29 March 2020

News Flash

कथा दालन : व्हॅनिला आइस्क्रीम

आमच्या वाडय़ाच्या समोरच एक मोठ्ठा बंगला होता.. कुणा व्यावसायिकाचा. गल्लीत सर्वात श्रीमंत तेच. कोणाशी त्यांचे फारसे संबंध नव्हते.

(संग्रहित छायाचित्र)

|| निरुपमा महाजन

ozone.point@gmail.com

‘‘मॅम, तुमच्यासाठी कोणता फ्लेवर?’’ संदेश सगळ्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे आइस्क्रीम ऑर्डर्स करत होता. मी निवांतपणे पूर्ण मेन्यूवरून नजर फिरवली आणि सांगितलं, ‘‘व्हॅनिला.. प्लेन व्हॅनिला.’’ ‘‘व्हॅनिला? कम ऑन मॅम.. यू आर बर्थडे गर्ल. व्हॅनिला काय?’’ सगळेच माझ्याकडे आश्चर्याने पाहात होते. आइस्क्रीम आलं.. मी शांतपणे समोर आलेल्या शुभ्र, प्लेन, मधुर सुवासाच्या त्या आइस्क्रीमचा एक चमचा तोंडात घेतला. समाधान, शांतता, गोडवा देहभर पसरत गेला.. आपसूक डोळे भरून आले.. मन किती तरी वर्ष मागे गेलं..

शूटिंग संपलं. फार मोठं शेडय़ुल.. उकृष्ट झालं. टीम खूश!

मी मेकअप उतरवण्यासाठी ‘मेकअप दादां’च्या समोर बसले होते. अचानक १५-२० जणांचा घोळका आत आला..

‘‘हॅपी बर्थडे..’’ शिवाय सरप्राईज केक होताच.

‘‘निरु.. कम से कम आइस्क्रीम पार्टी तो बनती है..’’

‘‘चलो.. तुम लोग भी क्या याद रखोगे.’’ मी म्हटलं.

निघालो.. ते नेतील तिथं..

कार पार्क केली आणि वळून पाहते तर काय, पावसाळी संध्याकाळच्या स्वप्नवत पाश्र्वभूमीवर रंगीबेरंगी दिव्यांनी नटलेलं सुंदर आइस्क्रीम पार्लर.. आत गेलो.. किती तरी स्वाद आणि रंग यांची मफल जमलेली..

‘‘मॅम, तुमच्यासाठी कोणता फ्लेवर? यांचे जवळपास सगळेच फ्लेवर्स हिट आहेत.’’ संदेश सगळ्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे आइस्क्रीम ऑर्डर करत होता.

मी निवांतपणे पूर्ण मेन्यूवरून नजर फिरवली आणि सांगितलं, ‘‘व्हॅनिला.. प्लेन व्हॅनिला.’’

‘‘व्हॅनिला? कम ऑन मॅम.. यू आर बर्थडे गर्ल. व्हॅनिला काय?’’

‘‘असू दे रे.. मला तेच आवडतं.. प्लेन व्हॅनिला.’’

सगळेच माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. संदेश खांदे उडवत ऑर्डर द्यायला निघून गेला.

आइस्क्रीम आलं. शांतपणे मी समोर आलेल्या शुभ्र, प्लेन, मधुर सुवासाच्या त्या आइस्क्रीमचा एक चमचा भरून तोंडात घेतला. समाधान, शांतता, गोडवा देहभर पसरत गेला.. आपसूक डोळे भरून आले..

मन किती तरी वर्ष मागे गेलं..

मी पाच वर्षांची होते.. इयत्ता पहिलीत.

आजीकडे होते शिकायला. वडिलांची नोकरी दूर लहानशा गावात.. तिथं शाळा नव्हती. शिवाय परिस्थितीही बेताचीच.  आजी-आजोबाही अगदी गरिबीतच. दोन वेळेचं जेवण सोडून दुसरा कुठलाच खर्च परवडणं त्यांना अवघड. पण शाळेसाठी मला तिथं ठेवलं.

आजोबा अतिशय संतापी. कदाचित परिस्थितीनं तसे झालेले. आजीसकट सगळे त्यांच्या धाकात.. धाकात म्हणजे काय.. अगदी दहशतीतच. आजी मला आजोबांची भीती घालून गप्प बसवायची.. ‘त्यांना नाव सांगेन हं’ म्हटलं की मी आजीलाही घाबरायची. शांत बसायची.. शांत म्हणजे अगदी शांत.. चिडीचूप! मग स्वत:शीच विचार करत राहायची.. मनातल्या मनात मनाशीच गप्पा, हसणं, रडणं वगैरे..

