अर्चना जगदीश

निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे आपण अधिकाधिक गत्रेत चाललो आहोत याचं सुंदरबन हे मोठं उदाहरण आहे. यावर उपाय करण्यासाठी अनेक संस्था आणि लोक काम करतात पण कांदळवनाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम खूप अवघड, दीर्घकालीन आहे. ऐन पंचविशीत सरकारी नोकरी सोडून जंगल आणि कांदळवनाच्या संरक्षणाच्या कामाला वाहून घेतलेल्या, गेली वीस वर्ष ‘न्यूज’ संस्थेमध्ये मुख्य प्रकल्प संचालक म्हणून काम करणाऱ्या अजंता डे यांच्याविषयी..

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
how to make sabudana papad at home recipe
Recipe : वर्षभर टिकणारे साबुदाणा पापड कसे बनवावे? पापडाचे वाळवण कसे घालावे? पाहा हे प्रमाण
People with diabetes Can Eat roasted or baked snacks Is this safe for blood sugar patients Need To Know What To Eat
मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Construction of 121 artificial reefs on Konkan coast for fish conservation
मत्स्यसंवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर १२१ कृत्रिम भित्तिकांची उभारणी

अथांग समुद्र, पाण्याची निळाई, किनाऱ्यावरची मऊ पुळण, अनंत क्षितीज, सूर्योदय किंवा सूर्यास्त, लाटांचा खेळ हे सगळं प्रत्येकाला कधी तरी भावलेलं असतं आणि म्हणूनच समुद्र आवडतोच, त्याबद्दलच एक सुप्त आकर्षण असतं मनामनात. कारण आपली पृथ्वी-जमीन हीच समुद्रात वसलेली आहे. आपलं जीवन जमिनीवर तितकंच समुद्रावरही अवलंबून आहे हे विज्ञानाने वारंवार सिद्ध केलं आहे.

मात्र हाच समुद्र रौद्र रूप धारण करतो, वादळं तयार करतो, भूगोलाच्या पुस्तकातले आपल्याला लक्षात ठेवायला सहसा न आवडणारे प्रवाह, खारे वारे -मतलई वारे इथेच तयार होतात आणि भारतीय उपखंडातील जीवन ज्यावर अवलंबून आहे तो मोसमी पाऊसदेखील समुद्रामुळेच तयार होतो. मात्र असं असलं तरी समुद्राकडून आपण फक्त घेतो. माणसाचं मुख्य अन्न जमिनीवर तयार होतं तसंच सागरातही. मात्र औद्योगिक क्रांतीपासून तंत्रज्ञानाच्या प्रगतीपर्यंत म्हणजे गेल्या शंभर वर्षांत समुद्राचा जास्तीतजास्त ऱ्हास होत गेला. माणसाची प्रत्येक बाबतीतली अभिलाषा महाप्रचंड बनली. आज जितकी जमीन आणि हवा प्रदूषित आहे तितकाच किंबहुना जास्त प्रमाणात समुद्र प्रदूषित झाला आहे. समुद्रातून मिळणारे मासे आणि इतर जीवांवर या प्रदूषणाचा परिणाम होतो आहे. म्हणूनच पुढच्या पंचवीस-तीस वर्षांत समुद्रातला आहे तो अविरत अन्नसाठा आणि त्यावर अवलंबून असणारं करोडो माणसांचं जीवन धोक्यात येणार आहे, असं भाकीत अनेक पर्यावरणवादी सातत्याने करत आहेत. मात्र हे सगळं आपल्या लक्षात कधी येणार? यावर उपाय कोण करणार? हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहतात.

