सिद्धी महाजन snmhjn33@gmail.com

जगभर लहान मुलं पर्यावरण संरक्षणाची मागणी लावून धरत असताना भारतातील मुलंमुली मागे कशी राहातील! हवामानबदलाचे भयावह परिणाम जसे इतर देशांना जाणवले, तसेच भारतातही जाणवले. हिमालय, नद्या, समुद्र या ठिकाणी निसर्ग रौद्ररूप घेतो तेव्हा काय भयावह स्थिती येते, हे मुलं पाहात आहेत. रिधिमा पांडे ही धीट मुलगी जेव्हा याबद्दल आवाज उठवण्यासाठी पुढे आली, तेव्हा प्रथम तिचं म्हणणं अनेकांना पटलं नाही.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

तरी ती आपलं काम करत राहिली. भारतात तिच्यासारखी अनेक मुलं आता हे प्रश्न विचारू लागली आहेत, हे विशेष.

हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं हरिद्वार हे उत्तर भारतातील एक महत्त्वाचं ठिकाण. गंगोत्री हिमनदीतील गोमुख उगमापासून प्रवास करणारी गंगा नदी इथे सर्वप्रथम मोकळ्या मैदानात प्रवेश करते. आकाशाशी स्पर्धा करणारी हिमशिखरं, आसमंताला व्यापून उरणारी हिरवाई. अल्लडपणे खळाळणाऱ्या पाण्यात हिमाद्रीचं प्रतिबिंब सामावून घेणाऱ्या जीवनदायी जान्हवीच्या कुशीत वसलेलं हे शहर. गंगा इथली जीवनरेखा आहे. तिच्या अस्तित्वानं या जागेला धार्मिक महत्त्व मिळवून दिलं आहे.

तिच्या पाण्यावर इथले जीव पोसले जातात. आंघोळ करणं, कपडे धुणं ते  पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या लोकांना गंगा नदी हाच एकमेव आधार आहे. गंगेच्या आसपासच्या प्रदेशाला तिचं अधूनमधून दर्शन देणारं रौद्र रूपही चांगलंच ठाऊक आहे. दुष्काळाच्या मोसमात बरंच रोडावलेलं तिचं पात्र पावसाळ्यात अकाली ढगफुटी झाल्यावर फुगतं. काठावरच्या जीवांचा, मालमत्तेचा घास घेतं. जीवनदायिनी गंगा जीवनहाारिणी बनते. उत्तराखंड राज्याला गेल्या दहा वर्षांत अनेक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. अनेक लोकांना बेघर व्हावं लागलं, हजारो जणांना प्राण गमवावे लागले. ऋतू अनियमित झालेत, नैसर्गिक आपत्ती अधिक तीव्र झाल्या आहेत. गंगेचं पाणी प्रदूषित झालं आहे आणि जलचरांचे जीव धोक्यात आले आहेत.

‘माझा भारत हवामानबदलावर उपाययोजना करण्यासाठी कोणती पावलं उचलत आहे?’ – हरिद्वारमधील नऊ वर्षांच्या रिधिमा पांडेचे हे शब्द. पॅरिस करारावर स्वाक्षरी करताना मंजूर केल्याप्रमाणे भारतानं हवामानबदलाविरोधात काही ठोस पावलं उचलणं अपेक्षित होतं. ते घडताना दिसत नसल्यामुळे या मुलीनं भारत सरकारविरोधात याचिका दाखल केली. ती म्हणाली, ‘माझा देश हवामानबदलाला सामोरा जाण्यासाठी पुरेसा तयार नाही. इथली जनता, इथलं पर्यावरण असुरक्षित आहे आणि इथला कुणीच नेता किंवा जबाबदार अधिकारी त्याचं रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.’ राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) ही राष्ट्रीय यंत्रणा देशातील पर्यावरणविषयक तक्रारींवर रीतसर सुनावणी घेऊन निर्णय देते. फटाक्यांमुळे ध्वनी व वायू प्रदूषण, ‘सीआरझेड’ नियमांचं उल्लंघन, खारफुटीची कत्तल, अशा अनेक समस्यांवर उपाययोजना होत असल्याची ‘एनजीटी’ वेळोवेळी खात्री करतं. या ‘एनजीटी’नं सरकार समाधानकारक काम करत आहे, असं कारण देऊन रिधिमाची याचिका फेटाळली.

देशात कुणाला याबद्दल फारशी खबर लागली नाही, मात्र परदेशात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. वर्तमानपत्रात छापून आली, अनेकांच्या वाचनात आली. यामध्ये एक नाव होतं मायकेल हॉस्फेल्ड यांचं. युरोप आणि अमेरिकेत ठिकठिकाणी कार्यालये असणाऱ्या प्रतिष्ठित ‘लॉ फर्म’च्या या अध्यक्षांनी रिधिमाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. लहान मुलांच्या हक्कांच्या बाबतीत संयुक्त राष्ट्र समितीकडे एक तक्रार दाखल केली गेली, त्यात जगाच्या वेगवेगळ्या भागातील काही लहान मुलांची कायदेशीर बाजू ते मांडत होते. ही मुलं जगातील पाच मोठय़ा अर्थसत्ता- अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी आणि टर्की यांच्याविरोधात लढा देत होती. हे देश एकाच वेळी कार्बन उत्सर्जनाला हातभार लावताना, पर्यावरणाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी मात्र कमी पडत होते. या लढय़ात उतरलेल्या लहान मुलांमध्ये एक आवाज भारताचा असावा, या प्रेरणेनं त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं.

