग्य निर्णयासाठी, तसंच वैवाहिक जीवन सजगपणे आणि समजुतीनं जगण्यासाठी भरपूर वैचारिक खाद्य मिळतं. निर्णय घेण्यासाठी, तसंच नातं उभं करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पारदर्शकता या विवाहपूर्व समुपदेशनामुळे मिळते. त्यामुळे माणसांना सुरक्षित वाटतं.

पति-पत्नी लग्नानं एकत्र येतात तेव्हा दोन कुटुंबही एकत्र येत असतात. पती-पत्नीचं वैवाहिक स्वास्थ्य जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच सर्वाचे एकत्रित कौटुंबिक स्वास्थ्यही महत्त्वाचं असतं. एकमेकांविषयी आपलेपणाची, जिव्हाळ्याची भावना निर्माण व्हावी म्हणून दोन्ही बाजूंनी मोकळ्या मनानं परस्परांचा स्वीकार, आदर, नव्या सुनेविषयी स्वागतशीलता आणि ती नव्या घरात, नव्या नात्यांमध्ये रुळेपर्यंत दाखवायचा संयम आणि सहिष्णुता पुढे जाऊन नात्यांच्या जपणुकीसाठी मोलाचे ठरतात. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशनात नातेसंबंध केंद्रस्थानी ठेवताना, दोन्ही कुटुंबांचाही विचार केला जातो. विवाहबद्ध होणाऱ्या मुलामुलीच्या घरची पार्श्वभूमी, कौटुंबिक वातावरण, कु टुंबामधील सदस्यांचे परस्परांमधील नातेसंबंध, सामाजिक- सांस्कृतिक- आर्थिक विचारसरणी, घरातील पद्धती, चालीरीती, परंपरा, दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह या समुपदेशनातून होतो. मुलगा – सून लग्नानंतर आईवडिलांबरोबर राहाणार असतील तर वरील गोष्टींचा विवेकी विचार होणे फार गरजेचे असते. आपली पत्नी नवीन नात्यांमध्ये सामावली जाईपर्यंत आपण काय भूमिका घेणार, तिला सहकार्य, साथ कशी करणार याचा विचार-कृती मुलानं करणं फार गरजेचं आहे. त्या आधारे मुलीला या पूर्ण भिन्न नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायला सोपं जाईल. आमचा एक मित्र नेहमी म्हणतो, की लग्नानंतर मुलाने दोन वर्षं आधी मुलीच्या माहेरी जाऊन राहावं. मग दोघांनी सासरी यावं. तरच कराव्या लागणाऱ्या तडजोडींची त्याला जाण येईल. आणि तो पत्नीच्या मन:स्थितीला संवेदनशीलतेनं समजून घेऊ शकेल.

नात्यातील जपणूक ही सर्वाच्या सहसंवेदनशीलतेमुळे  होत असते. खरं तर नाती जुळणं ही एक प्रक्रिया असते. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि आजूबाजूचे इतर

अनेक घटक या मूळ प्रकृतीचं परिशीलन

करत असतात. त्यातून माणसांची जडणघडण होत असते.

आपण कुठल्या, कशा वातावरणात वाढवले जातो आहोत यावर आपल्या विचारांची बैठक (beliefs), मूल्यं इत्यादी ठरत असतं. आपल्या जगण्यावर, वर्तणुकीवर या सर्वांचा खूप प्रभाव असतो. आपला मेंदू हा यंत्रमानव नसतो. तो बदलांना वेळ घेतो. त्याची स्वसंरक्षण व्यवस्था यामध्ये आपली भूमिका पार पाडत असते. हे विज्ञान समजून घेतलं नाही, तर अवास्तव अपेक्षा ठेवल्या जाण्याची शक्यता असते. आपल्या मनासारखं झालं नाही की माणसं नाराज होतात. त्याची व्यक्तीनुरूप वेगवेगळी प्रतिबिंबं नात्यांमध्ये उमटतात. त्यातून समज-गैरसमजांना वाव मिळतो. नाती फुलांसारखी असतात. संवेदनशीलतेनं हाताळता आली, तर त्यांची जपणूक होते. विविध फुलांचे जसे विविध रंग, रूप, सुवास.. तसंच माणसांच्या स्वभावाचं असतं. प्रत्येकाला स्वत:चं एक अस्तित्व असतं. माणसं प्रेमानं एकत्र आली तर रंगीबेरंगी फुलांचा एक सुंदर गुच्छ बनतो; पण नव्यानं लावलेलं रोपटं रुजायला, वाढायला वेळ लागतो. मगच त्याच्या फुलांची शोभा कळते. विवाहपूर्व समुपदेशनात परस्परांचे विचार, धारणा, स्वभाव, गप्पांमधून समजून घेण्याचा प्रयत्न करत, समाधानी वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनासाठी गरजेच्या असलेल्या मुद्यांची चर्चा आणि रुजवात केली जाते.

