16 January 2021

News Flash

वसुंधरेच्या लेकी : रागावलेल्या मुलींची गोष्ट!

कोण आहेत या मुली आणि कशा पद्धतीनं त्या पर्यावरणाचं रक्षण करत आहेत, हे जाणून घेणार आहोत दर पंधरवडय़ानं..

ग्रेटा थनबर्ग

सिद्धी महाजन

वर्षांनुवर्ष वाढत जाणारं कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदल कारणीभूत ठरून जगाचा नाश ओढवणार आहे, हे समोर दिसत असूनही त्या विरोधात ठोस पावलं उचलण्यात जग कमी पडताना दिसत आहे. अशा वेळी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत त्या वसुंधरेच्या लेकी. देशोदेशीच्या..  देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्यापासून ते आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जाब विचारण्याइतपत या मुली पुढच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढय़ात उतरल्या आहेत. कोण आहेत या मुली आणि कशा पद्धतीनं त्या पर्यावरणाचं रक्षण करत आहेत, हे जाणून घेणार आहोत दर पंधरवडय़ानं..

‘मुलंमुली आहेत ती, त्यांचं काय मनावर घ्यायचं?’

पर्यावरण रक्षणाचा झेंडा हाती धरून रस्त्यावर उतरणाऱ्या, फुटपाथवर ठाण मांडणाऱ्या मुलांना गंभीरपणे घेण्याआधी जगातली सगळी मोठी माणसं हेच म्हणत होती. जास्त जुनी नाही, मागच्या वर्षीचीच ही गोष्ट. नुकतीच बाळबोध कोषातून बाहेर पडलेली ही मुलं स्वतंत्र विचार करू लागली. आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलायचा प्रयत्न करू लागली. भविष्यकाळाचं चित्र रेखाटताना निर्माण होणाऱ्या अनामिक भीतीपोटी भूतकाळाला जाब विचारू लागली. आपल्या इवल्याशा टाचा उंचावून, ताठ मानेनं, कोवळ्या आवाजातील अनामिक जरबेनं आंतरराष्ट्रीय परिषदांचं व्यासपीठ हलवून सोडू लागली.

याची सुरुवात झाली, ती शाळेत न जाता संसदेसमोर धरणं धरून बसलेल्या एका स्वीडिश मुलीपासून. स्वीडन या देशात मुळात शाळा बुडवणं हा कायदेभंग मानला जातो. शालेय शिक्षण हा तिथल्या मुलांचा सर्वोच्च हक्क आहे. अन् हा स्वत:चा हक्क स्वत: डावलून ही मुलगी वर्षांनुवर्ष चालत आलेल्या व्यवस्थेविरुद्ध सविनय असहकार पुकारत जुन्या पिढीला सांगत होती, की तुम्ही चालवलेली जगरहाटी आम्हाला मान्य नाही. कारण या आमच्या शाळेतून बाहेर येऊन, आमच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी सोडून आंदोलन करायला तुम्हीच भाग पाडलं आहे. जिथे संतुलित पर्यावरणाची आणि पृथ्वीच्या संरक्षणाची खात्री नाही, तिथे फक्त पोटापाण्यासाठी अन् पृथ्वीला ओरबाडून टाकणाऱ्या विकासाला हातभार लावण्यासाठी दिलं जाणारं हे शिक्षण घेत राहून, येणाऱ्या विनाशक भविष्याकडे डोळेझाक करणं आम्हाला मान्य नाही. पुढच्या सात पिढय़ा बसून खातील एवढं ऐश्वर्य जमा करण्यासाठी धडपडणाऱ्या भांडवलशाही मानसिकतेच्या विकासाला चालना देताना, त्या सात पिढय़ांच्या भविष्याशी खेळण्याची तुमची हिंमत कशी झाली?

‘‘हाऊ डेअर यू?’’