काही दिवसांनी शेजारच्या वाडय़ातल्या २-३ मुलींनी गल्लीत खेळायला बोलावलं. आनंदानं गेले. त्यांचे रंगीबेरंगी फ्रॉक, रिबिनी.. आहा! किती छान! मला तर दोनच फ्रॉक.. जुने आणि फारच साधे. असू दे की, खेळायला मिळतंय ते काही कमी नाही. मग रोजच एकत्र खेळणं सुरू झालं. कधी पाणी प्यायच्या निमित्तानं त्यांच्या घरी जायची. लोखंडी कॉट, गाद्या, चकचकीत स्टिलची भांडी, सुंदर साडीतली त्यांची आई, एखादं लोखंडी कपाट, वर्तमानपत्रं, पुस्तकं.. हे ऐश्वर्य बघून मी थक्क व्हायची.. आजी अधूनमधून म्हणायची, ‘‘जरा अंतर ठेव. आपण त्यांच्या बरोबरीचे नाही. आपला अपमान नको व्हायला कधी.’’ मग मी त्यांच्यात असताना फारशी बोलायची नाही. फक्त सगळं ऐकायची, पाहायची आणि खेळायची.

एक दिवस आम्ही चौकात खेळत असताना ‘गारेगार’वाला आला.. त्याची छोटी चौकोनी ढकलगाडी घेऊन. ‘गारेगार’ म्हणजे आइस्क्रीम. त्या काळात आइस्क्रीम हा शब्दही कोणाला माहिती नव्हता त्या छोटय़ा गावात. तर तो आल्याबरोब्बर सगळी मुलं पळाली.. घरी जाऊन १०-१० पैसे घेऊन आली. पांढऱ्या रंगाचं, दुधाचं, काडीवालं ‘गारेगार’ विकत घेऊन चवीनं खाऊ लागली.. माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. मीपण घरी गेले.

‘‘आज्जी गं, दहा पैसे दे ना, ‘गारेगार’ घ्यायचंय.’’

‘‘गप गं.. यांनी ऐकलं तर खवळतील. कशाला खेळतेस त्या पोरींच्यात? आपल्याकडं तेवढा पसा नाही. हे बघ राणी.. आपण आपल्या पायरीनं राहावं.’’

मी परत बाहेर गेले. त्यांचं ‘गारेगार’ संपलं होतं, पण खेळताना त्यांच्या हातांना त्याचा मधुर, सुंदर सुवास येत होता. मला फार फार म्हणजे फारच आवडला. त्या वासासाठी किती तरी वेळ त्यांच्याशी खेळत राहिले.

पुढं सुट्टीत आईबाबांकडे गेले तेव्हा परत येताना आईकडे दहा पैसे मागितले. मला पोटाशी घेऊन निरोप देताना आईनं दहा पशांचं नाणं हळूच माझ्या हातात दिलं. ‘‘जपून ठेव बाळा.. योग्य ठिकाणीच वापर हं.’’

आईला सोडून परत जाताना डोळ्यांत इतकं पाणी भरून आलं की लाल बसमध्ये बसताना हातातलं नाणं सारखं धूसरच दिसत राहिलं. डोळ्यांत झोप उतरल्यानंतर मात्र ते नाणं फ्रॉकच्या खिशात जपून ठेवलं आणि स्वप्नांच्या जगात हरवून गेले..

स्वप्नातही तोच ‘गारेगार’चा पांढराशुभ्र रंग आणि तोच मधुर सुवास..

सकाळी आजीच्या घरी पोहोचले. खिशात हात घातला तर काय, पैसे गायब. खिसा फाटका होता.. भोकातून नाणं कुठं तरी पडून गेलं होतं.. वेडय़ासारखी सगळीकडे शोधत राहिले. नाहीच मिळालं. उलट मी पैसे हरवले म्हणून आजोबा भयंकर संतापले. मी फार रडले. रात्री स्वप्नातही तेच नाणं दिसत राहिलं आणि त्या ‘गारेगार’चा सुगंध पसरत राहिला. खरोखरच जणू मला वेड लागलं होतं..

आमच्या वाडय़ाच्या समोरच एक मोठ्ठा बंगला होता.. कुणा व्यावसायिकाचा. गल्लीत सर्वात श्रीमंत तेच. कोणाशी त्यांचे फारसे संबंध नव्हते. बडे लोग.. बडी बातें.. तर गावाहून त्यांची नातवंडे आली होती.. लाडावलेली पण खेळकर. त्या दिवशी आम्ही चौकात खेळत होतो तर तीही आमच्याशी खेळायला आली. दोन मुली आमच्याच वयाच्या आणि त्यांचा एक छोटा भाऊ. श्रीमंतांची मुलं म्हणून सगळे जरा दबकूनच होते. लगोरीचा डाव अगदी रंगात आला होता. आणि तेवढय़ात ‘‘गारेगार.. गारेगारऽऽवाला’’ अशी हाळी ऐकू आली.

