12 November 2019

News Flash

‘नसे अंत ना पार..’

‘प्रथम पोर्तुगीजकालीन गोवा आणि भारतातलं ब्रिटिश राज, प्रत्यक्ष ब्रिटनशी व्यावसायिक संबंध नंतर स्वतंत्र भारतातलं उद्योगविश्व, नंतर स्वतंत्र गोव्यातलं उद्योगविश्व आणि आता ग्लोबल व्हिलेजमधलं खुलं उद्योगविश्व..

| June 1, 2013 01:01 am

‘प्रथम पोर्तुगीजकालीन गोवा आणि भारतातलं ब्रिटिश राज, प्रत्यक्ष ब्रिटनशी व्यावसायिक संबंध नंतर स्वतंत्र भारतातलं उद्योगविश्व, नंतर स्वतंत्र गोव्यातलं उद्योगविश्व आणि आता ग्लोबल व्हिलेजमधलं खुलं उद्योगविश्व.. जोशी कुटुंबीयांच्या औद्योगिक अनुभवांना ‘नसे अंत ना पार..’ अशीच उपमा द्यायला हवी..’ गोव्यामधल्या जोशी कुटुंबांच्या औद्योगिक साम्राज्याविषयी..
एखाद्या व्यवसायात परंपरेचं संचित घेऊन नावीन्याची भर घालत जोमानं वाटचाल करणाऱ्या कुटुंबाच्या किमान चार पिढय़ांची ओळख आपण या सदरात करून घेत आहोत. काही गुण रक्तातून, काही संस्कारांतून, काही कळत, काही नकळत घेत घेत पुढची पिढी कशी विकसित होते त्याचा स्वच्छ आलेख दिसतो या शोधातून आपल्याला. नात्याच्या धाग्यानं बांधलेल्या चार पिढय़ांचे अनुभव न्याहाळतानाच आणखी चार विविधरंगी कार्य-संस्कृतीतून काम केलेलं एक आगळं वेगळं कुटुंब सापडलं मला.. गोव्यामध्ये! सध्या ९३ वर्षांचे असलेले, स्पष्ट विचार आणि खणखणीत वाणी टिकवून ठेवणारे श्री. वसंत सुब्राय जोशी यांनी स्वत:च्या ६० वर्षांच्या कार्यकाळात किती वेगवेगळ्या कार्यसंस्कृती अनुभवल्या, त्याचं आश्चर्य वाटत राहिलं.
प्रथम पोर्तुगीजकालीन गोवा आणि भारतातलं ब्रिटिश राज, प्रत्यक्ष ब्रिटनशी व्यावसायिक संबंध नंतर स्वतंत्र भारतातलं उद्योगविश्व, नंतर स्वतंत्र गोव्यातलं उद्योगविश्व आणि आता ग्लोबल व्हिलेजमधलं खुलं उद्योगविश्व.. त्यांच्या अनुभवांना ‘नसे अंत ना पार..’ अशीच उपमा द्यायला हवी. गोव्यामध्ये या जोशी कुटुंबाचं एक औद्योगिक साम्राज्यच आहे.
कै. सुब्राय जोशी यांनी १९२६ मध्ये या साम्राज्याचा पाया घातला तो ट्रान्स्पोर्ट व्यवसायातून. तेव्हाच्या छोटय़ाशा गोव्यात ‘कार्रेर’ नावानं पितळी अंगाच्या मिनी बससारख्या गाडय़ा वापरल्या जायच्या. राज्यांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी त्या पुरेशा असत. याचबरोबर सुब्राय जोशींनी ‘रॉयल मेल’ची वाहतूक करण्याचं कंत्राट मिळवलं. म्हणजे गोव्याबाहेरून, भारतातून जे टपाल येई ते पणजीला बोटीवरून उतरवून घ्यायचं आणि वास्कोला रेल्वे स्टेशनवर नेऊन ब्रिटिशांच्या रॉयल मेलच्या सुपरवायजरकडे सुपूर्त करायचं. ते ट्रेननं पुढे दक्षिणेत आणि राज्यात इतरत्र जायचं. सकाळी सातच्या आत टपाल वास्को स्टेशनवर पोहोचवावं लागे. हे काम करतानाच सुब्रायजींनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यातूनच त्यांनी पुढे इंग्लंडमधून मॉरिस गाडय़ा आणून गोव्यात विकायची एजन्सी घेतली.
