पत्रकार, सामाजिक कार्यकर्ती, राज्य महिला आयोगाची सदस्य आणि आदिवासी महिलांचा आवाज अशा विविध भूमिकांमधून वसावी किरो या गेली १५ वष्रे झारखंड, ओदिशा, आसाम या राज्यांतील आदिवासी महिलांच्या हक्कांसाठी झगडत आहेत. पण या लढय़ासाठी बळ एकवटण्यापूर्वी त्यांना स्वत:साठीच एक मोठा संघर्ष करावा लागला. शिक्षणासाठी आईशी केलेला संघर्ष, वहिनीच्या हक्कासाठी भावाशी केलेला संघर्ष आणि आदिवासी समाजातील काही घटकांकडून ‘उपरी’ असल्याबद्दल होणाऱ्या अवहेलनेशी संघर्ष अशा अनेक संघर्षांना यशस्वीपणे तोंड देत आज त्या आदिवासी महिलांसाठी लढत आहेत. समाजाबरोबरच घरातल्या आपल्याच लोकांशी संघर्ष करून स्वत:साठी आणि वहिनीला न्याय मिळवून देण्याचे धाडस करणाऱ्या वसावीविषयी..
झारखंड.. सुमारे १३ वर्षांपूर्वी बिहारपासून फारकत घेऊन अस्तित्वात आलेलं राज्य.  तिरका मांझी, बिरसा मुंडा, सिद्धू-कान्हू अशा आदिवासी नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दशकानुदशकांच्या संघर्षांतून उभं राहिलेलं हे राज्य त्याच्या निर्मितीनंतर मात्र गाजतंय ते राजकीय अस्थिरतेमुळे. १३ वर्षांत तब्बल आठवेळा मुख्यमंत्री/ सत्ताधारी बदल पाहणारं हे राज्य केवळ या कारणांमुळेच अजूनही अपेक्षित विकास करू शकलेलं नाही. याचा सर्वाधिक फटका येथील २६ टक्के आदिवासी समुदायाला बसतो आहे आणि आजही आदिवासी जाती-जमाती मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. जिथे अवघा आदिवासी समाजच असुरक्षिततेच्या वातावरणात जगत असताना या समाजातील महिलांची अवस्था याहूनही वाईट आहे.  बालविवाह, मानवी तस्करी, वेश्या व्यवसाय, लंगिक शोषण अशा अनेक अत्याचारांना झारखंडच्या आदिवासी महिला वर्षांनुवष्रे सोसत आहेत. या अत्याचारांना आणि अशा मनोवृत्तींना एक स्त्री अनेक वर्षांपासून टक्कर देत आहे. वासावी किरो!
 पत्रकार, सामाजिक कार्यकर्ती, राज्य महिला आयोगाची सदस्य आणि आदिवासी महिलांचा आवाज अशा विविध भूमिकांमधून वसावी किरो या गेली १५ वष्रे झारखंड, ओदिशा, आसाम या राज्यांतील आदिवासी महिलांच्या हक्कांसाठी झगडत आहेत. पण या लढय़ासाठी बळ एकवटण्यापूर्वी त्यांना स्वत:साठीच एक मोठा संघर्ष करावा लागला. शिक्षणासाठी आईशी केलेला संघर्ष, वहिनीच्या हक्कासाठी भावाशी केलेला संघर्ष आणि आदिवासी समाजातील काही घटकांकडून ‘उपरी’ असल्याबद्दल होणाऱ्या अवहेलनेशी संघर्ष अशा अनेक संघर्षांना यशस्वीपणे तोंड देत आज त्या आदिवासी महिलांसाठी लढत आहेत.
झारखंड आणि आसपासच्या राज्यांतील आदिवासी पट्टय़ात वसावी किरो हे नाव सुपरिचित आहे. आदिवासी महिलांना समाजाच्या मूळ प्रवाहाच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्न करतानाच जंगलतोड, वृक्षलागवड, प्रकल्पांमुळे बाधित आदिवासींचं पुनर्वसन आणि औद्योगिक प्रदूषण अशा अनेक मुद्दय़ांवरही त्यांचं सक्रिय काम सुरू आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आदिवासींच्या स्थानिक प्रश्नांना वाचा फोडतानाच त्याचं त्रयस्थपणे वर्णन करत राहण्याऐवजी वासवी किरो यांनी यात उडी घेतली. जंगलात राहणाऱ्या आदिवासी महिला बाहेरील जगापासून पार दुरावलेल्या असतात. त्यांना त्यांच्या स्वत:च्या मुलभूत हक्कांची जाणीव नसते. अशा आदिवासी महिलांना संघटित करण्यासाठी, त्यांना शिक्षणाकडे नेण्यासाठी वसावी किरो यांनी मोठी भूमिका बजावली आहे. झारखंडच्या राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदावरून नुकत्याच त्या पायउतार झाल्या. मात्र, आयोगाच्या सदस्य असताना त्यांनी आदिवासी महिलांच्या प्रश्नांसंदर्भात अनेक परिसंवाद, शिबिरे भरवली. झारखंडमधील आदिवासी मुलींना फूस लावून किंवा बळजबरीने पळवून वेश्या व्यवसायाला लावण्याच्या घटनांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला.  