सगळी मुलं ‘‘हुर्रऽऽऽयो’’ करत पैसे आणायला आपापल्या घरी पळाली. बंगलेवाल्या मुलांच्या आजीनेही त्यांना पैसे दिले. ‘गारेगार’वाल्याभोवती एकच घोळका झाला. सगळ्यांनी तेच पांढरेशुभ्र, त्या मधुर सुवासाचे, दुधाचे ‘गारेगार’ घेतले. ‘‘मी आधी, मी आधी’’ करत सगळे जण आपापले ‘गारेगार’ घेऊन विजयी मुद्रेने परत येत होते.

मी मात्र एकटीच आमच्या वाडय़ाच्या पायरीवर येऊन बसले होते. बिचाऱ्या आजीकडे पैसे मागण्यात काही अर्थ नव्हता. मातीत बोटाने रेघोटय़ा मारता मारता मध्येच तो गोड सुवास यायचा आणि तोंडाला पाणी सुटायचं.. मनाला आवर घालून डोळ्यांतलं पाणी कसंबसं थोपवत मी अगदी शांत बसले होते.. तितक्यात त्या बंगलेवाल्या तीन भावंडांमध्ये काही तरी बिनसलं. वादाचं रूपांतर मारामारीत झालं. त्या दोन्ही मुली लहान भावाला फटका देऊन बंगल्यात निघून गेल्या. रागारागाने त्यानं आपलं ‘गारेगार’ तिथंच चौकात फेकून दिलं आणि तोसुद्धा मोठय़ांदा रडत बंगल्यात निघून गेला. आपल्यावर नाव नको म्हणून गल्लीतली सगळी मुलं आपापल्या घरी पळून गेली. मी हे सगळं आश्चर्याने बघत एकटीच तिथं बसून होते. आता चौकात फक्त मी आणि ते ‘गारेगार’ हळूहळू वितळत चाललेलं..

माझ्या मनात द्वंद्व चालू झालं. एक मन म्हणत होतं, ‘घ्यावं का उचलून ते ‘गारेगार’? जरासं पुसून घेतलं की झालं. नाहीतरी ते वायाच जाणार आता..’ लगेच दुसरं मन सांगत होतं,’ याला हावरटपणा म्हणतात, कदाचित चोरी. आपल्या आजी-आजोबांना हे अजिबात आवडणार नाही.. नको मग.. नकोच.’

‘पण आजी-आजोबांना कोण सांगणार? इथं तर पाहायला कोणीच नाहीये आणि मला तर ते किती आवडतं.. बहुतेक देवानंच पाठवलं असेल माझ्यासाठी आणि फेकून दिलेलं ‘गारेगार’ घेतलं तर ती चोरी नाही ना होत..’ मीच माझ्याशी लढत होते. आणि शेवटी माझ्यातल्या मोहाचा संस्कारांवर विजय झाला. मी ते ‘गारेगार’ घ्यायचं ठरवलं.

आजूबाजूला कोणी नाही ना, हे आधी नीट पाहून घेतलं, मग हलक्या पावलांनी त्या ‘गारेगार’पाशी गेले. हळूच ते हातात उचलून घेतलं. त्याला लागलेली माती नीट पुसून टाकली. डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला. त्याचा सुगंध  मनभर पसरला. शरीरात आनंदाचा उत्सव केव्हाच सुरू झाला होता..

आता तोंडाजवळ नेऊन मी ते खाणार तेवढय़ात माझ्या हातावर एक जोराचा तडाखा बसला.. ते ‘गारेगार’ हातातून उडून दूर जाऊन पडलं. नजर वर करून पाहिलं तर आजोबा संतापानं थरथरत माझ्याकडे पाहात उभे होते. दुसऱ्याच क्षणी माझ्या पाठीत जोरदार धपाटा बसला. त्याच्या झिणझिण्या मेंदूपर्यंत पसरत गेल्या. मन आणि शरीर दोन्ही बधिर झालं होतं. डोळ्यांतून बांध फुटला, पण ओठांना कुलूप लागलेलं. चूक माझी होती. अवाक्षरही न काढता हुंदका गळ्यात थोपवून मी निश्चल उभी होते.

‘‘जीव गेला असता का तुझा ‘गारेगार’ खाल्लं नसतं तर? घरचे संस्कार विसरलीस? स्वत:चा घाम गाळून जे विकत घेता येतं, फक्त तेच मानानं घ्यावं.. स्वाभिमान विकलास की काय? लाज काढलीस आज.’’ आजोबा माझ्या हाताला धरून ओढतच घरी घेऊन गेले.