१९५२ मध्ये सुब्राय यांनी एक पार्टनरशिप फर्म स्थापन केली. ‘ऑटो सर्विसेस लि.’ वास्को स्टेशनच्या बाहेर त्यांनी यासाठी जागा निवडली आणि मग इम्पोर्टेड गाडय़ांचे ते एक केंद्रच बनले. जनरल मोटर्स इंडिया आणि यू.एस.ए.नं त्यांना डीलरशिप देऊ केली अन् जोशींनी ‘ओल्ड्समोबाइल’, ‘वॉक्सॉल कार्स,’ ‘बेडफर्ड ट्रक्स’ सारं गोव्यात विकायला सुरुवात केली. एका व्यवसायावर पकड बसली की त्यांची नजर दुसरीकडे वळायची. गाडय़ा विकल्या. मग त्यांच्यासाठी पेट्रोलपंप हवाच. म्हणून वास्को स्टेशनजवळ एक पेट्रोलपंपही उभारला. या साऱ्यात त्यांच्या मुलाची वसंत जोशींची सुब्रायजींना चांगलीच मदत होत असे. वडिलांच्या सहवासात राहून उद्योजकतेचे बाळकडूच वसंतरावांना मिळाले होते.
१९५५ मध्ये सुब्रायजींचं निधन झालं. वसंतरावांनी सारे उद्योग हाती घेतले. दरम्यान खाण उद्योगानं गोव्यात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. वसंतरावांनी त्यातल्या कामाची गरज हेरून बेडफर्ड ट्रक्सना टिपर ट्रकमध्ये परावर्तित केलं. हे ट्रक्स व्ॉकसॉल मोटर कंपनीकडून सुटय़ा भागात आयात करायचे आणि वास्कोतच जोडून मग विकायचे. यामुळे वसंतरावांनी अनेक हातांना वास्कोत काम दिलं. शिवाय आयात ट्रक्सपेक्षा हे ट्रक स्वस्त पडायला लागले. वास्को, पणजी आणि परिसरात विक्रीनंतर सेवा देणारी शोरूम उभारून वसंतरावांनी काळाच्या पुढे पाऊल टाकलं. स्वातंत्र्य मिळाल्यावर तर त्यांनी हिंदुस्थान मोटर्सची एजन्सी घेऊन गोव्यात अ‍ॅम्बॅसेडर गाडय़ा लोकप्रिय केल्या. मॅसीफर्गसन ट्रॅक्टर्सची, बजाजच्या स्कूटर्स,ऑटो रिक्षा आणि टेम्पो यांची एजन्सी घेऊन ऑटोमोबाइलच्या क्षेत्रात जोशींच्या नावाला पर्याय नाही हे सिद्ध केलं.
ऑटोमोबाइलचं क्षेत्र तुमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करतं. त्यामुळे वसंतरावांचा जनसंपर्क प्रचंड वाढला. शिवाय त्यांच्या घराण्यात परंपरेनं एक मंदिर आहे. त्यामुळे श्रद्धेचा धागा आला. यातूनच वसंतरावांचं सामाजिक काम आकार घेत गेलं आणि १९७२ मध्ये वसंतराव जोशी गोवा विधानसभेचे आमदार झाले. त्यांचा मतदारसंघ मुरगाव. या परिसरात चांगल्या शिक्षणसंस्थेची कमतरता ओळखून वसंतरावांनी मुरगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. इथे आर्ट्स, कॉमर्स शिवाय बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, कम्प्युटर्स, शिपिंगमधले विविध कोर्सेस यांच्या पदव्यांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गेल्या चाळीस वर्षांत या शिक्षणसंस्थेनं गोव्याच्या नावलौकिकात भर घालणारे अनेक विद्यार्थी घडवले आहेत.
शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवताना वसंतरावांचे पाच सुपुत्र एकेक करून त्यांच्या हाताशी येत गेले. तसतसा प्रत्येकासाठी एकेक नवा व्यवसाय उभारला गेला. आज शेवर्ले आणि हुंडाई कार्सची एजन्सी, सर्विस गॅरेजेस, पॅकेजिंगमधले अत्याधुनिक कारखाने, कीटकनाशकं आणि सौंदर्यप्रसाधनांसाठी लागणाऱ्या विशिष्ट प्लास्टिकच्या बाटल्या, यात जोशींच्या नावाचा दबदबा आहे. शिवाय आधुनिक राहणीची आणि बदलत्या काळाची गरज हेरून त्यांनी घरगुती एसी आणि इंडस्ट्रिअल एसीच्या एजन्सी घेण्यातही आघाडी घेतली आहे.
वसंतरावांचे ज्येष्ठ पुत्र परेश हे वास्को नगरपालिकेचे अध्यक्ष होते. गोव्याच्या सुप्रसिद्ध कलाअकादमीचे ते १२ र्वष उपाध्यक्ष होते. दुसरे चिरंजीव प्रशांत हे अखिल भारतीय क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तर धाकटे पंकज स्थानिक क्रिकेटविश्वात लोकप्रिय. पराग जोशी हे गोव्याच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि सध्या झपाटय़ानं कात टाकून विकास करणाऱ्या गोव्याच्या औद्योगिक प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर पुष्कर हे शेती आणि काजू-नारळ लागवडीमध्ये रमलेले आहेत.
औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रात जोशी कुटुंबानं खूप काम केलं आहे. यात पूर्ण कुटुंबाची प्रत्येकाला साथ असते. एकेकानं एकेक व्यवसाय वा कारखाना वाटून घेतला, तरी प्रसंगी पाच पांडव एकदिलानं उभे राहतात हीच त्यांची शक्ती आहे.
जोशींच्या घरात पूर्वापार श्रीदामोदर सप्ताह चालत आलेला आहे. त्याची कथा अशी सांगतात, की १८९९ साली त्यांच्या गावात पटकीची साथ आली. तेव्हा जांबावलीला श्रीदामोदर मंदिराला जाऊन कौल लावला. कौल मिळाला गावात सफाई व्हावी. त्या वेळी जोशींच्या घरात पाटावर नारळाची स्थापना झाली. त्यातूनच पुढे श्रीदामोदर मंदिर उभं राहिलं आणि सप्ताह साजरा होऊ लागला. त्या वेळी पटकीच्या साथीतून गावाला मुक्त करणारा हा देव आज मोठं श्रद्धास्थान आहे आणि वर्षांतून एकदा साजऱ्या होणाऱ्या सप्ताहात मोठमोठय़ा कलाकारांना आमंत्रित केलं जातं. गावाचं कल्याण करणाऱ्या एका दैवताचा असा जन्म झाला आहे आणि साऱ्या पंचक्रोशीनं हे दैवत, हा उत्सव आपला मानला आहे.
वसंतरावांच्या पणजोबांपासून या दैवताच्या रूपानं एक अघोषित नेतृत्व या कुटुंबाकडे चालत आलेलं आहे आणि जोशी कुटुंबीयांनी ती जबाबदारी नेहमी समर्थपणे पेलली आहे.