एका ग्रेटापासून सुरू झालेली १.४ अब्ज इतक्या रागावलेल्या मुलामुलींची ही कहाणी. ही मुलं पालकांना प्रश्न विचारतात, समर्पक उत्तरं मागतात. पोकळ शब्दांची आश्वासनं त्यांना मान्य नाहीत. राजकीय नेते जितके बोलतात, तितके पर्यावरणरक्षणासाठी झटत नाहीत असं त्यांना वाटतं. वर्षांनुवर्ष वाढत जाणारं कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदल कारणीभूत ठरून जगाचा नाश ओढवणार आहे, असं त्यांना वाटतं. खरंच आहे ते. २०१९ या आतापावेतो सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद झालेल्या वर्षी उद्रेक पावलेली त्यांची भीती बिनबुडाची मुळीच नाही. ती सयुक्तिक आहे, कारण पृथ्वीच्या आरंभापासून सामान्य वेगानं होणारी जागतिक तापमानवाढ आपला वेग भीतीदायकरीत्या वाढवते आहे. मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे अनेक जीवप्रजातींचा अधिवास अन् आयुष्य धोक्यात आहे, तर कित्येक नामशेष झाल्या आहेत.

मे २०२० मध्ये कार्बन डायऑक्साइडचं वातावरणातील प्रमाण सर्वाधिक धोकादायक पातळीवर, म्हणजे ४१६ पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) होतं. गंगा नदीमुळे वारंवार ओढवणारी पूरपरिस्थिती पाहून घाबरून गेलेल्या हरिद्वारमधील ११ वर्षांच्या रिधिमा पांडेनं २०१७ मध्येच राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यात ‘हवामानबदलाचे परिणाम रोखण्यासाठी भारत सरकार पुरेशी पावलं उचलत नाही. त्यांनी वैज्ञानिक आणि संशोधकांचं ऐकून कृतीचे आदेश द्यावेत’ असं म्हटलं होतं. पण तिचं म्हणणं स्वीकारलं गेलं नाही. परिणामी तिला सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागली. या सर्व गोष्टींकडे झालेली डोळेझाक अक्षम्य आहेच, पण त्याहूनही अक्षम्य आहे ते माणसांचं या परिस्थितीत जगणं गृहीत धरणं. समाजाला, त्यातील संवेदनशील घटकांना सर्वथा गृहीत धरणं.

समुद्राची वाढणारी पातळी अन् सततची चक्रीवादळं, पूर, यामुळे कितीतरी गावं आत्तापर्यंत पाण्याखाली गेली आहेत. कित्येक कुटुंबं बेघर झाली आहेत. पूर्णपणे नैसर्गिक जीवनशैली जगणाऱ्या आदिवासींच्या हातातला घास हिरावून घेतला गेला, त्यांच्या वस्त्या उद्ध्वस्त झाल्यात. प्रशांत महासागरातील चिमुकली हवाई बेटं पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. इथल्या आदिवासी जमाती, स्त्रिया आणि मुलं, यांच्यावर मोठाच विपरीत परिणाम झाला आहे. ज्यांच्या हातात दुय्यम अधिकार, कमी मालमत्ता अन् आर्थिक सुबत्तेची वानवा आहे, त्यांना यातून सावरायला फार वेळ लागत आहे. ब्रिटनसारख्या देशानं ठराव संमत करून वातावरणबदलासंबंधी आणीबाणी जाहीर केली. पण अजूनही विकसित देशांत कागदावर मांडलेले ठराव अन् प्रत्यक्ष कृती यांत कमालीची तफावत दिसून येते. विकसनशील देश तर दूरच राहिले!  भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या विकसनशील देशात, जिथे जनतेला मूलभूत सोयींची वानवा आहे, तिथे तर या मुद्दय़ांवर चर्चा होतच नाही. भरमसाट औद्योगिक प्रगती करून लोकांना दारिद्रय़ाच्या विळख्यातून बाहेर काढणं हेच जिथे प्रथम उद्दिष्ट आहे, तिथे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