वसावी किरोचं स्वत:चं आयुष्यही संघर्षांतूनच उभं राहिलं. बंगाली वडील आणि उरांव या आदिवासी जमातीतील आई अशा कुटुंबातील वसावी हे चौथं अपत्य. मूळचे पश्चिम बंगालचे असलेले तिचे वडील लग्नानंतर झारखंड अर्थात तेव्हाच्या बिहारमध्येच स्थायिक झाले. झारखंडमधील मानदार ब्लॉकमधील चटवाल या आपल्या आजोळी वसावीचं बालपण गेलं. तिच्या वडिलांनी तिथंच एक छोटंसं हॉटेल चालवायला घेतलं. वडिलांकडच्या कुणाशीही संबंधच न आल्यानं वासवी सर्वसामान्य आदिवासी मुलींप्रमाणंच वाढली. तीन भावांच्या पाठीवर झालेल्या वसावीला एकूण दहा भावंडे. त्या काळी आदिवासी जमातींमध्ये मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व फारसं रुजलं नव्हतं. वसावीची आई व तिच्या आजीकडची बाकीची मंडळीही फारशी शिकलेली नव्हती, पण वडिलांनी आग्रह  धरल्यानं वसावीलाही शाळेत टाकण्यात आलं. रांचीतील उर्सुलिन कॉन्व्हेंट शाळेत ही सगळी भावंडं शिकू लागली. वसावी घरातली सर्वात थोरली मुलगी. तिच्या पाठीवर दोन बहिणी होत्या. त्यामुळे वसावीने आता शिक्षण थांबवून आपल्याला घरकामात मदत करावी, असं तिच्या आईचं म्हणणं होतं. मात्र, वसावीच्या वडिलांनी तसं होऊ दिलं नाही. आई, मावश्या यांच्या विरोधातच वसावीचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. दरम्यानच्या काळात तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे आता महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारं कोणी नव्हतं. वसावीच्या तिन्ही मोठय़ा भावांची लग्न झालेली. घरात आíथक चणचणही जाणवू लागली होती. अशात वसावीनं मॅट्रिक होताच ‘न्यू मेसेज’ या स्थानिक िहदी वृत्तपत्रात काम सुरू केलं. वसावीचं नोकरी करणं आणि पुढे शिक्षण घेणं तिच्या आईला पटत नव्हतं. तिन्ही मोठय़ा भावांचाही याला विरोध होता, पण वसावीनं तसं होऊ दिलं नाही व रांची विद्यापीठातून बी.ए. पूर्ण केलं.
रांची विद्यापीठात शिकत असतानाच वसावीनं‘नवभारत टाइम्स’साठी  ‘कॅम्पस न्यूज’ देण्यास सुरुवात केली. कॉलेजातील समस्या, कार्यक्रमे, संमेलनं यांचं तपशीलवार वार्ताकन तिनं केलं. पत्रकारिता हा केवळ तिचा एक छंद होता. खरंतर भारतीय प्रशासकीय सेवेत जाणं हे तिच्यासमोरील लक्ष्य होतं. मात्र, घरातलं वातावरण व परिस्थिती यामुळे ते शक्य होताना दिसत नव्हतं. म्हणून एम.ए. करून प्राध्यापक बनायचा निर्धार तिनं केला. अर्थात यालाही घरातून विरोध झाला, वसावीला शिक्षणासाठी होणारी आíथक मदत थांबवली गेली. त्यामुळे मग वसीवीनं वृत्तपत्रातील नोकरीसोबतच खासगी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत वसावीचं पेपरातील लिखाण नावाजलं जाऊ लागलं होतं. आदिवासी महिला, जंगलं या विषयी तिनं केलेल्या वृत्तांकनाची चांगलीच दखल घेतली जात होती. त्यामुळे प्राध्यापकी पेशात शिरण्यापेक्षा पत्रकारितेतच स्थिरावण्याचा सल्ला दिला गेला आणि वसावीच्या पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
घरातल्यांचा विरोध झुगारून पूर्ण केलेल्या शिक्षणामुळे वसावीचा आत्मविश्वास वाढला. आपण आपल्या समाजातील महिलांसाठीही काहीतरी केलं पाहिजे, या भावनेने तिने महिला जागृतीचं काम हाती घेतलं. या कामासाठी तिच्या घरीच महिलांच्या बठका व्हायच्या, आदिवासी महिलांचं शिक्षण, हक्कसंरक्षण यांबाबत आयोजित करायच्या कार्यक्रमांची आखणी केली जायची. एकीकडे, वसावीच्या माध्यमातून आसपासच्या गावांतील आदिवासी महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचं काम होत होतं. तर दुसरीकडे, तिच्या स्वत:च्या घरात मात्र, रोज वेगळंच नाटय़ पाहायला मिळत असे. वडिलांच्या