वसंतरावांच्या मोठय़ा सूनबाई ललिता परेश सांगतात, ‘मी लग्न होऊन आले, तेव्हा सासूबाईंनी मला सांगितलं, की घराण्याच्या या अमुक परंपरा मी पाळते. पण तुझ्यावर सक्ती नाही बरं!’ ललिताताईंना या घराचं लोकांच्या मनात काय स्थान आहे ते जाणवलं एका विशेष प्रसंगानं.. गोवा मुक्तिसंग्रामाचे दिवस! बांबोळीचं रेडिओ स्टेशन उद्ध्वस्त केलं गेलं. वास्कोतही घबराट पसरली. गावातले तीनशे-चारशे लोक जोशींच्या घरात आले. देवाच्या पायाशी सुरक्षित राहू ही भावना! प्रेमाताई वसंत जोशींनी धामधुमीचे दिवस आहेत म्हणून आधीच घरात धान्य भरून ठेवलं होतं. वातावरण शांत होईपर्यंत सारा गाव जोशींकडे राहिला. जोशींच्या अन्नपूर्णानी एवढय़ा जणांचं जेवणखाण केलं. आजही हे घर साऱ्यांसाठी असंच स्वागतशील आहे.
ललिता या एमबीए असून त्यांच्याच शिक्षणसंस्थेत मॅनेजमेंट विंगच्या डायरेक्टर-प्रोफेसर आहेत. आचार-विचारांनी पुढारलेल्या असूनही घरातल्या दैनंदिन आणि देवळाच्या सर्व परंपरा मनापासून पाळतात. वैशाली पराग याही एमबीए तर सुजय पंकज या अ‍ॅडव्होकेट आहेत. मोनिका पुष्कर या डॉक्टर असून नेव्हीच्या दवाखान्यात काम करतात तर सुजाता प्रशांत या कलाकार असून सारं घर सांभाळतात. वसंतरावांच्या दोन्ही मुली भरपूर शिकलेल्या असून अमेरिकेत स्थायिक आहेत.
जोशींची चौथी पिढीही उच्चशिक्षण घेऊन व्यवसायात उतरू लागलीय. विभव-अक्षय हे एमबीए करून घरातल्या उद्योगाचा विस्तार करत आहेत तर रिषभ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आता परत येईल. बाकी पतवंडं उच्च शिक्षण घेत आहेत. या चौथ्या पिढीचं गोव्यावर अतिशय प्रेम आहे. इथली शांतता आणि एकत्र कुटुंबात लाभणारी आर्थिक-मानसिक सुरक्षितता या त्यांच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जगात कुठेही काम केलं, तरी घरच्या व्यवसायाइतकं समाधान नाही मिळणार, याची त्यांना खात्री आहे. आणि म्हणूनच आजही हे कुटुंब एकत्र आहे.
कोणतीही औद्योगिक संस्कृती नसणाऱ्या गोव्यात, पोर्तुगीजांच्या काळात सुब्राय यांनी व्यवसाय उभारला. ब्रिटिशांबरोबर इंग्लिश, मुंबईसाठी मराठी, भारतातील इतर शहरांसाठी हिंदी असा सर्व भाषांत व्यवहार केला. वसंतराव सांगतात ‘‘अहो, फक्त इम्पीरिअल बँक आम्हाला विदेशी चलन द्यायची. पुढे भारतीय स्टेट बँक आली.’’ शांत समाधानी गोव्याचा आता खाण उद्योगाच्या अकराळ-विकराळ स्वरूपाने झालेला कायापालट माझ्या डोळ्यासमोर आहे. ‘‘आमचाही व्यवसाय खूप वाढला. पण आम्ही फार नाही बदललो.’’ वसंतरावांना त्याचं समाधान आहे. कारण त्यांच्या कुटुंबाच्या ऐहिक प्रगतीला देवस्थानाचं श्रद्धेय अधिष्ठान आहे. शैक्षणिक-सामाजिक कामाची जोड आहे आणि आपल्याबरोबर साऱ्यांचाच विकास करायचा आहे याची ओढ पुढच्या पिढय़ांमध्येही झिरपली आहे. पिढय़ान् पिढय़ांचं हे नातं, ही बांधीलकी व्यवसायाशी आहे, आपल्या परिसराशी आहे आणि मुख्य म्हणजे माणुसकीशी आहे, ती सकस, समृद्ध आहे. आणखी काय पाहिजे?

First Published on June 1, 2013 1:01 am

Web Title: vasant subray joshi and his family in goa
टॅग Kutumba Ranglay