विवाहातील लैंगिक नातं, अर्थात लैंगिक सहजीवन हा तर स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. ‘गूगल’ करून ‘सर्वकाही’ (?) उपलब्ध असताना अगदी आजही, विवाहोत्सुक आणि विवाहित (अगदी १०-२० वा त्याहूनही अधिक वर्ष विवाहित असलेलेही) मुलं-मुली, जोडीदार यांच्यात जे अज्ञान, गैरसमज, गंड, अत्यंत अशास्त्रीय माहिती, मूलभूत माहितीचा अभाव, हे चित्र समुपदेशनासाठी येणाऱ्या प्रकरणांमध्ये बघायला मिळतं. ते पाहिल्यावर अक्षरश: स्तंभित व्हायला होतं.  अनेकानेक लग्नं अनेक प्रकारच्या लैंगिक समस्यांनी ग्रासलेली, असमाधानी, वंचितता अनुभवणारी आणि केवळ मोडायची नाहीत म्हणून टिकवून ठेवलेली आहेत हेही दिसतं. लग्न होऊन ५-५ वर्ष झाली तरी समागम न झालेली (Non -consumated), अनेक वर्षं एकत्र राहात असतानासुद्धा १०-१० वर्ष लैंगिक नात्यापासून, साध्या प्रणयापासूनही लांब राहिलेली, या इतक्या महत्त्वाच्या नैसर्गिक गरजेच्या आनंदापासून आपल्या जोडीदाराला वंचित ठेवणारी, अशी जोडपी नगण्य वा अपवादात्मक नाहीत. किंबहुना त्यांची संख्या खूप मोठी आहे, हे कुणीही समुपदेशक सांगू शकेल.

लैंगिकता, लैंगिक गरजा आणि लैंगिक नातं हाच मुळात (अजूनही!) आपल्या समाजात निषिद्ध आणि म्हणून लपवायचा विषय. त्यात ‘आमचं कसं छान चाललंय’ हे दाखवण्याचा अप्रमाणिकपणा आणि सोस (ज्याला आपले सर्व कौटुंबिक आणि सामाजिक समारंभ, सणवार वगैरे सतत संधी उपलब्ध करून

देत असतात.) यामुळे दुर्दैवाच्या, वेदनेच्या, घुसमटीच्या ‘खऱ्या’ कहाण्या कळतात त्या सहसा आमच्यासारखे समुपदेशक, मनोविकास तज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ या व्यावसायिकांनाच. आम्ही जेव्हा विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशनाच्या कार्यशाळा (सर्व वयाच्या लोकांसाठी) घेतो, तेव्हा बहुतेक वेळा ८० टक्क्यांहून अधिक उपस्थित मंडळी कार्यशाळेनंतर आम्हाला येऊन सांगतात, की आज प्रथमच आमचं लैंगिक शिक्षण झालं. लैंगिक सहजीवनाचं हे प्रशिक्षण विवाहपूर्व समुपदेशनाचं महत्त्वाचं अंग आहे. ते ‘स्पर्श’ या महत्त्वाच्या विषयांबद्दलचं अज्ञानही दूर करतं.

गोव्यामध्ये समुपदेशनासंबंधीचा कायदा लागू होवो न होवो, इतर राज्यांनी याबद्दलचा सुजाणपणा दाखवो वा न दाखवो, आपल्याला आपल्या इतक्या वैयक्तिक गोष्टींसाठी सरकार, कायदे याकडे का बरं बघावं लागतं? आपल्याला याचं महत्त्व का कळत/ वाटत नाही? ‘लोकसत्ता’नं यापूर्वीही के वळ समुपदेशनाचाच नव्हे तर लैंगिक समुपदेशनाचा विषयही ऐरणीवर आणला आहे. या विषयावर सलग एक वर्ष सदर प्रसिद्ध करून समाजाला जागरूक केलं आहे. समुपदेशनासंबंधी अनेक पुस्तकंही आली आहेत (मराठीमधूनही. इंग्रजीत होतीच). अनेकांनी पुढाकार घेऊन व्याख्यानं, परिसंवाद, कार्यशाळा आयोजित केल्या/ करत आहेत. ‘दूरदर्शन’नं शीला कुलकर्णी यांच्या पुढाकारानं  ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवर याबद्दल चार भागांची मालिका सादर केली.

आधुनिक काळाशी सुसंगत जगण्यासाठी आता हे सारं काही सहजी उपलब्ध आहे. परंतु आपल्या मानसिकतेची, विचारांची कवाडं खुली केली नाही तर? आनंदी, समाधानी संसार शक्य होईल का? आणि या साऱ्या मागच्या पिढीच्या अनुभवांमुळे आम्हाला लग्नच करायचं नाही, असं नवी पिढी म्हणू लागली तर दोष कुणाला देणार?

vankulk57@gmail.com