समुद्रात किंवा त्याच्या आसपास मोठा भूकंप झाला तर विनाशकारी ऊर्जा भूगर्भातून बाहेर पडते आणि अजस्र लाटा विनाश करण्यासाठी किनाऱ्याकडे झेपावतात. निसर्गाचा उत्पात कदाचित निसर्गच थांबवू शकतो, या न्यायाने असेल, पण त्सुनामीमधून येणारी ऊर्जा आणि विनाश यांना रोखण्याचं काम करू शकतात किनाऱ्यावरची कांदळवनं अर्थात मॅन्ग्रोव्हज. जिथे नद्या समुद्राला मिळतात अशा ठिकाणी मुख्यत: उष्ण कटिबंधात या विशिष्ट वनस्पती आढळतात. खाऱ्या पाण्यातही वाढणाऱ्या, भरती-ओहोटी आणि क्षारांच्या प्रमाणातील रोजचा फरक सहन करणाऱ्या कांदळवनातील वनस्पती म्हणजे खरं तर निसर्गाने दिलेलं वरदानच आहे. भारतात २००४ मध्ये  इंडोनेशियामधल्या समुद्री भूकंपामुळे आलेली त्सुनामी तडाखा देऊन गेली आणि दक्षिण भारतात तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातल्या किनाऱ्यांना याचा फटका बसला. प्रचंड आर्थिक नुकसान झालंच, पण अनेकांनी जीवही गमावले त्या उत्पातात. मात्र ओरिसामधल्या अनेक किनाऱ्यांवर त्सुनामी झेलण्याचं, रोखून धरण्याचं काम कांदळवनांनी केलं. गहिरमाथा, उषाकोठी अशा कांदळवन अभयारण्यामुळे तिथल्या मॅन्ग्रोव्हजच्या आच्छादनामुळे त्सुनामीच्या प्रचंड लाटा येऊनही विनाश खूप कमी झाला. अर्थात फक्त त्सुनामी आली तरच या कांदळवनांचा उपयोग असतो असं नाही; तर खेकडे, कालवं, वेगवेगळे मासे आणि अनेक समुद्री जीवांच्या वाढीसाठी पोषक अन्न याच कांदळवनांमध्ये असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वनस्पतीमध्ये कार्बन धरून साठवून ठेवण्याचं प्रमाण जमिनीवरच्या वनस्पती – वृक्षापेक्षा १० ते १२ टक्के इतकं जास्त असतं. अर्थात असं असलं तरी उष्ण कटिबंधातल्या, विशेषत: दक्षिण आणि आग्नेय आशियातल्या, अनेक देशांमध्ये या कांदळवनांचा खूप मोठय़ा प्रमाणावर नाश सुरू आहे. कधी किनाऱ्यावर विकासकामे म्हणजे रस्ते, पर्यटन यासाठी या वनांची कत्तल होते, तर कधी ही वने तोडून अधिक जमीन तयार करण्यासाठी भराव घालून समुद्र मागे ढकलला जातो. मुंबईची मूळची सात बेटं जोडण्यासाठी असंच केलं होतं. किनाऱ्यांवर राहणारे एक लोक इंधन म्हणून या वनस्पतींचा सर्रास उपयोग करतात. आज अलिबागचे अनेक किनारे त्यामुळेच  उजाड झालेले दिसतात. अनेक दुर्मीळ आणि लुप्तप्राय प्रजातींमध्ये अनेक कांदळवनवर्गीय वनस्पतीचा समावेश आहे आणि जगभरात या वनस्पतीच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत.