आणि अशा प्रकारे सप्टेंबर २०१९ मध्ये तो ऐतिहासिक खटला दाखल झाला, ज्याचं नाव होतं, ‘चिल्ड्रन व्हर्सेस क्लायमेट क्रायसिस’. या लढय़ात अकरा वर्षांच्या रिधिमाबरोबर बारा देशांचं प्रतिनिधित्व करणारी मुलं सहभागी झाली होती. आठ ते सतरा या वयोगटातील या मुलांमध्ये एक होती स्वीडनची पंधरा वर्षांची ग्रेटा थनबर्ग. या सर्वाना संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करण्याची संधी मिळाली. ‘नमस्ते. तुम्हा सर्वाना आश्चर्य वाटलं असेल की मी इथे का उभी आहे? मी इथे उभी आहे जगातल्या सर्व नेतेमंडळींना प्रश्न विचारण्यासाठी. त्यांना हवामानबदलावर काहीतरी उपाय शोधून काढण्यासाठी विनंती करण्यासाठी. जर हे वेळीच थांबवलं नाही, तर आमचं भविष्य धोक्यात येणार आहे. हो, यात माझा स्वार्थ आहे. आम्हाला सुरक्षित भविष्यकाळ हवा आहे. मला माझा भविष्यकाळ वाचवायचा आहे. माझ्या वयाच्या सर्व मुलांचा, जगात येऊ घातलेल्या पुढील पिढय़ांचा भविष्यकाळ वाचवायचा आहे. म्हणून मी या व्यासपीठावर उभी राहून तुम्हा सर्वाना कळकळीचं आवाहन करत आहे.’ रिधिमाच्या या वक्तव्यामुळे व संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेत सहभागी झाल्यामुळे रिधिमाला भारतात एक नवी ओळख मिळाली. तिचं म्हणणं ऐकण्यासाठी गर्दी होऊ लागली. तरीही तिच्या मते म्हणावी तशी जागरूकता इथे दिसून येत नाही. इतर जगात मोठय़ा प्रमाणावर आंदोलनं, चर्चा चालू असताना भारतात उदासीनता दिसून येते. अनेक लोकांना हवामानबदल, जागतिक तापमानवाढ हे शब्दही ठाऊक नाहीत की काय असं वाटतं. संवेदनशीलता दाखवली जात नाही, की रोजच्या जगण्याच्या संघर्षांपुढे लोकांचं त्याकडे लक्ष नाही, हा प्रश्न पडतो. काहीही असलं तरी आपल्या देशात पर्यावरणविषयक प्रश्नांबद्दल एक प्रकारची उदासीनता दिसून येते. सरकार गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी योजना राबवत आहे. तरीही गंगेत  सांडपाणी सोडणं, नदीत आंघोळ करणं, कपडे धुणं, निर्माल्य टाकणं चालूच असतं.

मात्र काहींना रिधिमाचं पर्यावरण आणि हवामानबदलाच्या मुद्दय़ांवर आवाज उठवणं रिकामपणाचं लक्षण वाटतं. जगभर प्रवास करण्याच्या मोहाखातर ती हा खटाटोप करते आहे, तिच्या आयुष्यातला मूल्यवान वेळ फुकट घालवते आहे, असा आरोप तिच्यावर करण्यात येतो. तिनं शाळेत बसून शिकावं, असे उद्योग करू नयेत, असे अनाहूत सल्लेही दिले जातात.

पण बदल होत आहे याची तिला खात्री आहे. थोडाफार का होईना, पण तो घडवण्यात तिचा हातभार लागतो आहे याचं तिला समाधान आहे. भारतभर अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन ती व्याख्यानं देते. हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ याबद्दल माहिती सांगते. त्याचा जनतेच्या आरोग्यावर आणि भविष्यावर कसा वाईट परिणाम होत आहे, होणार आहे, हे पटवून देते. आपण रोज फुफ्फुसात घेत असलेली हवा, अनेक ठिकाणी रोज पाच सिगारेट ओढत असल्याप्रमाणे दूषित झाली आहे आणि ती आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करते आहे, हे ती त्यांना समजावून देते. रिधिमानं लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष कष्ट घेतले आहेत. त्यांना डोळसपणे आजूबाजूला पाहायला शिकवलं आहे. रस्तारुंदीकरणासाठी झाडांची कत्तल होते, वसाहती निर्माण करण्यासाठी जंगलांची तोड केली जाते, हे समजून घ्यायला हवं. आपलं आकाश स्वच्छ आहे का, आपण रोज श्वासात भरून घेतो ती हवा शुद्ध आहे का, हे प्रत्येकानं ओळखायला हवं, असं तिला वाटतं. लहान मुलांनी आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या भवतालाचं निरीक्षण करावं. रोज शाळेला जाण्याच्या वाटेवर ठिकठिकाणी दुष्परिणाम करणारं प्रदूषण त्यांनी जाणून घ्यावं. त्यांनी आपल्या गावातली नदी पाहायला हवी, तिथली वनसंपदा ओळखायला हवी, हे ती आवर्जून सांगते. तिच्या या प्रयत्नांसाठी ‘बीबीसी’नं २०२० च्या जगभरातील १०० प्रभावशाली स्त्रियांच्या यादीत तिच्या नावाचा समावेश केला.