मृत्यूनंतर घराचा कारभार भावांकडे गेला होता. त्यात तिचा भाऊ भानो त्या घराचा ‘कर्ता पुरुष’ म्हणून वावरत असे. वसावी व तिच्या बहिणींवरही अधिकार गाजवण्याचा भानोचा प्रयत्न असे. स्वत:च्या पत्नीला तर तो रोज मारहाण करत असे. घरात भानोची दहशत एवढी होती की, त्याच्यासमोर बोलायची कुणीही िहमत करत नव्हतं. त्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की, घरात एका बाजूला वसावी आपल्या महिला मंडळासोबत बठक घेत असतानाच दुसरीकडे तिचा भाऊ तिच्या वहिनीला बेदम मारहाण करत असे. हा प्रकार निमूटपणे पाहणं असह्य होत होतं. पण जोपर्यंत वहिनीच याबद्दल बोलत नाही, तोवर काही करणं वसावीलाही शक्य नव्हतं. त्यामुळे भानो निर्ढावला होता. पण अखेर एके दिवशी वहिनीने वसावीची मदत मागितलीच. वसावीनेही तातडीने तिला घेऊन पोलीस ठाणं गाठलं आणि भावाविरोधातच तक्रार केली. या प्रकरणात भानोला अटक झाली. शिक्षा भोगून तो तुरुंगातून बाहेर सुटून आला आणि वसावीसमोर नवीन आव्हान उभं ठाकलं. या सगळ्या प्रकाराबद्दल साऱ्यांनी तिलाच दोष देण्यास सुरुवात केली. बाहेरचे लोक हसायचे, नावे ठेवायचे, हे गृहीत होतं. पण  घरातल्यांनीही बोलणं टाकून दिलं. त्यामुळे तिचा कोंडमारा होऊ लागला. आईशी तर वारंवार खटके उडायला लागला. ‘मी घर तोडायला निघाल्याचाच ठपका माझ्यावर ठेवला गेला तेव्हा मात्र मी खूपच अस्वस्थ झाले..’ वसावी सांगते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भानोनेही वसावीला वेगवेगळ्या मार्गाने त्रास देणे सुरूच ठेवले. पण या सर्व घटनेनंतर भावाचे वहिनीसोबतशी असलेले वागणे सकारात्मकपणे बदलले, याचंच वसावीला अधिक समाधान आहे.
आदिवासी महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी गेली २५ वष्रे पत्रकारिता आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या वासवीला स्वत:साठी कराव्या लागलेल्या या दोन संघर्षांची ही कहाणी. आज वसावी किरो या झारखंडमधील प्रथितयश महिला कार्यकर्त्यां आहेत. झारखंड राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदावरील त्यांचा कार्यकाळ नुकताच संपला. पण महिला, आदिवासी, वनसंरक्षण या मुद्दय़ांवरील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांत त्या झारखंडचे प्रतिनिधित्व करतात. तोरांग ट्रस्ट, नॅशनल अलायन्स ऑफ वूमेन ऑर्गनायझेशन, अखिल भारतीय आदिवासी साहित्य मंच, झारखंड स्टेट हॉरोपॅथी डॉक्टर्स असोसिएशन अशा कित्येक संघटनांत त्या कार्यरत आहेत. ‘नवभारत टाइम्स’, ‘प्रभात खबर’, ‘जनसत्ता’ अशा अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी यशस्वी पत्रकारिता केली. आदिवासींचे पुनर्वसन, महिलांचे प्रश्न यांवर त्यांनी केलेल्या वृत्तमालिकांबद्दल त्यांना २००१ मध्ये ‘चमेलीदेवी जैन राष्ट्रीय पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कारही देण्यात आला. याशिवाय लहान मुलांचं कुपोषण, महिलांमधील अ‍ॅसनेमिया, आदिवासींचे पुनर्वसन या मुद्दय़ांवरही त्यांचं सक्रिय कार्य
सुरू आहे. पण हे सर्व सुरू असतानाही वसावी किरो यांना आणखी एक संघर्ष करावा लागतोच आहे. आदिवासींच्या प्रश्नांवर काम करत असताना प्रतिस्पर्धी संस्था, संघटना वसावी यांच्या आदिवासी असण्यावरच प्रश्नचिन्ह उभं करतात. वसावी यांचे वडील बंगाली असताना त्या आदिवासी जमातीच्या कशा होऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करून अनेकांनी त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वसावी यांनी त्यांना  आपल्या कार्यानेच चोख प्रत्युत्तर दिले आहे.      
asif.bagwan@expressindia.com