भारतात पश्चिम किनाऱ्यावर कांदळवनं आहेत, पण त्यांचं प्रमाण पूर्व किनाऱ्यावर अधिक आहे. भारतातला सर्वात मोठा कांदळवनांचा प्रदेश म्हणजे गंगेच्या त्रिभुज प्रदेशातलं सुंदरबन. हा प्रदेश एकूण १०००० वर्ग किमी परिसरात पसरला आहे. त्यातला ४० टक्के भाग भारतात आहे तर उरलेला बांगला देशामध्ये. पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात पसरलेल्या सुंदरबन परिसरात एकूण ११०० गावं आहेत. उथळ पाण्यातल्या छोटय़ा छोटय़ा बेटांमध्ये पसरलेल्या या प्रदेशात स्थानविशिष्ट गंगा डॉल्फिन्स, खाजणातल्या मगरी, भारतीय वाघ तसंच इतरही अनेक प्राणी आणि वनस्पती आढळतात. वातावरणबदलाचे दुष्परिणाम या भागालाच सहन करावे लागणार आहेत. चक्रीवादळं, सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि किनाऱ्यांचं भूस्खलन या येत्या काही वर्षांतल्या मुख्य समस्या आहेत. कांदळवनांचा अतिवापर आणि विनाश त्यामुळे अन्न उत्पादनावर होणारा परिणाम आणि कांदळवनं नष्ट झाली तर त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचे भविष्यातले प्रश्न अशी न संपणारी प्रश्नमालिका.. ही कांदळवनं नष्ट होत चालल्यामुळे त्याला लागून असणाऱ्या जंगलातले प्राणी आता या छोटय़ा बेटांवरच्या गावांपर्यंत पोचू लागले आहेत आणि सुंदरबनच्या वाघांच्या भयकारी हकिगती आपण सतत वाचत ऐकत असतो. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे आपण अधिकाधिक गत्रेत चाललो आहोत याचं सुंदरबन हे मोठं उदाहरण आहे. यावर उपाय करण्यासाठी अनेक संस्था आणि लोक काम करतात, पण कांदळवनाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम खूप अवघड, दीर्घकालीन आहे. ते मोठय़ा प्रमाणावर केलं तरच उपयोग होणार आहे हे जाणवल्यामुळे कोलकाताच्या ‘न्यूज’ संस्थेची अजंता डे गेली पंधरा-वीस वर्ष यासाठी अथक प्रयत्न करते आहे हे फारसं कुणाला माहीतही नाही.

मे २००९ मध्ये कोलकाताच्या किनाऱ्याला ‘आयला’ या चक्रीवादळाचा तडाखा बसला होता आणि सुंदरबन भागातल्या १८ हजारांहून अधिक लोकांना बेघर व्हावं लागलं होतं. इथलं कांदळवनांचं आच्छादन केव्हाच नाहीसं झालं होतं. त्यामुळे वादळाच्या वेळी समुद्राचं पाणी सरळ गावांमध्ये घुसलं आणि प्रचंड नुकसान झालं. न्यूज म्हणजे ‘नेचर एनव्हायर्नमेंट अ‍ॅण्ड वाइल्डलाइफ सोसायटी’ ही संस्था आधीपासूनच निसर्गसंवर्धनासाठी काम करत होती, स्थानिक लोकांना सहभागी करून घेत होती. पण या वादळाने कांदळवन पुनरुज्जीवन आणि पुनर्लागवड करायलाच हवी हे प्रकर्षांने जाणवलं. अजंता डेने तरी हे आव्हान स्वीकारलं. ती आता पन्नाशीपार आहे पण ऐन पंचविशीत सरकारी नोकरी सोडून जंगल आणि निसर्ग संरक्षणाच्या कामाला तिने वाहून घेतले आहे. गणित विषयातली पदवी असली ओढा पूर्वीपासून निसर्ग आणि त्यासंबंधीचं वाचन-लिखाण आणि काम याकडे. गेली वीस वर्ष ती ‘न्यूज’ संस्थेमध्ये मुख्य प्रकल्प संचालक म्हणून काम करते आहे.