तिची आई विनिता उत्तराखंड सरकारच्या वनविभागात कार्यरत आहे, तर वडील दिनेश पांडे एका प्राणीप्रेमी संस्थेसाठी काम करतात. वन्यप्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी, तस्करी थांबण्यासाठी गस्त घालणाऱ्या पथकात त्यांचा सहभाग असतो. गंगा नदीकडून आणि आपल्या आईवडिलांकडून मिळालेली प्रेरणा रिधिमा कळत नकळत समवयीन मुलांमध्ये वाटते आहे.

गुरुग्राममधले तक्षील आणि जयशील बुद्धदेव हे अवघ्या नऊ आणि तेरा वर्षांचे भाऊ बागकाम आणि कंपोस्ट खताचे प्रयोग करतात. शाळेत सोलर कुकर आणि सेंद्रिय शेतीचे प्रयोग करून पाहातात. पुनर्वापर करण्यास अयोग्य अशा प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी दुकानदार, कारखानदार आणि आपल्या परिसरातील लोकांना प्रवृत्त करतात. उज्जनच्या पंधरा वर्ष वयाच्या दियासिद्धा हिनं आपल्या घराच्या एका भागात पुनर्वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणारं  ‘३-आर’ प्रदर्शन (रीडय़ूस, रीयूझ, रीसायकल) भरवले आहे. मध्य प्रदेशातील उज्जन इथं तिच्या घराच्या तळघरात शून्य नफा तत्वावर उभारलेली बाजारपेठ स्थानिकांना पूर्वी वापरलेली सामग्री खरेदी-विक्री करण्यासाठी प्रोत्साहन देते. हरियाणाचा सोळा वर्षांचा आदित्य मुखर्जी पर्यावरण संरक्षणासाठी धरणं धरतो, आंदोलन करतो. जंगलतोड आणि प्रदूषणाला विरोध करतो. संयुक्त राष्ट्रांचा युवादूत म्हणून काम करतो.

२००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे शाळांमध्ये पर्यावरणविषयक शिक्षण अनिवार्य केलं गेलं. युनेस्कोच्या अभ्यासानुसार १.३ दशलक्ष शाळांमधील ३०० दशलक्ष विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे.

नव्या पिढीची फळी तयार करण्यासाठी शिक्षकही मोठी भूमिका बजावत आहेत. लहान मुलांना याविषयी जागृत करण्यासाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचा वापर करत आहेत. दैनंदिन अध्यापनातून शाश्वत विकासाची उद्दिष्टं मुलांच्या मनात बिंबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक शाळांमध्ये पर्यावरणकेंद्रित शिक्षण दिलं जातं. आसपासच्या निसर्गाशी मुलांची ओळख करून दिली जाते. अनेक संस्था, व्यक्ती कृतिशील उपक्रमांतून मुलांना जागरूक करतात. मुंबईतील सफाई बँक, Upcyclers lab, The turquoise change ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणं.

बदल तळागाळापर्यंत, सर्वात लहान वयोगटापर्यंतही झिरपत आहे. हा बदल काहीतरी नवं घडवू पाहात असताना, पारंपरिक दृष्टिकोनातून आधुनिक आविष्कार घडवतो आहे. पर्यावरण संवर्धन ही कल्पना भारताला नवी नाही, कारण आपल्या संस्कृतीच्या मुळाशी ती प्रेरणा रुजली आहे. पण गरज आहे, ती याबाबत सक्रिय होण्याची. प्रतीकांचे पडदे बाजूला सारून वस्तुस्थिती नव्यानं ओळखण्याची.  जीवन जगताना, भवतालाची ओळख आणि त्याचं स्वास्थ्य जपण्याची. पर्यावरणाच्या अंगानं विचार करण्याची सवय अंगी बाणवून घेण्याची.

काळाची निकड जाणून नवी पावलं उचलण्यासाठी रिधिमासारख्या मुली नव्या पायवाटा तयार करत आहेत. तिकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांची मागणी कदाचित आततायी वाटू शकेल, पण त्यांचं म्हणणं विलक्षण संवेदनशीलतेतून आलं आहे. ही संवेदनशीलता समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तर आपणही त्यात सहभागी होऊ शकू .