हवामानबदलामुळे ओढवलेल्या आपत्तींनी विषुववृत्त आणि आसपासच्या प्रदेशातल्या बेटांवर, सागरकिनारी मुक्काम ठोकून राहाणाऱ्या आदिवासी जमातींचे पोटापाण्याचे व्यवसाय, अधिवास हिरावून घेतले. ‘कॅटरिना’ नावाच्या चक्रीवादळानं जो धुमाकूळ घातला त्यानंतर विस्थापित झालेल्या हजारो कुटुंबांतील ८३ टक्के  माता आपल्या मुलांना दोन वर्षांपर्यत भेटू शकल्या नाहीत. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, त्यात दोन तृतीयांश स्त्रिया होत्या. हजारो निराधार झाल्या. या आकडेवारीत पुरुषांना किंवा बहुसंख्याक घटकाला डावलण्याचा उद्देश नाही, तर मुळातच ज्यांच्या विकासाला कमी प्राधान्य दिलं गेलं, त्यांची झालेली ससेहोलपट नजरेत आणण्याचा उद्देश आहे. कदाचित यामुळेच हवामानबदलाविरुद्ध जागरूकता आणणाऱ्या या चळवळींची धार स्थानिक, वंचित, बालकं अन् स्त्रियांच्या दृष्टीनं जेवढी तीव्र बनली, तेवढी इतर कुणासाठी नाही. १८ वर्षांच्या इंडोनेशियन-डच वंशाच्या मेलाती विजसेन या मुलीनं आपल्या देशातील बदलत्या परिस्थितीमुळे व्यथित होत प्लॅस्टिकवर बंदी आणण्यासाठी ‘बाय बाय प्लॅस्टिक बॅग्ज’ संस्थेची स्थापना केली. ब्राझिलची १९ वर्षांची कार्यकर्ती आर्टेमिसा झक्रियाबा जेव्हा सात वर्षांची होती, तेव्हा तिनं मिनास गेराईस भागातील त्यांच्या स्थानिक जमिनीत होणारी वृक्षतोड अन् त्यामुळे समाजाला बसणारी झळ अनुभवली आणि त्याविरुद्ध आवाज उठवला.

महत्त्वाच्या सरकारी पदांवर काम करणाऱ्या स्त्रियांचा पर्यावरणाच्या दृष्टीनं अनुकूल धोरणांच्या बाबतीत सकारात्मक आणि संवेदनशील असण्याकडे कल आहे. उद्याची स्त्री बनण्याकडे पावलं टाकणाऱ्या किशोरवयीन मुली जागोजागी या चळवळींचं नेतृत्व करताना दिसतात. फु लण्याच्या वयात त्यांना सामोऱ्या जावं लागणाऱ्या अनेक आव्हानांपैकी असुरक्षित भविष्य हेही एक आव्हान बनलं आहे. त्यांच्यासाठी हवामानबदल, त्यामुळे उद्भवणाऱ्या आपत्ती यांच्याबद्दल माहिती असणं, हे बियॉन्से या प्रचंड लोकप्रियता असणाऱ्या गायिकेबद्दल माहिती असण्याइतकं सहज घडून आलंय. नवीन तंत्रज्ञान आणि पुढारलेल्या विज्ञानानं त्यांना एका समावेशक वैज्ञानिक दृष्टिकोनाची भेट दिली आहे, ज्याला आता त्यांच्या अस्तित्वापासून अलग करणं शक्य नाही. पूर्ण जग भोगवादी जीवनशैलीकडे झुकत असताना या मुली आपली जीवनशैली अधिकाधिक पर्यावरणपूरक बनवण्यासाठी प्रयत्न करतात. आचरणातून इतर मुलामुलींना धडे घालून देतात, विकासाची नवी व्याख्या बनवतात. यांनी समाजाचं सरळसरळ दोन गटांत विभाजन केलं आहे, पर्यावरणपूरक आणि पर्यावरणविरोधी. त्यांच्यावर गटबाजीच्या राजकारणाला बळी पडल्याचा आरोप केला जातो. पण त्यांचा खणखणीत आवाज कुणीच कानाआड करू शकत नाही.

मुळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असणाऱ्या विकासाचा ओढा एवढा वेगवान आहे की आपण सारेच एका अनिश्चित भविष्याकडे ढकलले जातोय. गावखेडी विस्थापित होत आहेत, त्या जागी शहरं उभी राहात आहेत. पैसा, संसाधनं, न्यायव्यवस्था, माध्यमं आणि महत्त्वाचं म्हणजे सत्ता ज्या समूहांच्या हातात आहे त्यांना हा बदल घडवून आणण्यासाठी, निसर्ग अन् पर्यावरणाचा नाश झाला तरी बेहत्तर, पण अनियंत्रित विकास करायचाच आहे. हा विकास कोणत्या मार्गानं जातोय हे समजून घेण्यात सामान्य जनतेला स्वारस्य नाही, कारण त्यांच्यापुढे उपजीविका आणि राहाणीमान यांच्यासारखे, त्यांना तुलनेनं महत्त्वाचे वाटणारे प्रश्न उभे आहेत. आपल्याला या विकासाच्या स्वप्नाची इतकी सवय झाली आहे की त्याला ओलांडून पर्यावरण रक्षण करायचं म्हटलं, तर अनेक असुरक्षितता आपल्या डोळ्यांसमोर उभ्या ठाकतात. या स्वप्नाला गोंजारून त्याला अधिक गोंडस नाव दिलं जातं, ते म्हणजे शाश्वत विकास. पण हा विकास पुढील पिढय़ांच्या भविष्यावर टाच देऊन केला जात असेल तर?  इथेच मग दोन पिढय़ांमध्ये संघर्षांची ठिणगी पडते. त्या ठिणगीचं नाव ग्रेटा थनबर्ग असतं.

‘करोना’मुळे या तथाकथित विकासाला दोन पावलं मागे जायला लागलं, तेव्हा ३५० तरुणांची दोन आठवडय़ांची जागतिक ‘व्हर्चुअल’  हवामान परिषद भरवली गेली. यातून विकसनशील देशांतील पर्यावरण चळवळीला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘करोना’ साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती ही पुढे येऊ घातलेल्या, हवामानबदलामुळे होऊ घातलेल्या विशाल विनाशाची छोटीशी रंगीत तालीम असू शकते. भूपृष्ठावर तापमान वाढल्यास संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.  म्हणूनच या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष झालं तर भविष्यात अशा अनेक साथी डोकं वर काढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. घसरलेलं अर्थकारण, ढासळलेली दळणवळण व्यवस्था अन् लाखो लोकांची उपासमार यातून परिस्थिती पूर्ववत होत असताना निसर्गाच्या जवळ जायचा प्रयत्न केला तरच पृथ्वीचं भविष्य सुरक्षित राहील.

हिंसाचार, मानसिक अस्वास्थ्य आणि विषमता यांच्या पकडीतून वंचित आणि संवेदनशील घटकांना बाहेर काढण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. जागोजागी चळवळींचा चेहरा बनलेल्या या मुलींवर लक्ष केंद्रित करावंच लागेल. म्हणूनच..

या मुलांमुलींचं म्हणणं मनावर घ्यावंच लागेल.

मूळच्या गोव्याच्या असलेल्या आणि लहानपणापासूनच लेखनाची आवड असणाऱ्या सिद्धी महाजन यांची सर्जनात्मक लिखाण प्रकारात राज्यस्तरीय ‘बालश्री’ पुरस्कारासाठी निवड झाली होती. वयाच्या चौदाव्या वर्षी ‘आरती मासिक काव्य पुरस्कार’, ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि ‘गोमंतक मराठी अकादमी’चे कवितालेखनासाठीचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. २०११ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा पहिला कवितासंग्रह- ‘शिदोरी’ प्रकाशित झाला आणि त्याला ‘गोमंतक विद्या निकेतन’ या संस्थेचा राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार मिळाला. नुकतीच भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी तसेच ‘बी .एड.’ पदवी प्राप्त के लेल्या सिद्धी यांनी काही महिने उच्च माध्यमिक विद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन के ले आहे. त्या सातत्याने विज्ञान साहित्य, मराठी, हिंदी, इंग्रजी कविता आणि ललित लेखन करत असून विविध मराठी वृत्तपत्रांसह मासिके  आणि दिवाळी अंकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे.

snmhjn33@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2021 12:01 am

Web Title: vasundharechya leki article on story of angry girls by siddhi mahajan abn 97
Next Stories
1 गद्धेपंचविशी : स्वत:ला शोधताना..
2 एक दशक संपताना!
3 गर्जा मराठीचा जयजयकार : मराठीची पताका फडकत राहो!
Just Now!
X