२००९ च्या चक्रीवादळापासून कांदळवनं वाढवणं, आहेत त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणं हे सुरू होतं. तिने मुख्यत: गावातल्या स्त्रियांना कांदळवनाच्या रोपवाटिका तयार करण्याच्या कामात सहभागी करून घेतलं आणि त्यांना प्रत्येक रोपामागे काही पैसे द्यायला सुरुवात केली. तसंच वाढलेली रोपं बघून त्याबद्दलही मोबदला द्यायला सुरुवात केली. तो अल्प असला तरी बायकांना पैसे हातात मिळायला लागल्यामुळे त्यांचा सहभाग वाढला. त्या कांदळवनांचं महत्त्व समजून घ्यायला लागल्या. पण फक्त १००-२०० हेक्टरवर कांदळवन लागवड करून मोठय़ा नैसर्गिक आपत्तींना तोंड देणं शक्य नव्हतं. ते काम मोठय़ा प्रमाणावर होणं गरजेचं होतं. दहा वर्षांपूर्वी वातावरण बदलाला उत्तर म्हणून जास्तीजास्त कार्बन धरून ठेवणाऱ्या वनस्पतींची लागवड करून त्याबद्दलची कार्बन क्रेडिट्स घेणं तेजीत होतं. प्रदूषण करणाऱ्या अनेक कंपन्या अशा तऱ्हेच्या कामात पैसे गुंतवायला तयार होत्या. अजंता आणि तिच्या सहकाऱ्यांनी खूप काळजीपूर्वक एक प्रकल्प अहवाल तयार केला. कांदळवनांची कार्बन धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते हे लक्षात घेऊन मोठय़ा प्रमाणावर लागवड, त्यानंतर जवळजवळ दहा वर्ष त्यांची देखभाल करणं आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक लोकांना इंधनासाठी तसंच उपजीविकेसाठी पर्याय तयार करणं अशा सर्व गोष्टींचा त्यात समावेश होता. भरपूर चर्चा, पुन्हापुन्हा प्रकल्प अहवाल दुरुस्ती अशा लांबलचक प्रक्रियेनंतर दानोन या फ्रेंच कंपनीने हा अहवाल मान्य केला. त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या उपजीविका फंडामार्फत सुंदरबनात कांदळवन लागवड कार्यक्रमासाठी वीस वर्ष गुंतवणूक करण्याचा करार केला. या फंडात दानोनबरोबर हर्मीस, सॅप, श्नायडर इत्यादी आणखी ११ बहुराष्ट्रीय कंपन्याही सहभागी होत्या. तेव्हापासून अजंता आणि तिच्या सहकाऱ्यांनी मागे वळून बघितलं नाही. या फंडामार्फत दर वर्षी हा प्रकल्प राबवण्यासाठी साधारणत: १ कोटी रुपये गुंतवले जातात.

‘न्यूज’मार्फत अजंताच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प २०१० पासून सुंदरबन विभागातल्या १४ तालुक्यांमधल्या ५९ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जातो. रैमंगल, बिद्या, माटला, ठाकुराई आणि मुरिगंगा या पाच नद्यांच्या खाडय़ांच्या आजूबाजूला हा प्रकल्प राबवला जातो. एकूण १७० ठिकाणी प्रत्यक्ष कांदळवन लागवड केली जाते आणि आतापर्यंत ५ हजारांपेक्षा अधिक हेक्टर्सवर हे काम पूर्ण झालं आहे. कोटय़वधी खाजण वृक्षांची लागवड करण्यात आली आहे आणि गेल्या काही वर्षांत कांदळवनांमध्ये १४ टक्के वाढ दिसून आलीय. १८०० स्थानिक स्त्रिया या कार्यक्रमात सहभागी झाल्यात आणि २५० हून अधिक स्थानिक लोक या प्रकल्पाची सतत पाहणी आणि संरक्षणाच्या कामात भागीदार आहेत. अजंताला या कामासाठी मानसन्मान मिळाले नसले तरी अनेकदा ती भेटते तेव्हा ती कामाबद्दल भरभरून बोलत असते आणि त्यांचा एकमेव कार्बन क्रेडिट्स प्रत्यक्षात आणणारा प्रोजेक्ट बघायला ये, असं नेहमी म्हणते. काम करताना आजही खूप शिकायला मिळतं हेही ती आवर्जून सांगते.

अर्थात अजंताचं काम अनेक पटींनी वाढलंय. संस्था चालवताना येणाऱ्या अडचणी म्हणजे लोक सोडून जाणं, तरुण लोकांना कामात सहभागी होण्यात रस नाही आणि प्रकल्पाचा सततचा अहवाल देत राहणं या गोष्टी अनेकदा तिला निराश करतात. पण गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या कामाचा खरा उपयोग होताना दिसला की अजंता पुन्हा नवीन गावांमध्ये लागवडी आणि कांदळवन बघायला जाण्यासाठी पूर्वीच्याच उत्साहाने तयार होते. कारण सर्वत्र निसर्गाचा विनाश दिसत असताना आपण तो थांबवण्यासाठी जमिनीवर काही तरी करतो आहोत, त्याचा फायदा लोकांना मिळतो आहे, ही समज तिच्यासाठी पुरेशी आहे.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com