जाताना वाडय़ातील सगळे लोक आमच्याकडे आश्चर्याने पाहात उभे होते. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. आजीच्या अंगावर मला रागानं ढकलून आजोबा तिलाही खूप बोलले. पुढचे चार-पाच दिवस माझं बाहेर खेळणं बंद झालंच, पुढेही किती तरी दिवस आजोबा माझ्यावर नाराजच राहिले.

काही वर्षांनी माझ्या वडिलांची बदली एका शहरात झाली. मी आईवडिलांच्याबरोबर तिकडे राहायला गेले. त्यांची आर्थिक स्थिती आधीपेक्षा सुधारली होती. चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. मोठी शाळा, नवे शिक्षक, नव्या मत्रिणी आणि आई-बाबा-भावंडांचा सहवास. दिवस आनंदात चालले होते. एके दिवशी वर्गातील एका मुलीच्या वाढदिवसाचं बोलावणं आलं. आम्ही सगळ्या मत्रिणी तिच्या घरी गेलो. खाणं झाल्यानंतर तिच्या आईने प्लॅस्टिकच्या कपमधून एक गोड पदार्थ दिला. तसाच शुभ्र, त्याच मधुर सुवासाचा, ‘गारेगार’सारखा.. मन बेचन करणारा. आनंद, दु:खं, राग, भीती, लाचारी, वेदना.. न जाणे किती गोष्टी मनात दाटून आल्या.

‘‘अगं निरु, खा ना आइस्क्रीम. विचार कसला करतेस?’’

पण मला ते खावंसंच वाटेना.. ‘‘नको मला.. मला आवडत नाही ते.’’

‘‘आवडत नाही? अगं व्हॅनिला आइस्क्रीम आहे ते, खा ना गं.’’ मत्रिणींचा आग्रह.. मी खाल्लं. तो सुगंध जेवढा सुंदर तेवढीच त्याची चवही स्वर्गीय होती. आइस्क्रीमचा तो मऊसूत थंड स्पर्श जिभेला सुखावत होता, पण मनाला समाधान देत नव्हता.. हे मात्र खरं. त्यानंतर किती तरी वर्ष गेली. एव्हाना बाजारात व्हॅनिलाशिवाय स्ट्रॉबेरी, पिस्ता, केशर, चॉकलेट, अंजीर असे बरेच स्वाद आले होते.

माझं शाळा, कॉलेजचं शिक्षण संपलं. नोकरी मिळाली. पहिला पगार हातात आला. त्या दिवशी काम संपल्यावर घराजवळच्या दुकानात गेले. घरच्या सगळ्यांसाठी व्हॅनिला आइस्क्रीम घेतलं. घरी आल्या आल्या त्यातला एक कप देवासमोर ठेवला. लोक पहिल्या पगाराचे पेढे ठेवतात, पण माझ्यासाठी ते आइस्क्रीम पेढय़ांपेक्षा कमी नव्हतं. घरात सगळ्यांना आइस्क्रीम दिलं. आनंदी आनंद!

मी माझा कप उघडला. अधीरतेनं एक चमचा तोंडात घेतला आणि.. मन अपार, विलक्षण समाधानानं भरून गेलं. तीच ती पांढऱ्या शुभ्र, दुधाच्या, मधुर सुवासाच्या ‘गारेगार’ची आठवण. ते लहानपणीचे दिवस, त्या मत्रिणी, तो ‘गारेगार’वाला, ते दहा पशांचं नाणं, ते जमिनीवर पडलेलं ‘गारेगार’, तो आजोबांनी संतापाने दिलेला तडाखा, ती वेदना.. सारं सारं आठवलं.. आजच्या या घासानं त्या सगळ्या जखमांवर मलम लागल्यासारखं झालं. आजोबांची तीव्रतेनं आठवण आली. डोळ्यांतलं पाणी थांबेचना.. चटकन उठून आतल्या खोलीत गेले. मनातल्या मनात आजोबांना हात जोडले, ‘‘आजोबा, आज तुमच्यामुळे समाधान या शब्दाचा खरा अर्थ कळला. मी माझ्या कष्टाच्या पशानं आज माझी आवडती गोष्ट मिळवली. थँक्यू सो मच आजोबा आणि मी वचन देते तुम्हाला.. ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर जीव जात नाही, अशा कोणत्याही गोष्टीसाठी मी कधीच अगतिक, लाचार होणार नाही..’’

..आणि आज शूटिंगच्या युनिटला इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या आईस्क्रीम्सची पार्टी देताना, मी फक्त त्या व्हॅनिला आइस्क्रीमनेच का समाधानी होते.. हे कोणाला कसं कळणार होतं?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:08 am

Web Title: vanilla ice cream chaurang katha dalan article abn 97
Next Stories
1 महामोहजाल : ऑनलाइन जगाचा धोका
2 सायक्रोस्कोप : फक्त पाच मिनिटं
3 गद्धेपंचविशी : शहाणपण शिकवणारी पंचविशी
Just Now!
X